दोन नोबेल दोन देश ....!!

   दोन नोबेल दोन देश ....!!



     जागतिक मानवी हक्कदिनी  नोबेल पारितोषिकाच वितरण केल गेल. उत्सवमूर्ती होते भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफजाई.भारत आणि पाकिस्तानच्या शान्तिदुतांना नोबेल पुरस्कार मिळण हा निव्वळ योगायोग आहे असे मला तरी वाटत नाही.एकीकडे पाकिस्तानात त्याच्या स्वतंत्र निर्मितीपासून कट्टरता पाळत आला आहे तर आपला भारत देश आता कट्टरतेकडे आगेकूच करत आहे.अशा संक्रमणाच्या काळात हे शांतीचे नोबेल मिळणे यामागे काहीतरी हेतू निवड समितीचा असू शकतो.भविष्यात या दोन देशांनी आपल्या आपल्या देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत असताना शेजारधर्म म्हणून शांतिवार्ता चालवावी अशी अपेक्षा यामागे असू शकते.सार्क परिषदेत भारत आणि पाकिस्तानचे पंतप्रधान पारंपारिक वैऱ्यासारखे वागले.पाकिस्तान दर वेळी सीमेवर कुरापती करत असतो,अतिरेक्यांना सीमेवरून आत सोडलं जात.मच्छिमारांना बेकायदा डांबून ठेवलं जात.पण आता मात्र  शांतिवार्ता केवळ दिखावा होऊन बसला आहे.भारतात तर अंतर्गत वाद इतके वाढत आहेत कि विचारता सोय नाही.स्वराजबाई गीतेला राष्ट्रग्रंथ  काय म्हणते,कुणी एक भाजप  खासदार नथुराम गोडसेला देशभक्त काय म्हणतो,कोणी एक साध्वी रामजादे  व्हयाच कि हरामजादे व्हायचं असा सरळ लोकांना प्रश्न विचारते. अशा प्रकारची विषाची रोपटे लावण्याची सुरुवात आता भारतात झाली आहे.गांधीजींना नोबेल पुरस्कार समितीने म्हणे दोन वेळा डावललं. हरकत नाही,पण एका गांधीवाद्याला तुम्ही पुरस्कार दिला त्यातच सगळ आल.त्यांना वेगळा पुरस्कार देण्याची गरजही नाही. बुद्ध,गुरुनानक,गांधी यांची प्रेरणा घेऊन सत्यार्थी आज "बचपन बचाव" चळवळ चालवत आहेत. त्यांच्या कामाची दखल भारतीयांना घ्यायला वेळ मिळाला नाही पण जागतिक पातळीवर मात्र त्याची दाखल घेतली गेली.कोणत्याच प्रार्थनास्थळात इथल्या लहान मुलांच्या भुकेचा,शिक्षणाचा आणि हक्काचा प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती नाही,असा प्रश्न उपस्थित करून सत्यार्थी यांनी इथल्या सामाजिक व्यवस्थेवर कोरडे ओढले आहेत.मलाला आणि सत्यार्थी यांनी जेव्हा पुरस्कार स्वीकारला तेव्हा उपस्थित जन्सामुदायातील एक महिला रडताना दिसली,एका हाताने मोबाईल कॅमेरामध्ये शुटींग आणि एका हाताने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसताना पाहून मलाही भारावून आल.त्यांच्या कार्याला जगाने आज मान्यता दिली.किती तरी वेळ टाळ्यांचा कडकडात त्या सभागृहात गुंजत राहिला. हे दोन नोबेल म्हणजे क्षितीजावरले दोन ध्रुव आहेत.एक ध्रुव मुलींच्या शिक्षणासाठी लढते आहे तर दुसरे लहानग्यांच्या हक्कासाठी.ह्या दोघांची लढाई आता लोकलढा व्हावा.महिला,बालक,श्रमिक,कष्टकरी यांचे प्रश्न जगाचे प्रश्न व्हावेत. भारतात स्रीशिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी काम केल म्हणून  आज भारतातील महिला सक्षम आहे.पाकिस्तानला मलाला हि सावित्रीची लेक जरा उशिरा मिळाली.उशिरा का होईना तिथे महिला शिक्षणाची चळवळ उभी राहिली आहे हे उल्लेखनीय.आणि भारतात अजून दलित,आदिवासींना माणूस म्हणून जगण्याची अजून मुभा मिळाली नाही.तिथे लहान मुलांचे प्रश्न तर कोसो दूर आहे.अशा फाटाफुटीच्या काळात सत्यार्थी यांच्या कार्याचा गौरव व्हायलाच हवा.
या दोन्ही नोबेल लोकांना शुभेच्छा......तुमच्या कार्याची प्रेरणा आम्हालाही मिळो.दिगांतरात मानवी हक्काचा आवाज घुमत राहावो. जिंदाबाद.!!!
              

त्यांचा ओणम आणि आणि आपली भाऊबीज.....

  त्यांचा ओणम आणि आणि आपली भाऊबीज.....

    आज ओणम असल्याकारणान एका मल्याळम मैत्रिणीच्या घरी भोजनाच  आमंत्रण होत.ओणम हा सण का साजरा केला जातो आणि कसा साजरा केला जातो याची जराशिसुद्धा कल्पना नव्हती.मस्त पैकी केळीच्या पानावर जेवण वाढली गेली.सगळ काही साग्रसंगीत! केरळ मध्ये आल्याचा पुरेपूर आभास.घरातले सगळेच आपल्या पारंपारिक वेशात.मैत्रिणीची आई,आजी,वडील,इतर सर्व नातेवाईक त्यांच्या पारंपारिक पेहेरावात.पांढऱ्या रंगाच्या आणि सोनेरी किनार असलेल्या साड्या घरातल्या महिलांनी  घातलेल्या होत्या.एकंदरीत पिव्वर मल्याळी वातावरण.सांबर भात,नारळाच्या खोबऱ्याची चटणी,खीर,वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि इतर बरंच काही.म्हटलं आता अधाशासारख ताटात लक्ष केंद्रित न करता इकडल्या तिकडल्या गप्पा कराव्यात.तेव्हा मैत्रिणीला या सणाचं महत्व विचारलं.तिने सांगितलेली माहिती माझ्या ठाई जुनी असली तरी नव्याने माहिती मिळत होती.

महाबली नावाचा एक राक्षस कुळातील राजा होता.सगळेच राक्षस वाईट नसतात,तसा हा पण राजा वाईट नव्हता .प्रजेवर आपल्या मुलांप्रमाणे हा प्रेम करायचा.प्रजा जे मागेल ते देण्यास हा महाबली राजा मागेपुढे पाहत नसायचा.दानशूर असलेल्या या राजाची सर्वदूर ख्याती होती.त्याच्या दानशूरपानाचे किस्से चारही मुलखात दंतकथांसारख्या सांगितल्या जायच्या.एकदा या राजाची ख्याती ऐकून भगवान विष्णूने त्याची परीक्षा घ्यायचं ठरवलं.भगवंतांनी वामन अवतार घेतला आणि महाबली राजाच्या दरबारात आला.भगवंतांनी त्याला ३ पाऊल जमीन मला दान स्वरुपात दे अशी मागणी केली.राजाने ती मान्य केली.आणि काय गहजब,बटूक असलेला वामन महाकाय झाला.त्याने एका पाऊलात संपूर्ण पृथ्वी,दुसऱ्या पाऊलात आकाश पादाक्रांत केल.आत संपूर्ण विश्व वामनाने बळकावल त्यामुळे तिसर पाऊल कुठे ठेवाव असा वामनाला प्रश्न पडला.महाबलीने सांगितलं,मी माझ्या शब्दाला जागणारा आहे,तिसर पाऊल तू माझ्या डोक्यावर   ठेव.झाल..वामनाने डाव साधला,महाबली राजाच्या  डोक्यावर पाय ठेऊन त्याला वामनाने पाताळात धाडलं.जाताना शेवटची इच्छा मात्र त्याला विचारली,राजा म्हणाला,मी माझ्या प्रजेवर पुत्रवत प्रेम करतो,माझ्या प्रजेला मला वर्षातून एकदा भेटता येईल अशी आज्ञा द्यावी.वामनाने त्याला आज्ञा दिली.त्यानुसार आजच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी महाबली राजा आपल्या प्रजेच्या भेटीला येतो असा मल्याळी लोकांचा समज आहे.आणि हा दिवस ते "ओणम" या नावाने साजरा करतात.

      ही कथा ऐकल्यावर जेवण करता करताच डोक्यात विचारचक्र फिरू लागली.भाऊबीजेला बहिण ओवाळायला लागली,कि आई तिला शिकवायची कि ओवाळताना "इडा पिडा जावो बळीच राज्य येवो" अस म्हणावं.तेव्हा आईला याबद्दल विचारलं तेव्हा तिनेसुद्धा रंजक माहिती सांगितली होती.बळी राजा हा आपला बहुजनांचा राजा.त्याच्या राज्यात आपण शेतकरी फार सुखी होतो.सगळ  काही व्यवस्थित होत .मात्र त्यादरम्यान परकीयांनी  (आर्यांनी) आक्रमण केल.  त्यामध्ये "वामन"  नावाच्या ब्राम्हणाने कपटाने बळी राजाचा खून केला.आपला भाऊ सुद्धा बळी राजासारखा पराक्रमी होऊ दे,दानशूर होऊ दे अशी मागणी आपण यावेळी करायची असते,म्हणून ओवाळताना ह्या ओळी म्हणाव्यात.

      एकीकडे हा राक्षस गणातला राजा,त्यातही दयाळू आणि दानशूर,इतका दानशूर कि भगवंतालाही त्याची परीक्षा घेण्याचा मोह आवरू नये? बर परीक्षा घेतली तरी त्यात सरळ घातपात? हे काही पचनी पडेना....इतका लोकप्रिय राजा कि त्याच्या रयतेने आपल्या भावाला ओवाळतानाही त्या राजाची आठवण काढावी आणि भावाला "बळीच" राज्य येवो अस म्हणावं म्हणजे तो राजा नक्कीच क्रूर नसावा.त्या राजाच्या स्वागतासाठी ओणम १० दिवस साजऱ्या करणाऱ्या केरळी लोकांना तो आपला वाटतो म्हणजे तो तितकाच लोकप्रिय असावा.इतिहासाची मोडतोड करण्याची आपल्या भारतीयांना मोठी घाण सवय.लोकायतवादी चार्वाकांना देखील महाबली/बळी राजाप्रमाणे संपविण्यात आल.बहुसंख्यांचा आणि अल्पसंख्यांकांचा संघर्ष असा शतकानुशतके सुरु आहे.त्याला थांबा कुठे भेटणार कोण जाणे?? या सगळ्या प्रश्नांची आता नव्याने मांडणी होणे गरजेचे आहे.इतिहासातली वांगी इतिहासात बरी, हे देखील तितकाच खर,परंतु राहून राहून ओणम आणि भाऊबीज साजरी  करून  त्या वांग्याचं भरीत आपणच बनवीत आहोत तेव्हा त्या मागची कारणमीमांसा होणे देखील गरजेचे.

   जेवताना इतकं सगळ मनात काहूर चालू असताना,मैत्रिणीच्या आईने ताटात सांबर ओतल,आणि मी भानावर आलो.त्या ताटात ओतू गेलेल्या सांबराला हाताने पुन्हा भातावर घेतलं.आता भाताच गोल आळ करून त्यात सांबर घेतलं.आणि कोपर्याने हलके हलके बाजूला काढत खाऊ लागलो.साला आपल्या संस्कृतीचे हाल सुद्धा त्या आळ घातलेल्या भातासारख झालेत.न त्याला बाहेर पडायची सवलत,आणि पडलाच तर एकदम केळीच्या पानावरून सरळ जमिनीवर नाहीतर कुणाच्या तरी पोटात.....
आता खरकटे हात सुखायला लागले,तेव्हा उठलो आणि हात धवून घेतले.यथेच्च ढेकर दिला,माझ्या अर्थी माझा "ओणम" अजूनही संपला नव्हता.

तेरे कातील जिंदा है..दाभोळकर हम शरमिंदा है..!!!

दाभोळकर सरांना एक अनाहूत पत्र.......



प्रिय नरेंद्र दाभोळकर सर ......

             आज तुम्हाला हे पत्र लिहिताना कोठून सुरुवात करावी.काय लिहू,कसं लिहू अशा असंख्य प्रश्नांनी मनात अगाध गोंधळ घातलाय.तुम्हाला आमच्यातून जाऊन पुरत एक वर्ष सरलंय ! चालता बोलता तुम्ही आमच्यातून निघून गेलात.आयुष्यभर विज्ञानवादी दृष्टीने जगलेल्या तुम्हाला ही पुरोगामी तरुण पिढी कशी विसरू शकेल.धर्माची,श्रद्धेची,कर्मकांडाची विज्ञानवादी चिकित्सा करण्याची दृष्टी तुम्हीच तर आम्हाला दिली.त्याच  हत्तीच्या बळामुळे आम्ही सनातनांच्या तोंडात चपराक मारू शकलो.तुमचा नरबळी दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने "जादूटोणा  विधेयक" अध्यादेश काढून लागू केला.पण त्यासाठी तुमचा नरबळी द्यावा लागला .....आणि त्यानंतर तुम्हाला "पद्मश्री" देऊन तुमच कौतुकही करण्यात आले. तुम्ही लावलेलं प्रबोधनाच रोपट  आता हळूहळू वाढत आहे,त्याचाच परिपाक म्हणून आता पंढरपूरचा विठ्ठल बडवेमुक्त तर झालाच पण आता त्याची पूजा सोवळे घातलेल्या शेटजी भटजींच्या नव्हे तर,बहुजन समाजातील पुजाऱ्यांच्या हातून होत आहे.तुम्हाला अभिप्रेत असलेली प्रबोधनाची चळवळ संथ गतीने का होईना पण आम्ही पुढे चालवत आहोत.

          तुमचे मारेकरी तर खरे षंढ म्हणावे लागतील.विचारांची लढाई विचारांनी करायची असते हे समजण्या इतके ते शहाणे न याअगोदर होते अन भविष्यातही होतील कि नाही याची शाश्वती नाही.आता तर अशा गांडूच्या अवलादी गल्ली पासून दिल्ली पर्यंत,रस्त्यारस्त्यावर दिसत आहेत.आज पर्यंत छुपी लढाई करणारे हे धर्माचे ठेकेदार समोरासमोर लढण्यासाठी तयार आहेत.काळ कसोटीचा आहे पण तुमच्या मुशीत वाढलेले आम्ही खचलेलो नाही.सल मात्र एवढी आहे कि आमचं ढिम्म प्रशासन तुमच्या मारेकऱ्यांना पकडू शकलं नाही.तुमचे मारेकरी आज खुशाल रानमोकळे पणाने  हिंडतायेत.आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असे विखारी प्रकार घडत असताना त्याला खतपाणी घालणारे कोण होते आणि कुणाच्या सांगण्यावरून तुमचा खून पाडला गेला हे कळण्याइतके मूर्ख इथले राजकारणी तर मुळीच नाहीत.आणि हद्द म्हणजे तुमचे मारेकरी शोधण्यासाठी जगात  पोलिस प्रशासनाने आजपर्यंत कुठेही वापरली नसेल अशी पद्धत तुमच्या खुनाच्या तपासाधिकारी गुलाबराव पोळ यांनी वापरली.तुमचं तथाकथित भूत "प्लनचिट" करून बोलावलं गेलं आणि त्यालाच मारेकरी कोण असा सवाल केला गेला.तुम्ही जर हयात असता आणि असा प्रकार घडला असता तर तुमची काय प्रतिक्रिया असती हे आम्ही समजू शकतो.आणि यावर कळस म्हणजे आपल्या देशाचे प्रसिध्द शास्रज्ञ,परम संगणकाचे जनक डॉ.विजय भाटकर यांनी तर हा प्रकार म्हणजे तपास प्रक्रियेचा भाग आहे अस सरळ सरळ विज्ञानवादी प्रमाणपत्र देऊ केलं.या प्रकारावरून इथली परिस्थिती  किती भयानक आहे याची तुम्हाला कल्पना आलीच असेल.
         असो,सध्या मुलतत्ववाद्यांची चालती आहे,सांप्रदायिक शक्ती राहून राहून डोक वर काढतायेत.धर्माच्या आड माणूस माणसाला मारतो आहे.काल परवा नितीन आगे आणि मोहसीन शेख यांची हत्या येणाऱ्या काळाची नांदी अधोरेखित करून गेली आहे.रात्र वैऱ्याची आहे आणि दिवससुद्धा वैऱ्याचा आहे.आता राष्ट्रवादाची परिभाषा बदललेली आहे.मुलतत्ववादाला देशभक्तीची झालर लावण्याचा बेगडी प्रयत्न सगळीकडे चालू आहे.अभिव्यक्तीची गळचेपी चालू आहे.इथले आदिवासी-दलित-मूळनिवासी भीतीच्या छायेखाली आहेत.एकात्मतेचे वारे थंडावलेले आहेत.आजपर्यंत काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर लिहिला जात होता,आता  मात्र भगव्या शाईने "खाकी" कागदावर इतिहास लिहिला जाणार आहे.अशाही परिस्थितीतही तुमच्या प्रेरणेने आम्ही आशावादी आहोत.
"हे असे आहे तरीही,हे असे असणार नाही.....
दिवस अमुचा येत आहे तो घरी बसणार नाही......."

धर्माचे गारदी कितीही बळकट असले तरी विवेकाने आम्ही त्यांना तोंड देणार आहोत.आज न उद्या ही परिस्थिती सुधारेल. बदल हा प्रकृतीचा नियम आहे तेव्हा जे काळानुरूप बदलणार नाहीत ते नामशेष झाल्याशिवाय राहणार नाही ही तुमची शिकवण आम्ही अंगी बनलेली आहे.तुमच्या जाण्यापाठी वर्षभरात भरपूर गोष्टी घडल्या.पुण्याच्या ओंकारेश्वर पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेलंय.आणि त्या वाहणाऱ्या पाण्यात प्रतिगाम्यांच्या जणिवासुध्हा वाहून गेल्यात  ........
असो,भरपूर तक्रारी आणि सल मनात आहे.काही अंशी या पत्रातून ती व्यक्त केलीये.राहिल्या साहिल्या गोष्टी परत एकदा पत्र लिहून कळवेन.....तोपर्यंत रजा घेतो.उद्या तुमच्यासाठी आयोजित स्मृतीसभेला जायची तयारी करायची आहे.तुमच्या पुढच्या स्मृतीसभेच्या वेळी तुमचे मारेकरी पकडले गेले असतील अशी अशा व्यक्त करतो अन थांबतो......जाताना शीतल साठेने तुमच्यावर रचलेल्या गाण्याच्या ओळी तेवढ्या सांगतो..

संपविला देह जरी,संपणार नाही मती......
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली....
तुका मारुनिया त्याची खबर दडवली....
त्या तुकयाच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती....
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

आठवा चार्वाकाला तुम्ही भस्म केले होते...
नाव इतिहासातुनी लुप्त झाले होते.....
त्याच चार्वाकाचे वारसआज दावू किती???
धर्माच्या गारद्यांनो कशी रोखणार गती????

                                                                                                              क्रांतिकारी सलाम.

                                                                                                             तुमचा एक कार्यकर्ता 

"डर्टी" पोलिस+अपमान+कॉलेजचे दिवस.

   "डर्टी" पोलिस+अपमान+कॉलेजचे दिवस.

 इंजीनिअरिंगचे दिवस आठवले कि अजूनही मन प्रसन्न होउन जात. रात्ररात्रभर केलेला टाईमपास असो,किंवा उगाच  लेक्चरला दांडी मारून मित्रांच्या खोलीवर झाडलेल्या गप्पा असोत.अतिशय अविस्मरणीय आणि आयुष्यभराची शिदोरी देऊन गेलेला हा जिवंतपणीचा ४ वर्षांचा सुकाळ....!!
असाच काल विचार करत बसलो आणि एक किस्सा आठवून स्वतःच हसत बसलो.....

विद्या बालनचा बहुचर्चित "डर्टी पिक्चर" रिलीज झाला होता.संगमनेर शहरात त्या काळी (फार नाही २ वर्षापूर्वीच) २ सिनेमागृहे होती.एक राजस्थान थिएटर जे गावच्या भरवस्तीत लोकांना मनोरंजनासाठी उपलब्ध होत,तर दुसर यशोदीप  थिएटर जे गावकुसाच्या बाहेर ६-७ किलोमीटरवर. सिनेमाच नावच इतक "डर्टी" असल्याकारणान हा सिनेमा आम्ही मित्रमंडळी न पाहिल्यावाचून राहणार तर नव्हतोच.रात्री ९ ते १२ चा शो पाहायचं ठरलं.जेवण करून आम्ही ,म्हणजे मी एकटा गावातला आणि बाकी सगळे ४-५ जण होस्टेलचे मित्रमंडळी सिनेमा पाहायला निघालो.यशोदीपला पोहोचलो तर शो हाउसफुल होता.काही झाल तरी आज सिनेमा पाहायचाच असा चंग बांधलेल्या आम्ही लोकांनी राजस्थानला जायचं ठरवलं.लिफ्ट मागत,ट्रक,रिक्षा भेटेल ते साधन घेऊन आम्ही गावात पोहोचलो.कसेबसे इथे तिकीट उपलब्ध होते ते घेतले.पान,गुठखा,तंबाखू यांनी रंगवलेल्या खुर्च्यांवर आम्ही रंगीले आसनस्थ झालो.तिथे पडद्यावर विद्या बालन हुलाला हुलाला करत असताना आम्ही मात्र ढेकणे चावत असल्यामुळे चलबिचल करत होतो.सिनेमा संपला.गर्दी ओसरल्यावर आम्ही निवांतपणे थिएटरच्या बाहेर पडलो.रात्रीच्या १२ वाजता डर्टी सिनेमा पाहून निघालेलो आम्ही सगळे बऱ्यापैकी मूडमध्ये होतो आणि टिंगलटवाळी करत निर्जन रस्त्यावरून बसस्थानकाच्या दिशेने चालत जात होतो.रस्त्यात  एक दुग्धालय लागल.घट्ट आणि "गरमागरम मलई मार के" वाल दुध पिण्यासाठी मी कायम तेथे जायचो.सगळ्या कॉलेजवयीन मुलाचं हे आवडीच ठिकाण.तेथून जवळच काही अंतरावर माझी लायब्ररि होती. रात्री लायब्ररि मधून घरी जाताना मी कायम इथे दुध पिउन जायचो.म्हटलं ,इतका छान सिनेमा पाहून आलोय म्हटल्यावर होस्टेलच्या मित्रांना हे दुध पाजुयात...त्या वेळी संगमनेर शहराचं वतावरण काहीस गढूळ होत.जातीय तणावाचे प्रकार वरचेवर घडत होते.स्थानिक कॉलेजमध्ये झालेल्या आंतरजातीय प्रेमप्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रकार काही धर्मवेड्यांनी चालविला होता.अशा पार्श्वभूमीवर पोलिसांची गस्त चालू होती.नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरच हे दुग्धालय आम्हा मित्रांच्या गडबड गोंधळामुळे गजबजलेल वाटत होत.नेमकी अशाच वेळी पोलिसांची पेट्रोलिंग करणारी गाडी दुग्धलयासमोर  येउन उभी राहिली.गाडीत बसलेल्या पोलिसकाकांनी आम्हाला हटकल आणि कुठे हिंडताय वैगेरे प्रश्न केले.आम्हा सगळ्यांच्या वतीने मी पुढारपण घेत सौम्य भाषेत उत्तरे दिली.आता पोलिसांनी मोर्चा दुग्धलायाच्या मालकाकडे वळविला.त्या दुकानमालकाच्या आई-बहिणीच्या उद्धाराने संभाषणाला सुरुवात केली.मला ते खटकल आणि मित्राच्या कानात कुजबुजलो कि काय वाय-झेड असतात हि पोलिसवाले...झालं! नेमकं कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकंच वेळ झाली. आणि गाडीत बसलेल्या हवालदाराने माझ वाक्य ऐकलं! त्याला माझ वाक्य पूर्णपणे ऐकू गेल नसणार पण माझ्या बोलण्याचा आशय मात्र त्याला नक्की समजला होता.स्वतःच्या गल्लीत कुत्रा पण वाघ असतो अस म्हणतात न,तेव्हा तो हवालदारसुद्धा आता माझा उद्धार करायला लागला.रात्रीचे फिरून दरोडे टाकायचा आणि दंगल घडवायचा विचार आहे कि काय ..अस काहीबाही पोलिसी खाक्यात  बरळायला लागला. आता मात्र मनातून मला राहवत नव्हत,पण म्हटलं आता जर तोंड उघडल आणि काहीबाही बोललो तर मात्र माझी काही धडगत नाही.सगळे पोलिस मिळून माझा "मन्या सुर्वे''  करतील हे पक्क होत.लागलीच सगळे आम्ही तेथून सटकलो.आता माझ्या मित्रांना मात्र माझी टिंगल करायला कारण आणि निमित्त मिळालं होत.पुढारगप्पा मारणारा तू पोलिसी खाक्या भेटताच शेपूट घालून पळून आला असं ऐकवत गमतीचा केंद्रबिंदू आता माझ्याकडे सरकला होता.सरळसरळ माझ्या व्यक्तिमत्वावर पडलेली हि गदाच होती.माझा अहंकार नाही म्हटलं तरी दुखावला गेला होता. मित्रांना एकदाच वाटी लावलं.ते होस्टेलला आणि मी घरी निघून आलो.
      झाल्या प्रकारामुळे रात्री उशिराने झोप लागली.काही तरी करून झाल्या अपमानाचा जाब विचारायचा असं वाटायला लागल.काल सिनेमा बघायला सोबत असलेल्या मित्रांना जेवायचं निमंत्रण देऊन घरी बोलावलं आणि त्यांना जेऊ न घालताच पोलिस स्टेशनला नेल.कधीकाळी काही निमित्ताने शहर  पोलिस निरीक्षकांची ओळख झाली होती आणि ते माझ्या बऱ्यापैकी संपर्कातही होते.ओळखीचा फायदा करून घ्यायचं ठरवलं.पोलिस स्टेशन मध्ये शिरताच सरळ पोलिसनिरीक्षकांच्या दालनात शिरलो.काल रात्री झाला प्रकार कथन केला..दुग्धलायातून बाहेर पडताना पोलिसांच्या गाडीचा नंबर मी पहिला होता आणि मनातल्या मनात घोळवलाही होता.त्या गाडीत रात्री गस्तीवर असलेल्या पोलिसांवर मला "धमकावयाच्या" गुन्ह्याखाली तक्रार दाखल करायची आहे अस सांगितलं.माझ्या भावना ओळखून हा मुलगा वेगळंच भलत प्रकरण आपल्या अंगावर शेकवेल अशी भीती वाटल्याने त्यांनी "त्या" गाडीत गस्तीवर असलेल्या पोलिसांना पुढच्याच मिनिटाला पाचारण केलं.काल माझ्यावर डाफरणारे आज त्यांच्या बॉससमोर अदबीने वागत होते.निरीक्षकांनी शहानिशा केली.आणि "त्या" पोलिसांना माझ्या आणि माझ्या मित्रांसमोरच समज दिली.आता कुठे माझ्या मनाला शांतता मिळाली होती.मित्रमंडळींना घेऊन पोलिसस्टेशन बाहेर पडलो.काल माझ्यावर हसणारे मित्र आता माझी टिंगल करणार नव्हते या जाणीवेने मला भरून पावल्यासारख वाटत होत.घरी गेल्यावर मित्रांना जेऊ घातलं आणि परत पाठवलं.......डर्टी सिनेमा इतरांसाठी काल रात्रीच संपला होता,पण माझ्यासाठी तो दुसऱ्या दिवशी दुपारी संपला.........

# आणि परत कधीच रात्री सिनेमा पाहायचा प्लान केला नाही.

आज स्वातंत्र्यदिन आहे.......

आज स्वातंत्र्यदिन आहे.......

लगबगीने आज मुद्दामहून लवकर उठलोय...
१० वाजता विद्यापीठात ध्वजारोहण आहे. १० वाजता?? हो !
लहान असताना ध्वजारोहण म्हणजे, सकाळी बरोबर ७ वाजता होणार अस समीकरण असायचं.त्यासाठी पहाटे ५ वाजताच सगळ घर जाग व्हायचं...खादीचा नेहरू शर्ट आणि गांधी टोपी कडक इस्तरी करून,नटून-खटून  जायचो....असा सगळा इतिहास(??) मनात तरळून जातोय......
असो,लगबगीन आता तयार झालोय आणि विद्यापीठाकडे निघालोय....घरापासून बस पकडण्यासाठी १-१.५ किलोमीटर बुद्ध कॉलनीपर्यंत चालत जाव लागतंय ..त्या दिशेने रस्ता तुडवीत,कालच्या पावसाने तुंबलेले खड्डे चुकवत चुकवत चाललोय...
आज स्वातंत्र्यदिन आहे......

जाणारा रस्ता हा कैकाडी वस्तीतून जातोय....लहान मुल हातात तिरंगा झेंडा घेऊन बागडताना दिसतायेत,जीर्ण झालेला एक म्हतारा नळाला पाणी आलंय म्हणून रस्त्यात अंघोळीला बसलाय...पाणी माझ्या शुभ्र कपड्यावर उडू नये म्हणून मी खिलाडू वृत्तीने स्वतःला वाचावतोय...आज स्वातंत्रदिन आहे........

मी हळूहळू कैकाडी वस्तीतून वाट काढतोय...डाव्या हाताला मरीआईच छोटस मंदिर लागलंय...मंदिराच्या ओट्यावर छोटासा टेप रेकोर्डर ठेवलाय त्यावर गाण चालूये...सारे जहां से अच्छा,हिंदूस्ता हमारा....पुढेच एक झेंडा एका पाणी साठलेल्या  खड्ड्यात पडलेला आहे,तो उचललाय आणि काय करायचं याचं??  या यक्षप्रश्नाच्या नादी न लागता तसाच तो फाटलेला झेंडा खिशात ठेवलाय.....आज स्वातंत्रदिन आहे...........

मी आता वस्तीतून बाहेर हाय-वे ला आलोय,वस्तीच्या बाहेर १०-१२ वर्षाची लहान मुले हातात शर्टला लावण्यासाठीचा झेंडा घेऊन उभी आहेत,काका हा झेंडा घ्या न म्हणत,काही कळायच्या आत त्यांनी माझ्या शर्टाला झेंडा टाचणीने टोचायला सुरुवात केलीये,मी त्यांना म्हणतोय अरे बाळ सुट्टे पैसे नाहीत माझ्याकडे....ते म्हणतायेत काका २ रुपये दिले तरी चालतील...मी म्हणतोय अरे सुटते नाहीच आहेत ,१०० ची नोट आहे...
मुलगा बारीक तोंड करतोय आणि आता पर्यंत अर्धी टोचलेली टाचणी खपकन ओढून घेतोय..आणि काय काका तुम्ही पण....असं म्हणत मागून येणाऱ्या माणसाकडे वळतोय....मी मात्र माझ्या ब्रांडेड शर्टाला भोक तर पडलं नाही ना म्हणून तपासून बघतोय....आज स्वातंत्र्यदिन आहे......

मी आता बसस्टोप वर पोहोचलोय....एव्हाना धो धो गर्दी करत वाहणारी बस आज निवांत आलीये...रिकाम्या बस मध्ये मी चौथा माणूस चढलोय....रोज ३०-३५ मिनिटाचा प्रवास आज १० मिनिटात संपलाय कारण आज ट्राफिक नाहीये....
आज स्वातंत्रदिन आहे......

विद्यापीठात पोहोचतोय....कुलगुरू साहेब अजून आलेले नाहीत.लोक कोवळ्या उन्हात ताटकळत उभे आहेत.थोड्या कालावधीने कुलगुरू आलेत.झेंड्याला मानवंदना दिली गेलीये....तालासुरात राष्ट्रगीत म्हटलं जातंय......झेंडा आसमंतात फडफडतोय .आज तिरंगा भलताच देखणा दिसतोय......कुलगुरू आता भाषण करतायेत.सभागृहात बसायला जागा नाहीये,म्हणून आम्हाला शेजारच्या वर्गात बसवलंय आणि तिथेच पडद्यावर सभागृहात काय चालू आहे हे थेट प्रक्षेपानाद्वारे दाखवलं जातंय...आज स्वातंत्रदिन आहे....

कुलगुरू आज दिलखुलास आहेत,त्यांच्या कारकिर्दीतल हे शेवटच भाषण आहे,पुढच्या स्वातंत्रदिनी ते निवृत्त झालेले असणार आहेत....रटाळगप्पा ऐकून आता मी बोअर झालोय...वसतिगृहाच्या वाचन कक्षात पेपर वाचायला बसलोय...हातात महाराष्ट्र टाईम्स आलाय...रिलायंस ट्रेंड ची जाहिरात दिसलीये..१९४७ रुपयांच्या कपडे खरेदीवर १९४७ ची खरेदी मोफत......
मी जाम खुश आहे...भावाला फोन करून सांगितलंय,तो म्हणतोय लवकर घरी ये जाऊयात आपण...मी पेपर ठेवून दिलाय आणि घाईघाईत आता रिक्षा पकडून  खरेदीला निघालोय.....
आज स्वातंत्रदिन आहे.....

मोदी सरकारकडून तरुणांच्या अपेक्षा...

       

         सोळाव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सोंगाढोंगात पार पडल्या.राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीच्या तोडीस तोड अशी ही निवडणूक झाली.सुमारे ६४% युवकांनी मतदानाचा हक्क बजावला आणि सर्वात तरुण आणि प्रगल्भ अशा लोकशाहीचे चित्रण जगासमोर मांडले.बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात एकपक्षीय सरकार स्थापन झाले आहे.अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात तिरंगे झेंडे घेऊन अंगावर लाठ्या खाणारे  युवक अगोदरच इथल्या व्यवस्थेला किंबहुना इथल्या गलिच्छ राजकारणाला वैतागलेला होता.केजारीवालांचा "आम आदमी" सुरुवातीला त्याला आपलासा वाटला खरा,परंतु नव्याचे नऊ दिवस लागलीच उतरले आणि "आम" पर्याय सुद्धा काही खास करिष्मा दाखवू  शकले नाहीत.नेमकी हीच परिस्थिती,युवकांची अस्वस्थता,मतदारांची  परंपरागत राजकारणाविषयी असेलेली उदासीनता,नव्या नेतृत्वाच्या,नव्या पर्यायाच्या शोधात असलेली सामाजिक मानसिकता ओळखण्यात भाजप यशस्वी ठरला.नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट मार्केटिंग,हायटेक प्रचारसभा,दिलखेचक जाहिराती वापरून मतदारांना भुलविण्याचा यशस्वी प्रयोग सिध्द करण्यात आला. आता केंद्रात मोदी सरकार आलंय.ज्या गुजरात मॉडेलला प्रोजेक्ट करण्यात आल त्या मॉडेलला देशभर राबवण्याची कसरत नव्या सरकारला करावी लागणार आहे.सामान्य भारतीय तरुण आज सुशिक्षित बेरोजगार बनत चाललाय.शिक्षण असूनही कुठल्याही रोजगाराच्या संधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही,हे विदारक वास्तव आहे,तरुणांच्या हाताला काम आणि कष्टाला काम देण्याची तरतूद करणे हा मोठा प्रश्न सरकार समोर असणार आहे. एका रात्रीतून रोजगार निर्मिती होणार नाही हे देखील मान्य परंतु "अच्छे दिन" च्या भरवशावर तरुणांना असलेली ही आशा पूर्ण करावीच लागणार आहे,याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.मुळात भाजपकडे स्वतःची यंत्रणा आहे,ज्यापासून एखाद्या गोष्टीच निराकरण कस करायचं याच विश्लेषण आणि कृतिकार्यक्रम मुळापासून आणि सविस्तर मिळतो.त्यामुळे असे प्रश्न कसे मार्गी लावले जावेत आणि याची कशी अंमलबजावणी व्हावी हे येत्या पाच वर्षात तरी अशक्य  नाही.
            अमेरिकेने ओसामा बिन लादेनचा खातमा केल्यानंतर भारतानेही पाकिस्तानात लपून बसलेल्या दाउद इब्राहिमच्या चारी मुंड्या चित कराव्यात आशा मागणीने जोर पकडला होता.आंतरराष्ट्रीय राजकारणात कायम ढिलेपणा दाखविणाऱ्या कॉंग्रेस सरकारला ते करता आले नाही.आतंकवादाचा खातमा मुळापासून जर करता आला तर ती बाब स्वागतार्ह्य अशीच असणार आहे.नवीन मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी सार्क परिषदेतील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करून मोदींनी मुत्सद्देगिरी दाखवली .पाक पंतप्रधान नवाज शरीफ यांना आमंत्रित करून नव्या मैत्रीपूर्ण संबंधाची सुरुवात करण्यात आली.तेव्हा मैत्रीच्या नावाखातर दहशतवादाविरोधात सरकारने नमती भूमिका घेणे कुणालाही रुचणार नाही,आणि भाजप सरकारकडून तशी अपेक्षा तरी नाही. . राष्ट्रीय राजकारण आणि अंतरराष्ट्रीय राजकारण संपूर्णतः वेगळे असते.गृहमंत्रालय,परराष्ट्र व्यवहार मंत्रालय,भारतीय लष्कर,गुप्तहेर संघटना,पोलिस यंत्रणा  यांची भूमिका काय असावी हे सरकार ठरवत असते.त्यामुळे याविषयीचे सरकारचे धोरण खमके असावे अशी भारतीयांची आणि महत्वेकरुन भारतीय तरुणांची अपेक्षा आहे .परराष्ट्र क्षेत्रातील आव्हाने कोणती,त्याचा सामना करण्यासाठी आवश्यक दीर्घकालीन योजना,आवश्यक साधनसामुग्री यासंदर्भात सुस्पष्ट ,व्यापक राष्ट्रीय धोरण आखले जाणे अनिवार्य आहे.आशा योजनांच्या अभावामुळे आजवर एकीकडे अंतर्गत समस्या हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे,तर दुसरीकडे परराष्ट्र धोरणात कमालीचा विरोधाभास व दुटप्पीपणा दिसून आला आहे.आशा धोरणांमुळे भारताचे महासत्ता बनण्याचे स्वप्न स्वप्नच राहिले आहे.परराष्ट्र खात्याचा कारभार नव्याने हाती घेतलेल्या सुषमा स्वराज यांची यात कसोटी लागणार आहे.
          भारतीय अर्थव्यवस्थेला आता व्यापक नजरेतून पाहावे लागणार आहे.जागतिक मंदीची लाट सर्व जगात असताना आणि त्यापासून अमेरीकासारखा बलाढ्य देशसुद्धा प्रभावित होत असताना भारताला  यात फारशी झळ पोहोचली नाही,याला कारण होते ते मनमोहन सिंग यांनी राबविलेले आर्थिक धोरण आणि खाउजा चा(खाजगीकरण,उदारीकरण,जागतिकीकरण) नेटाने केलेला पुरस्कार! खाउजा धोरणाचे फायदे काय आणि तोटे काय हा वेगळा मुद्दा होऊ शकतो परंतु ही  वस्तुस्थिती नाकारून जमणार नाही.आता येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नवे पाऊले उचलावी लागणार आहेत.विदेशात असलेले काळे धन भारतात आणण्यासाठी शासनाने चालविलेली मोहीम त्यामुळे नक्कीच कौतुकास्पद आहे.तरुणांना स्वयंरोजगार उपलब्ध करून द्यावा लागणार आहे.आर्थिक सुबत्तता नसल्यास राहणीमान सुधारले जाऊ  शकत नाही,आणि राहणीमान जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत समाजाचा सर्वांगीण विकास होत नाही हे सर्वमान्य असे तत्व आहे.त्यामुळे जनसामान्यांच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत.भारतीय अर्थव्यवस्था ही शेतीवर देखील अवलंबून  असते हे आपण हळूहळू विसरत चाललो आहोत कि काय याची राहून राहून शंका येते.निर्यातीला चालना देऊन परकीय गंगाजळी भारतीय अर्थव्यवस्थेत आणली जावी हा खरा उदारीकरणामागचा हेतू होता.मात्र वस्तू निर्माण उद्योग,व्यापार,वित्तीय सेवा,बँकिंग,भांडवल बाजार आशा सारख्या आणि मुख्यतः बिगरशेती व्यवसाय क्षेत्रात आर्थिक सुधारणा घडत गेल्या.प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे गेल्या २-३ दशकांत शेती क्षेत्राची अक्षम्य हेळसांड झाली.शेतीमधील सरकारी गुंतवणूक कमी झाली,सरकारी गुंतवणूक रोडावली,खाजगी गुंतवणूकदारसुद्धा शेतीव्यवसायाकडे दुय्यम पर्याय म्हणून पाहू लागले,शेतीसंशोधानात अनास्था,मनुष्यबळाचा कानाडोळा,बिनभरवशाचा वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा,शेतमाल विक्रीतील दलाली ह्या सगळ्यांची परिणीती म्हणजे शेतीअर्थव्यवस्थेचा झालेला ऱ्हास आणि शेती उत्पादनाची झालेली हानी होय.शेतीची अशी घनघोर उपेक्षा येणाऱ्या काळात पुन्हा घडणे आपल्याला परवडण्यासारखे नाही.या क्षेत्राचा अनुभव नसलेले नवीन कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना हे शिवधनुष्य पेलावं लागणार आहे.इथल्या बळीराजाला आर्थिक सुधारणांची शाश्वती देऊन त्यांच्या आत्महत्या रोखाव्या लागणार आहेत.पंचायत राजला बळकटी देऊन ग्रामीण भारताला मुख्य प्रवाहात आणावे लागेल.ग्रामीण भारताशी नाळ असलेले ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे आज आपल्यात नाही ,त्यांच्या आखत्यारीत असलेल्या ह्या खात्याने  नक्कीच चांगली कामगिरी केली असती ह्यात तिळमात्र शंका नाही.

          भारताच्या अंतर्गत सुरक्षेपुढे नक्षलवाद हे देखील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.नक्षलवादाचा सामना कसा करायचा,त्यामध्ये राज्य सरकारची,केंद्र सरकारची,लष्कर,पोलिस यांची काय भूमिका असावी याबाबत या सर्व विभागांमध्ये  कमालीचे  मतभेद आहेत नक्षलवाद हा राज्यांतर्गत प्रश्न समजला तर ही सर्वस्वी जबाबदारी पोलिस यंत्रणेवर येउन पडते आणि इथे लष्कराला काही मर्यादा पडतात.परंतु दिवसेंदिवस गजकर्णासारखा पसरत जाणारा हा नक्षलवाद राष्ट्रीय आपत्ती बनू पाहत आहे
.व्यापक राष्ट्रहित लक्षात घेत नक्षलवादाचा समूळ नायनाट होणे गरजेचे आहे.श्रीलंका सरकारने तामिळी वाघांचा केलेला बंदोबस्त हे उदाहरण भारतासमोर आहेच.लोकशाही मान्य नसलेले सुशिक्षित तरुण नक्षलवादाच्या भयंकर मार्गाकडे जात आहेत.प्रचंड स्थितीज उर्जा असलेला आजचा तरुण इथल्या सामाजिक विषमतेला कंटाळून रक्तरंजित क्रांतीच स्वप्न पाहतो आहे.अशा वाट चुकलेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात आणावे लागणार आहे.त्यांच्यात असलेली उर्जा राष्ट्रनिर्मितीसाठी कशी उपयोगी ठरेल यासाठी कृतिकार्यक्रम द्यावे लागतील.२०१३ मध्ये छत्तीसगढ येथे कॉंग्रेसच्या परिवर्तन रयाली वर नक्षल्यांनी केलेला हल्ला फार काही जुना नाही,याचे गांभीर्य नवीन सरकारने ओळखायला हवे.जर आपले नवनिर्वाचित सरकार आतंकवादी समस्यांबाबाद पाकिस्तानच्या पंतप्रधानांसोबत बोलणी करू शकतात मग नक्षलवाद्यांशी का नाही?नक्षलवादी काही भारताबाहेरून आलेले नाहीत. आपल्याच देशातील वाट चुकलेले हे आपले बांधव आहे.त्यांना आपलेपणाची  जाणीव करून देण आणि हा देश जसा आमचा आहे तसा तुमचाही आहे ह्याची शाश्वती द्यावी लागणार आहे. आशा अनेकविध समस्या आहेत ज्या इथल्या तरुणांच्या मनात धगधगणाऱ्या आहेत.त्या समस्यांचे मार्गी लावून "अच्छे दिन" येणारे सरकार घेऊन येईल अशी अपेक्षा आहे.या अपेक्षा पूर्ण होतात कि नाही हे येणारे काळच सांगेल.

बाबूजी धीरे चलना नही....

 बाबूजी धीरे चलना नही....

          प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असतं असं आपण कायम ऐकत आलोय.त्यामुळे काल परवा  शिवसेनेचे शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे जर निवडणुकीपूर्वी स्वगृही कॉंग्रेस मध्ये आले तर अचंबा वाटावं अस काहीच नाही.गेल्या लोकसभा निवडणुकीत शिर्डीची लढत रंगतदार आणि "राखीव" अशीच झाली होती.राष्ट्रीयपनात गुरफटलेल्या रामदास आठवलेंचा दोन्ही कॉंग्रेस वाल्यांनी मिळून "गेम" केला.त्यांनी केलेला गेम शेवटपर्यंत सध्या दासाचा "राम" झालेल्या  आठवलेंना कळला नाही.

   


ज्यांनी जय भीम पेक्षा राम राम बरा असा जातीयवादी प्रचार केला,त्यांच्या सोबत आपलं जातीचं कार्ड वापरून वाकचौरे निवडून आले.साधी ग्रामपंचायतीची सुद्धा निवडणूक न लढलेला माणूस सरळ लोकसभेत जाऊन बसलेला सर्व नागरिकांनी पहिला.हा पराभव रामदास आठवलेंच्या जिव्हारी लागण स्वाभाविक होत.पण या सगळ्या घोडेबाजारात आणखी एक नाव होत ते म्हणजे प्रेमानंद रुपवते याचं!!
             २००९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रुपवते या शिर्डी मतदार संघात सक्रिय तर होतेच,परंतु कॉंग्रेस चे निष्ठावान नेते म्हणून त्यांची ख्याती सुद्धा आहे.त्यांचे वडील आद.दादासाहेब रुपवतेंच्या मुशीत वाढलेल्या यांची जडणघडण संपूर्ण काँग्रेसी वातावरणातच झाली.रिपब्लिकन चळवळ फुटण्यासाठी दादासाहेब रुपवतेंना टार्गेट केलं जात.या गोष्टीमध्ये तथ्य जरी असलं तरी, कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर त्याचं सगळ राजकारण हे आंबेडकरी चळवळीला पुनरुज्जीवन करणारंच होत.दलित-आदिवासी-कष्टकऱ्यांच दुखण समजून घेणारा नेता नगर जिल्ह्यात अजून तरी जन्माला आला नाही अस म्हणायला हरकत नसावी.मंत्रिमंडळात  असताना दादासाहेबांनी केलेलं काम कुणी विसरू शकणार नाही.आणि जे विसरू पाहतील त्यांना कृतघ्न म्हणावं लागेल.त्यांचे विचार घेऊन प्रेमानंद रुपवते महाराष्ट्राच्या राजकारणात सामील झाले.फुले-आंबेडकरी विचारधारेचा तत्वचिंतक नेता म्हणून "बाबूजी" खेडोपाडी परिचित आहेत.त्यांच्या विचारांचा,ओघवत्या शैलीचा,लेखनाचा आणि विनोद बुद्धीचा चाहता वर्ग भरपूर आहे.अशा अष्टपैलू व्यक्तीकडे पाहिलं कि भारतीय राजकारण किती शालीन,कूलीन आणि सुसंस्कृत असू शकत याची प्रचीती येते.
       
            २००९ निवडणुकीत शिर्डीची जागा आघाडी च्या कोट्यातून रामदास आठवलेंना सोडली गेली.हक्काची जागा गेल्यामुळे प्रेमानंद रुपवतेंनी (शमणारी अशी) बंडखोरी केली.त्यांच्या पदरी पडलेली सुमारे २३००० मते काही किमया दाखऊ शकले नाहीत.बंडखोरी केल्यानंतर विचारवंत,अभ्यासू नेता आपल्या हातून निसटू नये म्हणून त्यांना सन्मानाने पक्षात घेतलं गेल.बसप,शिवसेना यांची ऑफर असतानासुद्धा विचारांशी प्रतारणा  करणे त्यांनी अमान्य केल.शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेना बाबूजींना आपल्या गोटात सामील करण्यासाठी उत्सुक होती.परंतु तात्त्विक तडजोडीला भिक घालतील ते बाबूजी कुठले? परंतु दरम्यानच्या काळात पुलाखालून भरपूर पाणी वाहून गेल.हरलेले रामदास आठवले शिवसेनेसोबत युती करून खासदार झाले,भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना सोडून निवडणुकीच्या तोंडावर स्वगृही कॉंग्रेस मध्ये परतले.अशाही परिस्थिती बाबूजी मात्र कॉंग्रेस बरोबर एकनिष्ठ राहिले.त्यांची कन्या उत्कर्षा युवक कॉंग्रेस मध्ये महत्वाची भूमिका बजावते आहे,युवक कॉंग्रेसच्या राष्ट्रीय  सचिवपदी काम करण्याची तिला संधी मिळाली.हि गोष्ट बाजूला ठेवली तर बाबूजींच्या हाती नेमकं लागलं काय? हा प्रश्न तसाच कायम आहे.महाराष्ट्रातील राजकारणात कॉंग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ असलेल्या एकनाथ गायकवाड ,सुशीलकुमार शिंदे(आपल्या पुत्रींसह) यांना पक्षाने सन्मानाने वागणूक दिलेली आहे.मग फक्त प्रेमानंद रुपवातेंना का दुय्यम स्थान दिल जात हे कळत नाही.
             मनात आणलं असत तर रिपब्लिकन रुपवते गट याअगोदरच स्थापन झाला असता.पण  सामान्य नागरिकांची अशी अपेक्षा आहे कि बाबुजींनी , "राजकारण" करून आपली स्वतःची ताकद आजमावली तर हरकत नाही.भाऊसाहेब वाकचौरे शिवसेनेत जाऊन खासदार होऊ शकतात मग रुपवते का नाही?  "विनाशकाले विपरीत बुद्धी" झालेल्या कॉंग्रेस ने भाऊसाहेब वकचौरेंना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.या निवडणुकीत सुद्धा बाबूजींना डावलली जाण्याची दाट शक्यता आहे.जस अगोदर म्हटलं आहे कि प्रेमात आणि राजकारणात सगळ काही क्षम्य असत त्याप्रमाणे वेगळा विचार करायला काहीही हरकत नाही.नवा प्रयोग जरूर करावा.केजरीवाल,मोदींच्या घोडेबाजारात मतदार सुद्धा सर्वसमावेशक अशा वेगळ्या पर्यायाच्या शोधात आहेत.बाबूजी धीरे चलना....या गाण्यात गायिका  बाबूजींना(रुपवते नव्हे) हळूहळू चालायला सांगते आहे,परंतु सर्वसामान्य नागरिक मात्र बाबूजींना हळूहळू चलताना सिंहावलोकन करा असा सल्ला देत आहे.आता मात्र हि शेवटची संधी आहे बाबूजी धीरे चलना नही .....अभी नही तो कभी नही...!!

अरे "महानायक" संपादका तुमची यत्ता वाढणार कि नाही????

                रिपब्लिकन चळवळ आणि आंबेडकरी जनता यांचा संबंध हा काय फार नवा नाही. प्रत्येक आंबेडकरी नागरिकाला रिपब्लिकन चळवळीशी असलेली आस्था हि केवळ बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही प्रगल्भ व्हावी ह्या हेतूने आहे.रिपब्लिकन गटातटांची फाटाफूट प्रत्येकजण जाणतो.कधी स्वतःच्या  फायद्यासाठी तर कधी सत्तेच्या हव्यासापोटी स्वतःला "राष्ट्रीय" म्हणविणारे रिपब्लिकन नेते विकले गेलेले आपण पहिले आहेत.आपला "स्वाभिमान" गहाण  ठेवायला सुद्धा यांनी मागेपुढे पहिले नाही.. आजचा तरुण हा आपल नेतृत्व मनसे,शिवसेना आणि कॉंग्रेस इतर पक्षांमध्ये शोधतो आहे.स्वतःची १३-१४% हक्काची मते असतानाही केवळ इतर पक्षांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण त्यांच्या दावणीला बांधलो गेलो आहोत,याची जाणीव आजचा सुशिक्षित आंबेडकरी तरुण मनात बाळगतो आहे.


दलित पँथरच्या उदयासाठी १९७०च्या वेळी जी परिस्थिती होती, नेमकी तशीच परिस्थिती आज आहे. आजचा हा दलित सुशिक्षित तरुण आतल्या आत घुसमटतो आहे.आजवरच्या सर्व रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांनी नवं नेतृत्व जन्माला येऊ नये,म्हणून पद्धतशीरपणे काळजी घेतल्याचे  पदोपदी जाणवते आहे.संस्थापक सदस्य असलेले पँथर आता वेगवेगळ्या तंबूमध्ये विसावलेले आहेत.नामदेव ढसाळ यांच्या रूपाने गरजणारा पँथर आता पडद्याआड गेला ,आणि उरलेसुरलेले सगळे वैयक्तिक स्वार्थासाठी "जोहार" मागत आहेत.असं लाचारीच्या  राजकारणाचा या दलित तरुणांना उबग आलाय.कितीवेळ हि लाचारी सोसायची,असा प्रश्न प्रचंड स्थितीज उर्जा असलेले हे  तरुण मुले इथल्या व्यवस्थेला विचारत आहेत.आणि हि घुसमट व्यक्त  होताना आता कुठे दिसते आहे.या प्रश्नाची उकल करण्यासाठी ह्या मुलांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आणि एक सर्वव्यापी उपाय सुचविला आहे,त्याच निमित्ताने ह्या पत्रकार परीषदेच आयोजन देखील करण्यात आले होते.
    येत्या लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्व दलित नेत्यांनी आपला मुजोर अहंगंड बाजूला  ठेऊन किमान निवडणूकपूर्व आपापसात युती करावी असा प्रस्ताव या युवकांनी मांडला आहे. रिपब्लिकन पक्षांचे सध्या ५२ गट आहेत.रिपब्लिकन पक्ष आणि फाटाफूट हे समीकरण लोकांच्या सवयीचं झालं.प्रत्येक दिवसाला रिपब्लिकन पक्षाचा एखादा गट निर्माण होत असतो,असे उपहासाने म्हटले सुद्धा जाते.
    आजवर अनेकवेळा रिपब्लिकन ऐक्य व्हावे म्हणू प्रयत्न केले गेले.परंतु एका म्यानात एवढ्या ५२ तलवारी मावणार तरी कशा,त्यामुळे या ऐक्याचं नेतृत्व कुणी करायचं,युती कुणाशी करायची या प्रश्नावरून हे ऐक्य अनेकदा फुटलं.या तथाकथित ५२ राष्ट्रीय नेत्यांना एकत्र आणण्यासाठी मग उपोषणही केले गेले,परंतु प्रतिक्रिया शून्य!
हक्काची १३-१४दलित मते असतानाही केवळ मतांचं ध्रुवीकरण होत असल्यामुळे कुणाच्याही पदरी यश आलेलं नाही.पश्चिम बंगाल मध्येसुद्धा कम्युनिस्ट पक्षांचे असेच कितीतरी गट आहेत.परंतु राजकीय फायद्यासाठी हि कम्युनिस्ट मंडळी निवडणुकीपूर्वी आपापसात युती करतात आणि निवडणुका लढवतात.यामुळे विनाकारण होणारे मतांचे ध्रुवीकरण थांबते आही हक्काची मते त्यांच्या पदरी पडतात.नेमके हे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन महाराष्ट्रातही रिपब्लिकन पक्षांनी निवडणूकपूर्व ऐक्य नाही तर किमान युती जरी केली,तरी सत्तेच्या जवळ  ते जाऊ शकतात एवढी ह्या दलित मतांची ताकद आहे.आणि हीच गोष्ट "फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट " हि संघटना वस्त्या-वस्त्यांवर जाऊन पथनाट्य करून लोकांना समजून सांगत आहेत,आणि सह्यांची मोहीम राबवत आहेत.लोकांचाही याला भरपूर प्रतिसाद मिळतो आहे.

    फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट ने हाती घेतलेले हे काम बघून राजकीय महत्वकांक्षा असलेले स्वयंघोषित "महानायक" पत्रकार ह्या नवतरुणांना त्यांची यत्ता विचारत आहेत,ह्या नवतरुणांना असा अभ्यासशून्य उपद्व्याप करायला कोणी सांगितला म्हणून आपल्या वर्तमानपत्रात लेखमाला लिहून ते या प्रयोगाला खुजे  ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत.मुळात हे महाशय आंबेडकरी चळवळीत सक्रिय कधी दिसले नाहीत. कोणत्या आंदोलनात नामांतराच्या चळवळीत रिडल्स च्या मोर्चात खैरलांजी हत्याकांड निषेधात! आपली गाडी-माडी आणि पैशाची नाडी  सांभाळणारा हा पत्रकार कधी समोर आलाच नव्हता.आपल बेरकी तत्वज्ञान झाडायला सध्या त्यांनी सुरुवात केली आहे.हे संपादक हि गोष्ट विसरत आहेत कि वृत्तपत्रे हे क्षणिक साहित्य असत आणि अनंत काळाची रद्दी असते.आपले रद्दड विचार कुणी का म्हणून स्वीकारेल? एसी मध्ये बसून चं छान छान लेख लिहायला जास्त कळ सोसावी लागत नाही.वडिलोपार्जित संपत्ती घेऊन अशा लोकांनी परिवर्तनवादी गप्पा कराव्यात हेच मुळात हास्यास्पद वाटतंय.आपली  ओजस्वी आणि तेजस्वी पत्रकारिता वापरून महारकी करणाऱ्या जनावरांसारख राहणाऱ्या समाजाला बाबासाहेबांनी कधी इयत्ता विचारली नव्हती.साधा गावकुसाबाहेर राहणारा प्रत्येक दलित तरुण मनापासून बाबासाहेबांवर आणि त्यांच्या विचारांवर प्रेम करतो.आपल्या  कुवतीनुसार तो समाजाला योगदान देत असतो.त्या प्रत्येकाला आपण त्याची  यत्ता विचारणार आहोत का? नामांतरात श्वास संपेपर्यंत "जय भीम" म्हणणाऱ्या पोचीराम कांबळे,गौतम वाघमारे यांना सुद्धा तुम्ही यत्ता विचारणार का?
अरे तुम्हाला कुठला नैतिक अधिकार आहे दुसऱ्यांची यत्ता विचारण्याचा??? असले तत्ववादी लेखमाला लिहून आपली स्वतःची यत्ता कधी वाढत नसते.पूर्वग्रह असलेले विचार तुमच्या यत्तेला अधिकच खुंटीत करतील. आजवरच्या सगळ्या परिवर्तनवादी चालवली इथल्या  सत्तेला बळ देऊन क्षीण झाल्या.बाबासाहेबांचा अस्थिकलश घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर "भावनिक" दौरा करून ज्यांनी युती अभियान चळवळ,त्यांनीच मग आपला सावता सुभा "स्वाभिमानीनावाने निर्माण केला.असा सगळा त्यांचे मागे इतिहास असताना दुसऱ्यांच्या प्रयत्नाला कितीवेळ पाण्यात पाहणार आहात आणि आंबेडकरी जनतेला मिंधे बनविणार आहात.

भटकते भटकते मंजिल तक पहुचेंगे सही,
गुमशुदा तो  वो ही जो घरसे निकले हि नही.....

 फेसबुक आंबेडकराईट मूव्हमेंट आपली विचारांची मशाल पेटवत परिवर्तनाची पहाट येईल  अशी अशा बाळगतो आहे,जे घरी बसून पोकळ गप्पा मारातायेत त्यांना येणारा काळच उत्तर देईल.

              

रंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना... पवळा हिवरगावकर !!

  तमाशा हा कलाप्रकार महाराष्ट्रात रुजला,वाढला आणि बहरला.महाराष्ट्रात  काही जातिवंत कलाकार ही कला जपावी म्हणून पिढ्यानपिढ्या काम करत होती.पेशवाईच्या काळात मात्र या कलेकडे आंबटशौकीन लोकांची आवड असलेली कला असा समज जनमानसात होऊलागला .तथाकथित कुलिन स्रिया तर या कलेकडे तुच्छ नजरेन पाहत.दौलत जादा करण्यासाठी तालेवार मंडळी हि कला पाहायला येत,परंतु आपल्या गिधाडी वृत्तीने नर्तिकेच शील भंग करण्यासाठीही मागेपुढे पाहत नसत.किशोर शांताबाई काळे यांच्या "कोल्हाट्याच पोर"  या पुस्तकात तर या बद्दल केलेलं वर्णन ऐकल कि जीवाच पाणीपाणी होत.


तमाशा हि महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यासाठी महार ,मांग,कोल्हाटी,ढोर या समाजातील कलाकारांनी महत्वाच योगदान दिलं आहे.पवळा पासून विठाबाई  नारायणगावकर  आणि कांताबाईसातारकरांपासून मंगला बनसोडे यांच्यापर्यंत सर्वच तमाशा कलावंतांनी आपलं आयुष्य भरीस घातलं.या सगळ्या प्रवासाची सुरुवात होते ती नागचंद पवळा या नर्तिकेपासून.तमाशा क्षेत्रात आजवर सर्वात रूपवान स्त्री म्हणून जिचा उल्लेख केला जातो त्या "नागचंद पवळा"संगमनेर तालुक्यातील हिवरगावच्या.नाशिकहून संगमनेरमार्गे पुण्याला जाताना जो चंदनापुरी घाट लागतो,त्या घाटाच्या पायथ्याशी असलेलं हिवरगाव पावसा हे गाव.अहमदनगरसारख्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात मोडत असलेला हा प्रदेश कायम दुष्काळीच राहिला.अशाहीदुष्काळी आणि पराकोटीच जातीय वास्तव असलेल्या काळात पवळाची जडणघडण होत होतीतबाजी भालेराव या महाराची ही  वी पोर१८८१ चा पवळाचा जन्मघरात अठराविश्वे दारिद्र्य.तारुण्याच्या उंबरठ्यावर येताच हीला मुरळी म्हणून देवाला(खंडोबालादान केलंमुरळीम्हणून पवळा नाचगाणे करू लागल्याहे करतानाच या काळातले जाणकार राणुजी रोहोम यांच्याकडे त्या नाचगाणी शिकल्यानामा धुलवाडकर यांच्या तमाशात पवळा पहिल्यांदा नाचल्यानाच्या पोरांच्या जमान्यात पवळायांच्यासारखी रूपवान स्त्री नाचताना पाहून प्रेक्षक फिदाव्हायचे.पवळा यांच्या नृत्याने तमाशात नवी क्रांती केलीपवळा यांच्या रूपाने तमाशात नाचनारीन म्हणून स्त्रीचा समावेश झालानाच्या पोरगा "मावशी"च्या रुपात वावरू लागलापुढे मुंबईमध्ये पिला हाउसला पठ्ठे बापुरावांनी पवळा यांची अदाकारी पहिली आणि हे शाहीर त्यांच्यारूपावर आणि कलेवर प्रभावित झालेनंतर पवळा या पठ्ठे बापुरावांसोबत  काम करू लागल्या.  पठ्ठे बापुराव हे  सिद्ध मराठी शाहीरत्याचं मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णीजन्म हरणाक्ष रेठरे (तालुका वाळवेजिल्हा सागंलीह्या गावीशिक्षण इंग्रजीतून चार-पाच इयत्तांपर्यंत.बापूराव ब्राह्मण होते.. बडवे घराण्यातील सरस्वती नावाच्या स्त्रीशी त्यांचा विवाह झालेला होतापरंतु तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिलास्वतःचा  फड उभारून त्यात स्वरचित लावण्या  कवने पठ्ठे बापूराव ह्या नावाने म्हणू लागले. . पठ्ठेबापूरावांनी गाणगौळणभेदिकझगड्याच्यारंगबाजीच्यावगाच्या विपुल लावण्या रचिल्याबहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतातत्यांना त्यांच्या प्रतिभेची शक्ती मिळून देण्यात पवळा याचं असलेलंयोगदान नाकारता येणार नाही.
पवळा  यांच्या बाबतीत मजेशीर कहाणी सांगितली जातेतमाशाप्रेमी बाबुराव घोलप यांनी आपल्या आत्मचरित्रात  याबद्दल रंजक माहिती लिहून ठेवली आहेपवळा आणि पठ्ठे बापूराव या जोडीने तमाशाला नवे वळण दिलेपवळाच्या पायात जणू जन्मजात नृत्य होतेतिचा गळामुळातच अतिशय गोड होतातिचे अप्रतिम सौंदर्यतिची नृत्यकला आणि तिचा गोड गळा यावरून लोक तिला नामचंद पवळा’ म्हणू लागलेनामा धुलवडकराचा तमाशा फुटल्यावर पवळापठ्ठे बापूराव यांच्या तमाशात आलीप्रतिभावान  तमाशा कलावंत रघुवीर खेडकर या बद्दलअतिशय रंजक अशी माहिती सांगतातपवळा आणि बापूराव यांचा संगम हा बापूरावांच्या प्रतिभेच्या परमोत्कर्षास कारणीभूत झालाआणि त्याचवेळी बापूराव बाटलेत्यांना हद्दपार का करू नये अशी लोकांत चर्चा सुरू झाली.प्रखर जातीय व्यवस्था आणि शिवाशिव पाळणाऱ्यासमाजात तर गहजब होणे साहजिकच होतसमाजात अशांतता पसरत होतीआणि शेवटी पठ्ठे बापूराव आणि पवळा यांना कोर्टाचे बोलावणे आलेन्यायाधीशाने बापूरावांना "तुम्ही बाटलांत का’ असे विचारलेत्याच्या उत्तरासाठी बापूरावांनी कोर्टातल्या न्यायाधीशांना आपल्यातमाशाचे आमंत्रण दिलेन्यायाधीश तमाशाला आले आणि बापूरावांनी कवन सुरू केले.:-

श्रेष्ठ वर्ण मी ब्राह्मण असुनीसोवळे ठेवले घालुन घडी
मशाल धरली हाती तमाशाचीलाज लाविली देशोधडी
कलियुगाचा ऐका दाखलापठ्ठे बापुराव भुलला पवळिला
महारिणीसाठी महार झाला
पुन्हा जात मिळेल का हो त्याला
ब्राह्मणाला हो जी जी 
जातीपातीच्या पलीकडे जाऊन पठ्ठे बापूराव आणि पवळा कला जगण्यासाठी आणि जागविण्यासाठी विचार करत होते,हे न्यायालयाच्या लक्षात आले आणि,कोर्टाने बापूराव आणि पवळाला निर्दोष सोडलेपुढे पुन्हा त्यांचा तमाशाचा फड सुरू झाला.

आपण आजपर्यंत माधुरी अथवा ऐश्वर्या या कलावंतिणींना  पाहायला तिकीट ठेवल्याची बातमी ऐकली नाही पण पवळा यांना पहायला तिकीट असायचंहे वाचलं की पवळायांच्या सौंदर्याची कल्पना येतेतिकीट घेऊन एखादा कलाकार बघायला जाणे आताच्या काळातही तर्कसंगत वाटत नाहीमुंबईत थिएटर  मालक अबुशेठ पवळा यांना भरजरी साडीत केस मोकळे करून खुर्चीवर बसवतसोबत पठ्ठे बापूराव असतया जोडीला पाहायला त्या वेळी  आणे तिकीट असायचंलोकांची प्रचंड गर्दी होई. 


पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांना ताला-सुरांचा साज चढून  त्याला तमाशात पेश करायचं काम पवळाने केल म्हणून २० व्या शतकात तमाशा क्षेत्रात अजरामर जोडी म्हणून पवळा आणि पठ्ठे बापूराव यांच्याकडे पाहिलं जात.


भारतीय जातीव्यवस्थेची बळी पवळा यासुद्धा ठरल्याआजही त्यांना कुठलीही प्रसिद्धी दिली जात नाही,त्यांच्या  राहत्या गावी त्यांचे स्मारक सुद्धा नाहीरंगभूमीवरील पहिली महिला नृत्यांगना... पवळा हिवरगावकर या अजूनही उपेक्षितच आहे.


रंगभूमीवरील पहिल्या महिला नृत्यांगना... पवळा हीवरगावकर यांना मानाचा मुजरा !!

----------------------------------------------------------------------
लेखसागर भालेराव.