तमाशा हा कलाप्रकार महाराष्ट्रात रुजला,वाढला आणि बहरला.महाराष्ट्रात काही जातिवंत कलाकार ही कला जपावी म्हणून पिढ्यानपिढ्या काम करत होती.पेशवाईच्या काळात मात्र या कलेकडे आंबटशौकीन लोकांची आवड असलेली कला असा समज जनमानसात होऊलागला .तथाकथित कुलिन स्रिया तर या कलेकडे तुच्छ नजरेन पाहत.दौलत जादा करण्यासाठी तालेवार मंडळी हि कला पाहायला येत,परंतु आपल्या गिधाडी वृत्तीने नर्तिकेच शील भंग करण्यासाठीही मागेपुढे पाहत नसत.किशोर शांताबाई काळे यांच्या "कोल्हाट्याच पोर" या पुस्तकात तर या बद्दल केलेलं वर्णन ऐकल कि जीवाच पाणीपाणी होत.
तमाशा हि महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यासाठी महार ,मांग,कोल्हाटी,ढोर या समाजातील कलाकारांनी महत्वाच योगदान दिलं आहे.पवळा पासून विठाबाई नारायणगावकर आणि कांताबाईसातारकरांपासून मंगला बनसोडे यांच्यापर्यंत सर्वच तमाशा कलावंतांनी आपलं आयुष्य भरीस घातलं.या सगळ्या प्रवासाची सुरुवात होते ती नागचंद पवळा या नर्तिकेपासून.तमाशा क्षेत्रात आजवर सर्वात रूपवान स्त्री म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या "नागचंद पवळा"संगमनेर तालुक्यातील हिवरगावच्या.नाशिकहून संगमनेरमार्गे पुण्याला जाताना जो चंदनापुरी घाट लागतो,त्या घाटाच्या पायथ्याशी असलेलं हिवरगाव पावसा हे गाव.अहमदनगरसारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडत असलेला हा प्रदेश कायम दुष्काळीच राहिला.अशाहीदुष्काळी आणि पराकोटीच जातीय वास्तव असलेल्या काळात पवळाची जडणघडण होत होती. तबाजी भालेराव या महाराची ही ८ वी पोर, १८८१ चा पवळाचा जन्म. घरात अठराविश्वे दारिद्र्य.तारुण्याच्या उंबरठ्यावर येताच हीला मुरळी म्हणून देवाला(खंडोबाला) दान केलं. मुरळीम्हणून पवळा नाचगाणे करू लागल्या. हे करतानाच या काळातले जाणकार राणुजी रोहोम यांच्याकडे त्या नाचगाणी शिकल्या. नामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचल्या. नाच्या पोरांच्या जमान्यात पवळायांच्यासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदाव्हायचे.पवळा यांच्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केली. पवळा यांच्या रूपाने तमाशात नाचनारीन म्हणून स्त्रीचा समावेश झाला. नाच्या पोरगा "मावशी"च्या रुपात वावरू लागला. पुढे मुंबईमध्ये पिला हाउसला पठ्ठे बापुरावांनी पवळा यांची अदाकारी पहिली आणि हे शाहीर त्यांच्यारूपावर आणि कलेवर प्रभावित झाले. नंतर पवळा या पठ्ठे बापुरावांसोबत काम करू लागल्या. पठ्ठे बापुराव हे सिद्ध मराठी शाहीर. त्याचं मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. जन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवे, जिल्हा सागंली) ह्या गावी. शिक्षण इंग्रजीतून चार-पाच इयत्तांपर्यंत.बापूराव ब्राह्मण होते.. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झालेला होता; परंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. स्वतःचा फड उभारून त्यात स्वरचित लावण्या व कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. . पठ्ठेबापूरावांनी गाण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात. त्यांना त्यांच्या प्रतिभेची शक्ती मिळून देण्यात पवळा याचं असलेलंयोगदान नाकारता येणार नाही.
पवळा यांच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जाते, तमाशाप्रेमी बाबुराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहे, पवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिले. पवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होते. तिचा गळामुळातच अतिशय गोड होता. तिचे अप्रतिम सौंदर्य, तिची नृत्यकला आणि तिचा गोड गळा यावरून लोक तिला ’नामचंद पवळा’ म्हणू लागले. नामा धुलवडकराचा तमाशा फुटल्यावर पवळा, पठ्ठे बापूराव यांच्या तमाशात आली. प्रतिभावान तमाशा कलावंत रघुवीर खेडकर या बद्दलअतिशय रंजक अशी माहिती सांगतात, पवळा आणि बापूराव यांचा संगम हा बापूरावांच्या प्रतिभेच्या परमोत्कर्षास कारणीभूत झाला. आणि त्याचवेळी बापूराव बाटले, त्यांना हद्दपार का करू नये अशी लोकांत चर्चा सुरू झाली.प्रखर जातीय व्यवस्था आणि शिवाशिव पाळणाऱ्यासमाजात तर गहजब होणे साहजिकच होत. समाजात अशांतता पसरत होती. आणि शेवटी पठ्ठे बापूराव आणि पवळा यांना कोर्टाचे बोलावणे आले. न्यायाधीशाने बापूरावांना "तुम्ही बाटलांत का’ असे विचारले. त्याच्या उत्तरासाठी बापूरावांनी कोर्टातल्या न्यायाधीशांना आपल्यातमाशाचे आमंत्रण दिले. न्यायाधीश तमाशाला आले आणि बापूरावांनी कवन सुरू केले.:-
श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनी, सोवळे ठेवले घालुन घडी
मशाल धरली हाती तमाशाची, लाज लाविली देशोधडी
कलियुगाचा ऐका दाखला, पठ्ठे बापुराव भुलला पवळिला
महारिणीसाठी महार झाला
पुन्हा जात मिळेल का हो त्याला
ब्राह्मणाला हो जी जी ॥
जातीपातीच्या पलीकडे जाऊन पठ्ठे बापूराव आणि पवळा कला जगण्यासाठी आणि जागविण्यासाठी विचार करत होते,हे न्यायालयाच्या लक्षात आले आणि,कोर्टाने बापूराव आणि पवळाला निर्दोष सोडले. पुढे पुन्हा त्यांचा तमाशाचा फड सुरू झाला.
आपण आजपर्यंत माधुरी अथवा ऐश्वर्या या कलावंतिणींना पाहायला तिकीट ठेवल्याची बातमी ऐकली नाही पण पवळा यांना पहायला तिकीट असायचं, हे वाचलं की पवळायांच्या सौंदर्याची कल्पना येते. तिकीट घेऊन एखादा कलाकार बघायला जाणे आताच्या काळातही तर्कसंगत वाटत नाही. मुंबईत थिएटर मालक अबुशेठ पवळा यांना भरजरी साडीत केस मोकळे करून खुर्चीवर बसवत. सोबत पठ्ठे बापूराव असत. या जोडीला पाहायला त्या वेळी ४ आणे तिकीट असायचं. लोकांची प्रचंड गर्दी होई.
पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांना ताला-सुरांचा साज चढून त्याला तमाशात पेश करायचं काम पवळाने केल म्हणून २० व्या शतकात तमाशा क्षेत्रात अजरामर जोडी म्हणून पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्याकडे पाहिलं जात.
भारतीय जातीव्यवस्थेची बळी पवळा यासुद्धा ठरल्या, आजही त्यांना कुठलीही प्रसिद्धी दिली जात नाही,त्यांच्या राहत्या गावी त्यांचे स्मारक सुद्धा नाही. रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना... पवळा हिवरगावकर या अजूनही उपेक्षितच आहे.
रंगभूमीवरील पहिल्या महिला नृत्यांगना... पवळा हीवरगावकर यांना मानाचा मुजरा !!
------------------------------ ------------------------------ ----------
लेख- सागर भालेराव.

खुप छान सागर
ReplyDelete