आजचा युवक सामाजिक संरचना बदलू पाहतोय?



आजच युवक सामाजिक संरचना बदलू पाहतोय?

     मुंबईतील सेंट झेविअर्स आणि टाटा सोशल सायन्स त्याचबरोबर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या नामांकित शिक्षणसंस्थांवर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक लक्ष ठेऊन असल्याच वाचलं.डोक्यात विचारांचा घोळ सुरु झाला.शिक्षण संस्थामध्ये माओवादी अन नक्षलवादी घडवत असल्याचा संशय एटिएस पथकाला आहे.सुशिक्षित आणि आधुनिक माओवादी निर्माण करण्याचा कारखाना सुरु झाल्याची ही नांदी असावी कदाचित.
     सर्वहारा समाजाची अस्वस्थता आजपर्यंत जगातील सर्व समाजवादी विचारवंतांनी मांडली.ओरीस्टोटल ,लेनिन,बेलाझ बेला अशा तत्वचिंतकांनी याच जाणिवेतून जनसंवादाचे सिद्धांत (communication  theory ) मांडले.वर्गात शिकत असलेले सिद्धांत प्रत्यक्षपणे व्यवहारात वापरल्यास प्रश्नांचा निपटाराही लवकर होईल असा विचार आजची तरुणाई करते आहे.आणि नेमके हेच विद्यार्थी हेरून त्यांना माओवादी बनविण्याचा प्रयत्न काही संघटना करत असल्याचा संशय एटिएसला आहे.तरुणांच्या डोक्याशी आणि मनाशी खेळण्याचा हा एक डाव आहे.खर तर आपला तरुण सध्या महागाई,भ्रष्ट्राचार,राजकीय अनास्था याविषयी कमालीचा जागरूक आणि सतर्क झाला आहे.त्याची ही उर्जा उत्सर्जित व्हायला कुठे वाव नाही,नेमक्या ह्याच संधीचा फायदा घेऊन सशस्र क्रांतीच्या बळावर परिवर्तन आणू इच्छिणाऱ्या शक्ती माओवादी आणि नक्षलवादी घडवत आहेत.जागतिकीकरणामध्ये देशातील एक अख्ख्याच्या अख्खा समाजघटक डावलला गेला.त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण करण्याची तजवीज मायबाप सरकार करू शकलं नाही.आणि त्याबद्दल साधी आस्था देखील दाखवण्याचं कष्ट इथल्या राज्यव्यवस्थेने आजवर घेतलं नव्हत.सिंगूर,नर्मदा,लव्हासा अशा आंदोलनातून स्वतःच अस्तित्व हा समाज टिकवु पाहतो आहे.त्या समुदायाच माणूसपण जितक मओवाद्यांना समजलं तितक आपण समजू शकलो नाही अथवा त्यात अपयशी ठरलो हे निदान आपण स्विकारायला हवं. पोटाला अन्न आणि हाताला काम देण्याची तजवीज इथल्या राज्यव्यवस्थेकडून होत नाही म्हणून ही तरुणाई अशा चळवळीकडे आकर्षित झालेली दिसते आहे.महात्मा गांधी,पंडित नेहरू,डॉ.आंबेडकर यांच्यापेक्षा मग त्यांना लेनिन,माओ,ह्युगो चेविझ जवळचे वाटतात.लोकशाही स्वीकारलेल्या राज्यघटनेला मग तिलांजली दिली जाते आणि क्रांतीच्या नावाखाली रक्ताचा अभिषेक दिला जातो.
     भारतीय लोकशाहीला अपेक्षित नितीमुल्ये कुठेतरी समाजापर्यंत पोहोचत नाहीत अस वाटत.क्रांतीच हत्यार शांततेच्या तत्त्वातून आणि बुद्ध-महावीरांच्या करुणेतूनही सापडतं हे तरुणाई विसरते.लोकशाही व्यवस्थेत एक व्यक्ती एक मत जरूर आहे,पण प्रत्येक मताला एकसारखी "पत" देणारी व्यवस्था नाही.ही व्यवस्था आपण दुसरीकडे शोधतो आहोत.एकसंघ,अखंड भारतवर्षाच स्वप्न बघणाऱ्या तरुणाईपुढे जर योग्य आदर्श ठेवण्यास अन आदर्श लोकशाही व्यवस्था ठेवण्यास जर आपण यशस्वी झालोत तर पुढच्या पिढ्यांनाही हे दिशादर्शक ठरणार आहे.

इंजि.सागर भालेराव.

प्रामाणिकतेत मुंबई आघाडीवर....!!!

प्रामाणिकतेत मुंबई आघाडीवर....!!!


     एका सर्वेक्षणावरून प्रामाणिकतेच्या बाबतीत मुंबई शहर जगात दुसऱ्या क्रमांकावर असल्याच निष्पन्न झालं आहे.खर तर आजच्या युगात प्रामाणिकपणाची वानवा सतावत असताना मुंबई मात्र आपली ओळख बनवते हे येथे उल्लेखनीय! आजवर मुंबईने अनेक सुख-दु:खे पाहीली,लक्ष्मी आणि अवदसा इथे हातात हात घालून चालतात,अंडरवर्डचा बादशाह इथल्याच गल्ली-बोळात घडतो-बिघडतो,दहशतवादाची अनेक पाशवी कृत्ये इथला समाज  झेलतो,गोलपिठा,कामाठीपुऱ्याच भयाण वास्तव इथली मुंबई जगते.या सगळ्या जाणिवेच्या प्रवासातून आजवर मुंबई घडली आहे.तरीही संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रच प्रतिबिंब एकट्या मुंबई नगरीत पाहायला मिळत.
     पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यातून आलेला कामगार सुद्धा मग अल्पावधीतच मग मुंबईकर होतो.त्याला जातीपातीच,धर्माचं कुठलंच लेबल वापरायची गरज पडत नसते.कारण यंत्रवत चालणाऱ्या या शहराने या लेबल्सला केव्हाच अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे.सामाजिक समरसतेतून  एकमेकांना मदत करायचा हा इथल्या नागरिकांचा स्थायी भाव! एखाद्या भांडखोर घरामध्ये प्राणांतिक प्रसंग घडून गेल्यावर जसा एकोपा निर्माण होतो,तसाच आपुलकीचा जिव्हाळा बॉम्बस्फोटानंतर इथल्या सामान्य माणसांमध्ये निर्माण झाला.यंत्रवत चालणारी व्यवस्था आता हळूहळू कुटुंबासारखी होऊ पाहते आहे.त्यामुळेच,रिक्षामध्ये ५० लाख रुपये विसरून गेलेल्या प्रवाश्याला रिक्षाचालक ते परत करतो आणि किलोभर सोन  सापडून सुद्धा एखादा प्रामाणिक मुंबईकर त्याच्या मालकाला ते पुन्हा देतो,हे प्रामाणिकपणाच लक्षण असणारी "सोन्या"सारखी माणसे क्वचितच इतर ठिकाणी सापडावीत!
     २ महिन्यापूर्वी मी पत्रकारितेच्या अभ्यासासाठी मुंबई गाठलं,या दोनच महिन्यात इथल्या गर्दीशी आणि वातावरणाशी समरूप झालो.प्रत्येकाला आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या या नगरी बद्दल स्वतः  अनुभव घेतला.तिच्या प्रामाणिकते बद्दल शंका घेण्याच कारण नाही,यंत्रांची,तंत्रांची,तल्लम साडीची हि मुंबापुरी शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्यातून आजकाल रोज भेटते आहे.ह्या मायानगरीचा उत्कर्ष असाच वाढत जावा ही अपेक्षा!!

इंजि.सागर भालेराव.
              

मार्क्सवाद आणि भारतीय समाज.(Communication Theory)

   


  मार्क्सवाद आणि साम्यवादाबद्दल आजकाल भरपूर काही बोललं जातंय.भारतीय समाजाला मार्क्सवाद नाही तर लोकशाही प्रणित क्रांती अपेक्षित आहे असा एक सुर सध्या आळवला जातो आहे.परंतु "दास कॅपिटल" या आपल्या ग्रंथात जेव्हा कार्ल मार्क्स कामगारांच्या आणि शोषितांच्या बाजुने बोलतो तेव्हा त्याच्या जाणीवा त्यात व्यक्त होतात,रशियाच्या पाश्वर्यभूमीवर  आणि साम्यवादी चळवळीतून निर्माण झालेला हा लढा भारताच्या दृष्टीकोनातून पहिला तर त्याची तत्वे पूर्णपणे इथे लागू होत नाही.श्रमिक आणि भांडवलदारांच्या विरुद्धचा लढा आपण आता आता सुरु केलेला आहे.उदारीकरणानंतर आणि जागतिकीकरणानंतर आपल्या समाजात झालेला बदल आणि त्या बदलामागची कारणे मार्क्सच्या नजरेतुन समजुन घेणे सध्या गरजेचे वाटते आहे.सशस्र क्रांतीचा मार्क्सला अपेक्षित असलेला लढा आपण उभारू शकत नाही पण लोकशाही मार्गाने हि समस्या आपण नक्कीच सोडऊ शकतो.बुद्धाची करुणा जेवढी भारतीय समाजाला आपली ओळख वाटते,तेवढीच न्याय्य भूमिकासुद्धा आपली संस्कृती आहे हे विसरता कामा नये.धर्माला अफूची गोळी मानणारा मार्क्स भारतीय तरुणांना का आपलासा वाटतो ? याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.नक्षलवादी चळवळीविषयी आपण भरपूर बोलतो पण त्याच्या मुळाशी जाण्याचे आपण साफपणे नाकारतो.आपलाच समाजघटक असलेला काही अल्पसंख्यांक समुदाय का स्वतःला अजूनही या व्यवस्थेपासून अलिप्त ठेवतो आहे, याबद्दल चर्चा करणे सामाजिक विचारवंतांकडून अपेक्षित आहे .पण बहुमताला पटणारा मुद्दा अल्पमताला किंमत देत नाही म्हणुन त्यांचे विचारच नाकारणे जसे मार्क्सला योग्य वाटत नाही तसेच लोकशाही तत्वे मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला सुद्धा नकोशा वाटतात.त्यामुळे संवादाच्या माध्यमातून विषमतेचा,भांडवलशाहीचा आणि वर्गाव्यवस्थेचा हा प्रश्न कसा सुटू शकतो याबद्दल विचार आणि कार्य करणे हे आपल्यासमोरची आव्हाने असणार आहेत.

 इंजि.सागर भालेराव.

धादांत खैरलांजी.....(communication theory)

हे मिथक आहे का भिमा??
-"धादांत खैरलांजी" रंगभूमीवर.

     सुमारे ७ वर्षापूर्वी म्हणजेच २९ सप्टेबर २००६ रोजी स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात माणुसकीला आणि समग्र परिवर्तनवादी संस्कृतीला काळिमा फासणारा प्रकार घडला.शुल्लक जमिनीच्या वादावरून घडलेल्या "खैरलांजी" हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रासह उभा देश सुन्न झाला.खैरलांजी हत्याकांडात सुरेखा आणि प्रियांका भोतमांगे या दलित कुटुंबातील  माय-लेकिंवर तथाकथित सवर्ण समाजातील गावगुंडांनी आळीपाळीने बलात्कार केला. एवढयावरच न थांबता या माय-लेकींच्या योनीत लाकूड टाकून पाशवी वेदना देऊन गावातून नग्न धिंड काढण्याचा संतापजनक प्रकारही करण्यात आला.सदर हत्याकांडाने जातीयतेच वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलं.या घटनेची माध्यमांनी देखील म्हणावी तशी दखल घेतली नव्हती.जनक्षोभ उसळल्यानंतर आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर या गोष्टीचं दाहक स्वरूप जगासमोर आलं होत.या सर्व घटनेचा संदर्भ घेत,अजूनही खेडोपाडी-शहरात शेकडो प्रियांका-सुरेखा नव्याने खैरलांजीला सामोरे जात आहे असं वास्तव सुप्रसिध्द कवयित्री प्रा.प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या पहिल्या वहिल्या नाटकात "धादांत खैरलांजी" मध्ये मांडल आहे.  या हत्याकांडाला ७ वर्षे पूर्ण होत असताना हे नाटक रसिकांसमोर आलं आहे.हजारो वर्षांच्या जुलमी व्यवस्थेला नाकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्य समाजाने हिंदू धर्माचा त्याग केला.समतावादी युगाचं स्वप्न बघणाऱ्या पुढच्या पिढीला त्यानंतरही वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं.रिडल्स,नामांतर,खैरलांजी इ. प्रकरणात अस्मिता पणाला लावावी लागली.परंतु,ह्या चळवळीला देखील उतरती काळा लागली.स्वहक्कासाठी आणि माणुसकीचा अधिकार मागण्यासाठी  लढणारा चित्ता देखील लेचापाचा झालेला दिसला.चळवळीची वाताहत,नव्याने वाढू घातलेला जातीयवाद,त्यातल्या त्यात पंचम वर्ग म्हणून ज्या दलित स्रिया स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करीत आहेत,त्यांच्या समोरच्या समस्या,असं संपूर्ण वास्तववादी चित्र या नाटकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे.आजवर समाजाचा स्रीयांकडे  बघण्याचा दृष्टीकोन कायम दुय्यम राहिलेला आहे,आणि त्यातच दलित स्रियांचे प्रश्न चर्चेत आणण्याचं धाडस कुणी केल नव्हत.त्यामुळे " हे सगळ मिथक आहे का भिमा?" असा प्रश्न आंबेडकरी विचारांचे नवयुवक विचारत होती.या प्रश्नाला प्रा.उर्मिला पवार यांच्या "आयदान" मधून त्यांनी  वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.आणि त्याचच पुढच पाऊल हे नाटक आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये.
     निर्भया प्रकरणानंतर मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणारा संवेदनशील समुदाय,खैरलांजी हत्याकांडावेळी का पुढे सरसावला नाही? कायद्याने देखील आरोपींना नाममात्र शिक्षा देऊन पिडीतांवर एकप्रकारे अन्यायाच केला.अशा प्रकारच्या  अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा एक उत्कृष्ट प्रयोग रंगभूमीवर होतो आहे.मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाच एक साधन असलेल्या नाटकाद्वारे असे प्रश्न चर्चिले जावेत अन प्रेक्षकांना देखील अशा सामाजिक विषयांवर विचार करायला अंतर्मुख करावे अशी अपेक्षा!

इंजि.सागर भालेराव.
९५९५८४२२३८ 
१५ सप्टेबरला या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला,या कार्यक्रमासाठी गेलो होतो,त्याबद्दल...

फाशी झाली आता पुढे काय??? (communication theory)

वर्षभराच्या आत निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.या देशात न्यायप्रक्रिया किचकट जरी असली तरी लोकशाही मानणाऱ्यांना ती सर्वोच्च संस्था वाटते.आजवर अनेक बलात्काराच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आल्या आहे आणि घडत आहेत.(भविष्यात घडू नये हि अपेक्षा!) निर्भया प्रकरणानंतर सगळा देश हळहळला होता आणि संपूर्ण देशात न्याय मागण्यासाठी तरुणांनी लढा उभारला  होता.त्या दबावामुळे खर तर द्रुतगती न्यायालयाची स्थापना केली गेली.झाल्या प्रकारानंतर तरुणाई रस्त्यावर उतरली,त्यांच्यातील संवादाच     माध्यम  सोशल मिडिया होत.फेसबुक,ट्विटर च्या माध्यमातून तरुणायीने आपले विचार मांडले आणि बघता बघता लाखोचा समुदाय विजय चौकात निदर्शने करताना,अश्रुधुराचा मारा खाताना,लाठीमार खाताना दिसला.न्यायासाठी ज्या पद्धतीने हा समुदाय लढला त्याच पद्धतीने त्याने पुढे सुद्धा वागायला हव.मेणबत्ती मोर्चे काढून हा प्रश्न संपणारा नाही.पुरुषप्रधान,स्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या आपल्या समाजात समानतेची शिकवण देणारा नवा अध्याय नव्या माध्यमातून आपल्याला सुरु करावा लागणार  आहे. निर्भायाला न्याय मिळाला पण अजूनही सुरेखा आणि प्रियांका भोतमांगे यांच्यासारख्या दुर्गम भागातील स्रियांना न्याय अजून मिळायचा आहे. त्यांच्यासाठी कुणीही मेणबत्ती मोर्चे काढलेले नाही,किंवा कोणताही मिडिया त्यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही.या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करावा लागणार आहे.कायदा झाला म्हणून स्रीयांवरचे अत्याचार कमी होणार नाहीत पण झालेल्या कायद्याची परिभाषा सामान्य नागरिकांना कळेल यासाठी आपण युवकांना  प्रयत्न करावे लागणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या गोष्टी सामान्य नागरिकांना सांगायला हव्यात.या घटना पुढे घडणार नाहीत आणि उपेक्षितांना न्याय मिळेल हि अपेक्षा!      

उत्सवाचे दिवस....(communication theory)

उद्यापासून घरोघरी गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला विराजमान करतील.१० दिवसासाठी मुक्कामी आलेला हा  पाहुणा प्रत्येक गणेशभक्ताला हवाहवासा वाटतो, म्हणून तर तो दरवर्षी विद्येची देवता आणि कलेचा दर्दी असलेल्या बाप्पाची वाट पाहत असतो.समाजात एकोपा नांदावा आणि सुसंवाद होऊन जागृत समाज निर्माण व्हावा असा या उत्सवामागचा विचार.परंतु,काळानुरूप सगळ्या गोष्टी बदलत गेल्या.अगोदर समाज प्रबोधनासाठी असलेला हा उत्सव हळूहळू मनोरंजनाच साधन बनलं.संवादासाठी आणि नवनिर्मितीसाठी एकत्र येणारे तरुण कार्यकर्ते आता मात्र धंदा म्हणून या उत्सवाकडे पाहू लागले.जागतिकीकरणाच  वारं मग बाप्पासुद्धा रोखू शकला  नाही.मनोरंजनासाठी भल्या भल्या आरास बनवल्या जाऊ लागल्या,दुसऱ्या गणेशमंडळाला खुज ठरवण्यासाठी स्पर्धा होऊ लागली.वर्गणी कोटींच्या घरात जमा होऊ लागल्या,मार्केटिंगचा,प्रसिद्धीचा फंडा येथे देखील वापरला जाऊ लागला.आपण या उत्सवामागचा हेतू हळूहळू  विसरतो आहोत असं वाटायला लागलं आहे.लाखो करोडो रुपये या समारंभात खर्च होतील,संस्कृती आणि परंपरेच्या  नावाखाली राजरोस १० दिवस संस्कृतीरक्षक धिंगाणा घालताना दिसतील. असं चित्र पाहून हतबल झालेला गणपती काय विचार करेल? संवादाच आणि एकोप्याच हे माध्यम आता अपयशी तर ठरत नाही ना? आपण आपल्या मुळ उद्दिष्टापासून दूर तर  जात नाही ना हे या क्षणी आपण ओळखायला हवे आहे.चंगळवादाच्या भोवऱ्यात न अडकता  सामाजिक उद्दिष्ट्य समोर ठेऊन हा उत्सव साजरा करूयात.

इंजि.सागर भालेराव.
9595842238