1947 साली बकरीच्या दिवशी दिल्लीतील जामा मस्जिद मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांनी एक भाषण केलं होतं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय मुसलमानांना उद्देशून असलेले हे भाषण अनेक अंगाने महत्वाचे आहे. सांप्रत काळात त्यांच्या विचारांची आवश्यकता आपल्याला पदोपदी जाणवते. 11 नोव्हेंबर १८८८ साली सौदी अरेबियामधील मक्का येथे त्यांचा जन्म झाला आणि 22 फेब्रुवारी 1958 त्यांचे देहावसान झाले. मुसलमानांच्या आजच्या स्थितीला केवळ आणि केवळ स्वतः मुसलमानच जबाबदार आहेत असं मौलाना म्हणतात. ते म्हणतात की जोवर इथले मुसलमान स्वतःला बदलू इच्छित नाही नव्या सुधारणा आत्मसात करू इच्छित नाही तोवर त्यांची प्रगती होणे दुरापास्त आहे.
माझ्या प्रियजनांनो,
तुम्हा सगळ्यांना हे ठाऊक आहे की अशी कोणती गोष्ट आहे जी येथे मला घेऊन आली आहे. माझ्यासाठी शहाजहानच्या स्मृती असलेल्या या जामा मस्जिदीत मध्ये अशा सभा होणे काही नवीन नाही. या अगोदरही मी या ठिकाणी अनेक सभांना संबोधित केले आहे. त्याला आता बराच काळ लोटला आहे जेव्हा मी तुम्हाला संबोधित केलं होतं. त्यावेळी तुमच्या चेहऱ्यावर अस्वस्थता नव्हती, सबुरी होती. तुमच्या मनात शंका नव्हती तर विश्वास होता. पण जेव्हा आज मी तुमच्या चेहर्यावरील चिंता आणि तुमच्या काळजातलं रितेपण बघतोय तेव्हा मला या जुन्या घटनांची आठवण होते आहे. तुमच्या लक्षात आहे काय कि मी जेव्हा तुम्हाला साद घातली, तेव्हा तुम्ही माझी जीभ छाटली. मी लिहिण्यासाठी लेखणी उचलली तेव्हा तुम्ही माझे हात तोडले. मी जेव्हा चालण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझे पाय कापले. मी कूस बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझे कंबर तोडले.
राजकीय घडामोडींमुळे देशाची फाळणी झाली. फाळणीच्या अगोदरपासून मी तुम्हाला येणाऱ्या संकटाबद्दल सूचित करण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही हद्द पार करत माझ्या सूचनेकडेही दुर्लक्ष केले. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मी सूचित केलेल्या संकटांनी आज तुम्ही आम्ही घेरलो गेलो आहोत. योग्य मार्गापासून आपण भरकटत चाललो आहोत.
मी सांग इच्छितो की मला तुमच्या व्यवहाराबद्दल तक्रार आहे. माझा आजवरचा अनुभव दुःखद आहे.विचार करा की तुम्ही नेमका कोणता मार्ग निवडला? कुठे निघाला आहात? हे भीतीदायक आयुष्य नाही काय?
हे भितीदायक वातावरण तुम्हीच निर्माण केले आहे.अजूनही जास्त वेळ उलटुन गेलेली नाही. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्ही धर्मांचे हे अतिरेकी विचार विनाशाचं कारण बनणार आहेत.परंतु तुम्ही त्यांना सोडायला तयार नव्हता.तुम्ही ज्यांच्यावर भरवसा दाखवला तेच तुम्हाला सोडून निघून गेले. परंतु तुम्ही मात्र ऐकून न ऐकल्यासारखं केलं.
तुम्ही विचार देखील केला नाही की ही वेळ आणि वेळेची गती तुमचं नशीब बदलू शकत नाही. तुम्ही ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला त्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडून दिलं, तुम्हाला तुमच्या नशिबावर सोपवलं. इंग्रजांनी आखलेल्या डावांमुळे तुमची स्वप्ने नेस्तनाबूत झाली आहेत. तुम्हीच तुमचे नेते निवडले होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करत होतात. त्याच नेत्यांनी तुमचा विश्वासघात केला आणि तुमचा मांडलेला सारीपाट खेळ सुरु होण्याअगोदर मोडला.
मी तुमच्या जखमांना चिघळवण्यासाठी हे बोलत नाहीये. तुमच्या मनात असलेल्या अस्वस्थता देखील मी वाढवू इच्छित नाही. परंतु मागे वळून जर बघाल तर कितीतरी गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. एक वेळ अशी होती जेव्हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विश्वास बाळगून मी तुम्हाला एक साद घातली होती आणि सांगितलं होतं कि जे होऊ घातले आहे त्या कल्याणकारी स्थितीला कुठलाही धर्म रोखू शकत नाही. भारताच्या नशिबात ही राजकीय क्रांती लिहिली गेली आहे ज्याच्या गुलामगिरीच्या शृंखला विसाव्या शतकात स्वातंत्र्याच्या हवेत गळून पडणार आहेत तुम्ही काळासोबत आपले पाऊल उचलले नाही तर भावी इतिहासकार असे लिहितील कि, मुस्लीम समुदायाने असा मार्ग निवडला जो नामशेष होणाऱ्या जमाती निवडतात.
आज भारत स्वतंत्र आहे. तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता की समोरच्या लाल किल्ल्यावर स्वतंत्र भारताचा झेंडा अभिमानाने फडकत आहे. हा तोच झेंडा आहे जो एखाद्या राजबिंड्या राजासारखा स्वातंत्र्याचा चित्कार करतो आहे. हे ठीक आहे कि काळाने तुमच्या इच्छेप्रमाणे कूस बदलली नाही.
हीच ती क्रांती आहे या क्रांतीच्या एका लाटेने तुम्हाला बरंच भयभीत केलं. तुम्ही विचार करत असाल की तुमच्याकडून काहीतरी अमूल्य वस्तू हिरावून घेतली गेली आहे आणि त्याऐवजी कोणती तरी वाईट वस्तू तुम्हाला थोपवली आहे. हो तुमची ही अस्वस्थता यासाठी आहे की तुम्ही स्वतःला चांगल्या गोष्टीसाठी तयार केलं नव्हतं. वाईट गोष्टीला तुम्ही आपलंस केलं. इंग्रजांच्या हातातलं खेळणं बनून तुम्ही राहिलात.
एक काळ असा होता जेव्हा तुम्ही युद्धाचा बिगुल वाजावा म्हणून वाट पाहात होतात आज त्याच युद्धांचा आणि फाळणीचा परिणाम तुम्ही भोगत आहात. माझ्या भावांनो मी कायम अशा वेदनादायी राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. परंतु आज मला जे काही बोलायचं आहे ते रोखठोकपणे मी बोलू इच्छितो. हिंदुस्तानची फाळणी मुळात चुकीची होती. धार्मिक वादाला ज्या पद्धतीने हवा दिली गेली त्याचा हा परिणाम होता. हा परिणाम आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. आपले दुर्दैव असं कि आजही तीच परिस्थिती कायम आहे. मागील सात वर्षांची परिस्थिती पुन्हा सांगण्यात काही हाशील नाही. त्यातून काही चांगला परिणाम देखील निघणार नाही. अलबत्ता मुसलमानांवर ज्या संकटाचा डोंगर कोसळला आहे त्याला कारण म्हणजे मुस्लिम लीगचे चुकीचे धोरण. हिंदुस्थानचे राजकारण आणि देशाची दिशा आता बदलली आहे. मुस्लिम लीगसाठी येथे कुठलीही जागा नाही. केवळ आपल्या सद्सद्विवेकबुद्धी वर हे अवलंबून आहे की आपण हे वास्तव स्वीकारायचे किंवा नाही. मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की आपल्याला स्वतः शिवाय कोणीही टाळू शकत नाही. मी तुम्हाला नेहमीच म्हणत आलो आहे की द्वेष करणे सोडून द्या. शंका घेणे सोडून द्या आणि चुकीच्या तर्कवितर्ककांचा त्याग करा. या तीन गोष्टी म्हणजे अनोखी अशी त्रिधारी अनोखी तलवार आहे , जी दुधारी तलवारी पेक्षा अधिक धारदार आहे.
या परिस्थतीमुळे निर्माण झालेल्या अनेक गोष्टी मी तुम्हा नवयुवकांच्या तोंडून ऐकल्या आहेत. हे विस्थापितांच जगणं तुम्ही स्थलांतराच्या नावाखाली स्वीकारलं आहे. त्यावर तुम्ही विचार करा. तुम्हाला कळून चुकले की हा मार्ग चुकीचा आहे. तुमच काळीज घट्ट करा आणि मेंदूला विचार करायची सवय लावा आणि मग बघा तुमचे निर्णय किती फायद्याचे ठरतात. शेवटी तुम्ही कुठे जाणार आहात आणि का जाणार आहात हे अगोदर बघा.
हा चारमिनार माना उंचावून तुम्हाला विचारत आहे की तुम्ही तुमच्या इतिहासातील तुमचे पान कोठे हरवून बसला आहात? खरे तर हिंदुस्थानच्या राजकारणाने आपली दिशा बदलली आहे. कालपरवाच यमुना नदीच्या किनाऱ्यावर तुमच्याच काफील्यातील काही लोकांनी वजू केला होता. आज मात्र तुम्ही भीतीच्या सावटाखाली आहात? खरं पाहिलं तर दिल्ली तुमच्या रक्तामासाची बनलेली आहे.
प्रियजनांनो, ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी एका टाकाऊ उत्साहाने तुम्ही आनंदित झाला होतात त्याचप्रमाणे आजची तुमची ही चिंता देखील क्षणिक आहे. मुसलमान आणि भयभीतपणा, मुसलमान आणि असहिष्णुता या दोन गोष्टी एकाच ठिकाणी वास करू शकत नाही. खऱ्या मुसलमानाला कुठलीच ताकद रोखू शकत नाही आणि घाबरवू शकत नाही. तुम्हाला वाऱ्यावर सोडून जाणारे तुमचे हृदय तर ते घेऊन गेले नाहीत. अजूनही तुमचे हृद्य तुमच्यापाशी शाबूत आहे. या हृदयाला ईश्वराचे घर बनवा.
माझ्या या बोलण्यातून मला केवळ तक्रार करायची नाहीये. पण तुम्हाला नेहमी नेहमी सांगावे लागते की गर्वाचं गाठोड घेऊन काही मंडळी देश सोडून निघून गेली. परंतु अजूनही तुमच्या मनातील महत्वाकांक्षा बदललेल्या नसतील आणि डोक्यातील राग कमी झाला नसेल तर येणारी परिस्थिती याहून काही वेगळी असेल. जर खरंच तुमच्या मनात परिवर्तनाची आस असेल तर ते अशाप्रकारे घडवा की इतिहासच बदलेल. आज आपण क्रांतीचा एक टप्पा पूर्ण केला आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील काही पाने आजही रिक्त आहेत. आपल्या इतिहासातील रिक्त पदांचा मथळा आपण बनू शकतो. परंतु त्यासाठी आपण परिवर्तनासाठी तयार असायला हवं. असं म्हणू नका की आम्ही सुधारणांसाठी तयार नाही. आकाशातील तारे तुटले असतील पण सूर्य मात्र अजूनही कायम आहे. या मुक्त सूर्याकडे प्रकाशाची किरणे मागा आणि अंधाराच्या वाटेवर त्या किरणांना पसरवा. उभा अंधारलेल्या वाटेवर उजेडाची खूप आवश्यकता आहे. मी तुम्हाला हे सांगत नाहीये की कुठल्या नामांकित मदरश्यातून तुमच्या प्रामाणिकतेच प्रमाणपत्र आणा. मी तर सांगू इच्छितो की भारताच्या ज्या पूर्व सुवर्णकाळाची तुम्ही चर्चा करत आहात, तो तुमच्या पूर्वजांनी घडवलंय. त्याला सोडू नका, त्याला विसरू नका. या सुवर्णकाळाचे वारसदार म्हणून राहा आणि निश्चय करा की तुम्ही इथून कुठेही जायला तयार नाही.
हा देश आपलाच आहे. आपल्या देशासाठी आपण आहोत आणि या देशाचे भविष्य आपल्या सह्योगाशिवाय अपूर्ण आहे. आज तुम्ही या प्रलयाला घाबरता आहात? कधीकाळी तुम्ही प्रलय होतात. आज अंधाराला घाबरत आहात? तुम्ही विसरलात की तुमचं अस्तित्व प्रकाशमान होतं. कोसळणाऱ्या पावसाला घाबरून तुम्ही तुमचे कपडे सांभाळत आहात? तुमचे काही साथीदार असे होते जे भर समुद्रात तुमच्यासाठी उतरले. अजस्त्र अशा पर्वताला त्यांनी टक्कर दिली. वादळ आल्यावर त्या वादळाला सांगितलं की हा रस्ता नव्हे. आपल्या प्रामाणिक पणा पासून दूर गेल्याच हे द्योतक आहे. बड्या बड्या आसामींची कॉलर पकडणारे तुम्ही आज स्वतःचीच कॉलर गहाण ठेवून बसला आहात. ईश्वराला देखील तुम्ही गाफील ठेवले.
प्रियजनांनो, या सगळ्या परिस्थतीवर माझ्याकडे काही नवीन तोडगा नाही. चौदाशे वर्षांपूर्वी हजरत मोहम्मद पैगंबर यांनी सांगितला तोडगा मी तुम्हाला सांगणार आहे.
कुरान शरीफ मध्ये असं उद्धृत केलंय कि, ‘निराश होऊ नका, दुखी होऊ नका. तुम्ही जर खरेच इमानदार असाल तर विजय नक्की तुमचाच आहे’.
आपल्यातला संवाद मी येथे थांबवतो. मला जे काही सांगायचं होतं ते मी सांगितलं. हेवती एवढंच सांगेल कि आपल्या महत्त्वाकांक्षांना थोडा लगाम लावा. आपल्या आयुष्यात असणाऱ्या आसपासच्या वातावरणात स्वतःचे अस्तित्व स्वतः बनवा. हा काही बाजारचा भाजीपाला नाही की मी तुम्हाला खरेदी करून देऊ शकेल. आपल्याला तर हृदये जिंकायची आहेत जी आपण आपल्या कर्माने जिंकू.
प्रभू तुमचे रक्षण करो!
अनुवाद : सागर भालेराव


