समर खडस यांना पत्र




















प्रती,
मा. समर खडसजी,
वरिष्ठ सहाय्यक संपादक,
महाराष्ट्र टाइम्स

विषय: मंजुळेजी, फुले-आंबेडकरांनी असे केले असते का? या आपल्या लेखाबाबत.

नमस्कार !
आपला लेख वाचला.म्हटल आपल्याशी या विषयावर बोललं पाहिजे.एखाद्या विषयाबद्दल मत मांडण्याचा जसा आपल्याला घटनादत्त अधिकार आहे, तसाच तुमच्या वादाला प्रतिवाद देण्याचा  मी माझा अधिकार समजतो म्हणून हा लेखनप्रपंच करतो आहे. मी नागराज मंजुळेचे वकीलपत्र घेवून बोलेल अस तुम्हाला वाटण्याची दाट शक्यता आहे ,तेव्हा मी 'भक्त' प्रवर्गातला नाही हे अगोदरच जाहीर करतो म्हणजे मला बोलायला आणि तुम्हाला समजायला सोपे जाईल.
आपले म्हणणे आहे कि, "अर्धशिक्षित गरीब बाईच्या आयुष्यात काय भोग वाट्याला आले याचा काडीमात्र विचार भक्तांपैकी कुणीही केला नाही".व्यवहारी जगात स्रीला कायम दुय्यम स्थान दिले गेले आहे, हे जसे तुम्हाला मान्य आहे तसेच मलादेखील. हे नाकारण्याइतके करंटे आपण  नक्कीच नाही.बाई अर्धशिक्षित राहिली कि काय होत हे या प्रकरणातून दिसतय. तेव्हा कायद्याने घटस्फोट झालेल्या बाईशी तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याशी नेमका कसा व्यवहार असायला हवे हे तुम्ही सांगायला विसरलात सोबतच नागराज मंजुळेवर तोंडसुख घ्यायला मात्र तसूभर जागा ठेवली नाही. 'स्रीसक्षमीकरण' आणि 'स्रीमुक्ती' या दोन वेगवेगळ्या गोष्टीत आपला गोंधळ उडालेला दिसतो आहे. तस पाहिलं तर मंजुलेंचा विवाह हा काही आंतरजातीय नाही.तो सजातीयच होता.त्यामुळे आपण डॉ. आंबेडकर लिखित 'कास्ट ईन इंडिया' या शोधनिबंधाचा उल्लेख करून काय सध्या करू पाहता आहात हे कळाले नाही.
या शोधनिबंधात बाबासाहेब म्हणतात कि, गटांतर्गत विवाह करणाऱ्या रूढीने गटबाह्य लग्न करण्याच्या रूढीवर मिळवलेला विजय म्हणजे जातीची निर्मिती होय.जातीत परावर्तीत होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाला त्यांच्यातील स्री-पुरुष संख्येत समानता राखणे हे अनिवार्य ठरते.लग्नपद्धती टिकून ठेवायची असेल तर लोकांचा लग्नविषयक अधिकार त्यांना गटातल्या गटात पूर्ण करता आला पाहिजे.नेमका हा मुद्दा घेवून 'सैराट' आला. 'आंबेडकर' हे नाव ऐकून ज्यांना दचकायला होत, त्यांना हा विचार पटणार तरी कसा? ऋतिक रोशनच्या बायकोला  पोटगीदाखल काय काय मिळाल याचा प्रश्न आपल्याला पडत नाही, कारण तो एका 'क्लास' चा विषय असतो, त्यात आपले काय काम असा उक्तिवाद केला जातो. मात्र गल्लेभरू(आपलाच शब्द) दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्याच्या सुलभ मानवी भावनेला परिपूर्ण न्याय देण्यास आपल्याला बरोबर जमले. सवर्ण स्रीला कायम लिंगभेदाशी संघर्ष करावा लागतो तर दलित स्रीला जातिभेद आणि लिंगभेद असा दुहेरी संघर्ष करावा लागतो. नागराजच्या घटस्फोटीत बायकोला या दोघांपैकी नेमका कोणता संघर्ष करावा लागतो आहे हा तुमचा संशोधनाचा विषय का झाला नाही कुणास ठावूक?
आपले आणखी एक म्हणणे आहे कि,जातीय शोषणाच्या चर्चा करणारे किंवा जात अत्याचाराच्या विरोधात रणशिंग फुंकल्याचा आव आणणारे या चर्चा व आंदोलनातही कायम स्त्री मुक्ती वजा करूनच ती चर्चा करतात.मला वाटते आपला हा फार मोठा गैरसमज झालाय. शतकातील क्रूर हत्याकांड अशी ज्या हत्याकांडाची ओळख करून देता येईल अशा खैरलांजी हत्याकांडात तथाकथित स्रीवादी कार्यकर्त्यांचे मेणबत्ती मोर्चे निघाले नाहीत त्यासाठी जातीय शोषणाच्या चर्चा करणाऱ्या लोकांनाच संघर्षाचा मार्ग पत्करावा लागला हे सत्य तुम्हीदेखील नाकारु शकत नाही. डेल्टा मेघवाल या दलित मुलीची राजस्थानमध्ये बलात्कार करून हत्या झाली त्यावेळी आपली लेखणी आपण स्रीवादी भूमिकेतून का झिजवली नाही हा प्रश्नदेखील निरुत्तर आहे.फुले आंबेडकर यांचे नाव घेतल्यानंतर वागण्यात काहीपथ्ये पाळावी लागतात,असे तुमचे म्हणणे आहे , परंतु नेमकी कोणती पथ्ये पाळायला हवी यासाठी आपण यादी दिलेली नाही तेव्हा कृपया करून ही तयार करावी, जेणेकरून देशातील तमाम घटस्फोटीत पुरुषांना ती कामी येईल.एकदा कि फुले-आंबेडकर विचारांच्या शाळेत दाखल झालो कि घटस्फोट घ्यायचा नाही असा काहीसा मतितार्थ आपल्या लिखाणाचा आहे असे समजते. तेव्हा लिव-ईन-रिलेशनशिपला तर आपल्या विचारप्रणालीत जागाच नसेल असे दिसते.याबद्दलही आपल्याकडून जाणून घ्याला आवडेल. माणूस हा समाजशील प्राणी आहे, तेव्हा आपल्या सारख्या समाजाचे कायम भले पाहणाऱ्या व्यक्तीकडून समाजात घटस्फोटीत स्री-पुरुषाबद्दल काय आचारसंहिता असायला हवी हे जाणून घ्यायला आवडेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या 'कास्ट ईन इंडिया' या शोधनिबंधाचा शेवट करताना म्हणतात कि, बंडखोर विचारवंत धर्मसंप्रदायाच्या स्वरुपाची जात निर्माण करत असतो. जातीचा भंग करण्याचे धाडस करणाऱ्या पापी माणसासाठी जातीजवळ दया-मया नसते. बहिष्कार हा त्याला दंड असतो व त्याचा परीणाम म्हणून नवी जात निर्माण होते. जातीबहिष्कृत लोक नवी जात निर्माण करतात, त्याला कारण आहे ती आपली समाजव्यवस्था. सैराटमध्ये माणुसकीच्या आधारावर फुलू बघणारी 'जात' रक्ताच्या अभिषेकाने संपवली जाते, तर तुमच्या  'मंजुळेजी, फुले-आंबेडकरांनी असे केले असते का?'  या प्रश्नाने तुम्हीच  'मंजुळे' नावाची एक नवी जात निर्माण करता आहात,ते देखील फुले आंबेडकरांचे नाव घेवून.यानिमित्ताने एक मात्र पक्क जाणवलं कि, जब्याने मारलेला दगड ज्या ज्या लोकांच्या जिव्हारी लागला होता त्या सगळ्यांनी या निमित्ताने छोटे-छोटे दगड,विटा घेवून परतफेड करण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला.असो,माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलाय,तुम्हाला पटलेच पाहिजे हा आग्रह नाही.

जय भीम ! जय जगत!

-सागर भालेराव

अन्सार आणि नसीम

वर्ष झालंय या गोष्टीला. मागच्या वर्षी चंद्रपूरला श्रमसंस्कार शिबिराला गेलो होतो. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या प्रेरणेन हे शिबीर अव्याहत चालू आहे. श्रमाला जातीचा, धर्माचा, पंथाचा गंध नसतो अस बाबा म्हणायचे. आपले हात हे कुणाला मारण्यासाठी नाही तर नवनिर्माणासाठी आहे अस बाबा म्हणायचे. 'भारत जोडो' अभियान याच मूल्याचा एक भाग. मागच्या वर्षी विचार केला कि चला या वर्षी श्रमसंस्कार शिबिराला जाऊयात  त्या निमित्ताने परिवर्तन  चळवळीतले मित्रमैत्रिणी भेटतील, नवा विचार ऐकायला, अनुभवायला मिळेल.


     अन्सारची एक विजयी मुद्रा, ज्यामागे बरेच संदर्भ आहेत.


शिबिराला गेलो, नवे मित्रमैत्रिणी भेटले, जुन्या नव्या विषयावर गप्पा व्हायच्या.आमच्या ग्रुपमध्ये एक चिनू नावाचा दहावीत असलेला  मुलगा होता. संघाच्या शाखेत जाणारा. संघाचे पक्के संस्कार त्याच्यावर खोल रुजलेले. मला दादा म्हणून हाक मारायचा. मला जेवताना एकदा त्याने जात विचारली. म्हंटल, 'मी ब्राम्हण आहे '(मी त्याला धर्म सांगितला हे त्याला कळले नाही, त्याचे या उत्तराने समाधान मात्र झाले) . त्याने प्रतिप्रश्न केला कि, 'मग जानवे का नाही घालत? ' म्हटलं 'माझा उपनयन विधी करायला मीच घरच्यांना नकार दिला म्हणून'. भाई बोलला, 'काय दादा तू पण भ्रष्ट ब्राम्हण निघालास!' त्याच्या भ्रष्ट ब्राम्हणांच्या यादीत मी कितवा होतो माहित नाही.
 
दुपारी शेतावर, बंधाऱ्यावर श्रम करून आलो कि मित्र मंडळी जवळच्या ओढ्यावर अंघोळीला जायचे. चिनू देखील मागेमागे असायचा. आमच्या सोबत पुण्याहून आलेला एक मित्र देखील होता. एक दिवशी चिनूने त्याच्याकडून अंघोळीचा साबण मागितला, त्याने दिला. अंघोळीवरून आल्यावर पुण्याच्या मित्राने आणलेला फरसाण खायला सगळे बसलो. त्याने घरून आणलेला फरसाण आम्ही गप्पाटप्पा मारत खात होतो. तितक्यात कोणी मित्र आला आणि 'अरे नसीम, अंघोळीला जाऊन आलास काय?' असा प्रश्न केला. त्याने उत्तर दिल 'हो'. त्या दोघांचे संभाषण चालू असताना, चिनू मात्र फरसाण खायचा थांबला. हातातला घास त्याने तसाच परत ठेवला. आणि 'तू मुस्लिम आहेस ?' अस नसीमला विचारलं, चिनूच्या कपाळावर पडलेल्या घड्या स्पष्ट दिसत होत्या. आता चर्चेला वेगळ वळण लागल. तुझ्याकडे बघून तू मुस्लिम असल्याच वाटत नाही, मुस्लिम लोक कसे क्रूर असतात वैगेरे बोलायला लागला. आम्ही त्याला समजविण्याचा प्रयत्न केला जरूर, पण तो मात्र वेगळ्या अविर्भावात होता. सुरवातीला नसीमने देखील लहान आहे म्हणून दुर्लक्ष केल. चिनू फरसाण न खाता निघून गेला. तो गेल्यावर मात्र २५/२६ वर्षाचा नसीम रडायला लागला. वयाने लहान असलेल्या पोराने माझा, माझ्या धर्मावरून उद्धार करावा हे जस त्याला पटल नव्हत तसच आम्हालाही पटल नव्हत. नसीम सांगायला लागला, हा अनुभव काही आजचा नाही. लहानपणापासून अशा प्रसंगाला समोर गेलोय. शाळेत असताना 'लांड्या' म्हणून चिडवायचे. कॉलेजमध्ये असतानाही इतर मुले मैत्री करायचे नाहीत,कारण एकच, माझा धर्म!
नसीम दाढी ठेवत नव्हता आणि टोपीदेखील घालत नव्हता, तेव्हा त्याची मुस्लिम ओळख स्पष्टपणे दिसायची नाही. त्याची मराठी देखील अस्खलित! मुस्लिमांचे असलेले कुठलेच संस्कार त्याच्या राहणीमानात दिसत नव्हते, किंबहुना ते लपवण्याचा त्याचा प्रयत्न असायचा. ढसाढसा रडलेला नसीम आज  प्रकर्षाने आठवत आहे तो अन्सार शेखच्या निमित्ताने.

देशभरातून ३६१ क्रमांक घेवून अन्सार युपीएससी पास झालाय. पुण्यात शिकायला असताना तो मुस्लिम असल्याकारणाने त्या रूम मिळायची नाही, तेव्हा आपल नाव तो शुभम सांगायचा. काय रे ते दुर्दैव!
आपली स्वतःची ओळख इथल्या सामाजिक विषमतेमुळे लपवावी लागण म्हणजे कसलं द्योतक? अल्पसंख्यांक असलेल्या वर्गाला आश्वासक वातावरण निर्माण करण्यास आपण पुरते अपुरे पडलो आहोत हे सत्य पुन्हा एकदा समोर आलय.( या अगोदरही पुण्यात मोहसीन शेखची हत्या झाली तेव्हा देखील आपल्याला अशीच उपरती झाली होती)  नसीम काय आणि अन्सार काय दोघेही सामाजिक विषमतेचे बळी ठरलेत. पण दोघांच्याही जिद्दीला सलाम. नसीम पुण्यातच प्राध्यापकाची नोकरी करतो आहे, येणाऱ्या पिढीवर समतेचे संस्कार व्हावेत म्हणून हरएक प्रयत्न करेल असे तो म्हणतोय. अन्सार देखील आता प्रशासकीय सेवेत आलाय. रंजलेल्या गांजलेल्या लोकांची सेवा व्हावी म्हणून त्याने हे क्षेत्र निवडलंय अस तो सांगतो. मी पूर्वग्रह ठेवून लिहितो आहे असा कुणाचा गैरसमज होईलही. पण जे लिहिलंय ते सत्य घटनेतून लिहिलंय. नसीमला ढसाढसा रडावं लागण, अन्सारला आपल नाव लपवावं लागण आणि चिनूला संघाचे संस्कार असण हा काही योगायोग नाही. आपण काय पेरतो आहोत आणि काय उगवलं जात आहे हे  रोहित वेमुला सोबत ओमर खालिद यांच्या उदाहरणाने स्पष्ट व्हाव. 'मला मातृभूमी नाही' अस उद्विग्नपणे बाबासाहेब आंबेडकर गांधीजींना उद्देशून म्हटले होते. आज स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही ही म्हणण्याची वेळ कुणावरही येऊ नये. त्यासाठी संघर्ष करावा लागेल, हरएक पातळीवर. समाजिक, सांस्कृतिक आणि राजकीयही. नसीम आणि अन्सार सारखे लाखो करोडो भारतीय या संघर्षाचे वाहक व्हावेत. भारताची वाटचाल ही लोकशाही समाजवादाच्या दिशेने व्हावी ना कि हिंदुराष्ट्रच्या दिशेने.

अस्पृश्यतेची विहीर - विषमतेच एक स्मारक

             
   स्वतंत्र भारताच्या संविधानानुसार कलम १७ अन्वये घटनाकारांनी ही गोष्ट जाहीर केली कि या देशातून मानवतेला काळिमा फासणारी 'अस्पृश्यता' नष्ट केली गेली आहे. सगळीकडे उत्साह होता, नव्या दमाने आपला देश आता विकासाची वाट धरू पहात होता. मनूच्या कायद्याने सांगितलेले जाचक नियम २६ नोव्हेंबरला १९५० ला लाथाडून एक नवी सुरुवात आपण केली. ज्या घटनाकारांनी स्वतः अस्पृश्यतेचे चटके सोसले त्यांनी कुठलाही लवलेश न ठेवता, सुडाचे राजकारण न करता प्रत्येक भारतीय नागरिकाला 'एक व्यक्ती-एक मत' आणि  'एक मत-समान मुल्य' हे तत्व दिले. या घटनेला आता ६५ वर्षे उलटून गेली. काय घडलं गेल्या ६५ वर्षात? घटनाकारांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय आपण प्रस्थापित करू शकलो? नेणीवेत असलेल्या जातीला मूठमाती देण्याचा खरच आपण प्रयत्न केला?



आज हे सगळे प्रश्न पडतायेत याच कारण म्हणजे काल परवा बातमी वाचली कि गावातल्या सवर्णांनी (तथाकथित, आता ही पद्धत फक्त बोलीभाषेत आहे, त्याला संविधानिक महत्व आणि अर्थ नाही) बापूराव ताजने नावाच्या एका दलित व्यक्तीच्या बायकोला विहिरीवरून पाणी भरू दिले नाही म्हणून ईर्षेला पेटलेल्या या पट्ठ्याने तब्बल ४० दिवसात चक्क विहीरच खोदली!
त्याने खोदलेल्या विहिरीला भला मोठा गर्भित अर्थ आहे अस मला वाटत. महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना खरे तर माणुसकीचे दर्शन घडायला हवे परंतु हा संस्कार आपल्या समाजात अजून पूर्णपणे रुजलेला नाही हे जळजळीत सत्य मान खाली घालून स्वीकारावे लागेल. पाण्यासाठी संघर्ष हा काही या समुदायासाठी नवा नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह इथल्या सनातनी परंपरेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार होता. किंडेमुंगे जे पाणी पितात त्या पाण्यावर हाडामासाच्या माणसांचा अधिकार असू नये ही गोष्टच मुळात तर्कबुद्धीला पटणारी नव्हती, पण ज्यांची बुद्धी हजारो वर्षापासून स्वर्ग-नरकाच्या संकल्पनेत गहाण पडली आहे त्यांचे प्रबॊधन होण्यासाठी अशा किती विहिरी खोदाव्या लागणार आहे कोण जाणे? हा सगळा विचार करता पाण्यासाठी संघर्ष करणारे बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांसाठी आपली खाजगी विहीर खुले करणारे जोतीराव फुले त्यामुळे या देशाचे  खरेखुरे महात्मा आहेत.

जातीचे वास्तव जो व्यक्ती नाकारतो त्याला खरे तर येरवड्याच्या जेलमध्ये नेवून विजेचे झटके देणे गरजेचे आहे नाही तर बापूराव ताजने सारख्या असंख्य मानवतेच्या विहिरी खोदण्यासाठी कामाला जुंपवण्याची  गरज आहे. पैकी पर्याय दुसरा अधिक संयुक्तिक वाटतो. आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोंडाला फेस येवूपर्यंत वाद-प्रतिवाद करायचा मात्र सामाजिक न्यायासाठी तसूभर आपली अक्कल झिजवायची नाही अशी आजच्या समाजाची गत आहे. बापूरावने खोदलेली विहीर ही त्यामुळे भारतातील विषमतेचे एक स्मारक आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. हे स्मारक येणाऱ्या काळात भावी पिढीला त्यांच्या पूर्वजांनी काय काय चुका केल्या हे ओरडून सांगणार आहे. बापूरावने खोदलेल्या विहिरीला पाणी लागल, पण दगड काळीज झालेल्या माणसांना पाझर कधी फुटेल माहित नाही. आत डोकावून पाहिलं कि समजते ही विषमतेची विहीर दिवसेंदिवस खोलवर जाते आहे, खोल. एकदम खोल. जिच्या बुडाशी निर्वात पोकळी आहे. तिचा रस्ता कुठे जातो माहित नाही. शेवट कुठे आहे माहित नाही. आदिमकाळात ही विहीर आपल्याला घेवून जाते. माणूस जेव्हा समाजशील प्राणी झालेला नव्हता त्याही  पलीकडे ही विहीर आपल्याला घेवून जाते. हळूहळू डार्विन -दुर्खीम मागे पडतात,बुद्धाची करुणामय आर्त हाक ओझरती कानावर पडते. पाठीमागून एक आवाज मात्र सदैव तुमचा पाठलाग करतो ,तो आहे १२५ वर्षांचा उत्क्रांत झालेला आवाज, जो ओरडून सांगतो, मागे फिरा! समतेच्या वाटेने या जगाचा उद्धार होईल,अंधाराकडे जाल तर विनाश आहे. उजेडाकडे चला.  गर्तेत जाल तर दरवेळी तुम्हाला त्यातून काढण्यासाठी मी असेलच असे नाही. आता या विहिरी तशाच ठेवायच्या कि बुजवायाच्या हे आपल आपण ठरवायचय. आतामात्र ठळकपणे ऐकू येणारा आवाज काहीसा अस्पष्ट ऐकू येतोय!