तेरे कातील जिंदा है..दाभोळकर हम शरमिंदा है..!!!

दाभोळकर सरांना एक अनाहूत पत्र.......



प्रिय नरेंद्र दाभोळकर सर ......

             आज तुम्हाला हे पत्र लिहिताना कोठून सुरुवात करावी.काय लिहू,कसं लिहू अशा असंख्य प्रश्नांनी मनात अगाध गोंधळ घातलाय.तुम्हाला आमच्यातून जाऊन पुरत एक वर्ष सरलंय ! चालता बोलता तुम्ही आमच्यातून निघून गेलात.आयुष्यभर विज्ञानवादी दृष्टीने जगलेल्या तुम्हाला ही पुरोगामी तरुण पिढी कशी विसरू शकेल.धर्माची,श्रद्धेची,कर्मकांडाची विज्ञानवादी चिकित्सा करण्याची दृष्टी तुम्हीच तर आम्हाला दिली.त्याच  हत्तीच्या बळामुळे आम्ही सनातनांच्या तोंडात चपराक मारू शकलो.तुमचा नरबळी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने "जादूटोणा  विधेयक" अध्यादेश काढून लागू केला.पण त्यासाठी तुमचा नरबळी द्यावा लागला .....आणि त्यानंतर तुम्हाला "पद्मश्री" देऊन तुमच कौतुकही करण्यात आले. तुम्ही लावलेलं प्रबोधनाच रोपट  आता हळूहळू वाढत आहे,त्याचाच परिपाक म्हणून आता पंढरपूरचा विठ्ठल बडवेमुक्त तर झालाच पण आता त्याची पूजा सोवळे घातलेल्या शेटजी भटजींच्या नव्हे तर,बहुजन समाजातील पुजाऱ्यांच्या हातून होत आहे.तुम्हाला अभिप्रेत असलेली प्रबोधनाची चळवळ संथ गतीने का होईना पण आम्ही पुढे चालवत आहोत.

          तुमचे मारेकरी तर खरे षंढ म्हणावे लागतील.विचारांची लढाई विचारांनी करायची असते हे समजण्या इतके ते शहाणे न याअगोदर होते अन भविष्यातही होतील कि नाही याची शाश्वती नाही.आता तर अशा गांडूच्या अवलादी गल्ली पासून दिल्ली पर्यंत,रस्त्यारस्त्यावर दिसत आहेत.आज पर्यंत छुपी लढाई करणारे हे धर्माचे ठेकेदार समोरासमोर लढण्यासाठी तयार आहेत.काळ कसोटीचा आहे पण तुमच्या मुशीत वाढलेले आम्ही खचलेलो नाही.सल मात्र एवढी आहे कि आमचं ढिम्म प्रशासन तुमच्या मारेकऱ्यांना पकडू शकलं नाही.तुमचे मारेकरी आज खुशाल रानमोकळे पणाने  हिंडतायेत.आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असे विखारी प्रकार घडत असताना त्याला खतपाणी घालणारे कोण होते आणि कुणाच्या सांगण्यावरून तुमचा खून पाडला गेला हे कळण्याइतके मूर्ख इथले राजकारणी तर मुळीच नाहीत.आणि हद्द म्हणजे तुमचे मारेकरी शोधण्यासाठी जगात  पोलिस प्रशासनाने आजपर्यंत कुठेही वापरली नसेल अशी पद्धत तुमच्या खुनाच्या तपासाधिकारी गुलाबराव पोळ यांनी वापरली.तुमचं तथाकथित भूत "प्लनचिट" करून बोलावलं गेलं आणि त्यालाच मारेकरी कोण असा सवाल केला गेला.तुम्ही जर हयात असता आणि असा प्रकार घडला असता तर तुमची काय प्रतिक्रिया असती हे आम्ही समजू शकतो.आणि यावर कळस म्हणजे आपल्या देशाचे प्रसिध्द शास्रज्ञ,परम संगणकाचे जनक डॉ.विजय भाटकर यांनी तर हा प्रकार म्हणजे तपास प्रक्रियेचा भाग आहे अस सरळ सरळ विज्ञानवादी प्रमाणपत्र देऊ केलं.या प्रकारावरून इथली परिस्थिती  किती भयानक आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल.
         असो,सध्या मुलतत्ववाद्यांची चालती आहे,सांप्रदायिक शक्ती राहून राहून डोक वर काढतायेत.धर्माच्या आड माणूस माणसाला मारतो आहे.काल परवा नितीन आगे आणि मोहसीन शेख यांची हत्या येणाऱ्या काळाची नांदी अधोरेखित करून गेली आहे.रात्र वैऱ्याची आहे आणि दिवससुद्धा वैऱ्याचा आहे.आता राष्ट्रवादाची परिभाषा बदललेली आहे.मुलतत्ववादाला देशभक्तीची झालर लावण्याचा बेगडी प्रयत्न सगळीकडे चालू आहे.अभिव्यक्तीची गळचेपी चालू आहे.इथले आदिवासी-दलित-मूळनिवासी भीतीच्या छायेखाली आहेत.एकात्मतेचे वारे थंडावलेले आहेत.आजपर्यंत काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लिहिला जात होता,आता  मात्र भगव्या शाईने "खाकी" कागदावर इतिहास लिहिला जाणार आहे.अशाही परिस्थितीतही तुमच्या प्रेरणेने आम्ही आशावादी आहोत.
"हे असे आहे तरीही,हे असे असणार नाही.....
दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही......."

धर्माचे गारदी कितीही बळकट असले तरी विवेकाने आम्ही त्यांना तोंड देणार आहोत.आज न उद्या ही परिस्थिती सुधारेल. बदल हा प्रकृतीचा नियम आहे तेव्हा जे काळानुरूप बदलणार नाहीत ते नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही ही तुमची शिकवण आम्ही अंगी बनलेली आहे.तुमच्या जाण्यापाठी वर्षभरात भरपूर गोष्टी घडल्या.पुण्याच्या ओंकारेश्वर पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलंय.आणि त्या वाहणाऱ्या पाण्यात प्रतिगाम्यांच्या जणिवासुध्हा वाहून गेल्यात  ........
असो,भरपूर तक्रारी आणि सल मनात आहे.काही अंशी या पत्रातून ती व्यक्त केलीये.राहिल्या साहिल्या गोष्टी परत एकदा पत्र लिहून कळवेन.....तोपर्यंत रजा घेतो.उद्या तुमच्यासाठी आयोजित स्मृतीसभेला जायची तयारी करायची आहे.तुमच्या पुढच्या स्मृतीसभेच्या वेळी तुमचे मारेकरी पकडले गेले असतील अशी अशा व्यक्त करतो अन थांबतो......जाताना शीतल साठेने तुमच्यावर रचलेल्या गाण्याच्या ओळी तेवढ्या सांगतो..

संपविला देह जरी,संपणार नाही मती......
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली....
तुका मारुनिया त्याची खबर दडवली....
त्या तुकयाच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती....
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

आठवा चार्वाकाला तुम्ही भस्म केले होते...
नाव इतिहासातुनी लुप्त झाले होते.....
त्याच चार्वाकाचे वारसआज दावू किती???
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

                                                                                                              क्रांतिकारी सलाम.

                                                                                                             तुमचा एक कार्यकर्ता 

"डर्टी" पोलिस+अपमान+कॉलेजचे दिवस.

   "डर्टी" पोलिस+अपमान+कॉलेजचे दिवस.

 इंजीनिअरिंगचे दिवस आठवले कि अजूनही मन प्रसन्न होउन जात. रात्ररात्रभर केलेला टाईमपास असो,किंवा उगाच  लेक्चरला दांडी मारून मित्रांच्या खोलीवर झाडलेल्या गप्पा असोत.अतिशय अविस्मरणीय आणि आयुष्यभराची शिदोरी देऊन गेलेला हा जिवंतपणीचा ४ वर्षांचा सुकाळ....!!
असाच काल विचार करत बसलो आणि एक किस्सा आठवून स्वतःच हसत बसलो.....

विद्या बालनचा बहुचर्चित "डर्टी पिक्चर" रिलीज झाला होता.संगमनेर शहरात त्या काळी (फार नाही २ वर्षापूर्वीच) २ सिनेमागृहे होती.एक राजस्थान थिएटर जे गावच्या भरवस्तीत लोकांना मनोरंजनासाठी उपलब्ध होत,तर दुसर यशोदीप  थिएटर जे गावकुसाच्या बाहेर ६-७ किलोमीटरवर. सिनेमाच नावच इतक "डर्टी" असल्याकारणान हा सिनेमा आम्ही मित्रमंडळी न पाहिल्यावाचून राहणार तर नव्हतोच.रात्री ९ ते १२ चा शो पाहायचं ठरलं.जेवण करून आम्ही ,म्हणजे मी एकटा गावातला आणि बाकी सगळे ४-५ जण होस्टेलचे मित्रमंडळी सिनेमा पाहायला निघालो.यशोदीपला पोहोचलो तर शो हाउसफुल होता.काही झाल तरी आज सिनेमा पाहायचाच असा चंग बांधलेल्या आम्ही लोकांनी राजस्थानला जायचं ठरवलं.लिफ्ट मागत,ट्रक,रिक्षा भेटेल ते साधन घेऊन आम्ही गावात पोहोचलो.कसेबसे इथे तिकीट उपलब्ध होते ते घेतले.पान,गुठखा,तंबाखू यांनी रंगवलेल्या खुर्च्यांवर आम्ही रंगीले आसनस्थ झालो.तिथे पडद्यावर विद्या बालन हुलाला हुलाला करत असताना आम्ही मात्र ढेकणे चावत असल्यामुळे चलबिचल करत होतो.सिनेमा संपला.गर्दी ओसरल्यावर आम्ही निवांतपणे थिएटरच्या बाहेर पडलो.रात्रीच्या १२ वाजता डर्टी सिनेमा पाहून निघालेलो आम्ही सगळे बऱ्यापैकी मूडमध्ये होतो आणि टिंगलटवाळी करत निर्जन रस्त्यावरून बसस्थानकाच्या दिशेने चालत जात होतो.रस्त्यात  एक दुग्धालय लागल.घट्ट आणि "गरमागरम मलई मार के" वाल दुध पिण्यासाठी मी कायम तेथे जायचो.सगळ्या कॉलेजवयीन मुलाचं हे आवडीच ठिकाण.तेथून जवळच काही अंतरावर माझी लायब्ररि होती. रात्री लायब्ररि मधून घरी जाताना मी कायम इथे दुध पिउन जायचो.म्हटलं ,इतका छान सिनेमा पाहून आलोय म्हटल्यावर होस्टेलच्या मित्रांना हे दुध पाजुयात...त्या वेळी संगमनेर शहराचं वतावरण काहीस गढूळ होत.जातीय तणावाचे प्रकार वरचेवर घडत होते.स्थानिक कॉलेजमध्ये झालेल्या आंतरजातीय प्रेमप्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रकार काही धर्मवेड्यांनी चालविला होता.अशा पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त चालू होती.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरच हे दुग्धालय आम्हा मित्रांच्या गडबड गोंधळामुळे गजबजलेल वाटत होत.नेमकी अशाच वेळी पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी दुग्धलयासमोर  येउन उभी राहिली.गाडीत बसलेल्या पोलिसकाकांनी आम्हाला हटकल आणि कुठे हिंडताय वैगेरे प्रश्न केले.आम्हा सगळ्यांच्या वतीने मी पुढारपण घेत सौम्य भाषेत उत्तरे दिली.आता पोलिसांनी मोर्चा दुग्धलायाच्या मालकाकडे वळविला.त्या दुकानमालकाच्या आई-बहिणीच्या उद्धाराने संभाषणाला सुरुवात केली.मला ते खटकल आणि मित्राच्या कानात कुजबुजलो कि काय वाय-झेड असतात हि पोलिसवाले...झालं! नेमकं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकंच वेळ झाली. आणि गाडीत बसलेल्या हवालदाराने माझ वाक्य ऐकलं! त्याला माझ वाक्य पूर्णपणे ऐकू गेल नसणार पण माझ्या बोलण्याचा आशय मात्र त्याला नक्की समजला होता.स्वतःच्या गल्लीत कुत्रा पण वाघ असतो अस म्हणतात न,तेव्हा तो हवालदारसुद्धा आता माझा उद्धार करायला लागला.रात्रीचे फिरून दरोडे टाकायचा आणि दंगल घडवायचा विचार आहे कि काय ..अस काहीबाही पोलिसी खाक्यात  बरळायला लागला. आता मात्र मनातून मला राहवत नव्हत,पण म्हटलं आता जर तोंड उघडल आणि काहीबाही बोललो तर मात्र माझी काही धडगत नाही.सगळे पोलिस मिळून माझा "मन्या सुर्वे''  करतील हे पक्क होत.लागलीच सगळे आम्ही तेथून सटकलो.आता माझ्या मित्रांना मात्र माझी टिंगल करायला कारण आणि निमित्त मिळालं होत.पुढारगप्पा मारणारा तू पोलिसी खाक्या भेटताच शेपूट घालून पळून आला असं ऐकवत गमतीचा केंद्रबिंदू आता माझ्याकडे सरकला होता.सरळसरळ माझ्या व्यक्तिमत्वावर पडलेली हि गदाच होती.माझा अहंकार नाही म्हटलं तरी दुखावला गेला होता. मित्रांना एकदाच वाटी लावलं.ते होस्टेलला आणि मी घरी निघून आलो.
      झाल्या प्रकारामुळे रात्री उशिराने झोप लागली.काही तरी करून झाल्या अपमानाचा जाब विचारायचा असं वाटायला लागल.काल सिनेमा बघायला सोबत असलेल्या मित्रांना जेवायचं निमंत्रण देऊन घरी बोलावलं आणि त्यांना जेऊ न घालताच पोलिस स्टेशनला नेल.कधीकाळी काही निमित्ताने शहर  पोलिस निरीक्षकांची ओळख झाली होती आणि ते माझ्या बऱ्यापैकी संपर्कातही होते.ओळखीचा फायदा करून घ्यायचं ठरवलं.पोलिस स्टेशन मध्ये शिरताच सरळ पोलिसनिरीक्षकांच्या दालनात शिरलो.काल रात्री झाला प्रकार कथन केला..दुग्धलायातून बाहेर पडताना पोलिसांच्या गाडीचा नंबर मी पहिला होता आणि मनातल्या मनात घोळवलाही होता.त्या गाडीत रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मला "धमकावयाच्या" गुन्ह्याखाली तक्रार दाखल करायची आहे अस सांगितलं.माझ्या भावना ओळखून हा मुलगा वेगळंच भलत प्रकरण आपल्या अंगावर शेकवेल अशी भीती वाटल्याने त्यांनी "त्या" गाडीत गस्तीवर असलेल्या पोलिसांना पुढच्याच मिनिटाला पाचारण केलं.काल माझ्यावर डाफरणारे आज त्यांच्या बॉससमोर अदबीने वागत होते.निरीक्षकांनी शहानिशा केली.आणि "त्या" पोलिसांना माझ्या आणि माझ्या मित्रांसमोरच समज दिली.आता कुठे माझ्या मनाला शांतता मिळाली होती.मित्रमंडळींना घेऊन पोलिसस्टेशन बाहेर पडलो.काल माझ्यावर हसणारे मित्र आता माझी टिंगल करणार नव्हते या जाणीवेने मला भरून पावल्यासारख वाटत होत.घरी गेल्यावर मित्रांना जेऊ घातलं आणि परत पाठवलं.......डर्टी सिनेमा इतरांसाठी काल रात्रीच संपला होता,पण माझ्यासाठी तो दुसऱ्या दिवशी दुपारी संपला.........

# आणि परत कधीच रात्री सिनेमा पाहायचा प्लान केला नाही.

आज स्वातंत्र्यदिन आहे.......

आज स्वातंत्र्यदिन आहे.......

लगबगीने आज मुद्दामहून लवकर उठलोय...
१० वाजता विद्यापीठात ध्वजारोहण आहे. १० वाजता?? हो !
लहान असताना ध्वजारोहण म्हणजे, सकाळी बरोबर ७ वाजता होणार अस समीकरण असायचं.त्यासाठी पहाटे ५ वाजताच सगळ घर जाग व्हायचं...खादीचा नेहरू शर्ट आणि गांधी टोपी कडक इस्तरी करून,नटून-खटून  जायचो....असा सगळा इतिहास(??) मनात तरळून जातोय......
असो,लगबगीन आता तयार झालोय आणि विद्यापीठाकडे निघालोय....घरापासून बस पकडण्यासाठी १-१.५ किलोमीटर बुद्ध कॉलनीपर्यंत चालत जाव लागतंय ..त्या दिशेने रस्ता तुडवीत,कालच्या पावसाने तुंबलेले खड्डे चुकवत चुकवत चाललोय...
आज स्वातंत्र्यदिन आहे......

जाणारा रस्ता हा कैकाडी वस्तीतून जातोय....लहान मुल हातात तिरंगा झेंडा घेऊन बागडताना दिसतायेत,जीर्ण झालेला एक म्हतारा नळाला पाणी आलंय म्हणून रस्त्यात अंघोळीला बसलाय...पाणी माझ्या शुभ्र कपड्यावर उडू नये म्हणून मी खिलाडू वृत्तीने स्वतःला वाचावतोय...आज स्वातंत्रदिन आहे........

मी हळूहळू कैकाडी वस्तीतून वाट काढतोय...डाव्या हाताला मरीआईच छोटस मंदिर लागलंय...मंदिराच्या ओट्यावर छोटासा टेप रेकोर्डर ठेवलाय त्यावर गाण चालूये...सारे जहां से अच्छा,हिंदूस्ता हमारा....पुढेच एक झेंडा एका पाणी साठलेल्या  खड्ड्यात पडलेला आहे,तो उचललाय आणि काय करायचं याचं??  या यक्षप्रश्नाच्या नादी न लागता तसाच तो फाटलेला झेंडा खिशात ठेवलाय.....आज स्वातंत्रदिन आहे...........

मी आता वस्तीतून बाहेर हाय-वे ला आलोय,वस्तीच्या बाहेर १०-१२ वर्षाची लहान मुले हातात शर्टला लावण्यासाठीचा झेंडा घेऊन उभी आहेत,काका हा झेंडा घ्या न म्हणत,काही कळायच्या आत त्यांनी माझ्या शर्टाला झेंडा टाचणीने टोचायला सुरुवात केलीये,मी त्यांना म्हणतोय अरे बाळ सुट्टे पैसे नाहीत माझ्याकडे....ते म्हणतायेत काका २ रुपये दिले तरी चालतील...मी म्हणतोय अरे सुटते नाहीच आहेत ,१०० ची नोट आहे...
मुलगा बारीक तोंड करतोय आणि आता पर्यंत अर्धी टोचलेली टाचणी खपकन ओढून घेतोय..आणि काय काका तुम्ही पण....असं म्हणत मागून येणाऱ्या माणसाकडे वळतोय....मी मात्र माझ्या ब्रांडेड शर्टाला भोक तर पडलं नाही ना म्हणून तपासून बघतोय....आज स्वातंत्र्यदिन आहे......

मी आता बसस्टोप वर पोहोचलोय....एव्हाना धो धो गर्दी करत वाहणारी बस आज निवांत आलीये...रिकाम्या बस मध्ये मी चौथा माणूस चढलोय....रोज ३०-३५ मिनिटाचा प्रवास आज १० मिनिटात संपलाय कारण आज ट्राफिक नाहीये....
आज स्वातंत्रदिन आहे......

विद्यापीठात पोहोचतोय....कुलगुरू साहेब अजून आलेले नाहीत.लोक कोवळ्या उन्हात ताटकळत उभे आहेत.थोड्या कालावधीने कुलगुरू आलेत.झेंड्याला मानवंदना दिली गेलीये....तालासुरात राष्ट्रगीत म्हटलं जातंय......झेंडा आसमंतात फडफडतोय .आज तिरंगा भलताच देखणा दिसतोय......कुलगुरू आता भाषण करतायेत.सभागृहात बसायला जागा नाहीये,म्हणून आम्हाला शेजारच्या वर्गात बसवलंय आणि तिथेच पडद्यावर सभागृहात काय चालू आहे हे थेट प्रक्षेपानाद्वारे दाखवलं जातंय...आज स्वातंत्रदिन आहे....

कुलगुरू आज दिलखुलास आहेत,त्यांच्या कारकिर्दीतल हे शेवटच भाषण आहे,पुढच्या स्वातंत्रदिनी ते निवृत्त झालेले असणार आहेत....रटाळगप्पा ऐकून आता मी बोअर झालोय...वसतिगृहाच्या वाचन कक्षात पेपर वाचायला बसलोय...हातात महाराष्ट्र टाईम्स आलाय...रिलायंस ट्रेंड ची जाहिरात दिसलीये..१९४७ रुपयांच्या कपडे खरेदीवर १९४७ ची खरेदी मोफत......
मी जाम खुश आहे...भावाला फोन करून सांगितलंय,तो म्हणतोय लवकर घरी ये जाऊयात आपण...मी पेपर ठेवून दिलाय आणि घाईघाईत आता रिक्षा पकडून  खरेदीला निघालोय.....
आज स्वातंत्रदिन आहे.....