मनाबी बंधोपाध्याय या भारतातल्या प्रथम तृतीयपंथी मुख्याध्यापक.दिड वर्षांपूर्वी त्यांनी पश्चिम बंगालमधल्या कृष्णानगर महिला कॉलेजच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला. मोठं कौतुक केलं आपण.यानिमित्ताने आपण भारतीय किती पुढारलेले आहोत हे घसा कोरडा होईपर्यंत आणि किबोर्डची बटणे तुटेपर्यंत सगळ्या जगाला आपण सांगत होतो. आज दिड वर्षानंतर काय स्थिती आहे? २३ डिसेंबरला मनाबी यांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा आपल्या कॉलेज प्रशासनाकडे सुपूर्त केलाय. कारण हे आहे कि, त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि विद्यार्थ्यांकडून त्यांना सहकार्य मिळत नाही.
मोठ्या शरमेची ही बाब आहे. एक तर तृतीयपंथी असणं,त्यांनी समाजात सन्मानानं वागणं हे भारतीय समाजात सहजसहजी पचनी पडत नाही. त्यांचा शारीरिक/लैगिक केमिकल लोचा आहे, या कारणावरून समाजातून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. तृतीयपंथी लोकांच्या विविध समस्या आपण कायम ऐकत असतो, त्यावर अनेकदा चर्चा होते. सेवाभावी वृत्तीने, कारुण्यतेने त्यावर विविध अंगाने चर्चा घडते. पण केवळ चर्चाच घडते.त्यातून निष्पन्न काहीच होत नाही.आपली पुरुषप्रधान व्यवस्था महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपाय रावबत असते , पण जो वर्ग महिलाही नाही आणि पुरुषही नाही त्यांचं काय? त्यांच्यासाठी डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया असे कोणतेच कार्यक्रम नसतात. स्मार्ट सिटीमध्ये त्यांच्यासाठी कुठलीही तरतूद नसते. त्यांच्या असण्याला, नसण्याला कुठलीही किंमत नसते. मनाबी यांच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. आपण आज पुन्हा एकदा हरलो आहोत. आपण हरण्यामागे महत्वाचं कारण आहे तें म्हणजे आपली पुरुषी व्यवस्था. या व्यवस्थेत केवळ पुरुषांना नावे ठेवून चालणार नाही. पुरुषी व्यवस्था राबविणाऱ्या महिलांनादेखील तितकेच दोषी ठरविले पाहिजे. बऱ्याचवेळा समाजातील महिलाच पुरुषसत्ताक व्यवस्थेची प्रतीके जपण्याचा प्रयत्न करत असतात. मनाबी बंधोपाध्याय यांच्या सोबत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जर त्यांना नैतिक पाठबळ दिल असत, तर त्या खचल्या नसत्या आणि त्यांनी माघार देखील घेतली नसती. त्यांची माघार घेणं म्हणजे तुम्ही आम्ही इतिहासाच्या काळ्याकुट्ट परीक्षेपात जाण्यासारखं आहे. वर्तमानाची हाक आपण अजूनही ऐकत नसू, तर सावित्री -फातिमा यांचा वारसा सांगण्याची आपली काहीही एक लायकी नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे.
मागे एक मित्र विचारत होता कि, तृतीयपंथीयाने जर काही गुन्हा केला आणि त्याला जर तुरुंगात कैद करायचं असेल तर त्याला कुठल्या तुरुंगात ठेवणार? महिलांच्या कि पुरुषांच्या? मी याबद्दल कधी विचार केलेला नव्हता, या प्रश्नामुळे पुरता गोंधळून गेलो होतो. मित्र सांगत होता, त्याच्या ओळखीतल्या एका तृतीयपंथीयाला कोणत्यातरी आरोपाखाली अटक केली गेली तेव्हा, पोलिसांना असलेले कायद्याचे अज्ञान म्हणा किंवा न्यायव्यवस्थेत तृतीयपंथीयांना विचारात घेतलं नसण्याचं कारण म्हणा, त्या तृतीयपंथीयाला रात्रभर कोठडीच्या बाहेर ठेवलं गेलं.
मानवाधिकार कार्यकर्त्यांना जेव्हा ही घटना कळली, तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाला याबद्दल विचारणा केली. त्याबद्लच्ची कारवाई सध्या चालू न्यायालयात चालू आहे,. सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा.
सकारात्मक असलो तरी, मनाबी बंधोपाध्याय यांच्या राजीनाम्याची नकारात्मक बातमी मनाला चटका लावून गेली आहे.पुढचे काही दिवस यावर चर्चा होईल, परिसंवाद होतील, सगळं काही होईल. कालांतराने आपण सगळे विसरून जाऊ. संस्कृतीरक्षक LGBT च्या हक्कांसाठी विरोध करतील, पण त्यांच्या मानवी हक्कांसाठी, संविधानिक हक्कांसाठी त्यांच्या बाजूने उभं राहणार नाहीत. तें उभे राहणार नाहीत, कारण ते पुरुषीसत्तेचे वाहक आहेत. या सगळ्या लढ्यात विवेकवादी परंपरेने तृतीयपंथीयांच्या लढ्यात त्यांच्या बाजूने उभं राहील पाहिजे. इथली माणसं जगली तरच या जगाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. इथल्या प्रत्येकाचं अस्तित्व टिकलं पाहिजे, महिलांचं, पुरुषांचं आणि तृतीयपंथीयांचं देखील.मनाबी बंधोपाध्याय यांचं अस्तित्व मिटता कामा नये, आजच्या फाटाफुटीच्या काळात त्यांच्या बाजूने आज उभे राहण्याची गरज आहे.



