मीडियातील अघोषित आणीबाणी

भारतातील प्रसारमाध्यमे कशी काम करत आहेत,  त्यांच्यावर राजसत्ता,भांडवलदार कसे दबाव आणू पाहतायेत, लोकशाहीचा चौथा खांब कुणाकुणाच्या वळचणीला बांधला जातो आहे, याबद्दल खा. शरद यादव यांनी राज्यसभेत अभ्यासपूर्ण भाषण केलं होत, त्याचा हा मराठी अनुवाद.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------


मी सांगू इच्छितो कि, भारताच्या संसदीय लोकशाही व्यवस्थेत दोन सभागृहाचा समावेश आहे. या दोन्ही सभागृहांवर, म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेवर भारताच्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. आपण सर्व संसद सदस्य जे काही काम करत असतो त्या कामांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम जर कोण करत असेल, तर ती आपली प्रसारमाध्यमे आहेत.  सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे नवमाध्यमे (न्यू मीडिया), दृकमाध्यमे (व्हिज्युअल मीडिया) आणि समाजमाध्यमे (सोशल मीडिया) मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत. उपसभापती महोदय, मी तुम्हाला  सांगू देखील शकत नाही कि समाजमाध्यमे कशा पद्धतीने ही नवमाध्यमे वापरली जात आहेत. समाजमाध्यमांद्वारे अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, शिवीगाळ केलेली जात आहे. आपण कल्पना देखील करू शकत नाही अशा पद्धतीने समाजमाध्यमांचा दुरुपयोग सर्रासपने केला जातो आहे.



भारतीय माध्यमांसाठी फार अगोदरच मजीठिया आयोग गठीत केला गेला होता.  याठिकाणी आपण आपल्या लोकशाहीत निवडणुकांमध्ये सुधार व्हावा यासाठी चर्चा करत आहोत, पण हा सुधार नेमका कसा घडविला जाईल?  निवडणुकांमध्ये सुधारणा करायची असेल तर लोकशाहीत घडत असलेल्या गोष्टींची माहिती लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या प्रसारमाध्यमांचा विचार आपल्याला  करावा लागेल. ही प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. या माध्यमांची आजची नेमकी काय स्थिती आहे?
पत्रकार म्हणजे पत्रकारितेचा आत्मा आहे, असं मानलं जातं. आज आपली लोकशाही व्यवस्था अडचणीत आहे याच्या मागचं कारण म्हणजे आपण पत्रकारांना स्वातंत्र्य दिलं नाही. 'हायर अँड फायर' नावाची एक युरोपातील संकल्पना आपल्याकडे रुजू घातली आहे, याद्वारे पत्रकारांना कामावर ठेवा आणि आपल्याला हवे तसे त्यांना राबवून घ्या असा प्रघात पडलेला आहे. बहुतांश पत्रकार या संकल्पनेचे बळी ठरलेले आहेत.
मी मोठमोठ्या पत्रकारांबरोबर राहिलेलो आहे,वावरलेला आहे.  पूर्वीच्या काळात प्रसारमाध्यमे कसे काम करतात हे आम्ही पाहिलेले आहे. आजच्या काळातील प्रसारमाध्यमेदेखील आम्ही बघतो आहोत. या प्रसारमाध्यमांचा महत्वाचा आत्मा कोणता आहे? खऱ्या बातम्या नेमक्या कशा येतील? मागच्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी मी स्वतः निवडणूक आयोगाकडे जाऊन सांगितले होते कि सगळीकडे पेड न्यूजचे पेव फुटले आहे. आज आपले पत्रकार हे अतिशय अस्वस्थ आणि त्रस्त आहेत.पत्रकारांकडे त्यांचा स्वाभिमान आजही शाबूत आहे, पण हेही मात्र खरं कि  ते सत्य लिहू शकत नाही.ते काम करत असलेल्या  प्रसारमाध्यमांच्या मालकासमोर त्यांना सांगितलं जात कि कोणत्या विषयावर लिहिलं पाहिजे आणि कोणत्या विषयाला बगल दिली पाहिजे. आपल्या कुटुंबाच्या भरणपोषणासाठी तो पत्रकार प्रयत्नशील असतो तेव्हा नाईलाजास्तव त्याला आपापल्या तत्वांना मुरड घालावी लागते. आपल्या लोकशाहीत आता एक बाजारू व्यवस्था प्रचलित झालेली आहे. या बाजारू व्यवस्थेत आपण आपली प्रसारमाध्यमे, लोकशाहीचा चौथा खांब कुणाच्या हाती सोपविला? ही माध्यमे कुणाकुणाच्या वळचणीला आपण बांधली ? या सर्व प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. आपल्या देशात एक असा भांडवलदार आहे ज्याने देशातील प्रसारमाध्यमांची ४० ते ६० टक्के मालकी आपल्याकडे ठेवलेली आहे.

काय होईल या देशाचं? आता हिंदुस्थान टाईम्स देखील विकला जाणारा आहे. कालच तो विकला गेल्याच ऐकलंय. असे असेलतर हा देश कसा बरे प्रगत होईल? निवडणुकांमधील सुधार आणि  त्यावरची चर्चा ही कुठे दाखवली जाईल, कुठे लिहिली जाईल? इथे कुणीही याबद्दल बोलायला तयार नाही. निश्चितपणे मी तुम्हाला हे सांगू इच्छितो कि लोकशाहीत प्रसारमाध्यमे ही संसदेच्या अखत्यारीत असायला हवीत. यावर काही उपाययोजना आपण करणार आहोत कि नाही? लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जे पत्रकार वावरतात ते पत्रकारितेचे, प्रसारमाध्यमांचे मालक मुळीच नाहीत. जेव्हापासून भारतात बाजारीकरणाला सुरुवात झाली आहे तेव्हापासून आपल्या लक्षात येईल कि प्रकारमाध्यमात व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या संपत्तीत आवक वाढलेली आहे. मी आज जे काही बोलतो  आहे त्याबद्दल कदाचित आपल्या प्रसारमाध्यमांमध्ये माझ्याबद्दल उलटसुलट लिहिले देखील जाईल.
परंतु जेव्हा माझ्यासारखा कुणी एक माणूस जो स्वतंत्र भारताच्या भल्यासाठी साडेचार वर्षे तूरूंगात राहून  आला आहे,  जर आता तो काही बोलला नाही तर मला वाटते ही भारतातील तमाम नागरिकांचा माझ्याकडून विश्वासघात होईल. उपसभापती महोदय, आज मोठ्या प्रमाणात कंत्राटी कामगार कामावर ठेवले जात आहेत.

आज भारतात कुठेही नागरिकांना नोकरी आणि उद्योगधंदे उपलब्ध करून दिले जात नाहीत .सर्व ठिकाणी आज भांडवलदार आणि खाजगी क्षेत्रातील लोक आहेत. पत्रकारितेत तर मोठ्या प्रमाणावर कंत्राटी कामगार म्हणून पत्रकार काम करत आहेत. अशाप्रकारे मजिठिया आयोगाच्या शिफारसी कशा लागू होणार? प्रसारमाध्यम समूहाचे कर्मचारी असलेल्या पत्रकारांना आपले संघटन बनविण्याचे देखील स्वातंत्र्य नाही. तुम्ही जेव्हा कुठली सत्य घटना पत्रकारांना सांगता तेव्हा त्या सत्य घटनेमागे मालकाचे असलेले हितसंबंध त्या पत्रकाराला काहीदेखील करू देत नाहीत, असे केल्यास त्या पत्रकाराची नोकरी जाण्याची शक्यता ही असतेच.तेव्हा अशा परिस्थितीत ही माध्यमे कशी सुधारतील? जर ही माध्यमे सुधरली नाहीत तर निवडणूक प्रक्रियेतील सुधाराच्या आपण करत असलेल्या चर्चा व्यर्थ ठरणार आहेत. मी जे काही बोलतो आहे कदाचित याची बातमी देखील पद्धतशीरपणे प्रसारमाध्यमांच्या बाजूने लिहिली जाईल, त्यांच्या विरोधातील माझी भूमिका छापली देखील जाणार नाही.
प्रसारमाध्यमांचे मालकच पत्रकारांना  सांगतील कि काय गोष्टी छापाव्यात आणि काय छापू नये. आमच्यासारखे अनेक लोक याबद्दल रोजच बोलत असतात, आणि हे प्रसारमाध्यमांचे मालक नेहमीच आपल्या पत्रकारांना सांगत असतात कि आपल्याविरोधी असलेल्या बातम्यांमध्ये कितीही सत्यता असली तरी त्या छापल्या जाऊ नये.

मी माध्यमांबद्दल बोलत असलेले सत्य हे बॅलेट पेपरच्या विश्वासार्ह्यतेशी निगडित आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. चारही बाजूंनी  या विश्वासार्ह्यतेला भांडवली व्यवस्थेने घेरलेलं आहे. आपल्या समोर सद्यस्थितीला पेच हा आहे कि या प्रश्नांवर चर्चा नेमकी कशी घडवून आणली जाईल?


भारत हा एक खंडप्राय देश आहे, पण आपली चर्चा,आपले मुद्दे लोकांपर्यंत जायला तयार नाही. प्रसारमाध्यम समूहाचे मालक हे एकाच वेळी अनेक उद्योगधंदे करत आहेत. ते आता जमीनदार झालेले आहेत, आणि आपले उद्योगधंदे चालवत आहेत.कधी कधी तर ते संसदेतही येत असतात. त्यांना आता सगळेच पक्ष उमेदवारी देतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो कि अशाप्रकारे आपले लोकतंत्र कदापिही उत्कर्ष करू शकणार नाही. असे जर होऊ द्यायचे नसेल तर त्यासाठी एखादा  कायदा हा बनवला गेला पाहिजे. य कायद्याद्वारे कोणाही प्रसारमाध्यम समूहाच्या मालकाला किंवा वृत्तपत्राच्या मालकाला इतर उद्योगधंदा चालविण्याचा अधिकार नसेल.
उपसभापती महोदय, या देशात क्रॉस होल्डिंग ( एकाच वेळी अनेक उद्योगधंदे करण्याची मुभा) बंद झाली पाहिजे. अशा प्रकारचा कायदा पारित करा आणि मग बघा कि हा देश कसा सुधारतो ते. आपल्या देशात खूप सारे लोक असे आहेत जे विद्रोहीपणे आपली सत्य भूमिका लोकांना सांगत आलेले आहेत.भारताला घडविण्यात या लोकांचा मोलाचा सहभाग राहिलेला आहे. असे सत्यवादी लोक आज नाहीत असे मी म्हणणार नाही. असे खूप लोक आपल्यामधी आजही आहेत जे सत्य जगासमोर आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर आणीबाणी लागू झाली आहे. भारतात तशीही अघोषित आणीबाणी लागू झालीच आहे. याबद्दल आजचे पत्रकार काही लिहू शकत नाही कारण त्यांना काही मर्यादा आहेत. या मर्यादा माध्यमांच्या मालकांनी त्यांच्या पत्रकारांवर लादलेल्या आहेत. परंतु जेव्हा माध्यमांच्या मालकांचे  आणि सरकारचे  हितसंबंध जोपासले जातात  तेव्हा मात्र  माध्यमे अलगदपने सरकारच्या मुठीत बंद होऊन जातात.
जे पत्रकार सत्य  लिहिण्याचा प्रयत्न करतात त्यांना मग शिवीगाळ केली जाते.. अशा पत्रकारांना कामावरून काढून टाकले जात आहे. असे असेल तर आपला देश कसा घडेल? आपण आपल्या देशात सुधारणा कशा आणणार? मी तुम्हालाच नाही तर सर्वांना विचारू इच्छितो कि भारतात सुधारणा होतील तरी कशा? उपसभापती महोदय, या देशात प्रसारमाध्यमांसंदर्भात चर्चा का केली जात नाही? या देशात असा कायदा का बनवला जात  नाही कि जो क्रोस होल्डींगला परवानगी देणार नाही. असे जर झाले तरच आपला देश उत्तमरीत्या घडेल असे मला वाटते . भारत देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देखील अशीच परिस्थिती होती. त्यावेळी गणेश शंकर विद्यार्थी होते, ज्यांनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. मी या संसदेत रवी शंकर प्रसाद यांनी निवेदन करतो कि, तुम्ही आज सत्तेत आहात आणि आम्ही विरोधी पक्षात आहोत. आपण सगळेच कायमस्वरूपी इथे नसणार आहोत. सध्या गरीब, मजदूर, शेतकरीवर्ग  लोकशाहीपासून दूर होत चालला आहे. तुम्ही कितीही स्टॅन्डअप आणा, कितीही योजना राबवा हा वर्ग लोकशाहीपासून दूर दूर जाताना आपल्याला दिसेल. आपण सगळ्यांनी खूप ताकद याकामी खर्च केली पण या योजना गरिबांपर्यंत पोहोचताना मात्र दिसत नाही. सर, मागे जेव्हा निवडणुका होत होत्या तेव्हा मी ३ वृत्तपत्रांच्या कार्यालयात गेलो, आणि माझी भूमिका सांगितली. त्या तीनही वृत्तपत्रांनी  माझे म्हणणे छापले नाही. मी महिन्याभरा तक्रार करत राहिलो पण माझे म्हणणे एका ओळीत देखील छापून येऊ शकले नाही. ते आज देखील माझे म्हणणे छापणार नाहीत कारण त्यांचे मालक त्यांच्या डोक्यावर बसलेले आहेत. हे सगळे पत्रकार माझे म्हणणे ऐकून घेतील, मनात साठवतील, पण प्रसारमाध्यम कंपन्यांचे मालक ते छापू देणार नाहीत.
मी सांगू इच्छितो कि असा कायदा बनलाच पाहिजे, माध्यमांच्या मालकाला एकच व्यवसाय करण्याची मुभा असावी. तो केवळ पत्रकारितेचं काम करेल, अन्य कोणतेही काम करणार नाही. असे जेव्हा होईल तेव्हाच आपली लोकशाही सुधारेल. बेईमानी करण्यासाठी हे प्रसारमाध्यमांचे मालक इतरही व्यवसाय चालवतात. प्रसारमाध्यमांचा व्यवसाय ते केवळ बेईमानी करण्यासाठी करत आहे, लोकशाही परिपकव व्हावी यासाठी ते किंचितही प्रयत्नशील नाहीत. भारताचे शेतकरी, कामगार यांच्यासाठी ते माध्यमे चालवत नाहीत.

खा. शरद यादव
( जदयू खासदार शरद यादव यांनी राज्यसभेत केलेले हे भाषण, २२ मार्च २०१७)

पूर्वप्रसिद्धी: लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट २०१७ 

गंभीर सुरुवात अजून बाकी आहे!

डॉ . हमीद अन्सारी यांनी उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाळ संपताना सध्या भारतातील मुस्लिम समाज स्वतःला असुरक्षित समजतो आहे, असं व्यक्तव्य केलं. याबद्दल सध्या जोरदार चर्चा चालू आहे. त्यांनी ही भूमिका या अगोदरही अनेकदा मांडलीच होती. बरोबर दोन वर्षांपूर्वी  'ऑल इंडिया मजलीस-ए-मुशावरात' या संघटनेच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी मुस्लिम समाजाबद्दल तेव्हा मांडलेले मुद्दे आजही तेवढेच महत्त्वाचे ठरावेत ... 


---------------



नवी दिल्लीत 'ऑल इंडिया मजलीस-ए-मुशावरात' या संघटनेच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ३१ ऑगस्ट २०१५ रोजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी मुस्लीम समाजाचे प्रश्न आणि त्यातून मार्ग काढून समाजाचा करावयाचा विकास याविषयी मार्गदर्शन केले. त्या भाषणाविषयी मीडियात उलट-सुलट मत-मतांतरे व्यक्त झाली, ते हे भाषण.

ऑल इंडिया मजलीस-ए-मुशावरातच्या ५० व्या वर्धापनदिनी मला आपल्यासमोर विचार मांडण्याची संधी मिळते आहे, ही माझ्यासाठी एक मोठी उपलब्धी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ऑल-इंडिया-ए-मुशावरातच्या विविध उपक्रमांचा तुमच्याप्रमाणेच मीसुद्धा एक अनुयायी राहिलेलो आहे. मुस्लीम समुदायाची ओळख आणि परंपरा जपण्यासाठी मुशावरातची स्थापना झाली. भारतीय संविधानाच्या कक्षेत राहून स्वत:च्या परंपरा आणि उत्कर्ष घडविण्याचा प्रयत्न मुशावरातने आपल्या स्थापनेपासूनच केला आहे. सध्याच्या मुस्लीम समुदायाची होत असलेली प्रगती आणि काळानुरूप झालेले बदल बघितले की, मुशावरातची काय संकल्पना आहे हे लक्षात येईल.

मुस्लिमांची लोकसंख्या १८ कोटी असलेला भारत हा एक देश आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या १४ टक्के लोकसंख्या ही मुस्लिमांची आहे. इंडोनेशियानंतरची जगातील सगळ्यात मोठी मुस्लीम लोकसंख्या ही भारतात आहे.

भारताच्या नागरिकीकरणाच्या प्रक्रियेत, संस्कृती संवर्धनाच्या प्रक्रियेत मुस्लिमांचा कोणता सहभाग राहिलेला आहे, हे आपण सर्वजण जाणतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मुस्लिमांनी ब्रिटीशांविरुद्ध दिलेला लढा कोणीही विसरू पाहता विसरणे शक्य नाही. भारतातील सर्व मुस्लीम हे वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे आहेत. भाषा, पेहराव, सामाजिक-आर्थिक स्तर यातून मुस्लिमांची विविधता प्रतीत होते. त्यांची ही विविधता देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेत महत्त्वाची ठरली आहे.

ऑगस्ट १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर भारतातील मुस्लीम समुदायाला भौतिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला. फाळणीमुळे झालेले वादविवाद, राजकारण, अन्याय इथल्या मुस्लिमांना सहन करावा लागला आहे. यातून मिळालेल्या वेदना, अन्याय काळाच्या ओघात भारतीय मुस्लीम सहन करत आलेले आहेत. फाळणीनंतरही भारतीय मुस्लिमांच्या भळभळत्या जखमा ताज्या करण्याचा प्रयत्न झाला. विकास प्रक्रियेत सामावून घेण्यातही दुजाभाव झाला. असे असले तरी, त्यांनी आपला विकास, उत्कर्ष घडवून आणला आहे आणि भविष्यात तो अधिक होणे नितांत गरजेचे आहे.

मागच्या दशकात भारतीय मुस्लिमांच्या कोणत्या समस्या आहेत, हे सच्चर आयोगाच्या अहवालानंतर पुन्हा एकदा अधोरेखित झाले. २००६ साली प्रसिद्ध झालेला सच्चर आयोगाचा अहवाल अनेक गोष्टींवर भाष्य करतो. राजकारण्यांचा खोटारडेपणा या अहवालाने जगासमोर आणला. राजकारण, अर्थकारण, समाजकारण यांच्यापासून हा समाज दुर्लक्षित राहिला. देशातील अनुसूचित जाती-जमातींच्या तुलनेत मुस्लीम समुदाय मागासलेला आहे असे सच्चर आयोगाने नमूद केले. या सर्वेक्षणामुळे विकास प्रक्रियेत देशातील एक मोठा जनसमुदाय कसा दुर्लक्षित केला गेला हे चित्र सर्वांसमोर आले. याच धर्तीवर २००८ साली काही तज्ज्ञ लोकांनी मुस्लीम समुदायाला पुरेसे प्रतिनिधित्व व संधीची समानता मिळावी यासाठी अहवाल सादर केला.
या दोन्ही अहवालांचा आधार घेता असे लक्षात येते की, 'समाजातील प्रभावी समुदायाकडे विशेष लक्ष पुरविले गेले तर मुस्लीम समुदायाला असमानतेला सामोरे जावे लागले.'

अगदी अलीकडे सप्टेंबर २०१४ मध्ये 'कुंडू रिपोर्ट' जाहीर करण्यात आला. सच्चर समितीने सुचविलेल्या योजना अमलात आल्या की नाहीत, यासंदर्भात हा अहवाल आहे. यात नमूद केले आहे की, 'सुरुवात तर झाली आहे, परंतु गंभीरतेने सुरुवात अजून बाकी आहे.' हा अहवाल ठामपणे सांगतो की, 'सुरक्षिततेसाठी मुस्लीम अल्पसंख्याक समुदायाचा विकास अगदी तळापासून होणे गरजेचे आहे. (कुंडू रिपोर्ट, २०१४, पा. नं. १७०-१८१)

या शासकीय अहवालांचा सार काढायचा ठरल्यास, खालील प्रमुख समस्यांना मुस्लीम समुदाय सामोरे जात आहे, असे लक्षात येते -
१) ओळख व सुरक्षितता
२) शिक्षण व विकास
३) न्याय्यपूर्ण व्यवस्थेतील सहभाग
४) निर्णयप्रक्रियेतील योग्य सहभाग.

भारतातील प्रत्येक नागरिकाचे हे हक्क आहेत. परंतु मुस्लीम समुदाय मात्र या हक्कांबाबत न्यूनगंड बाळगतो आहे. त्यामुळे आपल्यासमोर मुख्य आव्हान कुठले असेल तर यासंदर्भात तंत्रशुद्ध रचना निर्माण करणे व कुशल पद्धतींचा अवलंब करून न्यूनगंडित मुस्लीम समुदायाला मार्गदर्शन करणे.

सरकारची संपूर्ण जबाबदारी आहे की त्यांनी मुस्लिमांच्या सुविधा, विकास, त्यांच्यावर होणारा भेदभाव, अन्याय यांच्याबद्दल कारवाई करावी. मुस्लीम समुदायात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे हे ओघानेच आले. याबद्दल आवश्यक त्या साधनसामग्रींचा, कायद्यांचा, अधिकारांचा वापर करून सरकारने योजना आखल्या पाहिजेत. राजकीय चांगुलबुद्धी, सामाजिक सलोखा, शांती, जनमत यांना या प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा उचलावा लागणार आहे. याबाबत केवळ योजना बनवून चालणार नाही तर त्यांची अंमलबजावणी कशी व किती प्रमाणात होते हे बघणे महत्त्वाचे ठरते. तसेच ही व्यवस्था चालवणारी यंत्रणा किती चांगुलपणा दाखवते यावर हे अवलंबून असणार आहे.

समकालीन सरकारचे उद्दिष्ट, 'सबका साथ सबका विकास' हे प्रशंसनीय जरूर आहे. परंतु पार्श्वभूमी लक्षात घेतली की समजते, जिथे गरज आहे अशा वर्गांपासून विकासाची प्रक्रिया सुरू व्हावी. प्रत्येक नागरिकाचा वैयक्तिक विकास, सामाजिक विकास, सरकारची सुधारणा तळापासून होणे गरजेचे आहे. जनतेचा विकास व्हावा, यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत, परंतु या योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी काही वेळ जावा लागणार आहे.

ज्या मागील गोष्टींचा आपण विचार केला त्या प्रामुख्याने सरकारी दिरंगाई किंवा जाणिवांचा अभाव यांच्याशी निगडित आहेत. असे असताना हे सगळे विषय हाताळताना संबंधित समुदायाने स्वत: हून स्वायत्त प्रयत्न करायला हवे होते. मुस्लीम समुदायातील  मागासलेपणा आणि गरिबी यांच्याशिवाय सामाजिक, आर्थिक  आणि शैक्षणिक विकास यांच्यात उद्भवणार्या समस्या  निवारण करण्यासाठी आपण किती प्रयत्न केले आहेत? समोर येणार्या आव्हानांना आपण कितीसा प्रतिसाद दिला आहे, किती सामोरे गेलो आहोत?

काही शतकांपूर्वी भावना उंचबळवणारा शोक व्यक्त केला जायचा :
फिर्का बंदी है कही
और कही जातीयां हैैं
क्या जमाने मेें पनपने
की यही बातेें हैैं?

आज आपण ही गोष्ट मान्य केली पाहिजे की 'फिर्का बंदी' आणि 'जात' हे समाजाचं वास्तव आहे. (कुराण या पवित्र धर्मग्रंथानुसार फिर्का बंदी म्हणजे संप्रदाय आणि जातिव्यवस्था याला इस्लाममध्ये स्थान नाही) आपण सर्वांनी इतिहासातील मेहमूद आणि अयाज ही पात्रे खांद्याला खांदा लावून चालताना पाहिली, परंतु ही पात्रे धर्मसत्तेने अमान्य केली. (टीप  : गजनीचा सुलतान मेहमूद आणि त्याचा गुलाम अयाज यांच्यातील नातेसंबंधाविषयी अनेक सुफी रचनाकारांनी नितांत सुंदर अशा  रचना केल्या आहेत, असे असले तरी त्यांच्यातील नातेसंबंधांना धर्मसत्तेने मान्यता दिली नाही, त्यांच्यावर तेव्हाही टीकाच झाली आणि आताही होते आहे.) याबाबतीत आपण नीटनेटकेपणा आणि शिस्तीला अधिक महत्त्व दिले आहे. या प्रत्येक  मंडळीच्या प्रार्थना या ठरावीक  मर्यादेपलीकडे गेल्या नाहीत. त्यासाठी सुधारित अशा यंत्रणा आपल्याला राबवाव्या लागणार आहेत, या योजना दोन मुख्य विभागात विभागल्या गेल्या पाहिजेत. एक  म्हणजे मुस्लिमांमधील अनुसूचित जाती आणि जमाती यांचा वर्ग आणि दुसरा म्हणजे मुस्लिमांमधील इतर मागास वर्ग. उपलब्ध आवकडेवारीनुसार या दोन वर्गवारीत मुस्लीम समाज विभागाला जाऊ शकतो.

हे स्पष्ट आहे की, मुस्लीम समुदायातील लक्षणीय असा एक भाग, स्वतःच्या सांस्कृतिक प्रगतीत अडथळा आणणार्या लबाडांच्या विरोधात बचावात्मक पवित्रा घेतो. आपल्या परंपरा अत्यंत पवित्र मानल्या जातात, पण असे करताना आपण विवेकबुद्धीला विसरतो. आधुनिकीरण ही आता प्रशिक्षित अभिव्यक्ती बनायला हवी. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे, तसेच कुशल समुदाय घडविण्यासाठी सारासार विचार आणि विश्वास यांची आवश्यकता आहे.  इज्तिहाद (बदलांशी जुळवून घेणे) यास असहमती दाखविणे, अनुल्लेखित करणे टाळले पाहिजे. पैगंबरवासी शेख अब्दुल हसन अली याबद्दल म्हणतात की, 'इज्तिहाद म्हणजे सतत होणार्या आयुष्यातील  बदलांशी झुंजण्याची क्षमता होय.' इज्तिहादचा हा नेमका उद्देश आपण विसरलो आहोत. इमाम अल‚ गझली यांच्या मतानुसार प्रत्येक विषयाची एक  सीमा असते. धर्माची जपवणूक, जीवन, बुद्धी, वंश, संपत्ती यांनासुद्धा सीमारेषा असायला हव्यात. सैद्धांतिक चौकट आणि सामाजिक बदलांसाठीचा विचार या दोन गोष्टींचा आपल्या मूलतत्त्वादि विचारांशी कायम संघर्ष झाला आहे.

या सगळ्यांमध्ये मुशावरातची भूमिका कायम महत्त्वपूर्ण राहिलेली आहे. मुस्लीम समुदायाच्या एका पुरोगामी आणि विश्वासार्ह संस्थेकडे बघताना, या संस्थेने मुस्लीम समुदायाची ओळख व आदर निर्माण करताना आपला बचावात्मक पवित्रा सीमित ठेवू नये. या सीमांच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे, जेणेकरून देशाच्या नव्हे तर जगाच्या जडणघडणीत आपला सहभाग नोंदविता येईल. आपल्या कक्षा आपल्याला विस्ताराव्या लागणार आहेत ते सर्व समाजाच्या विभागांना विशेषतः महिला, युवक आणि बहुजन वर्गाला सामावून घेणारे असले पाहिजे, हे वर्ग एकत्रितपणे आल्यास समाजाचा एक महत्त्वाचा घटक निर्माण होत असतो, हे आपण ओळखले पाहिजे.

हे सगळे  करताना भारतीय संविधानाच्या सीमारेषांना नावकारून चालणार नाही. बहुमत, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही या त्रिसूत्री समोर ठेवून भविष्याची आखणी करावी लागणार आहे.

'भेदभाव नाकारताना आणि सगळे काही ठीक आहे असा आव आणताना आपण तथ्य नाकारले तर तोंडावर पडू. परंतु भेदभावाबद्दल संघर्ष करताना भेदभाव वाढविण्याची प्रकट भावना समोरच्यांच्या मनात निर्माण होत असते. मुस्लीम समुदायाच्या समस्या सोडविण्यासाठी ज्या दुविधा निर्माण होत आल्या आहेत त्या आपल्या सर्वांसाठी काही नवीन नाहीत आणि संघर्ष करताना झालेल्या जखमादेखील काही  नव्या नाहीत. जर या समस्या मुळापासून सोडवायच्या असतील, तर नेमक्या समस्या काय आहेत हे कळणे महत्त्वाचे ठरते. भारतीय संविधानिक लोकशाही आणि राष्ट्रीय एकात्मता यांच्या चौकटीत हे सगळे व्हायला हवे हे मात्र नक्की' (ए.जी. नुरानी, द मुस्लीम ऑफ इंडिया, २००३, पा. नं. १३)

ह्या सगळ्यांची कार्यसिद्धी होण्यासाठी भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि न्याय यांचा प्रभाव निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. या माध्यमातून भारताच्या सर्व नागरिकांची श्रेष्ठता, कनिष्ठता यांच्यापलीकडे जाऊन सौहार्दाचे वातावरण निर्माण करावे लागेल. देशाच्या एका विशाल समुदायाशी सुसंवाद नसेल तर आपण आपल्यापुरतेच सीमित राहून जाऊ. भारताच्या विविधतेत आपलाही सहभाग आहे आणि तो अधोरेखित करण्यासाठी देशातील बहुसंख्य समाज आणि अल्पसंख्याक मुस्लीम समाज यांच्यात सुसंवादाची प्रक्रिया होणे नितांत आवश्यक आहे.

भारतीय लोक हे अनुभवत आहेत की अल्पसंख्याक मुस्लीम समुदाय हा एका धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेत राहतो आहे, आपले अनुकरण करण्याचा इतर समुदाय विचार करतील असा समज चुकीचा आहे.

एक शेवटची गोष्ट सांगू इच्छितो, इस्लामची शिकवण ही केवळ भारतासाठी आणि मुस्लिमांसाठी आहे असे समजण्याचे कारण नाही. आपल्या विचारातून, आचारातून ही शिकवण इतर लोकांनाही मिळायला हवी. काही वर्षांपूर्वी एका अल्जेरिअन तत्त्ववेत्ता असलेल्या मोहम्मद अरकान याचे एक पुस्तक माझ्या वाचनात आले. त्याचे हे पुस्तक वाचून मी पुरता प्रभावित झालो. त्याने मुस्लीम समुदायाची आधुनिकतेच्या बाबतीत काय मते असायला हवीत याबद्दल आपल्या पुस्तकात ऊहापोह केलेला आहे. तो आपल्या या पुस्तकात म्हणतो,  'विवेकवादी बुद्धी, आधुनिकतेचा विचार आणि त्याचबरोबर आधुनिकतेची चिकित्सा ही इस्लामची शिकवण मुळातच इस्लामी तत्त्वज्ञान वाढविण्यासाठी मदत करत आहे.'  तेव्हा सामाजिक बदलाची नवी कवाडे आपण उघडी करूयात. (मोहम्मद अरकान, रीथिंकींग इस्लाम : कॉमन क्वेश्चन, अनकॉमन अंन्सर, १९९४, पा. नं. १३)

आपण हे नवे क्षितीज गाठले नाही तर येणारी पिढी आपल्याला माफ करेल?

'वास्तविकतः जो पर्यंत आपण स्वतःमध्ये, स्वतःच्या आत्म्यामध्ये बदल घडवत नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यात बदल घडविण्यासाठी येणार नाही.' (कुराण ए. १२ .११)

त्यामुळे मुशावरात समोर जे काम उभे ठाकले आहे, ते आरंभ करताना एका उज्ज्वल भविष्याची आपण आखणी करत आहोत, हे निर्धारित असायला हवे. आपले कायदेशीर आणि संविधानिक हक्क मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेतच, पण ते करत असताना दुसर्या विशाल समुदायापासून अलिप्त राहून चालणार नाही. हे सर्व करत असताना आपण सर्वांनी बदलत्या जगाशी आपले आचार आणि विचार जुळवून घेतले पाहिजेत. डॉ. झफरूल इस्लाम खान साहेब यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
खुदा हाफिज!
जय हिंद!

स्वैरानुवाद : सागर भालेराव
पूर्वप्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक ऑक्टोबर २०१५