संकटाच्या दारात उभा आहे "पँथर"....

संकटाच्या दारात उभा आहे  "पँथर"....

     भारतीय समाजात आजवर एक असा समाज घटक जो कायम वर्णवादी व्यवस्थेमध्ये पिचला गेला होता,त्या सर्वहारा समाजाची घालमेल ७० च्या दशकात साहित्य,चळवळ,राजकारण आणि समाजकारण या माध्यमातून बाहेर यायला लागली.सदाशिव पेठी आणि हिंदू कॉलनी असे शिक्के असलेले अभिजनवार्गाचे साहित्य आता टीकेचे धनी ठरत होते.शृंगारिक साहित्य निर्मितीपेक्षा क्रांतिकारी साहित्य निर्मिती व्हावी आणि आपल्या जाणिवांचा प्रवास जगासमोर यावा,यासाठी नवी पिढी काम करू लागली.वर्णव्यवस्थेच्या जुलमी जाचातून ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सोडविण्याचा प्रयत्न केला,त्या प्रयत्नाला मूठमाती दिली जात असल्याची भावना ७० च्या काळात आंबेडकरी तरुणांच्या मनात रुंजी घालू लागली.आणि "अक्शन को रिअक्शन दो" म्हणत  अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर  दलित पँथर ही सशस्त्र संघटना १९७२ मध्ये सुरू केली.आणि या संघटनेचा मुख्य म्होरक्या होते  "पद्मश्री नामदेव ढसाळ"!

    नामदेव ढसाळ हे एक कवी म्हणून,राजकारणी म्हणून,कार्यकर्ता म्हणून आणि सामाजिक विश्लेषक म्हणून सगळ्या भारताला माहिती आहे.त्यांच्या कवितेचा लेहेजा आजही अनेक क्रांतिकारी  विचारांच्या तरुणांवर अधिराज्य गाजवतो आहे.त्यांच्या कवितेतून प्रसवणारी वेदना कधी शिव्यांच्या माध्यमातून तर कधी जडत्वाच्या प्रक्रियेचा भाग असलेल्या भारदस्त शब्दातून वाहत असते.अस्पृश्य समाजात जन्माला आलेले  नामदेव ढासळ नंतर इतके  विद्रोही कसे होतात  ह्या प्रश्नाची उकल करताना थक्क होऊन जायला होत.खाटकाच्या हाताखाली काम करणारा बाप,समाजव्यवस्थेचा भार डोक्यावर वाहणारी आई,आणि आजूबाजूला जातीयतेच बिकट सावट,अशा सगळ्या परिस्थितीतून ढसाळ  घडत होते .हा सगळा जाणिवांचा प्रवास मग "गोलपिठा" या काव्यसंग्रहातून बाहेर व्यक्त झाला.गोलपिठाच्या वेश्या वस्तीत शरीरविक्री करणारी बाई त्यांना  आपली आई-बहिण वाटू लागली,ज्या आया बहिणी पोटापाण्यासाठी आपली शरीर विकतात त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आपण उभं रहाव हे फक्त ढसाळ यांनाच सुचलं.आणि ते खऱ्या अर्थाने पीडितांच्या मोर्चाचं नेतृत्व करणारा सेनापती झाले..एक कार्यकर्ता म्हणून नामदेव ढसाळ वेगळेचं वाटतात .सगळ आयुष्य समष्टीसाठी वाहून देण्याची त्यांची तयारी असते.त्यामुळेच तर आयुष्याच्या शेवटी स्वतःजवळ स्वतःची तजवीज काहीच नसते.अमानुषीकारणाविरोधात पहिला "ब्र" उच्चारण्याची उर्मी याच माणसाने आणली.हाच माणूस मग सूर्याच्या रथाचे ७ घोडे मारण्यासाठी सुद्धा मागे पुढे पाहू लागला नाही,त्याच्या गाठी हे शृंगारिक जग गांडू बगीचा आहे. त्यांच्या लिखाणाने सारस्वतांच्या मेळ्यात धरणीकंप माजला.काहींनी "ढसाळ नामदेवांचा काळ सुरु झाला आहे" अशी निर्भत्सना केली तर काहींनी त्यांना  "पोएट ऑफ अंडरवर्ड"  अशी उपाधीही दिली.
    अशा सगळ्या कमालीच्या वातावरणातून घडलेला हा पँथर सध्या संकटाच्या दारात उभा आहे.गेल्या कित्येक दिवसापासून ते मायस्थेनिया ग्रेव्हिस या दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत.गेल्या २ आठवड्यापूर्वी त्यांना पोटाचा त्रास होऊ लागला आणि त्यांना मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये भरती केलं गेलं. नामदेव ढसाळ हे कॅन्सरच्या विकाराने आजारी असून,आयुष्यभर परिस्थितीशी लढणारा योद्धा आज दुर्धर अशा आजाराशी लढतो आहे,सगळ्या गोष्टींची  सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही.सामान्य माणसासारखा विचार कधी ढसाळ सरांनी  केलाच नाही.त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात पैसे साठवावे आणि मस्त पैकी आयुष्याची संध्याकाळ मौज मजेत घालवावी असं त्यांना वाटण्याचं कारणही नाही.काल त्यांनी व्यवस्थेला दिलेल्या शिव्या आज गोड वाटतायेत.त्यांच्या प्रसवणाऱ्या वेदना आता कुठे जाणऊ लागल्या आहेत.त्यामुळे हा अवलिया चळवळीसाठी किती महत्वाचा आहे हे कळते.आज आंबेडकरी तरुणांसमोर नीट,पारदर्शी नेतृत्व नाही.समाजाची झालेली सामाजिक आणि राजकीय ससेहोलपट सगळेच जाणतात,त्यातल्या त्यात कधी धर्मांध शक्तींबरोबर गेल्याची ओरड ढसालांवर झाली तर कधी भारतीय समाजरचनेपेक्षा पाश्चिमात्य संस्कृतीच आकर्षण असल्याच बोललं गेलं.पण या सगळ्या टीकेत ढसाळ सर स्थितप्रज्ञ  होते,त्यांना माहित होत कि आंतरराष्ट्रीय पातळीवर जेव्हा हे सर्वहारा समाजाचे मुद्दे  चर्चिले जातील तेव्हा त्याचा होणारा परिणाम वेगळा असेल.असा दूरदृष्टी असलेला नेता लाभणे आजच्या काळात तर दुर्मिळच!

"मी तुला शिव्या देतो,तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो,तुझ्या संस्कृतीला शिव्या देतो,तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो,
इव्हन मी आई-बापाला शिव्या देतो,बांबलीच्यांनो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात ,आता आम्हालाही जन्म देऊन बरबाद केलंत"

अशी भळभळ व्यक्त करणारा कवी आपली मनाची घालमेल व्यक्त करतो,चाकोरीच्या आतलं जीण त्याला नको वाटत.अक्राळ-विक्राळ भांडण त्याला आवडतं.सृजनाचा एल्गार त्याला काही अंशी पटतो पण त्याचबरोबर दांभिकतेवर तोंडसुख घ्यायलाही त्याला तितकाच आनंद होतो.असा अष्टपैलू कवी,सजग कार्यकर्ता आणि डोंगरा एवढा तत्वचिंतक आज खाटेला खिळलेला पाहावा लागत आहे.त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून कित्येक कार्यकर्ते धावपळ करतायेत,त्यांची बायको म्हणजे शाहीर अमर शेखांची मुलगी प्रख्यात कवयत्री मल्लिका अमर शेख त्यांच्या प्रकृतीवर रात्रंदिवस नजर ठेऊन आहेत.नामदेव ढसाळांच्या प्रत्येक कार्यात  खांद्याला खांदा लाऊन चालणारी हि महिला, पत्नी म्हणून आज ढसाळ सरांच्या पाठीशी  खंबीरपणे उभी आहे.बॉम्बे रुग्णालयात त्यांना भेटायला येणाऱ्या त्यांच्या चाहत्यांची रीघ थांबता थांबत नाहीये.त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी भरपूर असली तरी आजपर्यंत कुणासमोर हात न पसरणारे ढसाळ परिवाराचे हात सध्या आर्थिक मदतीच्या अपेक्षेत आहे.ज्या सरकारला आपल्या उभ्या आयुष्यात शिव्यांच्या पन्हाळ्याखाली उभं केलं,त्या महाराष्ट्र  सरकारने देखील या योद्ध्याची अगतिकता समजून घेऊन त्यांना ७ लाखांची मदत जाहीर केली आहे,सिद्धीविनायक ट्रस्ट ने देखील २ लाख रुपये देण्याचं आश्वासन दिल आहे.देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी असा प्रत्यय सध्या येतो आहे.ढसाळ सरांसारखा निडर योद्धा आपल्याला हवा आहे.त्यांच्या विचारांचा,आचारांचा आणि समजुतीचा वारसा संपूर्ण  देशाला हवा आहे.त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होवो आणि संकटाच्या दारात उभा असलेला हा "पँथर" लवकरच मार्गदर्शक म्हणून आजच्या तरुणपिढीला लाभावा अशी इच्छा.


 इंजि.सागर भालेराव 
9595842238

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांचा उचित सन्मान.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांचा उचित  सन्मान.             
              
    पुणे शहर म्हणजे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाचं सांस्कृतिक वैभव! आजवरच्या प्रत्येक शैक्षणिक चळवळीत,परिवर्तनवादी चळवळीत हे शहर पुढारलेलं आहे."विद्येच माहेरघर" असलेल्या पुण्याने जगभरात आपली ओळख आणि परंपरा निर्माण केलेली आहे.संपूर्ण भारतातूनच काय पण जगातून अनेक विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत असतात.उत्तम शैक्षणिक वातावरण,नावाजलेली शिक्षण संस्था,प्रगल्भ सांस्कृतिक वातावरण यामुळे अनेक विद्यार्थी या विद्याभूमिकडे आकर्षित होत असतात."पुणे विद्यापीठ" हि या सर्व कारणांची मातृसंस्था.१९४८ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाने आजवर अनेक नामांकित व्यक्ती जगाला दिले आहेत,ज्यांनी पुढे जाऊन जग घडविण्यात मोलाची  कामगिरी केली आहे.अशा या विद्यापीठाचा येत्या काळात नामविस्तार होणार आहे.काल झालेल्या सिनेट सदस्यांच्या बैठकीत विद्यापीठाचा "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ" असा नामविस्तार व्हावा असा निर्णय झाला आहे,आणि या मागणीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

   "कर्मठ" पुण्याची "सांस्कृतिक" पुणे ओळख निर्माण करण्यासाठी महात्मा फुल्यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांत सावित्रीबाई खंबीरपणे  ज्योतीबांच्या मागे उभ्या राहिल्या.ज्या समाजात स्रियांना ज्ञानार्जनबंदी होती,त्या समाजाच्या विरोधात उभे राहून परिवर्तनाचा एल्गार पुकारणारे हे दाम्पत्य खऱ्या अर्थाने या देशाचे कोहिनूर ठरले.चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्रियांना पंचम वर्ग म्हणून मान्यता होती,अस्पृश्यांपेक्षा कठोर वागणूक या स्रिवर्गाला    भोगावी लागली आहे,दास्यपणाची,गुलामगिरीची जाणीव शिक्षणाशिवाय रुजू घालू शकत नाही हे महात्मा फुल्यांनी ओळखलं आणि स्री शिकली कि समाज शिकेल आणि कर्मठ प्रथा बंद होतील हे जाणून त्यांनी आपल्या पत्नीला,म्हणजेच सावित्रीबाईंना  शिक्षण दिलं. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली १८५१ साली पुण्यातच स्रियांसाठी भिडे वाड्यात त्यांनी सुरु केलेली मुलींसाठीची   शाळा त्यांच्या दूरदृष्टीची आजही साक्ष देत आहे.

"विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले" 

 हे सत्य स्वीकारत त्यांनी दलितोद्धारासाठी आजन्म कार्य केले.सत्यशोधक समाज मध्ये असलेल सावित्रीबाईच योगदान देखील वादातीत असंच आहे.'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.आणि महात्मा फुल्यांच्या पाठीवर हे काम सावित्रीबाईनी अविचलपणे पेललं.
  ज्या काळात धर्मरुढीचा,धर्मवेड्या लोकांचा समाजावर पगडा होता,त्या काळात समाजाच्या विरुद्ध जाऊन सामाजिक सुदृढतेसाठी फुले दाम्पत्यांने केलेला हा प्रयोग नक्कीच प्रसंशनीय आहे.आज महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं,तर आज आकाशाला गवसणी घालणाऱ्या,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,खेळ अशा सगळ्या क्षेत्रात ज्या महिला दिसत आहेत त्या सावित्रीबाईच्या ऋणी आहेत.काल जर त्यांनी स्रिशिक्षणाची मुहूर्तमेढ रचली नसती तर महिला सक्षमीकारणाचा पायंडा पडलाच नसता.बालविवाहाला विरोध करणाऱ्या सावित्रीबाई,बलात्कारामुळे गरोदर असलेल्या बाईच बाळंतपण करणारी सावित्रीबाई,पोटापाण्यासाठी शरीरविक्री करणाऱ्या माय-माउलीला दृष्टांच्या तावडीतून सोडून आणणारी सावित्रीबाई आणि प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना आईच्या मायेप्रमाणे सुश्रुषा करणाऱ्या सावित्रीबाई आज देखील एक अद्भुत रसायन वाटतात.  त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नामांतरामुळे सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस नक्कीच न्याय मिळणार आहे.त्यांच्या कर्मभूमीत असलेल्या या विद्यापीठाला एक आणखी एक नवी ओळख मिळेल,आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कार्याचा महिमा हा विद्यापीठ रूपाने सर्वांच्या नजरेत राहणार आहे.सध्या सिनेटचा हा निर्णय राज्य शासनाकडे विचाराधीन आहे,येणाऱ्या काळात शासन किती लवकर निर्णय घेतो हे पाहण्याजोगे असेल.मराठवाडा नामांतराप्रसंगी झालेला संघर्ष आजूनही पुरोगामी चळवळीतील लोकांच्या मनात भळभळत आहे,१४ वर्षांच्या रक्तरंजित संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला,या वेळी मात्र असा प्रकार घडू नये आणि हि सुयोग्य मागणी मायबाप  सरकारने मान्य करावी अशी इच्छा विद्यापीठातील विद्यार्थी,प्राध्यापक आणि सगळेच कर्मचारी व्यक्त करीत आहेत.गेल्या ७-८ वर्षापासून काही संघटना पुणे विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करीत होत्या.सोशल मिडीयावर या मागणीला पाठींबा देणारे पेज देखील बनविण्यात आले होते,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या मागणीला पाठींबा मिळविण्याचा उत्कृष्ट प्रयोग या प्रकरणामध्ये करण्यात आल्याचे आढळते.पुणे विद्यापीठ नामविस्तारला कुणाची हरकत असेल असे चित्र सध्या तरी दिसत नाहीये.परंतु भविष्यात काही समाजविघातक शक्तींकडून याला विरोध होऊ शकतो.याच सुसंस्कृत पुण्यात गेल्या महिन्यात ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली.धर्मांध शक्तीकडे पुणे परत तर वळले जात नाही ना? अशा प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे.या पार्श्वभूमीवर आपल्या एकजुटीचे प्रदर्शन दाखऊन महाराष्ट्राची सुद्न्य जनता,पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहील अशी ग्वाही द्यायला हवी. सावित्रीबाई फुल्यांना आणि महात्मा फुल्यांना अभिप्रेत असलेला  पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न सुद्न्य जनता नक्की करेल.या सर्व परिवर्तनवादी विचारमंचाला हे विद्यापीठ सदोदित प्रेरणा देणारे ठरेल आणि या विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी सावित्रीमाईच कार्य डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रउभारणीत आपला सहभाग नोंदवतील या बाबत शंका नसावी.  

इंजि.सागर भालेराव.

आजचा युवक सामाजिक संरचना बदलू पाहतोय?



आजच युवक सामाजिक संरचना बदलू पाहतोय?

     मुंबईतील सेंट झेविअर्स आणि टाटा सोशल सायन्स त्याचबरोबर पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज या नामांकित शिक्षणसंस्थांवर महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक लक्ष ठेऊन असल्याच वाचलं.डोक्यात विचारांचा घोळ सुरु झाला.शिक्षण संस्थामध्ये माओवादी अन नक्षलवादी घडवत असल्याचा संशय एटिएस पथकाला आहे.सुशिक्षित आणि आधुनिक माओवादी निर्माण करण्याचा कारखाना सुरु झाल्याची ही नांदी असावी कदाचित.
     सर्वहारा समाजाची अस्वस्थता आजपर्यंत जगातील सर्व समाजवादी विचारवंतांनी मांडली.ओरीस्टोटल ,लेनिन,बेलाझ बेला अशा तत्वचिंतकांनी याच जाणिवेतून जनसंवादाचे सिद्धांत (communication  theory ) मांडले.वर्गात शिकत असलेले सिद्धांत प्रत्यक्षपणे व्यवहारात वापरल्यास प्रश्नांचा निपटाराही लवकर होईल असा विचार आजची तरुणाई करते आहे.आणि नेमके हेच विद्यार्थी हेरून त्यांना माओवादी बनविण्याचा प्रयत्न काही संघटना करत असल्याचा संशय एटिएसला आहे.तरुणांच्या डोक्याशी आणि मनाशी खेळण्याचा हा एक डाव आहे.खर तर आपला तरुण सध्या महागाई,भ्रष्ट्राचार,राजकीय अनास्था याविषयी कमालीचा जागरूक आणि सतर्क झाला आहे.त्याची ही उर्जा उत्सर्जित व्हायला कुठे वाव नाही,नेमक्या ह्याच संधीचा फायदा घेऊन सशस्र क्रांतीच्या बळावर परिवर्तन आणू इच्छिणाऱ्या शक्ती माओवादी आणि नक्षलवादी घडवत आहेत.जागतिकीकरणामध्ये देशातील एक अख्ख्याच्या अख्खा समाजघटक डावलला गेला.त्यांच्या प्राथमिक गरजाही पूर्ण करण्याची तजवीज मायबाप सरकार करू शकलं नाही.आणि त्याबद्दल साधी आस्था देखील दाखवण्याचं कष्ट इथल्या राज्यव्यवस्थेने आजवर घेतलं नव्हत.सिंगूर,नर्मदा,लव्हासा अशा आंदोलनातून स्वतःच अस्तित्व हा समाज टिकवु पाहतो आहे.त्या समुदायाच माणूसपण जितक मओवाद्यांना समजलं तितक आपण समजू शकलो नाही अथवा त्यात अपयशी ठरलो हे निदान आपण स्विकारायला हवं. पोटाला अन्न आणि हाताला काम देण्याची तजवीज इथल्या राज्यव्यवस्थेकडून होत नाही म्हणून ही तरुणाई अशा चळवळीकडे आकर्षित झालेली दिसते आहे.महात्मा गांधी,पंडित नेहरू,डॉ.आंबेडकर यांच्यापेक्षा मग त्यांना लेनिन,माओ,ह्युगो चेविझ जवळचे वाटतात.लोकशाही स्वीकारलेल्या राज्यघटनेला मग तिलांजली दिली जाते आणि क्रांतीच्या नावाखाली रक्ताचा अभिषेक दिला जातो.
     भारतीय लोकशाहीला अपेक्षित नितीमुल्ये कुठेतरी समाजापर्यंत पोहोचत नाहीत अस वाटत.क्रांतीच हत्यार शांततेच्या तत्त्वातून आणि बुद्ध-महावीरांच्या करुणेतूनही सापडतं हे तरुणाई विसरते.लोकशाही व्यवस्थेत एक व्यक्ती एक मत जरूर आहे,पण प्रत्येक मताला एकसारखी "पत" देणारी व्यवस्था नाही.ही व्यवस्था आपण दुसरीकडे शोधतो आहोत.एकसंघ,अखंड भारतवर्षाच स्वप्न बघणाऱ्या तरुणाईपुढे जर योग्य आदर्श ठेवण्यास अन आदर्श लोकशाही व्यवस्था ठेवण्यास जर आपण यशस्वी झालोत तर पुढच्या पिढ्यांनाही हे दिशादर्शक ठरणार आहे.

इंजि.सागर भालेराव.

प्रामाणिकतेत मुंबई आघाडीवर....!!!

प्रामाणिकतेत मुंबई आघाडीवर....!!!


     एका सर्वेक्षणावरून प्रामाणिकतेच्या बाबतीत मुंबई शहर जगात दुसऱ्या क्रमांकावर असल्याच निष्पन्न झालं आहे.खर तर आजच्या युगात प्रामाणिकपणाची वानवा सतावत असताना मुंबई मात्र आपली ओळख बनवते हे येथे उल्लेखनीय! आजवर मुंबईने अनेक सुख-दु:खे पाहीली,लक्ष्मी आणि अवदसा इथे हातात हात घालून चालतात,अंडरवर्डचा बादशाह इथल्याच गल्ली-बोळात घडतो-बिघडतो,दहशतवादाची अनेक पाशवी कृत्ये इथला समाज  झेलतो,गोलपिठा,कामाठीपुऱ्याच भयाण वास्तव इथली मुंबई जगते.या सगळ्या जाणिवेच्या प्रवासातून आजवर मुंबई घडली आहे.तरीही संपूर्ण देशाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रच प्रतिबिंब एकट्या मुंबई नगरीत पाहायला मिळत.
     पोटाची खळगी भरण्यासाठी इतर राज्यातून आलेला कामगार सुद्धा मग अल्पावधीतच मग मुंबईकर होतो.त्याला जातीपातीच,धर्माचं कुठलंच लेबल वापरायची गरज पडत नसते.कारण यंत्रवत चालणाऱ्या या शहराने या लेबल्सला केव्हाच अरबी समुद्रात जलसमाधी दिली आहे.सामाजिक समरसतेतून  एकमेकांना मदत करायचा हा इथल्या नागरिकांचा स्थायी भाव! एखाद्या भांडखोर घरामध्ये प्राणांतिक प्रसंग घडून गेल्यावर जसा एकोपा निर्माण होतो,तसाच आपुलकीचा जिव्हाळा बॉम्बस्फोटानंतर इथल्या सामान्य माणसांमध्ये निर्माण झाला.यंत्रवत चालणारी व्यवस्था आता हळूहळू कुटुंबासारखी होऊ पाहते आहे.त्यामुळेच,रिक्षामध्ये ५० लाख रुपये विसरून गेलेल्या प्रवाश्याला रिक्षाचालक ते परत करतो आणि किलोभर सोन  सापडून सुद्धा एखादा प्रामाणिक मुंबईकर त्याच्या मालकाला ते पुन्हा देतो,हे प्रामाणिकपणाच लक्षण असणारी "सोन्या"सारखी माणसे क्वचितच इतर ठिकाणी सापडावीत!
     २ महिन्यापूर्वी मी पत्रकारितेच्या अभ्यासासाठी मुंबई गाठलं,या दोनच महिन्यात इथल्या गर्दीशी आणि वातावरणाशी समरूप झालो.प्रत्येकाला आपल्या पोटात सामावून घेणाऱ्या या नगरी बद्दल स्वतः  अनुभव घेतला.तिच्या प्रामाणिकते बद्दल शंका घेण्याच कारण नाही,यंत्रांची,तंत्रांची,तल्लम साडीची हि मुंबापुरी शाहीर अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्यातून आजकाल रोज भेटते आहे.ह्या मायानगरीचा उत्कर्ष असाच वाढत जावा ही अपेक्षा!!

इंजि.सागर भालेराव.
              

मार्क्सवाद आणि भारतीय समाज.(Communication Theory)

   


  मार्क्सवाद आणि साम्यवादाबद्दल आजकाल भरपूर काही बोललं जातंय.भारतीय समाजाला मार्क्सवाद नाही तर लोकशाही प्रणित क्रांती अपेक्षित आहे असा एक सुर सध्या आळवला जातो आहे.परंतु "दास कॅपिटल" या आपल्या ग्रंथात जेव्हा कार्ल मार्क्स कामगारांच्या आणि शोषितांच्या बाजुने बोलतो तेव्हा त्याच्या जाणीवा त्यात व्यक्त होतात,रशियाच्या पाश्वर्यभूमीवर  आणि साम्यवादी चळवळीतून निर्माण झालेला हा लढा भारताच्या दृष्टीकोनातून पहिला तर त्याची तत्वे पूर्णपणे इथे लागू होत नाही.श्रमिक आणि भांडवलदारांच्या विरुद्धचा लढा आपण आता आता सुरु केलेला आहे.उदारीकरणानंतर आणि जागतिकीकरणानंतर आपल्या समाजात झालेला बदल आणि त्या बदलामागची कारणे मार्क्सच्या नजरेतुन समजुन घेणे सध्या गरजेचे वाटते आहे.सशस्र क्रांतीचा मार्क्सला अपेक्षित असलेला लढा आपण उभारू शकत नाही पण लोकशाही मार्गाने हि समस्या आपण नक्कीच सोडऊ शकतो.बुद्धाची करुणा जेवढी भारतीय समाजाला आपली ओळख वाटते,तेवढीच न्याय्य भूमिकासुद्धा आपली संस्कृती आहे हे विसरता कामा नये.धर्माला अफूची गोळी मानणारा मार्क्स भारतीय तरुणांना का आपलासा वाटतो ? याचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे.नक्षलवादी चळवळीविषयी आपण भरपूर बोलतो पण त्याच्या मुळाशी जाण्याचे आपण साफपणे नाकारतो.आपलाच समाजघटक असलेला काही अल्पसंख्यांक समुदाय का स्वतःला अजूनही या व्यवस्थेपासून अलिप्त ठेवतो आहे, याबद्दल चर्चा करणे सामाजिक विचारवंतांकडून अपेक्षित आहे .पण बहुमताला पटणारा मुद्दा अल्पमताला किंमत देत नाही म्हणुन त्यांचे विचारच नाकारणे जसे मार्क्सला योग्य वाटत नाही तसेच लोकशाही तत्वे मानणाऱ्या आपल्या संस्कृतीला सुद्धा नकोशा वाटतात.त्यामुळे संवादाच्या माध्यमातून विषमतेचा,भांडवलशाहीचा आणि वर्गाव्यवस्थेचा हा प्रश्न कसा सुटू शकतो याबद्दल विचार आणि कार्य करणे हे आपल्यासमोरची आव्हाने असणार आहेत.

 इंजि.सागर भालेराव.

धादांत खैरलांजी.....(communication theory)

हे मिथक आहे का भिमा??
-"धादांत खैरलांजी" रंगभूमीवर.

     सुमारे ७ वर्षापूर्वी म्हणजेच २९ सप्टेबर २००६ रोजी स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रात माणुसकीला आणि समग्र परिवर्तनवादी संस्कृतीला काळिमा फासणारा प्रकार घडला.शुल्लक जमिनीच्या वादावरून घडलेल्या "खैरलांजी" हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्रासह उभा देश सुन्न झाला.खैरलांजी हत्याकांडात सुरेखा आणि प्रियांका भोतमांगे या दलित कुटुंबातील  माय-लेकिंवर तथाकथित सवर्ण समाजातील गावगुंडांनी आळीपाळीने बलात्कार केला. एवढयावरच न थांबता या माय-लेकींच्या योनीत लाकूड टाकून पाशवी वेदना देऊन गावातून नग्न धिंड काढण्याचा संतापजनक प्रकारही करण्यात आला.सदर हत्याकांडाने जातीयतेच वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलं.या घटनेची माध्यमांनी देखील म्हणावी तशी दखल घेतली नव्हती.जनक्षोभ उसळल्यानंतर आणि आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरल्यानंतर या गोष्टीचं दाहक स्वरूप जगासमोर आलं होत.या सर्व घटनेचा संदर्भ घेत,अजूनही खेडोपाडी-शहरात शेकडो प्रियांका-सुरेखा नव्याने खैरलांजीला सामोरे जात आहे असं वास्तव सुप्रसिध्द कवयित्री प्रा.प्रज्ञा दया पवार यांनी आपल्या पहिल्या वहिल्या नाटकात "धादांत खैरलांजी" मध्ये मांडल आहे.  या हत्याकांडाला ७ वर्षे पूर्ण होत असताना हे नाटक रसिकांसमोर आलं आहे.हजारो वर्षांच्या जुलमी व्यवस्थेला नाकारून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्पृश्य समाजाने हिंदू धर्माचा त्याग केला.समतावादी युगाचं स्वप्न बघणाऱ्या पुढच्या पिढीला त्यानंतरही वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं.रिडल्स,नामांतर,खैरलांजी इ. प्रकरणात अस्मिता पणाला लावावी लागली.परंतु,ह्या चळवळीला देखील उतरती काळा लागली.स्वहक्कासाठी आणि माणुसकीचा अधिकार मागण्यासाठी  लढणारा चित्ता देखील लेचापाचा झालेला दिसला.चळवळीची वाताहत,नव्याने वाढू घातलेला जातीयवाद,त्यातल्या त्यात पंचम वर्ग म्हणून ज्या दलित स्रिया स्वाभिमानाने जगण्याचा प्रयत्न करीत आहेत,त्यांच्या समोरच्या समस्या,असं संपूर्ण वास्तववादी चित्र या नाटकाद्वारे मांडण्याचा प्रयत्न झालेला आहे.आजवर समाजाचा स्रीयांकडे  बघण्याचा दृष्टीकोन कायम दुय्यम राहिलेला आहे,आणि त्यातच दलित स्रियांचे प्रश्न चर्चेत आणण्याचं धाडस कुणी केल नव्हत.त्यामुळे " हे सगळ मिथक आहे का भिमा?" असा प्रश्न आंबेडकरी विचारांचे नवयुवक विचारत होती.या प्रश्नाला प्रा.उर्मिला पवार यांच्या "आयदान" मधून त्यांनी  वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.आणि त्याचच पुढच पाऊल हे नाटक आहे असं म्हटलं तरी वावग ठरू नये.
     निर्भया प्रकरणानंतर मेणबत्त्या घेऊन मोर्चे काढणारा संवेदनशील समुदाय,खैरलांजी हत्याकांडावेळी का पुढे सरसावला नाही? कायद्याने देखील आरोपींना नाममात्र शिक्षा देऊन पिडीतांवर एकप्रकारे अन्यायाच केला.अशा प्रकारच्या  अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचा एक उत्कृष्ट प्रयोग रंगभूमीवर होतो आहे.मनोरंजनासोबतच समाजप्रबोधनाच एक साधन असलेल्या नाटकाद्वारे असे प्रश्न चर्चिले जावेत अन प्रेक्षकांना देखील अशा सामाजिक विषयांवर विचार करायला अंतर्मुख करावे अशी अपेक्षा!

इंजि.सागर भालेराव.
९५९५८४२२३८ 
१५ सप्टेबरला या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला,या कार्यक्रमासाठी गेलो होतो,त्याबद्दल...

फाशी झाली आता पुढे काय??? (communication theory)

वर्षभराच्या आत निर्भया बलात्कार प्रकरणात दोषी असलेल्या नराधमांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.या देशात न्यायप्रक्रिया किचकट जरी असली तरी लोकशाही मानणाऱ्यांना ती सर्वोच्च संस्था वाटते.आजवर अनेक बलात्काराच्या घटना आपल्या आजूबाजूला घडत आल्या आहे आणि घडत आहेत.(भविष्यात घडू नये हि अपेक्षा!) निर्भया प्रकरणानंतर सगळा देश हळहळला होता आणि संपूर्ण देशात न्याय मागण्यासाठी तरुणांनी लढा उभारला  होता.त्या दबावामुळे खर तर द्रुतगती न्यायालयाची स्थापना केली गेली.झाल्या प्रकारानंतर तरुणाई रस्त्यावर उतरली,त्यांच्यातील संवादाच     माध्यम  सोशल मिडिया होत.फेसबुक,ट्विटर च्या माध्यमातून तरुणायीने आपले विचार मांडले आणि बघता बघता लाखोचा समुदाय विजय चौकात निदर्शने करताना,अश्रुधुराचा मारा खाताना,लाठीमार खाताना दिसला.न्यायासाठी ज्या पद्धतीने हा समुदाय लढला त्याच पद्धतीने त्याने पुढे सुद्धा वागायला हव.मेणबत्ती मोर्चे काढून हा प्रश्न संपणारा नाही.पुरुषप्रधान,स्रियांना दुय्यम स्थान देणाऱ्या आपल्या समाजात समानतेची शिकवण देणारा नवा अध्याय नव्या माध्यमातून आपल्याला सुरु करावा लागणार  आहे. निर्भायाला न्याय मिळाला पण अजूनही सुरेखा आणि प्रियांका भोतमांगे यांच्यासारख्या दुर्गम भागातील स्रियांना न्याय अजून मिळायचा आहे. त्यांच्यासाठी कुणीही मेणबत्ती मोर्चे काढलेले नाही,किंवा कोणताही मिडिया त्यांच्या बाजूने उभा राहिलेला नाही.या सगळ्या गोष्टींचा सांगोपांग विचार करावा लागणार आहे.कायदा झाला म्हणून स्रीयांवरचे अत्याचार कमी होणार नाहीत पण झालेल्या कायद्याची परिभाषा सामान्य नागरिकांना कळेल यासाठी आपण युवकांना  प्रयत्न करावे लागणार आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून या गोष्टी सामान्य नागरिकांना सांगायला हव्यात.या घटना पुढे घडणार नाहीत आणि उपेक्षितांना न्याय मिळेल हि अपेक्षा!      

उत्सवाचे दिवस....(communication theory)

उद्यापासून घरोघरी गणेश भक्त आपल्या लाडक्या गणरायाला विराजमान करतील.१० दिवसासाठी मुक्कामी आलेला हा  पाहुणा प्रत्येक गणेशभक्ताला हवाहवासा वाटतो, म्हणून तर तो दरवर्षी विद्येची देवता आणि कलेचा दर्दी असलेल्या बाप्पाची वाट पाहत असतो.समाजात एकोपा नांदावा आणि सुसंवाद होऊन जागृत समाज निर्माण व्हावा असा या उत्सवामागचा विचार.परंतु,काळानुरूप सगळ्या गोष्टी बदलत गेल्या.अगोदर समाज प्रबोधनासाठी असलेला हा उत्सव हळूहळू मनोरंजनाच साधन बनलं.संवादासाठी आणि नवनिर्मितीसाठी एकत्र येणारे तरुण कार्यकर्ते आता मात्र धंदा म्हणून या उत्सवाकडे पाहू लागले.जागतिकीकरणाच  वारं मग बाप्पासुद्धा रोखू शकला  नाही.मनोरंजनासाठी भल्या भल्या आरास बनवल्या जाऊ लागल्या,दुसऱ्या गणेशमंडळाला खुज ठरवण्यासाठी स्पर्धा होऊ लागली.वर्गणी कोटींच्या घरात जमा होऊ लागल्या,मार्केटिंगचा,प्रसिद्धीचा फंडा येथे देखील वापरला जाऊ लागला.आपण या उत्सवामागचा हेतू हळूहळू  विसरतो आहोत असं वाटायला लागलं आहे.लाखो करोडो रुपये या समारंभात खर्च होतील,संस्कृती आणि परंपरेच्या  नावाखाली राजरोस १० दिवस संस्कृतीरक्षक धिंगाणा घालताना दिसतील. असं चित्र पाहून हतबल झालेला गणपती काय विचार करेल? संवादाच आणि एकोप्याच हे माध्यम आता अपयशी तर ठरत नाही ना? आपण आपल्या मुळ उद्दिष्टापासून दूर तर  जात नाही ना हे या क्षणी आपण ओळखायला हवे आहे.चंगळवादाच्या भोवऱ्यात न अडकता  सामाजिक उद्दिष्ट्य समोर ठेऊन हा उत्सव साजरा करूयात.

इंजि.सागर भालेराव.
9595842238

बलात्कारात "महा"न राष्ट्र???

   हा blog १० दिवसांपूर्वी लिहिला होता,परंतु तांत्रिक अडचणींमुळे तो आता प्रकाशित करीत आहे.

          राकट देशा,कणखर देशा,दगडांच्या देशा असं लहानपणी महाराष्ट्राचं वर्णन आम्ही शिकलोय.१५/१६ वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आणि आताचा महाराष्ट्र यात आता कुठलंच साधर्म्य उरलेलं नाहीये.गेल्या १५/१६ वर्षात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलंय.लोकांच्या जाणीवा थंडावल्यात. आता राकट मनांचा,कणखर संवेदनांचा आणि दगडी काळजाचा देश असं जरी महाराष्ट्राचं वर्णन केलं तरी ते चुकीचे ठरू नये. असं निराशाजनक सामाजिक वातावरण आजूबाजूला पाहायला मिळते आहे.२० ऑगस्टला आपण एकीकडे रक्षाबंधन साजरा करत असताना अंधश्रद्धेची बंधने जुगारून जुलमी व्यवस्थेला चपराक देणाऱ्या प्रबोधनकार डॉ.नरेंद्र दाभोळकरांची  तथाकथित सुसंस्कृत शहरात दिवसाढवळ्या हत्या होते आणि पत्रकार असलेल्या २२ वर्षीय तरुणीवर कधीही न झोपणार्या मुंबई शहरात बलात्कार होतो,यापेक्षा शोकांतिका अजून काय असू शकते??
          बलात्काराची प्रकरणे आपल्याला  फार नवी नाहीत.प्रत्येक ५२/५४ मिनिटाला आपल्या देशात बलात्काराची घटना घडत असते.बऱ्याच घटना या उंबऱ्याआड घडतात आणि उंबऱ्याच्या आतच त्याची गळचेपीसुद्धा होते. निर्भया प्रकारानंतर रणरागिणी कुठे याबद्दल बोलायला लागल्या आहेत.प्रत्येक वेळी बलात्कार झाल्यावर लैगिक शिक्षण,स्वसंरक्षण या सगळ्या गोष्टीचं गुऱ्हाळ सुरु होत.परंतु हा प्रश्न इतका सहजासहजी सुटण्यासारखा मुळीच नाही.आपल्या संस्कृतीतच पूर्वीपासून स्रियांना समाजात दुय्यम स्थान देण्याची फार मोठी परंपरा आहे.लाखो करोडो "अहिल्या" अजूनदेखील पुरुषी संस्कृतीचा आभिशाप भोगत आहेत.मुंबईतील महालक्ष्मि मध्ये रात्री ८ वाजेच्या सुमारास हा बलात्कार होतो आणि तो पण एका महिला पत्रकारावर!! हीच गोष्ट आपल्या सामाजिक मागासलेपणावर बरंच काही सांगून जाते. बलात्कार हा बलात्कार असतो,तो सडकेवर भिक मागणाऱ्या लहानग्या मुलीवर असो वा कारमध्ये फिरणाऱ्या धनिकाच्या मुलीवर असो,त्याबद्दल दुमत नाही.परंतु पत्रकार या शब्दाला एक सामाजिक वजन आहे.लोकशाहीचा चौथा खांब असलेल्या या वर्गातील एका प्रतिनिधीची जर अशी अवस्था असेल तर सामान्य स्रीयांनी त्यांच्या स्वतःच्या संरक्षणाबद्दल आश्वासक का रहावं?? 
चंगळवादाकडे वाहवत जाणारी तरुणाई जर स्रीला भोगवादाचे साधन मानत असेल तर आपण अजूनही राजाराम  मोहन  रॉय यांच्या प्रतीक्षेतच आहोत का??? असं प्रश्न पडतो. पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून या प्रकरणामुळे सकाळ पासून अस्वस्थ होतो ,विद्यापीठात गेल्यानंतर साहजिकच हा चर्चेचा मुद्दा होता,या चर्चेदरम्यान एक नवा विचारप्रवाह आपल्या तरुणाईत तयार होतो आहे असं जाणवलं.एका मित्राचे असे म्हणणे होते कि,मुळात त्या मुलीने इतक्या रात्री त्या परिसरात जायचंच कशाला? पत्रकार असली म्हणून काय झालं? तिला सामान्य मुलीसारख्या मर्यादा आहेतच कि,आणि विशेष म्हणजे त्याच्या या विधानाला काही मुली सुद्धा समर्थन देत होत्या.त्यावेळी खरच जाणवलं कि,असे लाखो आसाराम बापू आपल्या समाजात आहेत.त्यांच्या मनावर अजूनही मनुस्मृती अधिराज्य गाजविते आहे.कायद्याने सगळेच प्रश्न सुटणार नाही,कायद्याला पद्धतशीरपणे पळवाटा काढणारे आपणच आहोत. निर्भया प्रकरणानंतर न्या.वर्मा समिती नेमली गेली.या समितीने सुचविलेल्या प्रावधानांवर वटहुकुम देखील काढला गेला. कायदा झाला तरी लोकांच्या मानसिकतेत काहीच बदल झालेला नाही.परस्रीला मातेसमान मानणाऱ्या समाजात व्यक्ती जेव्हा अशी कृती करतात तेव्हा "वन्दे मातरम" नव्हे तर "गंदे मातरम"  अशीच आरोळी आपण द्यायला काय हरकत आहे? विलासवादी स्वप्ने बघणाऱ्या तरुणाईला कायद्याचा बडगा जरूर दाखवला पाहिजे.परंतु त्याच वेळी भारताचे सुजाण नागरिक असल्याची आणि कायदा व सुव्यवस्था जपण्यासाठी आपण कटीबध्ह आहोत याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी.जेव्हा प्रत्येक नागरिक सुज्ञबनेल तेव्हा आपसूकच देश सुद्धा सुज्ञ बनेल.
          या प्रकारानंतर मा.मुख्यमंत्री महोदयांनी पिडीत तरुणीवरच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च सरकार करेल असे जाहीर केले.मुख्यमंत्र्यांनी जर या अगोदरच महिलांना सुरक्षित वाटेल असे आश्वासक वातावरण जर राज्यात तयार केले असते तर आज हि वेळच आली नसती.सदर प्रकरणावरून "राज"कारण सुद्धा चालू झाले आहे. कोणत्या गोष्टीच राजकारण करावं आणि कसलं करू नये हे सुद्धा नेत्यांना कळू नये हि गंभीर बाब आहे.प्रत्येक नागरिकाने स्वतः जरी नैतिकता पाळली तरी बऱ्यापैकी या घटनांना विराम लागू शकतो.आपल्या आयाबहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे यासाठी प्रत्येकानेच प्रयत्न करायला हवा.सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे आणि फातिमाबी शेख यांच्या महाराष्ट्रात जर स्रियांची अशी अवस्था असेल तर आपल्यासारखे करंटे आपणच! सामाजिक परिवर्तनाच्या गप्पा मारणाऱ्या सामुदायानेसुद्धा याबाबत गंभीर विचार करायला हवा. स्रीला देवी म्हणून देव्हाऱ्यात ठेवण्यापेक्षा ,आणि "बाईमाणूस" म्हणून नव्हे तर "माणूस" म्हणून वागणूक देऊ,तेव्हाच स्वतःला पुरोगामी म्हणून घेण्यासाठी महाराष्ट्र लायक असेल.  

आम्ही सगळे दाभोळकर...!!!

                
               काल सकाळी सकाळी डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्यावर विद्येच माहेरघर(?) असलेल्या पुण्यात खुनी हल्ला झाल्याची ब्रेकिंग न्यूज पाहिली आणि आपण मध्ययुगीन भारतातच राहतो आहोत कि काय असा प्रश्न पडला.डॉ.दाभोळकर आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती हे समीकरण फार वर्षापूर्वी आपल्या तथाकथित पुरोगामी (?) महाराष्ट्रात रूढ झालेलं होत.समाजवादी,विज्ञान निष्ठेची परंपरा आपल्या देशाला जरूर आहे.परंतु,मुलतत्ववाद्यांच्या डोक्याला लागलेली दैववादाची अन अंधश्रद्धेची कीड अजून गेलेली नाहीये,हे पुन्हा एकदा सिध्द झालं आहे.दाभोळकर सरांचे २ व्याख्यान ऐकण्याचा अन त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटण्याचा योग मला लाभला.दाभोळकर सर तासनतास अंधश्रद्धा,कर्मकांड,भानामती,विज्ञानवाद  या विषयावर बोलत राहायचे.प्रत्येकाला उत्तर देताना,शंकानिरसन करताना  हा माणूस कधीही थकला नाही. गेल्या १८ वर्षापासून "जादू-टोणा विरोधी विधेयक"  आपल्या कार्यसम्राट   लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात मंजूर करावं यासाठी ते अविरत लढले.त्यांच्या या प्रस्तावित विधेयकामुळे ज्या कुणा समुदायाच अर्थकारण बिघडणार होत,त्यांनी याला प्रखर विरोध केला.हिंदू संस्कृतीच्या रक्षणाचा मक्ता उचललेल्या बांडगुळांनी नथूरामच्या रुपात शेवटी डाव साधलाच! दै.सनातन प्रभात मधून जहरी भाषेत दाभोळकर यांच्यावर  टीका केलेली असायची.दाभोलकरांना देशाचा "ग्यालेलिओ "  ठरवत,धर्माच्या आणि दैववादाच्या विरोधात गेलात तर गांधींसारखे हाल होतील असे देखील सुनावले.परंतु अशा धमक्यांना सरांनी कधी भिक घातली नाही .चर्वाकापासून तुकारामापर्यंत आणि महात्मा फुल्यांपासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समृध्द विचारांचा वारसा सरांनी आयुष्यभर जपला.
     विचारांची लढाई हि विचारांनीच करायची असते हि अहिंसेची शिकवण "फ्यासिस्ट" शक्ती विसरलेल्या आहेत.एकटा दाभोळकर मारून काय मिळणार आहे तुम्हाला? दाभोळकर सरांचा देह माराल पण त्यांचे विचार,विवेकवाद कसा नष्ट कराल? स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सोडून समाजाचा डॉक्टर होण्याचा खडतर मार्ग या प्रबोधनकाराने स्वीकारला.पुरोगामी चळवळीत प्रत्येक आंदोलनात,मोर्चात हा माणूस शिलेदार राहिला.डॉ.आंबेडकरांनी तयार केलेल्या "हिंदू कोड बिलाची" अशीच परवड झाली.सनातन्यांच्या विखारी टीकेला त्यांना सुद्धा समोर जावं लागलं.हिंदू धर्मसंस्कृतीत हि अफरातफर करायचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. परंतु थोडीबहुत नैतिकता असलेल्या तेव्हाच्या जनसमुदायाने हत्येचा मार्ग निवडला नव्हता!!

                किती काळ आपण आपल्या घाणेरड्या रूढी पाळणाऱ्या संस्कृतीचा अभिमान जपणार आहोत??संस्कृतीचा आभिमान जरूर हवा पण गर्व कशाला??ज्या संस्कुतीमध्ये नरबळी,यज्ञात पशुहत्या,देवदासींचे लैगिक शोषण होते,ती आपली संस्कृती म्हणून आपण गोडवे गायचे आहेत का??? समताधीष्टीत समाजरचनेचा पाया हा विज्ञानवादावर अवलंबून आहे हे न समजण्यासारखे मूर्ख आहोत का आपण??  फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे किती दाभोळकर मारले गेल्यावर ढिम्म प्रशासन जागे होणार आहे?? 
                 सनातन्यांनी हे जरूर लक्षात ठेवावे कि त्यांच्या विचारांची मशाल अजून धगधगते आहे.संस्कृतीरक्षणाचे  गोडवे गाणाऱ्या आणि धर्मावर संकट येणार म्हणून गळे काढणाऱ्या गांडूच्या अवलादींनी हे नीट समजून घ्यावे.या प्रकारामुळे खंर तर महाराष्ट्र ५०/६० वर्ष मागे गेलाय.विचारांच्या लढाईमध्ये डॉ.दाभोळकर नामक शरीराचा बळी गेलाय.त्यांचे हे योगदान इतिहासात सुवर्णअक्षराने लिहिले जाणार आहे .एकीकडे धर्मवादी,कट्टरपंथी  "नरेंद्रच" कौतुक आणि दुसरीकडे प्रबोधनकार "नरेन्द्रांची" हत्या,आपल्याला अराजकतेकडे घेऊन जाणार आहे.चार्वाक,एकलव्य,शम्भूक,गार्गी,फुले,शाहू आणि आंबेडकरांच्या पंक्तीत आज दाभोळकर सर विराजमान झालेले आहेत. त्यांच्या जाण्याने चळवळीचा शिलेदार हरपलेला जरूर आहे परंतु त्यांच्या विचारांची समृद्धी प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्याकडे आहे.निरीश्वरवादाच्या सिद्धांताचे समर्थन करणाऱ्या सरांच्या आत्म्यास शांती लाभो असे मी म्हणणार नाही.पंचतत्वात विलीन झाल्यावर निसर्गातील प्रत्येक अणु-रेणू स्वतःच वेगळ अस्तित्व सांगत असतो,सरांच देखील समाजातील स्थान अढळ असंच आहे.सरांच राहिलेलं अपूर काम आता आपण युवक पूर्ण करूयात.कारण आपल्या प्रत्येकात दाभोळकर  आहे,जो धर्माविरोधात एल्गार पुकारणार आहे आणि बिनिवरति घाव घालणार आहे कारण "आम्ही सगळे दाभोळकर" आहोत!!! 

इंजि.सागर भालेराव
9595842238