केशवसुत जेव्हा दोन 'बाजी' म्हणजे बाजीप्रभू देशपांडे आणि बाजीराव पेशवे यांची तुलना करतात तेव्हा कदचित इथल्या परंपरावादी सदाशेवपेठी रसिकजणांना ते 'असहिष्णू' वाटू शकते. केशवसुत हयात असते तर कदाचित त्यांना पाकिस्तानी एजंट म्हणून गौरविले असते. कदाचित त्यांच्यावर शाईफेकीचा सामुहिक कार्यक्रम आयोजित केला गेला असता. त्यांच्या पुस्तकांच्या चौकाचौकात होळ्या केल्या गेल्या असत्या. आताचे एकूणच वातावरणाचा अंदाज घेतला तर वाटत, बर झाल हा कवी संजय भन्साळीचा समकालीन नाही राहिला. १८९५ साली केशवसुतांनी लिहिलेली हि कविता वाचा.
दोन बाजी
त्या शूरानें भगवा झेंडा हिदुस्थानीं नाचविला,
निजराष्ट्राचें वैभव नेलें एकसारखें बढतीला;
जिकडे तिकडे समशेरीची कीर्ति आपुल्या गाजविली,
खुप शर्तीनें कदर आपली गनीमांस त्या लावियली,
आणि तुवां रे ? – त्वां नीचानें पाठ आपुली दावुनियां
रणांतुनी पौबारा केला, शेपूट भ्याडा वळवुनियां ! १
गुणी जनांची पारख करुनी त्या धीरानें गौरविले,
उत्साहाच्या वातें अपुल्या तेज तयांचे चेतविलें;
प्रतीपदीपज्योति पोषिली सुजनस्नेहा वाढवुनी,
गनीममशकें कितीक गेलीं तिच्यामधें खाक् होवोनी !
आणिक तूं रे ? – नाचलासि तूं नग्रच संगें अधमांचे,
धूळ खात गेलास-लाविले सर्वत्र दिवे शेणाचे ! २
भटांस जे रणधुरंधुर तयां पाचरुनि त्या सिंहानें
माराया कीं मरावया अरिवरि नेले आवेशानें;
‘हरहर!’ शब्दा परिसुनि वळली कितिकांची घाबरगुंडी
‘अला मराठा !’ म्हणत दडाल्या सैरावैरा किति लंडी !
तूंहि भटांला पाचरियलें; काय त्यांसवें पण केलें ?-
यथेच्छ लाडू मात्र झोडिले – नांव हायरे बुडवीलें ! ३
घोड्यावरीच हुरडा चोळित शत्रुशासना धांवोनी
तो गेला.- तूं बिछान्यावरी राहिलास रे लोळोनी !
वीर भले खंबीर आणखी मुत्सद्दी ते सदबुद्धी
त्यांच्या साह्यें निजसत्तेची त्यानें केली रे वृद्धि.
पण तूं रे ?- तूं नगरभवान्या नाच्येपो-ये घेवोनी
दौलतजादा केला – धिग् धिग भटवंशी रे जन्मोनी ! ४
या भटवंशी महाप्रतापी ख्यात जाहले असूनियां
तुळशीमध्ये भांग निघाली अभद्र ऐशी कोठुनियां !
निजनामाचा ‘गाजी’ ऐसा अर्थ उरवुनी तो गेला,
तर हळहळली आर्यमाउली ऐकुनि त्याच्या निधनाला !
मरणा आर्धिच मरुन आणुनि काळोखी निजराष्ट्राला,
तूं गेलासी करुन ‘पाजी’ अहह ! पितामह नामाला ! ५
मुंबई, १६ फेब्रुवारी १८९५
करमणूक, २३ फेब्रुवारी १८९५, पृ. १३२

