परिघाबाहेरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर


 

   विषमतेच्या वाळवंटात  समतेची कारंजी फुलविणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज जन्मदिन. अखिल विश्वाला परिवर्तनाचा सम्यक मार्ग सांगणाऱ्या या महामानवाच्या स्मृतींना आपण नेहमीच उजाळा देत असतो.त्यांच्या विचारांचा वारसा आणि शिकवण आजदेखील संपूर्ण मानवजातीला कल्याणकारक अशीच आहे.परंतु दुर्दैव म्हणा किंवा आपलाच करंटेपणा असा  कि,आपण नेहमीच या थोर विभूतीला एका ठराविक चौकटीत गुंडाळून ठेवत आलो आहोत.डॉ.आंबेडकर म्हणजे केवळ दलितांचे नेते,अस्पृश्य चळवळीचे,कामगार चळवळीचे नेते असे आजवर आपण समजत होतो,किंबहुना समजून घेत होतो.परंतु एक राष्ट्रभक्त,एक समाजसेवी,अर्थतज्ञ, म्हणून बाबासाहेब काय रसायन आहे हे आपण अगदी  काल काल पर्यंत समजून घेतले नव्हते.परंतु सद्य स्थितीचा अंदाज घेतला कि लक्षात येते कि,या प्रज्ञासुर्याला कुठल्याही दिशेचे बंधन नव्हते,काळाच्या पुढे जाऊन विचार करणारा हा महामानव सर्वव्यापी असे तत्वज्ञान देणारा भारताचा कोहिनूर होता.
   राजकीय स्वातंत्र्य हे खऱ्या अर्थाने राजकीय स्वातंत्र्य असावं,आणि त्याला आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक परिमाणे असावीत अशी व्यापक भूमिका बाबासाहेब नेहमीच घेत होते.देशाच्या पायाभरणीसाठी ही गोष्ट तर महत्त्वाचीच ठरली.भारतीय राजकारणात कोणत्याच नेत्याने लिहिले नसेल इतके प्रचंड साहित्य बाबासाहेबांनी निर्माण केले.त्यांच्या तत्वज्ञानाच्या अधिष्ठानाला वैचारिक वारसा,भाषण,पुस्तकांची व्यापक परंपरा आहे.आपल्या आयुष्यात त्यांनी २२ उच्चतम ग्रंथ लिहिले ,सुमारे ५३७ मर्मभेदी भाषणे त्यांनी केली.अर्थशास्र,समाजशास्र,राज्यशास्र,इतिहास,कायदा,संविधान,धर्मशास्र,मानववंशशास्र अशा अनेक विषयांमध्ये पारंगत असलेल्या बाबासाहेबांनी आपली विपुल कामगिरी केली आहेच त्याचबरोबर पुढच्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडेल असे उत्तरदायित्व केल्याचे सुद्धा आढळून येते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील सर्वात जास्त शिकलेले अर्थतज्ञ  होते,परंतु त्यांच्या अर्थ विषयक ज्ञानाला आपल्याकडे दुर्लक्ष केले गेले. बाबासाहेबांनी सुद्धा स्वतःला सीमित ठेवले नाही त्यामुळे ते म्हणतात कि, "मी प्रथमत: भारतीय आहे आणि अंतत: सुद्धा भारतीय आहे".राष्ट्रवादी पणाचा प्रखर विश्वास त्यांच्या ठायी पदोपदी जाणवतो.१९३०-३१-३२ या वर्षी ३ गोलमेज परिषद झाल्या,या तीनही गोलमेज परिषदांमध्ये बाबासाहेबांनी केलेले भाषण किती अभ्यासपूर्ण आणि विश्लेषक आहे याची कल्पना येते.स्वातंत्रपूर्व व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मजूरमंत्री,वीजनिर्मिती,जलसंधारण आणि पायाभूत सुविधा अशा अनेक महत्वाची जबाबदारी बाबासाहेबांनी पार पडली हे बहुतेक जणांना माहिती नसेल.रोजगार नोंदणी कार्यालयात बहुतेक सुशिक्षित  तरुण/तरुणी जात असतील,परंतु केंद्रीभूत पद्धतीने  शासकीय अधिपत्याखाली बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणे सरकारचे आद्य कर्तव्य आहे हे समजून सांगणाऱ्या बाबासाहेबांची ही कल्पना आहे आणि मजूरमंत्री असताना ही कल्पना त्यांनी आमलात आणली हे आपल्या गावी सुद्धा नसते.एवढेच कशाला,सध्या कौशल्यविकास कार्यक्रमाचा सगळ्याच क्षेत्रात बोलबाला आहे,हा कार्यक्रम शासकीय पातळीवर राबविण्याचा मान हा बाबासाहेबांनाच जातो.अशी विविधांगी कला असलेले बाबासाहेब आपण इतके दिवस का ओळखू शकलो नाही हे राहून राहून मनाला सलतेच! आता कुठे बाबासाहेबांच्या या पैलूंचीही ओळख जगाला होते आहे.मुलत: अर्थतज्ञ असलेल्या बाबासाहेबांकडे  १ पदवी कायदे विषयक  आहे आणि उरलेल्या सगळ्या पदव्या ह्या अर्थशास्राच्या आहेत.पीएचडी ला असताना त्यांनी लिहिलेला "ब्रिटीश भारतातील प्रांतिक वित्तांची उत्क्रांती" हा प्रबंध तत्कालीन मुंबई,कलकत्ता आणि मद्रास प्रांताच्या करवसुलीवर आखल्या जाणाऱ्या नियोजनावर आधारित असा होता.राज्यसरकार आणि केंद्रसरकार यांच्यामध्ये आर्थिक संबंध कसे असावेत आणि कसे असले पाहिजे याचे अभ्यासपूर्ण  विश्लेषण त्यांनी या प्रबंधामध्ये केले आहे.गेल्या ६६ वर्षात भारतात १३ वित्त आयोग नेमले गेले,जे आयोग गोळा केलेल्या महसुलाचे वाटप कसे व्हावे,राज्यसरकारने किती महसुल ठेवावा आणि केंद्र सरकारला किती द्यावा याची मार्गदर्शन तत्वे ठरवते,या सर्व १३ आयोगांना आपल्या  कामाची आखणी करताना जर कोणता मार्गदर्शक ग्रंथ असेल तर तो हा डॉ.बाबासाहेबांचा पीएचडीचा प्रबंध होता. डॉ.नरेंद्र जाधव जे नियोजन आयोगाचे सदस्य आहेत ते याची कबुलीही देतात.
   त्यांनी लिहिलेला आणखी एक अप्रतिम प्रबंध म्हणजे "रुपयाचा प्रश्न: उद्यम आणि उपाय".तत्कालीन भारताची अर्थव्यवस्था समजून घेत त्यांनी केलेले विवेचन आपल्या देशाचं आजच्या ढासळत्या आर्थिक परिस्थितही किती मार्गदर्शक आणि सूचक आहे हे आता कुठे आपल्या अर्थतज्ञांना उमजते आहे.भारतासारख्या विकसनशील देशाचे  विनिमयाचे साधन काय असावे याबाबत मागील शतकातील महान अर्थतज्ञ असलेल्या लॉर्ड केन यांनी आपला अहवाल ब्रिटीश सरकारला दिला होता .या अहवालात सुवर्ण परिमाण आणि सुवर्ण विनिमय परिमाण  असे २ विकल्प मांडण्यात  आहे होते,त्यापैकी सुवर्ण परिमाणामध्ये चलनात सरळसरळ सोन्याच्या नाण्यांचा वापर करावा,आणि सुवर्ण विनिमय परिमाणामध्ये चलनात कागदी नोट असाव्यात परंतु त्याला पाठबळ  म्हणून सरकारकडे सोने असावे असे अहवालात नमूद केले होते.भारताची एकंदर परिस्थिती पाहता सुवर्ण विनिमय परिमाण पद्धत फायदेशीर राहील असा विश्वास लॉर्ड केन यांना होता.सगळ्याच अर्थशास्रज्ञांनी केन यांची री ओढली पण यांच्या या प्रस्तावाला दोन हात करण्याची धमक १९०९ साली आंबेडकरांनी दाखवली होती.कारण असे कि,जर सुवर्ण विनिमय परिमाण अस्तित्वात आले आणि  बेजबाबदार सरकार जर अस्तित्वात आले तर नोटांची अनियंत्रित छपाई होऊ शकते आणि चलन फुगवटा होऊ शकतो  आणि त्याचा फटका हा गोरगरिबांनाच जास्त बसेल अशी त्यांची भीती होती.ही चैन भारतासारख्या देशाला परवडणारी नाही,गरजेनुसार वित्तीय तुट भरून काढण्यासाठी हे परिमाण लवचिक असले तरी हे दुधारी शस्र आहे,त्याचा गैरफायदा सत्तेत असलेली लोक घेऊ शकतात अशी भीतीही आंबेडकर व्यक्त करतात.शक्य-अशक्यतेच्या पातळीवर त्यांनी व्यक्त केलेली भीती दुसऱ्या कुठल्यातरी मार्गाने का होईना परंतु आपल्यावर ओढवलेली आहे हे आपली आर्थिक "पत" पहिली कि जाणवते. 
      १९४० साली भारताला स्वतंत्र मिळण्याच्या हालचाली सुरु झाल्या असतानाच मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केली.या मागणीचा आशय लक्षात घेऊन त्यावर सांगोपांग विचार करून त्यांनी भारत-पाकिस्तान फाळणीवर आधारित ग्रंथ "Thoughts on Pakistan" लिहिला.फाळणी कशी आपरीहार्य आहे आणि ती स्वीकारणे गरजेचे कसे आहे याबद्दल त्यांनी या ग्रंथात विवेचन केले आहे.फाळणी होण्याच्या ७ वर्ष अगोदर दूरदृष्टी असलेल्या या नेत्याने मांडलेले विचार प्रत्यक्ष फाळणीच्या वेळी गांधी आणि जिना यांनी स्वीकारलेले होते.यावरून त्यांचा असलेला राष्ट्रवाद आपल्या लक्षात येतो.याठिकाणी समाजहिता बरोबरच राष्ट्रहित किती महत्वाचे आहे त्यांनी दाखऊन दिले होते.
     अर्थशास्राचा व्यासंग असलेल्या बाबासाहेबांनी सामाजिक क्षेत्रात केलेली कामगिरी तर अतुलनीय अशीच म्हणावी लागेल.सामाजिक सुधारणा करताना त्यांची अशी रणनीती होती कि,हिंदू धर्मात राहूनच सामाजिक सुधारणा केल्या जाव्यात.महाडचा सत्याग्रह ,नाशिकच्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह यांमधून समाजाला मुख्य प्रवाहात आणायची त्यांची योजना प्रस्थापितांनी सपशेल अमान्य केली.शेवटी हिंदू धर्म हा अपरिवर्तनीय आहे आणि हि व्यवस्था आपल्याला स्वीकारण्याच सौदार्ह्य दाखवणार नाही आणि हे अशक्य आहे हे ओळखून १९३५ साली येवला येथे "मी हिंदू धर्मात जन्माला आलो ,तरी हिंदू म्हणून मरणार नाही" अशी घोषणा बाबासाहेब करतात.ज्या चतुर्थ वर्णावर हि चातुर्वर्ण्य व्यवस्था तरलेली आहे तो पायाच काढून घेतला तर हि जातीची उतरंड कोसळेल असा त्यांचा विचार होता.त्याचमुळे १९५६ साली एक पूर्ण समुदाय अनिष्ठ परंपरेला नाकारून आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली बौद्धमय झाला.स्वतंत्र भारताच्या दृष्टीने आणि परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीकोनातून हि फार महत्वाची बाब होती."Anihilation Of Caste" म्हणजेच जातिनिर्मूलन या विषयी आपल्या ग्रंथात बाबासाहेब आंबेडकर काळाच्या पुढे जाऊन आपले विचार मांडत होते.जातीव्यवस्था निर्मुलनासाठी त्यांनी सुचविलेले अभ्यासपूर्ण आणि अमुलाग्र बदल आजदेखील सत्याच्या कसोटीला उतरतील असे आहेत. अनेक बुद्धिवंत,नररत्नांची खाण असलेला आपला देश अजूनसुद्धा महासत्ता म्हणून का जन्माला येऊ शकला नाही याचे विवेचन करताना सामाजिक रचणेनुसार ३-४% लोकांनाच केवळ शिक्षणाची संधी मिळते आणि उरलेले ९६% लोक जातीआधारित व्यवसाय करण्यातच आयुष्य खर्ची घालतात.त्यांना इतर ज्ञानाची कवाडे खुले करून दिले जात नाही त्यामुळे गेल्या हजारो वर्षात या मागास समाजात कितीतरी न्यूटन,कितातरी आइनस्टायिन जन्माला आले असतील परंतु इथल्या व्यवस्थेने त्यांना त्यांची प्रतिभा नाकारलेली होती. अशा बदफैली वातावरणात भारताचा उत्कर्ष होऊ शकत नाही असे आंबेडकर म्हणतात.ही बदफैली दूर करण्यसाठी मिश्रविवाह,अंतरजातीय विवाह ही संकल्पना ते सुचवितात. असा सर्वांगी,सर्वव्यापक नेता आजवर एका चौकटीत ठेवला गेला होता.त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सवंग समाज प्रगतीचे शिखर गाठत असताना त्यांनी सुचवलेले मार्गदर्शक तत्वे अप्रतिम अशीच आहेत यात तिळमात्र शंका नाही.एका परीघामध्ये संकुचित केलेले डॉ .आंबेडकर परिघाबाहेर नेण्याच्या,पोहोचविण्याचा प्रयत्न डॉ.नरेंद्र जाधव,डॉ.भालचंद्र मुणगेकर आदी मंडळी करत आहेत.समाजहिताला आणि राष्ट्रहिताला प्राधान्य  देणाऱ्या या प्रकांडपंडिताची व्याप्ती समग्र मानवहितासाठी मार्गदर्शक ठरावी अशीच आहे.ती लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी हा लेखनप्रपंच.

इंजि.सागर भालेराव.
पत्रकारिता विभाग,
मुंबई विद्यापीठ,
मुंबई।
9595842238

No comments:

Post a Comment