'घाल,अंगावर गाडी पोरा.नाहीतरी जगून काय फायदा? एखादी गाडी यावी आणि आम्हाला चिरडून जाव असं वाटतंय आता'. मुंबई महानगरातील कायम कलंकित समजल्या जाणाऱ्या वस्तीत आम्ही उभे होतो. कामाठीपुरा. वेश्यावस्ती म्हणून प्रसिद्ध असलेला हा मुंबईचाच एक भाग ,येथे देहव्यापार चालतो.वस्तीत शिरल्यावर जिथे आम्ही आमची दुचाकी लावायला थांबलो ,तिथे साठी ओलांडलेली एक महिला बसलेली होती ,त्या महिलेने आम्हाला हे बोल सुनावले होते. म्हटलं, काय झालं आंटी? एवढ्यात काय मरायचे स्वप्न बघताय? जगा कि पोटभरून. आंटी बोलायला लागल्या,विनाकारण जगण्यात काय मजा? जवानीत असताना भरपूर पैसा कमवला.आता या वयात कोण विचारतंय? पोटात घालायला अन्न नाही.शेजारी गिऱ्हाईकांची वाट बघत उभ्या असलेल्या मुलींकडे बघत म्हणाली, या पोरी देत असतात दिवसाला १०-२० रुपये, तेव्हा जेवण-चहा,नाश्ता याची सोय होत असते. या आंटी हेंद्राबादवरुन ४० वर्षांपूर्वी मुंबईत आल्या. अगोदरच घरच अठराविश्वे दारिद्र्य.तेव्हा झटपट पैसे कमावण्याचा मार्ग म्हणजे वेश्याव्यवसाय. हा काटेरी मार्ग पत्करला आणि उभ्या आयुष्याचं वाळवंट झालं. आज या आंटीच्या मागेपुढे बघणार कुणीही नाही.नातेवाईक काय म्हणून मला संभाळतील असा आंटीचा प्रश्न आहे,तेव्हा लाचारीचं जगणं नातेवाईकांच्या दारात काढण्यापेक्षा,ज्या कामाठीपुऱ्यानं बदनाम केलं,लाचार केलं, तिथेच भीक मागून खाण्यात काय वाईट असं तिचं म्हणणं आहे.
यांचा भूतकाळ,वर्तमानकाळ अंधारात होता,आणि आहे.भविष्याबद्दल माहिती नाही.
***
२.
आंटीसोबत गप्पा झाल्यावर वस्तीमध्ये शिरलो. पुण्याच्या बुधवार पेठेत एकदा गेलो होतो.पुण्याची ही वेश्यावस्ती त्यामानाने अधिक फुललेली वाटली होती. वेश्यावस्ती फुललेली असणं म्हणजे समाजाचं बदफैली असणं आहे. बदफैली असं म्हणजे तरी काय? या वेश्यासमाजाला बिघडवतात काय? कि बिघडलेला समाज यांना असा दूर अंधारात लोटतो? ही शोषणाची प्रक्रिया दोन्ही बाजूने चालते कि एकाच बाजूने अव्याहत सुरु आहे? या सगळ्या प्रक्रियेचा लगाम कुणाचा हातात आहे? याच मूळ शोधायला वेळ आहे का आपल्याकडे ? या सगळ्यांची उत्तरे नकारात्मक भेटतात.जिथे सुरुवात माहित नाही,शेवट काय असेल याचा कयास लावता येत नाही त्या भानगडीत पडायच तरी कशाला!
मायानगरी मुंबईमधली वेश्यावस्ती म्हणजे ग्लॅमर असलेली हवी,झगमगाट असावा,सुंदर सुंदर ललना असाव्यात. असं काहीस चित्र माझ्या मनात होत.कदाचित चित्रपटांचा,कादंबऱ्यांचा हा प्रभाव असावा. परंतु असं काहीही चित्र इथं नव्हतं. अगदी शांतपणे इथला कारभार चालू होता.नेहमीची गिऱ्हाईक मंडळी नेहमीच्या ठिकाणी जात होती.सगळं काही नेहमीसारखं. नावीन्य त्यात नव्हतंच.देहव्यापार करणाऱ्या स्रिया एकमेकींशी गप्पा मारण्यात गुंग होत्या. चहाच्या टपरीवर एका दारुड्याला टपरीचा मालक मारहाण करत होता. प्रत्येकजण आपलं आपलं काम करण्यात गुंग होते.हे सगळं निरखण्यात वेगळी मजा होती. या वस्तीतून चालत चालत एका चाळीत शिरलो.दणादण डीजेचा आवाज येत होता. 'अफगाण जिलेबी' हे गाणं मोठ्यानं वाजत होत. जवळ जाऊन पाहिलं, तर कळलं कि तिथे कुणाचा तरी वाढदिवस होता.कुणा वेश्येच्या मुलाचा तो पहिलाच वाढदिवस होता. मस्तपैकी मंडप,रोषणाई,सजावट,अशा थाटात तो वाढदिवस त्या चाळीतील प्रत्येक वेश्या साजरा करत होती. डीजेच्या तालावर दंग होऊन कामाठीपुऱ्यातल्या त्या स्रिया नाचत होत्या. नेहमी इतरांची वासना शमविण्यासाठी नाचणाऱ्या त्या, आज स्वतःसाठी नाचत होत्या.बेफाम होऊन नाचत होत्या. त्यात समोरच्याला खुश करण्याचा भाव नव्हता, तर स्वतःसाठी,त्यांच्या त्या लहान मुलासाठी त्या नाचत होत्या.
लहानग्या मुलाच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव
***
३.
वाढदिवसाचा जश्न पाहिल्यावर तेथून निघालो. समोर एक तीनमजली माडी आहे. त्या गंजलेल्या जीर्ण वस्तीत ही माडी सहज ओळखू येईल अशी चकचकीत आहे. मित्राची तिथे ओळख असते.आम्ही दोघे इमारतीमध्ये शिरतो,जिन्याने पहिल्या माळ्यावर जातो. आम्हाला बघून तिथले दलाल आमच्याकडे येतात.आम्ही 'गिऱ्हाईक' आहोत अशी त्यांची समजूत झालेली असते.आमच्या हाताला धरून ते समोरच्या खोलीकडे जाण्यासाठी आम्हाला सांगतात. दरवाज्यात नटून-थटून उभ्या असलेल्या स्रिया आमच्याकडे बघून सौम्य हास्य करत असतात. या सगळ्यांना चुकवून आम्ही आता दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी जिना चढतो. दुसऱ्या माळ्यावर दरवाजात उभी असलेली आक्का आम्हाला बघून नमस्कार करते.मित्र सरळ आतमध्ये घुसतो. त्याच्या पाठोपाठ मी देखील त्या खोलीत शिरतो. खोलीत शिरल्यावर सुरवातीला एक हॉल लागतो. तिथे छानपैकी एक सोफा ठेवलेला असतो. त्या सोफ्यावर आम्ही बसतो.आक्का जवळ येते आणि कुणासोबत जाणार ?,असं विचारते.
समोर ४-५ तरुण मुली उभ्या असतात.आमच्या गोंधळलेल्या नजारा बघून त्यांना मजा येते आहे. त्या आपापसात कुजबुजतात.आम्ही आक्काला येथे येण्याचं प्रयोजन सांगतो. वेश्यावस्तीत ५००-१००० नोटांच्या बंदीचा काय परिणाम झालाय हे जाणून घ्यायला आलोय हे सांगतो. आमचं प्रयोजन ऐकून आक्का जवळजवळ आमच्यावर ओरडतेच. धंद्याच्या वेळी गप्पा मारायला वेळ नाही असं सांगते. मित्र हळूच आक्काच्या हातात १०० ची नोट टेकवतो, आता आक्का हसून आमच्यासोबतच सोफ्यावर बसते.
आक्का आमच्याशी बोलायला तयार असते.एका पोरीला आवाज देऊन आमच्यासाठी थंड पाणी घेऊन यायला सांगते.अधूनमधून जेव्हा गिऱ्हाईक येतात तेव्हा आक्का त्यांना बंद खोलीपर्यंत सोडते, कोणत्या तरुणीसोबत जायचं हे सांगते,आणि परत आमच्यासोबत येऊन गप्पा मारते.
हळूहळू आक्का प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करते.थोड्या वेळानंतर तिला काहीही विचारण्याची गरज भासत नाही.आक्का आता सगळं कथन करायला सुरुवात करते.
आक्का सांगते कि ५००-१००० च्या नोटा बंद झाल्यापासून इथे गिऱ्हाईक येणं कमी झालंय. अगोदर दिवसाला १०० गिऱ्हाईक यायचे,तर आता केवळ २०-२५ येतात. इकडे एका शय्येचा भाव ४७० रुपये आहे असं ती सांगते. ५०० रुपयांच्या जुन्या नोटा घ्यायला आमच्या शेठने सांगितलंय तेव्हा जुन्या-नव्या सगळ्या नोटा आम्ही घेतोय. ५०० ची नोट घेऊन कोणी आलं तर ३० रुपये मात्र आम्ही परत देत नाही असं अक्का स्पष्ट करते.
आम्ही बोलत असताना २५-२७ वर्षे वयाचा एक तरुण आत शिरतो.त्याच्या हालचालींवरून तो दारू पिऊन आलेला आहे हे आम्ही सगळे ओळखतो. आक्का त्याला विचारते , किती रुपये आणले? तो खिशातून ५०० ची नोट काढतो.आक्का ती नोट घेते आणि नोट खरी आहे कि खोटी आहे हे निरखून बघते. नोट खरी असल्याची खात्री झाल्यावर त्या तरुणाला एका मुलीसोबत जायला सांगते,आणि सुनावते कि, १० मिनिट जास्त घे हवं तर , पण ३० रुपये परत मिळणार नाहीत.
***
४.
आमच्या गप्पा चालूच असतात.प्रीती नावाची एक तरुणी आमच्याशेजारी येऊन बसते. २८-३० वर्षाची असेल. ही कलकत्त्याची आहे.आमचं बोलणं ऐकून ती स्वतःहून आमच्याकडे आली. तिच्याशी बोट असताना हे कळलं कि, दर तीन महिन्यांनी ही कलकत्त्याला जात असते. हिला लहान-लहान ३ मुले आहेत.आईवडिलांकडे लहानग्या मुलांना टाकून ही इकडे जीवाची मुंबई करते आहे. प्रीती सांगत होती कि प्रत्येक गिऱ्हाईकाकडून इथला दलाल ४७० रुपये घेतो. त्यातले १५० रुपये आम्हाला मिळतात. महिन्याला कसेबसे १०,००० रुपये कमाई होत असते. त्यात घरी मुलांना पैसे पाठवायचे असतात.मुलांची शाळा आहे,आईवडिलांचं दुखणं आहे,कपडालत्ता आहे,खाणंपिणं आहे,माझा इकडचा खर्च आहे.या सगळ्यात पैश्याची मोठी ओढाताण होत असते .आत धंदा मंदीत चालू आहे म्हटल्यावर पैशाची मिळकत होत नाहीये. घरी पैसे कसे पाठवणार याची चिंता हिला लागून राहिलेली आहे.
बोलताना प्रीती आता आगतिक झालेली वाटली.लाली -पावडरने सजवलेल्या तिच्या खोट्या चेहऱ्यावरचं खोटं हसू आता निवळलं होत.
***
५.
तिथेच थोड्या वेळाने समोरच्या बंद खोलीतून एका तरुणासोबत शय्या करून आलेली,आणि त्याच तरुणाला अश्लील शिव्या देणारी बॉबी आमच्या समोर बसली. आत खोलीत या दोघांचं काही तरी वाजलं असेल हे आम्ही ओळखलं.बळजबरीने तो माझे फोटो काढत होता असं ती सांगत होती.ही बॉबी देखील तिशीच्या आतली. बंद झालेल्या ५००-१००० च्या नोटांमुळे ही कमालीची चिंतीत होती.१० वर्षांपासून कामाठीपुऱ्यात देहाचा व्यापार करणाऱ्या हिचे कुठल्याही बँकेत अकाउंट नाही.अकाउंट नाही म्हटल्यावर पैसे कुठे जमा करणार? नोटा कुठे बदलणार? धंदा करायचा कि नोटा बदलीसाठी बँकेच्या रांगेत उभं राहायचं असे असंख्य प्रश्न हिला पडलेले होते. कालच एका मैत्रिणीच्या अकाउंटवर १५,००० रुपये टाकून आल्याचं ती सांगत होती. जानेवारीत आता तिला तिचे पैसे भेटतील,पण केवळ १३०००. तिची मैत्रीण २००० रुपये कमिशन घेणार आहे.
***
६.
सुरेशसोबत बोलत होतो. सुरेश इथला दलाल आहे. त्याचीसुद्धा कहाणी काही वेगळी नाही.धंदा मंदीत असल्यामुळे तो देखील चिंतेत आहे. पोलिसांना महिन्याला २ लाख रुपये हप्ता द्यावा लागतो,तेव्हाच आमचा हा व्यापार चालतो असं तो सांगत होता. पोलिसांना द्यावा लागणारा २ लाखाचा हप्ता कसा भरून काढायचा, याच प्रश्नावर तो राहून राहून बोलत होता.
रोजचा हप्ता वसूल करायला आलेले पोलीस देखील आता सुट्टे पैसे मागतात, ५००-१००० च्या नोटा घ्यायला मनाई करतात.तेव्हा त्यांना कुठून पैसे द्यायचे हे सुरेशच आम्हाला विचारतो.
आम्ही '२ लाखांचा हप्ता' हे ऐकूनच स्तब्ध झालो होतो.हा 'व्यापार' किती मोठा आणि किती खोटा आहे हे त्यानिमित्ताने जाणवत होतं. प्रत्येक गिऱ्हाईकामागे १५० रुपये मिळविणाऱ्या आणि महिन्याला कसेबसे १०००० रुपये कमावणाऱ्या या वेश्या किती मोठ्या आर्थिक शोषणाचा भाग आहे हे जाणवलं. यांचं सामाजिक शोषण आहेच पण त्याहून भयानक आर्थिक शोषण आहे,हे शोषण थांबावं म्हणून आपल्याकडे आहे का काही कार्यक्रम? कोणाच्या अजेंडयावर आहेत यांचे प्रश्न? यांच्यासाठी कोणता 'स्किल इंडिया' चा कार्यक्रम आहे आपल्याकडे? स्मार्टसिटीच्या योजनेत कामाठीपुरा येईल का कधी? याची उत्तरे १००% नकारात्मक भेटणार आहेत.
कामाठीपुरा- आर्थिक आणि सामाजिक शोषणाचा काळा बाजार
शेवटी निघताना आक्काचा निरोप घ्यायला गेलो,तेव्हा हातात हात घेत आक्का म्हणाली, पोरा,आमच्याकडे येणारा प्रत्येक पैसा हा काळाच असतो. आमचा धंदा हा काळा बाजाराचं आहे हे आम्ही मान्य करतो.पण देशाचे लुटेरे तिथे कर्ज बुडवून देशातून पळून जातात त्यांना पकडायचं सोडून आमच्यासारख्या गरिबांच्या मागे हे सरकार का लागतंय? सरकार कुठलंही येऊ दे,आमच्यासाठी कुणीच काही करत नाही.आम्ही काल देखील उपरेच होतो,आज थोडं आणखी उपरे झालोत एवढंच.





