अजानच्या आवाजामुळे सकाळी सकाळी झोपमोडे होते अशी तक्रार इलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. संगिता श्रीवास्तव यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. ठरलेल्या शिरस्त्याप्रमाणे लागलीच चर्चेला उधाण आलं. मशिदीवरच्या भोंग्यांनी राजकीय चर्चा घडवून आणली. कुलगुरू बाईंच्या तक्रारीवरून त्यांच्या घराच्या दिशेला असलेला भोंगा आता दुसऱ्या दिशेला वळवला गेलाय. यापुढे कुलगुरू बाईंना पहाटे पहाटे साखरझोप मिळेल, पण ज्यांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार आहे त्यांचं काय?
इस्लाममध्ये अजानसाठी भोंगे लावावेत असं म्हटलंय का?
अजिबात नाही! इस्लामची स्थापना झाली ती मुळात अरबस्थानात. जिथे समाजाची एकूण स्थिती अत्यंत हालाखीची होती. नागरिकांना 'शांततेचा' संदेश देण्यासाठी मोहम्मद पैगंबर यांनी नवा मार्ग निवडला, तो म्हणजे इस्लाम! त्याकाळी अजान देण्यासाठी भोंगेच काय, तर कुठलेही विद्युत उपकरणे शोधली गेली नव्हती. अशा काळात उंच मिनारावर उभे राहून मौलाना लोक नागरिकांना प्रार्थनेची आठवण करून देत. आजही जवळजवळ सगळ्या मशिदींची रचना ही उंच मिनाराची असलेली आपण पाहतो. पण त्या मिनाराची जागा आता मौलवी नाही तर भोंग्यांनी घेतलीये.
'या' मुस्लिम देशात अजानसाठी भोंगे वापरले जात नाहीत.
मागे मी मलेशियाला एका अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो. हा एक इस्लामिक देश आहे. इथे ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून सरकारी स्तरावर विशेष काळजी घेतली जाते. अनावश्यक असेल तर गाडीचे हॉर्न देखील वापरले जात नाहीत.
इथल्या मशिदीवर मग भोंगे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही इथल्या नागरिकांवर देव कोपलेला नाही! मलेशिया सोबतच इंडोनेशियात देखील आपल्या धार्मिक स्वातंत्र्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे मात्र प्रत्येक मशिदीवर मोठमोठे भोंगे लावण्याची जणू स्पर्धाच रंगलेली पाहायला मिळते.
महाराष्ट्र काय स्थिती?
महाराष्ट्रात काही वेगळी स्थिती नाही. आमच्या घराच्या चारी दिशांना चार मशिदी आहेत. या चारही मशिदींचा एकेक भोंगा आमच्या घराच्या दारा-खिडक्यांशी दिवसातून 5 वेळा संवाद साधत असतो. विचार करा एका भोंग्यांने कुलगुरू बाईंची झोप उडत असेल तर आमची स्थिती काय होत असेल? दुर्दैव हे की आमच्या घरातलं कुणीही कुलगुरू नाही!
आमच्या घराच्या उजव्या बाजूला 'देवी गल्ली' आहे. नावावरुन कल्पना आली असेल की इथे कुणा देवीचं मंदिर असेल. होय, अगदी बरोबर. एक नाही 2-2 देवीची मंदीरे आहेत. नवरात्री उत्सवात येथे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ मोठमोठ्या आवाजात देवीची भक्तिगीते वाजवली जातात. अजानचे 365 दिवस आणि नवरात्रीचे 9 दिवस अशी तुलना करायची गरज नाही! याच दरम्यान जेव्हा आमची सहामाई परीक्षा यायची तेव्हा या देवी देवतांना रिटायर करून कुठे तर पाठवून द्यावं असं वाटायचं. बाकी मित्र-मंडळींना आमचा हेवा वाटायचा, आमच्या घराच्या इतक्या जवळ जत्रा भरते म्हणून. परंतु आमची अडचण सांगणार कुणाला? आम्ही कुलगुरू थोडेच आहोत?
ध्वनी प्रदूषण हा गुन्हाच मानायला हवा!
ज्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. परीक्षेत चांगले गुण मिळवता येत नाही, त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई कोण करणार? ज्या लहान मुलांचे डिजे आणि लाऊडस्पीकर मुळे कानाचे पडदे फाटलेत, जन्मभराच अधुपण आलं त्याची जबाबदारी कुठली मशीद किंवा मंदिर ट्रस्ट घेणार आहे? ज्या फटाक्यांच्या आवाजामुळे झाडाला हादरे बसून आपल्या पिलांसोबत चिमणी-पाखरं घरट्यासकट खाली पडले, त्यांच्या विमा उतरावा म्हणून कुणी आंदोलनं केली का? केवळ 'शांतता'प्रिय हिंदू-मुस्लिमांनी नाही तर सगळ्याच समुदायाने या प्रकरणाचा आवर्जून विचार करायला हवा. भोंगे काय, ते तर विजेवर चालतात, मनुष्यप्राणी मात्र अजूनही बुद्धीनेच चालतो ना? डोक्याचा वापर केला तर हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला जाऊ शकतो.

अगदी बरोबर सागरजी,
ReplyDeleteछान मांडणी केलीये.
सागर,एकदम बरोबर.सर्वच प्रार्थना स्थळांचे भोंगे काढलेच पाहिजे.
ReplyDeleteफार छान
ReplyDeleteमशिदींवरील भोंगे आणि मंदिरातल्या आरत्या ध्वनी वार्धकाची
ReplyDeleteगरजच काय ?
त्यांचा अल्ला आणि यांचा देव काय बहिरा आहे का ?
बिनकामाचा सगळ्यांना त्रास का ?