डॉ. आंबेडकरांचा 'राज्य समाजवाद' - डॉ. सुखदेव थोरात

आजच्या काळात जातीअंताचा प्रश्न हा ऐरणीवर असायला हवा. आजच्या परिस्थितीत आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचेही चिंतन होणे गरजेचे आहे. राष्ट्रवाद आणि देशभक्तीचे अवडंबर माजवले जात असताना आपण हे का घडलं? याची कारणमीमांसा केली पाहिजे. आपल्या अनेक तत्त्ववेत्त्यांनी आपल्याला या आधी सावध केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं की कुठल्या काळात, कशा पद्धतीने लोकशाही धोक्यात येऊ शकते. दूरदृष्टी असलेल्या आपल्या मार्गदर्शकांना आपण दुर्लक्षित केलं, म्हणून आज आपल्यासमोर हे सगळे प्रश्न उभे आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा प्रदेश इतर प्रदेशांपेक्षा निराळा आहे. जर राष्ट्रीय चळवळीचा श्रेय बंगाल राज्य घेत असेल, तर महाराष्ट्रातही जातीअंताची आणि महिला मुक्तीची चळवळ सर्वप्रथम उभी राहिली हे आपणही लक्षात घ्यायला हवं.





भक्ती चळवळीचा मोठा वारसा महाराष्ट्राला आहे. संत नामदेव, संत तुकाराम अशा संतांनी महाराष्ट्राची भूमी समतेच्या मार्गाने जाण्यासाठी तयार केली. पुढे शाहू महाराजांनी ही परंपरा पुढे नेत आरक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्या संस्थानात त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली.महाराज सयाजीराव गायकवाड यांनीही शिक्षणाचे महत्त्व जनतेला समजावून सांगितलं आणि महिलांच्या प्रश्नांबाबतही महत्त्वाचे बदल केले. त्यांच्या अगोदर महात्मा फुले यांनी केलेलं काम कोणीही नजरेआड करू शकत नाही. सामाजिक समतेसाठी आणि लिंग विषमतेविरुद्धचा त्यांचा लढा आपण समजून घ्यायला हवा. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज यांच्या शिवाय आपली समतेची परंपरा पूर्ण होऊ शकत नाही. या तिघांनी केवळ सामाजिक प्रश्नांची उकल केली नाही तर आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या.सोबतच सामाजिक चळवळीत स्वतः सक्रिय सहभाग नोंदवला. त्यानंतर पंजाबराव देशमुख, विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज यांनी समतेची परंपरा समर्थपणे पुढे नेली. ही सगळी मंडळी ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करत होते. या समुदायाने सामाजिक एकता प्रस्थापित व्हावी यासाठी काय प्रयत्न केले आहेत हे वर सांगितलेल्या महापुरुषांच्या नावावरूनच समजून येते.


ओबीसी सोबतच ब्राह्मण जातीतले देखील काही समतावादी सुधारक होऊन गेले आहेत. आगरकर, रानडे श्रीधरपंत टिळक, साने गुरुजी अशी असंख्य नावे घेता येतील. लोकमान्य टिळकांचे ज्येष्ठ पुत्र श्रीधरपंत टिळक हे तर सक्रीयपणे डॉ.आंबेडकर यांच्या चळवळीत सामील झाले होते। अस्पृश्य जातीतील मुला-मुलींना शिक्षित करण्याचे काम त्यांनी आपल्या घरातच सुरू केले होते. समाजाच्या ,नातेवाईकांचा त्रासाला कंटाळून त्यांनी नंतर आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी डॉ.आंबेडकरांना पत्रही लिहिलं होतं. या सगळ्यांच्या प्रभावात डॉ. आंबेडकरांनी आपली जातीअंताची चळवळ सुरू केली. त्यांची कुठलीही कृती ही विना अभ्यास नव्हती. प्रश्नांचे सूक्ष्म आकलन करण्याची त्यांची वृत्ती त्यांना अधिक खंबीर बनवत गेली. या सगळ्या घटनांचा, चळवळीचा प्रभाव घेऊन आंबेडकरांनी घटना समितीत काम पाहिलं. मनुस्मृतीच्या धारणांना नाकारत समतेचा संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न घटनेच्या प्रत्येक पानावर आपल्याला आढळतो. स्वातंत्र्य,बंधुता, समता, अस्पृश्यता निर्मूलन, संधीची समानता ही मुले मूलभूत अधिकारात समाविष्ट व्हावीत यासाठी त्यांचा संघर्ष आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. सोबतच राज्यांसाठीची जी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली गेली आहेत त्यातही डॉ. आंबेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.


डॉ.आंबेडकर हे त्यावेळी सक्रिय राजकारणात होते. तत्कालीन सत्ताधारी पक्ष हा काँग्रेस पक्ष होता. काँग्रेसच्या धोरणानुसार आंबेडकरांना स्वतःच राजकारण आणि समाजकारण त्यांना सांभाळावे लागत होते. अशाही काळात अनेकदा काँग्रेसशी त्यांचे मतभेद झाले. परंतु त्यातही त्यांनी कायम समन्वयवादी भूमिका घेतली. या संघर्षातून, वादविवादातून डॉ. आंबेडकर यांनी आपल्याला लोकशाही बद्दल सजग केलं होतं. 'स्टेट अँड मायनॉरिटी' या ग्रंथातून डॉ. आंबेडकरांचे लोकशाही बद्दलचे राज्यकर्त्यां वर्गाबद्दलचे विचार आणि राष्ट्रवादाची त्यांची भूमिका आपल्याला समजून घेता येते. त्यांचे आर्थिक, राजकीय,सामाजिक प्रश्नांबाबतची समजही आपल्याला जाणून घेता येते. अल्पसंख्यांकांचे प्रश्न राज्यकर्त्यावर्गाने कसे सोडवायला हवेत आणि त्यावर काय उपाययोजना करायला हव्यात हे स्पष्टपणे त्यांनी आपल्याला या ग्रंथात सांगितलं आहे. त्यांची सगळीच मते त्यांना संविधानात उतरवता आले नाहीत हेही खरं. त्यांनी आपले विचार 'रानडे गांधी आणि जिन्हा' या त्यांच्या पुस्तकातही मांडले आहेत. या सगळ्यांचे प्रतिबिंब त्यांच्या घटना समितीतील शेवटच्या भाषणात बघायला मिळतं.


आपल्याकडे राजकीय लोकशाही जरूर आहे पण आपल्याकडे सामाजिक लोकशाहीचा अभाव आहे असं ते म्हणत होते. सगळेच नागरिक आपल्या नागरी हक्कांचा उपभोग घेऊ शकतील असे वातावरण देशात नाही हे त्यांनी ठणकावून सांगितले होते.' एक व्यक्ती एक मत' म्हणजे लोकशाही असे आपण मानू नये हे डॉ. आंबेडकर आपल्याला वारंवार बजावत होते.


आर्थिक लोकशाही, सामाजिक लोकशाही, समान हक्क -अधिकार याबाबतही आपण सजग व्हायला हवं आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेत असा त्यांचा आग्रह होता.  सोबतच आपण असे प्रयत्न केले नाही आणि सर्वांगीण समानता आणू शकलो नाही तर आपण लिहिलेली घटना कितीही सुंदर असली तरी ती उपयोगाची नाही असं ते म्हणत.डॉ. आंबेडकरांनी लोकशाहीच्या बाबतीत आपल्याला दिलेली सूचना आज खरी होऊ पाहते आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य, बंधुता, समता, एकात्मता असायलाच हवी सोबतच समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि गणतंत्र या मूल्यांचा ही विकास व्हायला हवा यासाठी डॉ. आंबेडकर कायम आग्रही राहिले. तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यासोबत त्यांचे काही मतभेद होते. जेव्हा आपल्या सामाजिक संरचनेत अस्थिरता आणि असहिष्णुता आहे आणि आचार-विचारांचे पालन करण्याचे स्वातंत्र्य नाही, अशा काळात लोकशाहीचे संवर्धन कसं होऊ शकतं? हा प्रश्न आंबेडकरांनी नेहरूंना विचारला होता. याचसाठी
'राज्य समाजवाद' ही संकल्पना त्यांनी मांडली. याद्वारे सर्वहारा वर्गाची आर्थिक, सामाजिक परिस्थिती सुधारावी यासाठी सरकारने काय उपाययोजना करायला हव्यात यावर त्यांनी भाष्य केले आहे. देशाला प्रगतीपथावर न्यायचं असेल तर अशा उपाययोजना सरकारने करायलाच हव्यात, असा डॉ. आंबेडकरांचा आग्रह होता.


बहुसंख्य लोकांच्या हाती सत्ता गेल्यास काय होऊ शकते याचा अंदाज डॉ. आंबेडकर वर्तवत होते. सामाजिक दृष्ट्या सक्षम भारताची निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. आपण संसदीय लोकशाहीचा स्वीकार हा ब्रिटनच्या संसदीय लोकशाहीतून घेतला आहे.यांत ज्यांच्याकडे संख्याबळ अधिक ते सत्ता स्थापन करू शकतात. बहुमताने कुठला पक्ष केव्हा सत्तेत येतो, जेव्हा तो कुठल्याही धोरणांवर काम करतो. लोक त्यांना मतदान करताना त्यांच्या कामाची, आश्वासनांची पूर्तता होईल याची शहानिशा करत असतात. जर त्या पक्षाने लोकांची निराशा केली तर जनता त्यांना घरीही बसवते. डॉ.आंबेडकर या बद्दल मत व्यक्त करताना म्हणतात, 'आपल्याकडेच संसदीय नाही तर राजकीय लोकशाही आहे'. आपल्या देशात विविध जाती धर्माचे लोक राहतात. जातींमध्ये विभागलेल्या समाज मग केवळ जातीच राजकारण करू बघतो. त्यामुळे बहुसंख्य जातीधर्म आपलेच मुद्दे पुढे रेटत राजकारण करतात. बहुसंख्यांकांचा राष्ट्रवाद त्यातूनच जन्माला येईल अशी त्यांना भीती होती. सत्ता पक्षातील बहुसंख्यांक समुदाय बदलू शकेल पण जाती आणि धर्मांवर आधारित बहुसंख्यांक कायम वरचढ राहतील असे डॉ. आंबेडकर म्हणत. त्याच सोबत सांप्रदायिक बहुसंख्याकांचे राजकारणही कायम राहील, असं ते म्हणत होते. 


आजची जी परिस्थिती आपण अनुभवतो आहोत त्यासाठी भाजप, आर एस एस किंवा मोदी- शहा जबाबदार नसून डॉ. आंबेडकरांनी सांगितलेली लोकशाही समोरची आव्हाने जबाबदार आहेत.डॉ. आंबेडकरांनी या आव्हानांचा सामना करण्यासाठी काही उपाय सुचवले होते. अल्पसंख्यांकांवर बहुसंख्यांक वरचढ होतील असं त्यांचं म्हणणं होतं आणि यासाठी ते म्हणत होते की बहुसंख्यांकांचे संसदीय लोकशाहीतील प्रतिनिधित्व कमी करून अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व वाढवावे. अल्पसंख्यांक आणि बहुसंख्यांक यांच्यात समान प्रतिनिधित्व असावे असा त्यांचा उद्देश होता. यातून अल्पसंख्यांक समुदाय सत्ता स्थापन करू शकेल आणि आपले हक्क अधिकारांचे रक्षण करु शकेल असं ते मानत.


संसदीय लोकशाहीत बहुसंख्येच्या जोरावर लोकसभा आणि राज्‍यसभेत हवे ते निर्णय घेता येतात,यावर मत व्यक्त करताना डॉ. आंबेडकर यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की,


'संसदीय लोकशाहीतील निर्णय हे बहुमताने नाही तर एकमताने व्हायला हवेत'. 


सोबतच अल्पसंख्यांक समुदायाचे प्रतिनिधी अल्पसंख्यांकांनीच निवडून द्यायला हवेत असा त्यांचा आग्रह होता. त्याच बरोबर प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींची नियुक्ती देखील संसदेत केली जाईल ज्यायोगे सामान्य नागरिकांना त्याबद्दल आस्था राहील, असे ते म्हणत. आज घडीला न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया सारख्या देशांनीही अल्पसंख्यांकांचे प्रतिनिधित्व वाढावे यासाठी निवडणूक प्रक्रियेत बदल केले आहेत. 


डॉ. आंबेडकर यांनी क्रांती-प्रतिक्रांतीचा सिद्धांत मांडला होता. स्वातंत्र्य,बंधुता, समता आणि सामाजिक न्यायासाठी एकीकडे संघर्ष सुरू असताना ब्राह्मणीकरणाचाही घाट काही लोक घालत आहेत. ब्राह्मणशाही नव्या रुपात नव्या ढंगात पुन्हा पुन्हा डोके वर काढत असते असं डॉ.आंबेडकर म्हणत. याचीच प्रचिती आज आपल्याला येते आहे. याला 'हिंदुत्ववाद' म्हणता येणार नाही. अकराव्या शतकात 'हिंदू' हा शब्दच अस्तित्वात नव्हता  हिंदू संस्कृती ही एक संमिश्र संस्कृती आहे.भक्ती चळवळ, जैन धर्म, बौद्ध धर्म,कबीर पंथ, वारकरी पंथ आदींच्या वैचारिक घुसळणीतून हिंदू संस्कृती जन्माला आली. आज आपल्यासमोर भासवले जात असलेले चित्र हे 'हिंदू' धर्माचे नाही, तर ब्राह्मण्यवादाचे आहे. आपण या दोघांत फरक करायला हवा.


जैन, वारकरी आणि इतर पंथ- संप्रदाय यांचा यात काहीही हात नाही. हिंदूंमधील ब्राह्मणवादाला खतपाणी घालणारे लोक या सगळ्यांच्या मागे आहेत,हे आपण समजून घ्यायला हव. जातिअंताचा कार्यक्रम आपल्या अजेंड्यावर आंबेडकरांनंतर कोणीही ठेवला नाही. समाजवादी ,साम्यवादी चळवळींनी देखील याकडे गांभीर्याने पाहिलं नाही. राष्ट्रवादाबद्दल बोलताना जमीन, भाषा, धर्म आणि संस्कृतीचा विचार होत असेल तर तो राष्ट्रवाद नाही असं ते म्हणत. राष्ट्रवादासाठी एकात्मता आवश्यक असते असं त्यांचं मत होतं. भारतात पूर्णपणे लोकशाही अस्तित्वात आहे हा आपला समज दूर करावा असेही आंबेडकर म्हणत होते. आंबेडकरांच्या गंभीर सूचनेकडे आपण दुर्लक्ष केलं. आपण या भ्रमात राहिलो की 'एक व्यक्ती-एक मत' आणि 'संसदीय लोकशाहीमुळे' सगळ्याच जाती-धर्माला समान प्रतिनिधित्व आहे.परंतु आता आपले भ्रम दूर झाले आहेत. आपल्या समोर उभ्या असलेल्या समस्यांना समजून घ्यायच असेल आणि त्यावर उपाय शोधायचे असतील तर आपल्याला डॉ. आंबेडकरांची संसदीय लोकशाहीबद्दल ची भूमिका समजून घ्यावी लागेल. यापेक्षा वेगळा मार्ग आज आपल्याकडे नाही. असं केल्यानंतरच आपल्याला सर्वसमावेशक लोकशाहीचा मार्ग सापडणार आहे.

 - डॉ. सुखदेव थोरात 

(साभार: राष्ट्र सेवा दल, इंडिया YouTube )

मशिदीचे भोंगे आणि नवरात्रीचे ढोल!

अजानच्या आवाजामुळे सकाळी सकाळी झोपमोडे होते अशी तक्रार इलाहाबाद विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. संगिता श्रीवास्तव यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली होती. ठरलेल्या शिरस्त्याप्रमाणे लागलीच चर्चेला उधाण आलं. मशिदीवरच्या भोंग्यांनी राजकीय चर्चा घडवून आणली. कुलगुरू बाईंच्या तक्रारीवरून त्यांच्या घराच्या दिशेला असलेला भोंगा आता दुसऱ्या दिशेला वळवला गेलाय. यापुढे कुलगुरू बाईंना पहाटे पहाटे साखरझोप मिळेल, पण ज्यांना ध्वनीप्रदूषणाचा त्रास होणार आहे त्यांचं काय? 


इस्लाममध्ये अजानसाठी भोंगे लावावेत असं म्हटलंय का? 


अजिबात नाही! इस्लामची स्थापना झाली ती मुळात अरबस्थानात. जिथे समाजाची एकूण स्थिती अत्यंत हालाखीची होती. नागरिकांना 'शांततेचा' संदेश देण्यासाठी मोहम्मद पैगंबर यांनी नवा मार्ग निवडला, तो म्हणजे इस्लाम! त्याकाळी अजान देण्यासाठी भोंगेच काय, तर कुठलेही विद्युत उपकरणे शोधली गेली नव्हती. अशा काळात उंच मिनारावर उभे राहून  मौलाना लोक नागरिकांना प्रार्थनेची आठवण करून देत. आजही जवळजवळ सगळ्या मशिदींची रचना ही उंच मिनाराची असलेली आपण पाहतो. पण त्या मिनाराची जागा आता मौलवी नाही तर भोंग्यांनी घेतलीये. 



'या' मुस्लिम देशात अजानसाठी भोंगे वापरले जात नाहीत. 


मागे मी मलेशियाला एका अभ्यास दौऱ्यासाठी गेलो होतो. हा एक इस्लामिक देश आहे. इथे ध्वनिप्रदूषण होऊ नये म्हणून सरकारी स्तरावर विशेष काळजी घेतली जाते. अनावश्यक असेल तर गाडीचे हॉर्न देखील वापरले जात नाहीत. 

इथल्या मशिदीवर मग भोंगे असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही इथल्या नागरिकांवर देव कोपलेला नाही! मलेशिया सोबतच इंडोनेशियात देखील आपल्या धार्मिक स्वातंत्र्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथे मात्र प्रत्येक मशिदीवर मोठमोठे भोंगे लावण्याची जणू स्पर्धाच रंगलेली पाहायला मिळते. 

महाराष्ट्र काय स्थिती

महाराष्ट्रात काही वेगळी स्थिती नाही. आमच्या घराच्या चारी दिशांना चार मशिदी आहेत. या चारही मशिदींचा एकेक भोंगा आमच्या घराच्या दारा-खिडक्यांशी दिवसातून 5 वेळा संवाद साधत असतो. विचार करा एका भोंग्यांने कुलगुरू बाईंची झोप उडत असेल तर आमची स्थिती काय होत असेल? दुर्दैव हे की आमच्या घरातलं कुणीही कुलगुरू नाही! 

आमच्या घराच्या उजव्या बाजूला 'देवी गल्ली' आहे. नावावरुन कल्पना आली असेल की इथे कुणा देवीचं मंदिर असेल. होय, अगदी बरोबर. एक नाही 2-2 देवीची मंदीरे आहेत. नवरात्री उत्सवात येथे नऊ दिवस सकाळ संध्याकाळ मोठमोठ्या आवाजात देवीची भक्तिगीते वाजवली जातात. अजानचे 365 दिवस आणि नवरात्रीचे 9 दिवस अशी तुलना करायची गरज नाही! याच दरम्यान जेव्हा आमची सहामाई परीक्षा यायची तेव्हा या देवी देवतांना रिटायर करून कुठे तर पाठवून द्यावं असं वाटायचं. बाकी मित्र-मंडळींना आमचा हेवा वाटायचा, आमच्या घराच्या इतक्या जवळ जत्रा भरते म्हणून. परंतु आमची अडचण सांगणार कुणाला? आम्ही कुलगुरू थोडेच आहोत? 

ध्वनी प्रदूषण हा गुन्हाच मानायला हवा! 

ज्यांच्या धार्मिक स्वातंत्र्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करता येत नाही. परीक्षेत चांगले गुण मिळवता येत नाही, त्यांच्या शैक्षणिक नुकसानीची भरपाई कोण करणार? ज्या लहान मुलांचे डिजे आणि लाऊडस्पीकर मुळे कानाचे पडदे फाटलेत, जन्मभराच अधुपण आलं त्याची जबाबदारी कुठली मशीद किंवा मंदिर ट्रस्ट घेणार आहे? ज्या फटाक्यांच्या आवाजामुळे झाडाला हादरे बसून आपल्या पिलांसोबत चिमणी-पाखरं घरट्यासकट खाली पडले, त्यांच्या विमा उतरावा म्हणून कुणी आंदोलनं केली का? केवळ 'शांतता'प्रिय  हिंदू-मुस्लिमांनी नाही तर सगळ्याच समुदायाने या प्रकरणाचा आवर्जून विचार करायला हवा. भोंगे काय, ते तर विजेवर चालतात, मनुष्यप्राणी मात्र अजूनही बुद्धीनेच चालतो ना?  डोक्याचा वापर केला तर हा प्रश्न चुटकीसरशी सोडवला जाऊ शकतो.

मोदी सरकार सहकार चळवळ देखील संपवणार!

गेल्या 30 वर्षांपासून उदारीकरणाचा प्रयोग आपल्या देशात होतो आहे. सगळ्याचं क्षेत्रातून सरकारने आपला मालकी हक्क सोडावा आणि पायउतार व्हावं असं हे धोरण आहे. सोबतच सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील उद्योगधंदे अधिक सुलभतेने व्हावेत यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला गेला. यामध्ये सगळ्यात जास्त शोषण झाल ते कामगारांचं. सरकारचा आणि मालक वर्गाचा असा समज होता की विकासाच्या प्रक्रियेत कामगार हा एक अडथळा आहे. श्रमशक्तीचा वापर करून उत्पादन वाढवणाऱ्या श्रमिकांना, त्यांच्या संघटनांना आपण अडथळा कसं म्हणू शकतो? कामगारांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सरकारी स्तरांवर केला गेला. कायमस्वरूपी कामांचं कंत्राटीकरण केल गेल. याचा परिणाम मनमोहन सिंग सरकारला भोगावा लागला, आणि त्यांचं सरकार पडलं. मनमोहन सिंग यांनी तशी कबुलीही दिली की, उदारीकरणाची प्रक्रिया ही मानवककेंद्री ठेवण्यात त्यांच सरकार अपयशी ठरल.


संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी वेतन आयोग आले आणि त्यांचे पगार वाढले परंतु रेल्वे, बँक आदी क्षेत्रात बाहेरच्या कंपन्यांची घुसखोरी देखील वाढत गेली. 2000 सालानंतर हे फार मोठ्या प्रमाणात घडलं. राष्ट्रीय सकल उत्पादनात वाढ झाली खरी पण याचा नेमका फायदा कोणाला झाला? तर ज्यांनी भांडवल लावलं त्यांनी नफा कमावला पण कामगारांना मात्र तुटपुंज्या पगारावर काम करावं लागलं. याचाच परिणाम असा झाला की दारिद्ररेषेखालील लोकांचे प्रमाण प्रचंड वाढत गेलं. असंघटित कामगारांना मात्र महागाई भत्ता मिळत असल्याने त्यांना विशेष झळ बसली नाही. हा महागाई भत्ता असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळावा यासाठी संघटित क्षेत्राने आणि सरकारने काही प्रयत्न केले का? याचे उत्तर नाही असे आहे.

याउलट असंघटित क्षेत्रातील कामगारांनी अनौपचारिक क्षेत्रातील कामगारांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, घरेलू कामगार संघटना व  कंत्राटी कामगार यांना संघटीत करण्याचा प्रयत्न आजपर्यंत सुरू आहे. 'सत्ताधारी पुरस्कृत भांडवलदार' ही संकल्पना भारताला जुनी नाही. पूर्वी टाटा-बिर्ला होते आता अंबानी-अदानी आहेत. सरकार आणि भांडवलदार यांच्या संगनमताने संघटित क्षेत्र नष्ट करण्याचा प्रयत्न आज उघडपणे सुरू आहे.

मला भीती आहे की रेल्वेची दहा लाख कामगारसंख्या दोन लाखांवर येईल आणि सात लाख बँक कामगारांची संख्या एक लाखावर येईल. हीच परिस्थिती भारतीय पोस्ट विभाग आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये देखील येत्या काळात बघायला मिळू शकते. वाढत्या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे हे असं घडलं हे कुणीही नाकारू शकत नाहीये. आपल्या संसदेत जर कलम 370 हटवण्यासाठीचा कायदा पारित केला जाऊ शकतो तर कामगारांना देशोधडीला लावण्यासाठीचे कायदे देखील पारित केले जाऊ शकतात हे आपण समजून घ्यायला हव.

 लोकांच्या हातात पैसा नाही म्हणून ते उत्पादन विकत घेऊ शकत नाही. उत्पादन विकले जात नाही म्हणून उद्योगधंदे आज ठप्प आहेत.आता हे चक्र आपल्याला समजून घ्यावे लागेल. आता कुठे राहुल गांधी, रघुराम राजन व इतर राजकारणी आणि अर्थतज्ञ पुढे येऊन यावर भाष्य करू लागले आहेत. लोकांच्या हाती पैसा खेळवत ठेवावा लागणार आहे. असंघटित कामगारांच्या प्रश्नाबाबत आपण सर्वांनीच धोरणात्मकदृष्ट्या सरकारवर हल्ला करण्याची गरज आहे असं बोलून दाखवलं जात. परंतु सरकार मात्र सातत्याने आपल्याला खोटे आकडे दाखवून कामगार कल्याणासाठी निधी दिल्याचे सांगत असते.


आता एअर इंडिया आणि जेट एअरवेज मधील कर्मचाऱ्यांना घरी पाठवले गेले आहेत. बीएसएनएल, एमटीएनएल मधील कर्मचाऱ्यांना सक्तीची स्वेच्छानिवृत्तीवर पाठवलं जात आहे. सात लाख कोटींची वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सार्वजनिक क्षेत्र विकण्याचा सपाटा सरकारने लावला आहे. हे  करूनही सरकारच्या हाती केवळ दोन लाख कोटी येतील.


खरं तर आपल्या सगळ्याच राजकीय पक्षांना एकत्रित होऊन विरोध करणं जमत नाहीये. आपल्या राजकीय पक्षांना प्रश्न कळला नाही असं नाही, प्रश्‍नांची जाणीव त्यांना जरूर आहे पण संसदेतील बेरीज वजाबाकीचे गणित साधण्याच्या नादात श्रमिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. 65 टक्के हून अधिक असंघटित कर्मचाऱ्यांच्या क्रियाशक्तीतून पुढच्या काळात संपत्ती निर्माण होणार नसून, वित्तीय भांडवलातून भविष्यातील संपत्ती निर्माण होईल असे एक चित्र आपल्या समोर आहे. अमेरिका-चीन सारखे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे इथल्या बँक इन्शुरन्स कंपन्या विकत घेत आहेत. हीच नीती, हेच वित्तीय भांडवल कामगारांना येत्या काळात वेठबिगार करणार आहे.


मोदी सरकारने अगोदरच स्पष्ट केले आहे की पाच लाखांवर असलेल्या ठेवी ते सुरक्षित करू शकत नाही. आपल्या ठेवी जर सरकार सुरक्षित ठेऊ शकत नसेल तर मग सरकार आणि रिझर्व बँक काय काम करत आहे?

लोकांनी आपल्या ठेवी बँकेतून काढून घ्याव्यात हा काही उपाय असू शकत नाही. या प्रकरणी बँक कर्मचाऱ्यांनी आणि  ठेवीदारांनी एकत्रित आवाज उठवला पाहिजे.


काही दिवसांपूर्वी सहकार क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याचा वटहुकूम रिझर्व बँकेने काढला. यायोगे सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या आर्थिक संस्था सरकारला ताब्यात घ्यायच्या आहेत. सहकार चळवळ देखील तसं पाहायला गेलं तर असंघटित क्षेत्रातच मोडते. गोरगरीब जनतेने सहकारातून उभे केलेले भांडवल आणि मेहनत हडप करण्याचा डाव सरकार आखते आहे. लोकशाही आणि संविधानाचं संरक्षण करायचं असेल तर संघटितपणे आपण सर्व क्षेत्रातील कामगारांना आपला लढा लढावा लागणार आहे. एकट लढून कुणालाही प्रभावीपणे हक्क अधिकारांची लढाई लढता येणार नाही. 


श्री. विश्वास उटगी, बँक कर्मचारी नेते 

साभार: महाराष्ट्र सोशल फोरम, राष्ट्र सेवा दल 

तशाही 'कुतिया' प्रामाणिकपणे फार खतरनाक असतात: महिला दिन विशेष


'संघर्षातून निर्मिती' हे आशयपूर्ण सूत्र घेऊन राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकारातून महाराष्ट्र सोशल फोरम चा प्रयोग होतो आहे. त्यासाठी आपणा सर्वांचे अभिनंदन.अलीकडच्या काळात माणूस म्हणून जगण्याचा, आनंद अनुभवायचा अवकाश कोरोना आणि कोरोनाबाह्य कारणांमुळे अतिशय भयानक रीतीने आक्रसत जातो आहे. या निमित्ताने महाराष्ट्र सोशल फोरमचा हा वैचारिक हस्तक्षेपाचा यज्ञ मला अधिक स्वागतार्ह वाटतो आहे. याच जागरात माझ्यासारख्या लिहित्या व्यक्तीला आमंत्रित केलं गेलं, यासाठी आयोजकांचे आभार.


मला इथे हिंदी मधील प्रसिद्ध कवयित्री अनामिका हिची आठवण होते आहे. ती एका कवितेत असं म्हणते,


मैं एक दरवाजा थी

मुझे जितना पीटा गया

मैं उतनी ही खुलती गई!


याचा अर्थ काय आहे तर, अविरत संघर्ष ही बाब स्त्रियांसाठी अजिबात नवीन नाही. संघर्षरत स्त्रीला, प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीला, उत्तर मागणाऱ्या स्त्रीला, परंपरेने लादलेली स्त्री संहिता गपगुमान न स्वीकारता स्वप्रज्ञाने अर्थ लावते म्हणून, त्याची मोडतोड करते म्हणून आणि नवनवीन संहिता आणू पाहते म्हणून सगळ्याच स्त्रिया पिटल्या जात आहेत. पिटल्या  जाणाऱ्या या स्त्रिया थांबायला मात्र तयार नाहीत. अनामिका म्हणते तशी ही संघर्षरत स्त्री सताड उघड्या दरवाजासारखी बनत चालली आहे. ऍड. निशाताई शिवूरकर म्हणतात तसं प्रज्ञा, शील आणि निर्भयता या गोष्टी स्त्रियांनी अंगी बाणल्या पाहिजे. बऱ्याच वर्षांपासून स्त्रियांचा स्व-अस्मितेचा संघर्ष सुरू आहे. हा कुठलाही संघर्ष तिच्यासाठी कधीच साधासोपा नव्हता. बुद्ध काळात थेरीगाथेत बौद्ध स्त्रियांनी पितृसत्तेला प्रश्न विचारले आहेत. त्यात एक स्त्री असे म्हणते की, माझा नवरा मला सतत मारहाण करतो, तेव्हा अशा नवऱ्यासोबत मी का रहाव?  इतकंच नाही तर विश्वातल्या प्रत्येक गोष्टीला सत्य स्वरूपात बघण्याची जी संकल्पना बौद्ध तत्त्वज्ञानाने सांगितली आहे, त्या जागृत अवस्थेला अंगीकृत करण्याची ताकत ही बौद्ध काळात थेरींनी अवगत केलेली आपल्याला आढळते. ज्ञान प्रक्रियेतील ज्ञान अर्जित करण्याचा अधिकार अडीच हजार वर्षांपूर्वीही महिलांनी बजावला होता हे यातून स्पष्ट होते. अर्थात हे सगळं सहजासहजी घडलेले नाही. संत जनाबाईंनी स्वतःला 'वेसवा' म्हणजेच वेश्या म्हणवून घेत, सामाजिक अवकाशात पाऊल टाकलं. चोखोबांची पत्नी, सोयराबाईंनी तर वर्णव्यवस्थेत असलेल्या 'विटाळ' संकल्पनेतील कोतेपणा अतिशय निर्भयपणे उघड केला आहे.


 देहासी विटाळ म्हणती सकळ 

आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध 

देहीचा विटाळ देहीच जन्मला 

सोवळा तो झाला कवण धर्म? 

अशा धारदार शब्दात सोयराबाई आपले विचार मांडताना दिसतात. अशाच प्रकारे दक्षिणेत अक्कमहादेवी,  कश्मीर मधल्या लल्लनदेवी, उत्तरेतील संत मीराबाई अशांसारख्या अनेक क्रांतिकारक स्त्रियांनी आपले विचार निर्भयपणे मांडले आहेत. अलीकडच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर नेटफलिक्स वर 'बुलबुल' नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाची निर्माती अभिनेत्री अनुष्का शर्मा ही आहे. या चित्रपटातून असं दिसतं की स्त्रियांनी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या संघर्षाचा सामना केला आहे. स्त्रियांना 'पापाची खाण' म्हटलं गेलं, तर कधी 'बुलबुल' सारखं उलट्या पायांची डाकीण म्हटलं गेलं. अलीकडच्या सत्ताधार्‍यांना तर तिचं हसणं देखील शूर्पणखेची आठवण करून देत. खरं पाहायला गेलं तर आमच्यासारख्या सर्व स्त्रियांसाठी शूर्पणखा ही एक लढावू स्त्री आहे. अलीकडच्या काळात भेदक प्रश्न विचारणाऱ्या या आमच्या महिला पत्रकार मैत्रिणींना 'प्रेस्टीट्यूट' अशी विशेषण लावली गेली आहेत. पुरस्कार परत करणाऱ्या माझ्यासारख्या लिहित्या स्त्रीला पाकिस्तानचे हस्तक असंही म्हटलं गेलं आहे. मी हे याचसाठी सांगते आहे की काळ कुठलाही असू देत स्त्रियांचे ट्रोलिंग होतच आलेले  आहे.  पंडिता रमाबाईंची 'रेवरंडा' म्हणून रेवडी उठवणारे लोकमान्य टिळक देखील एका अर्थाने पंडिता रमाबाईना ट्रोलच करत होते. गौरी लंकेश सारख्या निर्भीड महिला पत्रकाराला सनातनी गोळ्या घालून आज ठार मारतात. मधल्या काळात सावित्रीबाई फुले, फातिमाबी,मुक्ता मांग ,ताराबाई शिंदे असे भरभक्कम खांब आपली प्रेरणा म्हणून उभे राहतात. या खांबांना धरूनच आजच्या स्त्रिया अन्यायाच्या विरोधात निडरपणे आवाज उठवत आहेत. गेल्या काही वर्षांपासून लोकशाहीचा संकोच ज्या पद्धतीने होतो आहे, दमनशाहीचे स्तोम माजवले जात आहे अशा परिस्थितीत आपण सगळे लढतो आहोत. परंतु या सगळ्या परिस्थितीचा सामना स्त्रिया अनादिकालापासून करत आहेत. जन्म घेतलेल्या घरापासून ते बाहेरच्या जगापर्यंत याला कुठेही अपवाद नाही.


हे खरं आहे की आज स्त्रिया खूप शिकतायेत, आपले प्रश्न मांडत आहेत, न्याय हक्कासाठी भांडत आहेत, नवऱ्याच्या दमनाला विरोध करत आहेत, घटस्पोट घेत आहेत आणि  एकट्या राहून समष्टीसाठी लढत आहेत. चिपको आंदोलनापासून ते 'मी टू' आंदोलनापर्यंत आपल्याला हेच बघायला मिळतं.खरं तर सध्या आपल्या सर्वांचा उलटा प्रवास सुरू आहे. लोकशाहीतून हुकूमशाहीकडे आपण निघालो आहोत. आजवर अविरत संघर्षातून स्त्रियांनी मिळवलेला जो अवकाश आहे तोच अवकाश हिरावून घेण्याचा प्रयत्न होताना दिसतो आहे. मोदी सरकार सातत्याने 'नव्या भारताची' भाषा करत आहे. नव्याची चलती सुरू असताना या शासनाचा नाविन्याचा सोस स्त्रियांपर्यंत येता येता पूर्णपणे आटून गेलेला दिसतो. त्यांच्यालेखी असलेली आदर्श स्त्रीची प्रतिमा ही अजूनही जुनाट आहे. हिंदु राष्ट्रात स्त्रीने किती मुले जन्माला घालावी हे सांगणारी त्यांची संस्कृती आहे. स्त्रियांसाठी कुटुंब हेच प्रधान कार्यक्षेत्र मानणारी ही संस्कृती आहे. या संस्कृतीचे वेगळेपण असं की, इथे सरकार आदर्श सांगून थांबत नाही तर त्या आदर्शांच्या आधारावर 'चांगली स्त्री' आणि 'वाईट स्त्री' असं विभाजन देखील केल जात. त्यांच्या लेखी असलेल्या 'वाईट स्त्रियांना' कठोर शासन देऊन योग्य मार्गावर आणण्याची देखील व्यवस्था आहे. यासाठी साम-दाम-दंड-भेद या सत्तादंडाचा  मुक्तहस्ताने वापर केला जातो. अशा स्त्रियांवर हिंसेचा वापर देखील केला जातो. सरकारी यंत्रणा देखील त्याला अधिमान्यता देतात. जामिया मिलिया विद्यापीठ असो किंवा बनारस हिंदू विश्वविद्यालय असो तरुण मुलींना दंडुक्याच्या धाक दाखवून योग्य मार्गावर आणू पाहिलं गेलं. योगी सरकार मध्ये बलात्कारित महिलांचा संघर्ष किती निष्ठूरतेने मोडून काढला गेला हे आपण पाहिलं. बलात्कारित पुरुषांना संरक्षण देण्याचा देखील प्रकार घडला. आजच्या वर्तमानाचे वेगळेपण यानिमित्ताने आपल्याला स्पष्ट दिसते आहे.

अनामिका ही कवयत्री तिच्या दुसऱ्या एका कवितेत म्हणते,


स्त्री सब कुछ जानती है पिंजरे के बारे में

जाल के बारे में, यातनागृह के बारे में

उसे पूछो पिंजरे के बारे में

वह बताती है निले अनंत विस्तार के बारे में

उड़ने के रोमांच के बारे में


कारावासाच्या भिंती उध्वस्त करून मुक्तीचा स्वप्न बघणारी जी स्त्री आहे ती सनातनी वृत्तीच्या लोकांसाठी आदर्श कशी असणार? 'बेटी बचाव बेटी पढाव' अशी घोषणा देणारे जे सत्ताधारी आहेत, त्या सत्ताधाऱ्यांना पुरुष सत्तेचे समर्थक म्हणून ती स्वतःची जबाबदारी भासू लागते.परंतु जिला संरक्षण द्यायचे आहे तीच जर लढायला तयार असेल तर तिचा बंदोबस्त केला पाहिजे हे देखील ते पुरुषसत्तेची जबाबदारी मानतात. हे सगळं आपण आपल्या सर्व भोवतालात अनुभवतो आहोत. केरळ मधील शबरीमाला प्रकरण ,नागरिकत्व विधेयक आदी निमित्ताने स्त्रियांचा झगडा आपण पाहिला. प्रत्येक वेळी सरकारने त्यांना सापत्न वागणूक दिली आहे. अलीकडच्या काळातील शाहीनबागचा लढा हा आपल्याला स्वातंत्र्य आंदोलनाची आठवण करून देणारा होता. दिल्लीतल्या फक्त शंभर स्त्रिया शाहीनबागेत एकत्र येतात आणि धरणे धरतात. त्यांच्या भूमिकेचा स्वीकार करून देशभरात शाहीनबाग उभारल्या गेल्या हे सकारात्मक चित्र आहे  शाहीनबागेच्या महिला आंदोलकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शीख धर्मीयांनी घेतली हे देखील आपण पाहिले आहे. हे सगळे घडत असताना स्वतःला निधर्मी, लोकशाहीवादी म्हणून घेत असलेला आम आदमी पक्ष शाहीन बाग आंदोलकांना भाजपच्या कुटील कारस्थानाचा भाग ठरवतो ही देखील अत्यंत उद्वेग आणणारी घटना होती. दिल्लीत येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूका लक्षात घेता या धार्मिक ध्रुवीकरणाचा फायदा भाजपाने साधून घेतलेला दिसतो. शाहीनबागेतील काही लोक भाजपमध्ये सामील झालेही असतील, परंतु सरळपणे आपण तिथल्या आंदोलकांना भाजप समर्थक म्हणत असू, तर कुठेतरी आपण या महिलांनाच बेदखल करतो आहोत. महिलांना बेदखल करून आपण आपली लढाई लढू शकत नाही. फॅसिजम विरोधी लढाईची धुरा ही महिलांच्या खांद्यावर असणार आहे हे शाहीनबाग आंदोलनाने आपल्याला दाखवलं. भारतीय स्त्री मग ती प्रियंका भोतमांगे असू देत किंवा सफुरा सरगर असू देत, राधिका वेमुला असू देत किंवा गौरी लंकेश असू देत, लढण्याचा खूप मोठा अनुभव आणि वारसा भारतीय स्त्रियांना आहे. भारतीय संविधानाच्या तळपत्या सर्व मूल्यांसाठी हाच लढाईचा वारसा आपल्याला उपयोगी ठरणार आहे असं मला वाटतं. समारोप करताना मला एक कविता तुमच्या समोर सादर करावीशी वाटते, 'मी वाचू पाहिलं सत्य'



मी वाचू पाहिलं सत्य

वाचू पाहिली सत्याची पारदर्शी झुळझुळीत अक्षर

ज्याला घाबरला तुम्ही आणि वेगानं बदलवत नेलं त्यांना 

कधीच न बदलणाऱ्या पोथ्यांमध्ये 

तुम्ही घाबरलात लहान मुलांच्या उत्फुल्ल हसण्याला

शाळकरी मुलींच्या तुर्रेबाज लाल रिबीनीनां

घाबरलात तुम्ही तरुण तरतरीत मेंदूना

ज्यात उसळतात लाखो-करोडो प्रश्न 

एखाद्या मंथर कारंजासारखे थुईथुई

तुम्ही देता नागव्या तलवारी, छरेदार बंदुक्या

लाठ्याकाठ्या, कोयते आणि हिंसेचा आकर्षक पासवर्ड.

जे रोखू शकणार नाही त्यांची पावलं

मी नाही सोडणार धीर, विझणार नाहीत माझी स्वप्न कधी पुन्हा पुन्हा उतरेन मी 

कधी अक्कमहादेवीच्या दाहक शरीरातून

कधी गौरी लंकेच्या तीक्ष्ण धारदार लेखणीतून

पुन्हा पुन्हा दिसेल मी कुठल्याही गल्लीबोळात 

तशाही 'कुतिया' प्रामाणिकपणे फार खतरनाक असतात.


-डॉ. प्रज्ञा पवार 

(महाराष्ट्र सोशल फोरम आयोजित 'स्त्री आणि नव्या युगातील संघर्ष' या परिसंवादातील त्यांनी मांडलेले हे विचार आहेत) 


आभार: Rashtra Seva Dal, India YouTube Chanel 

हनुमानाप्रमाणेच शेतकरी आंदोलनही चिरंजीवी- योगेंद्र यादव

 या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाविषयी एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे कि जेव्हा जेव्हा हे आंदोलन क्षीण झालंय असं बोललं जात, आंदोलनाला ब्रेक लागला अशी चर्चा होते तेव्हा हे आंदोलन अधिक जोमाने आणि उत्स्फुतपणे जोर धरते. आतापर्यंत अनेक टीकाकारांना या आंदोलनाला दुषणे लावली. शांततेच्या मार्गाने होत असलेले हे आंदोलन आता चौथ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. या अगोदर तीन वेळा टीकाकारांची तोंडे आंदोलनकारी शेतकऱ्यांनी बंद केलेली आहेत. 

या अर्थाने या शेतकरी आंदोलनाचे पात्र हनुमानासारखे आहे. हनुमानासारखी त्याची शक्ती अमर्याद आहे. तो समुद्र पार करू शकतो, डोंगर उचलू शकतो, आणि आपल्या शत्रूचा नाशही करू शकतो.



परंतु हनुमानाप्रमाणेच शेतकर्‍यालाही त्याची शक्ती कळत नाही. जर त्याला योग्य दिशा देणारा मर्यादा पुरुषोत्तम राम सापडला तर लक्ष्य गाठण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही. हनुमानाची भक्ती जशी वैष्णव, शैव, शाक्य पंथांच्याही वर आहे, तशी किसान चळवळ ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या ध्वजाच्या पलीकडेही आहे. हनुमानाप्रमाणेच शेतकरी आंदोलनही चिरंजीवी आहे. पहिल्यांदाच,  नोव्हेंबर महिन्यात या आंदोलनाने टीकाकारांचे तोंड बंद केले. 

पहिल्या टप्प्यात पंजाबमध्ये अभूतपूर्व जनजागृती व आंदोलन झाले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने 9 ऑगस्ट,25 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबरला या तीन कायद्याविरोधात राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले होते. तोपर्यंत असे म्हटले जात होते की हे आंदोलन केवळ पंजाब पुरते मर्यादित आहे. काही समीक्षक असेही म्हणू लागले होते की पंजाबात सुरु  झालेले हे आंदोलन तिथेच शमेल. अशा परिस्थितीत, 26 नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली ' असा पुकारा देत शेतकरी दिल्लीला पोहोचले आणि आंदोलनाने अभूतपूर्व यश मिळवलं.

पंजाबमध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाने, चळवळीने दिल्लीला वेढा घातला. आता हरियाणा मधले शेतकरी  बांधव देखील या आंदोलनात सामील झाले आहेत.  शेतकरी चळवळ ही आता राष्ट्रीय चळवळ बनली आहे. दुसर्‍या टप्प्यात दिल्लीत पोहोचलेले हे शेतकरी आंदोलन 5-7  दिवसही टिकणार नाही असा काही समीक्षकांनी कयास लावला होता.याच टप्प्यात उन, वारा, पाऊस यांची कुठलीही पर्वा न करता शेतकरी खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखलं गेलं. 
ऐतिहासिक 'किसान परेड'ने शेतकरी आंदोलन जगभरात पोहचवले. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूरचे आंदोलन  देशभरातील शेतकर्‍यांसाठी तीर्थक्षेत्र बनले. किसान आंदोलनाने हनुमानाच्या चिरंजीवी शक्तीची प्रचीती परत दिली जेव्हा लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर शेतकऱ्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि चिरडण्याचा प्रयत्नही केला गेला. 

सर्वात अगोदर माध्यमांना हाताशी धरून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले गेले. पोलिसांच्या उपस्थितीत स्वतःला 'स्थानिक' म्हणवून घेणारे गुंड आंदोलकांवर हल्ला करू लागले. हे अगल बघून सत्ताधार्यांना वाटले कि रातोरात हे आंदोलन संपेल.  गोदी मिडीयाने तर हे आंदोलन संपल्याचे जाहीर देखील केले. परंतु गाजीपूरच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने चित्र पालटून टाकले. राकेश टिकैत यांचे अश्रू शेतकऱ्यांच्या अपमानाचे प्रतिक बनले आणि दिल्लीच्या आसपास असलेले शेतकरी बांधव आंदोलनस्थळी पोहचू लागले.यावेळी उत्स्फूर्तपणे शेतकरी महापंचायतींचे आयोजन केले गेले. आंदोलनाचा आवाज.दाबण्याऐवजी हा आवज सर्वदूर पोहोचल. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी महापंचायतींची प्रक्रिया आजही सुरू आहे.





आता ही शेतकऱ्यांची ऐतिहासिक चळवळ चौथ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. आता पुन्हा एकदा मोर्चांमधील शेतकर्‍यांची संख्या कमी झाली आहे, समर्थन ओसरत आहे असा दावा सरकार करत आहे. सरकारचे निर्दयी वागणे हीच सरकारची ताकद आहे अस चित्र उभ केल जात आहे. 'मोदी झुकणार नाहीत' आणि शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागेल असे टीकाकार म्हणत आहेत. परंतु संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात सुरु असलेली ही ऐतिहासिक चळवळ आगामी काळात पुन्हा एकदा शिखर गाठेल, हा आम्हां सगळ्यांना विश्वास आहे. 

आधी शेतकरी चळवळीचे रणांगण उत्तर भारत होते परंतु दिवसेंदिवस दक्षिण व पूर्व भारतामध्येही हे आंदोलन पसरत चालले आहे.शेतीमालाला  किमान आधारभूत किंमत मिळावी आणि या मागणीला कायद्याचं संरक्षण मिळाव अशी आम्ही मागणी करत आहोत.  तसेच अध्यादेश आणून लागू केलेले 3 कायदे रद्द करण्याची मागणी जोरदारपणे येणाऱ्या काळातही मांडली जाईल. मतदानासाठी आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या सामर्थ्याला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शेतकरी योग्य धडा शिकवतील. 

केवळ हे सरकारच नाही, तर भविष्यातील कोणतेही सरकार या तिन्ही किंवा त्यांच्यासारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्याची हिंमत करणार नाही. सत्य हे आहे की ही शेतकरी चळवळ आता या तीन कायद्याच्या पलीकडे गेली आहे. आता ही चळवळ शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची चळवळ बनली आहे. खर तर हा संघर्ष केवळ या सरकारच्या विरोधात नाही. शेतकरी विरुध्द सत्ताधारी असा हा संघर्ष आहे. सत्ताधाऱ्यांनी याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला गेलेलं सत्ताधाऱ्यांना महागात पडणार आहे. 


मूळ लेखक: योगेंद्र यादव 
अनुवाद: सागर भालेराव 

टीआरपीच्या खेळाने काश्मीरमधल्या मुस्लिमांना काय सहन करावं लागलं?

 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेचा दिवस होता. त्या दिवशी, मी आणि माझा चुलत भाऊ 'गली बॉय' हा चित्रपट पाहण्यासाठी जम्मूच्या वेव्ह मॉलमध्ये गेलो होतो. जम्मूपासून दूर पुलवामामध्ये भारतीय सैन्यावर हल्ला झाल्याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला ही घटना समजली. 


मी जम्मू शहरातील मुस्लिमबहुल भागात,  गुज्जर नगरमध्ये भाड्याने राहत होतो. दुसर्‍या दिवशी, 15 फेब्रुवारी 2019 रोजी, सकाळी सकाळी बाहेरच्या विचित्र आवाजांनी माझी झोप उघडली. मी कॉलेजला जाण्यासाठी तयार व्हायला निघालो तेव्हा पाहिलं कि माझ्या मोबाईलवर माझ्या कुटुंबियांचे आणि हितचिंतकाचे जवळपास 50 कॉल येऊन गेले होते. मला आश्चर्यही वाटलं आणि काळजीही वाटली. माझ्या कुटुंबियांबद्दल मला चिंता वाटू लागली. मी घरी फोनवर बोललो तेव्हा तर आणखीनच चक्रावलो. एका काश्मिरी मुलाने भारताच्या निमलष्करी दलाच्या काफिल्यावर आत्मघातकी हल्ला केल्याचे न्यूज अँकर ओरडून ओरडून सांगत होते. या हल्ल्यात दुर्दैवाने आपले 40 जवान शहीद झाले होते. हे सर्वच दुखःद होत. कारण इस्लाम किंवा मानवता कोणालाही आत्मघाती हल्ला करण्यास परवानगी देत नाही. याहून वाईट गोष्ट म्हणजे टीव्हीवरचे न्यूज अँकर सामान्य काश्मिरींना दोष देत होते. आपल्या वातानुकुलित स्टुडियोतून त्यांनी छेडलेला विषय माझ्यावर थेट परिणाम करत होता. या घटनेनंतर अचानकपणे मी सर्वांचा शत्रू बनलो. माझ्यापासून दूर कुठे घडलेल्या कृत्यासाठी मलाच दोषी धरलं जात होत. खरं तर हे कुणी केलं?, का केलं? याची कुणालाही कल्पना नव्हती. जम्मू हे माझ्यासाठी दुसरं घर होतं. पण त्या दिवासानंतर अचानक मला, आपण कुणीतरी परके आहोत, अपराधी आहोत अस विनाकारण वाटायला लागलं. हे सगळं भारतातील न्यूज वाहिन्यांनी माझ्यासारख्या अनेकांवर लादलं होतं. एक काश्मिरी मुस्लीम असल्याकारणाने मला जम्मू सोडण्यास भाग पाडलं गेलं. त्यासाठी जनमाणसात वातावरणनिर्मिती करण्याचं काम अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीने केलं होतं. 


PC: Newlaundry 

या घटनेच्या दोन वर्षांनंतर, पुलवामा हल्ल्याविषयी टेलिव्हिजन रेटिंग एजन्सीचे तत्कालीन सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्याशी अर्णबने केलेले चॅट सार्वजनिक झाले. हे चॅट वाचल्यावर माझे रक्त अक्षरशः उसळायला लागले.


 मी आजवर हे ऐकलं होतं कि आपल्याकडे काही पत्रकार मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खातात. इथे तर टीआरपीसाठी सैन्यातील जवानांच्या मृत्यूचा उपयोग केला गेला होता. या सगळ्याची कुणीही कल्पना देखील केली नव्हती. आपल्या चॅनलचा टीआरपी वाढला असल्याचे सांगताना 'हा हल्ला आपण वेड्यासारखा जिंकला आहे' (This attack we have won like crazy) असे अर्णबने दासगुप्ता यांना लिहिलं आहे. 


 घरच्यांशी फोनवर बोलल्यानंतर मी जेव्हा चित्र-विचित्र आवाज ऐकून बाहेर आलो तेव्हा प्रचंड गोंगाट होता. मी रहात असलेल्या गुज्जरनगरमध्ये एक जमाव घुसला होता आणि आरडाओरडा करत होता. काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी मी घराच्या छतावर गेलो तेव्हा काळ्या धुराने आकाश व्यापलं होत. काश्मीर खोऱ्यातील गाड्यांच्या नंबर प्लेट बघून त्या गाड्यांची तोडफोड केली जात होती आणि त्या गाड्या पेटवून दिल्या जात होत्या. दंगा करणारे हे सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते. या जमावाने, आमच्या घरांवर, काचेच्या खिडक्यांवर दगडफेक केली.  राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मिरी मुस्लिमांच्याबद्दल हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण करण्यात अर्णबसारख्या पत्रकारांना यश आलं होतं. 

मला आठवतंय, तो शुक्रवारचा दिवस होता. आम्ही एकमेकांच्या आधाराने नमाजसाठी मशिदीत गेलो. आम्हांला कळून चुकलं होतं कि कुणीही आमच्या मदतीला येणार नाही. आम्ही ईश्वराकडे दैवी मदतीसाठी याचना करत होतो. महिला देखील रडत-गागत मोठमोठ्याने ईश्वराकडे प्रार्थना करत होत्या. प्रार्थनेनंतर शेजारच्या वस्तीतील मुस्लीम बांधव देखील आमच्या मदतीला आले. सगळ्यांनी मिळून हिंसक जमावाला गुज्जरनगरच्या बाहेर काढलं आणि आमच्या वस्तीचं रक्षण केलं. अनेकांना यावेळी १९४७ साली झालेल्या हत्याकांडाची आठवण झाली. या हत्याकांडात अडीज लाख मुस्लीम नागरिक मारले गेले होते आणि शेकडो लोक विस्थापित झाले होते. या हत्याकांडानंतर जम्मूच लोकसंख्याशास्त्र बदललं आणि मुस्लीम अल्पसंख्याक बनले. 

 



पण हे सगळ इथवर थांबलं नाही.

भारतातील टेलिव्हिजन अँकरांनी काश्मिरी नागरिकांना शत्रू म्हणून चित्रित करण्यात कुठलीही कसर सोडली नव्हती. आपले सगळे चॅनल केवळ टीआरपीसाठी लढले. आम्ही मात्र आमच्या जीवासाठी आणि गुज्जर नगरमधील महिलांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला आळा घालण्यासाठी लढा दिला. या हिंसक जमावामुळे आमच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. 

 

खरं तर आम्ही टेलिव्हिजन स्टुडिओतून आमच्याविरूद्ध चालवलेल्या लढाईचा प्रतिकार करण्यासाठी जमलो होतो.दंगल घडवणारा जमाव हजारोंच्या संख्येने होता तर आम्ही केवळ शे-दीडशे लोक होतो. रोमन साम्राज्यात राजाच्या करमणुकीसाठी कुणा गरीब कारागिराची आणि बलाढ्य सैनिकाशी किंवा जनावराशी जीवघेणी कुस्ती लावली जात असे, आमचीही अवस्था अशीच काहीशी झाली होती.


 या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी काश्मिरी नागरिकांना धमकावण्यात आले, त्यांच्यावर हल्ले केले गेले. गाझियाबादच्या एसआरएम विद्यापीठात शिकत असलेल्या माझ्या एका मित्राला विद्यापीठ सोडावं लागलं. देशभरात काश्मिरी नागरिकांना त्रास दिला जाऊ लागला, त्यांना बळजबरीने 'भारत माता की जय' असा जयघोष करायला भाग पाडलं गेलं. देहरादूनमध्ये राहत असलेल्या एका मित्राला हिंदुत्ववादी जमावापासून वाचण्यासाठी आणि खालसा सहायता कार्यालयाकडे पोहोचण्यासाठी कपाळावर टिळा लावावा लागला. देहरादूनमध्येच अनेक महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडून जायला भाग पाडलं.आमच्या आणखी एका मित्राला हरयाणामध्ये जमावाने मारहाण केली. अशा घटना देशभरात घडत असताना गरज होती ती एकीची.  लोक एकत्र येत होते खरे परंतु एकीसाठी नाही, तर आमच्यासारख्या अल्पसंख्याकांच्या विरुध्द!


अशा घटनांमध्ये वाढ होत असताना आम्ही जम्मू सोडण्याचा निर्णय घेतला. उधमपूरमध्ये एका मुस्लिम ड्रायव्हरला जिवंत जाळल्याची अफवा ऐकल्यावर आम्ही थांबलो. हे सगळ ऐकून आमचं अवसान गळाल. स्थानिकांनी दाखवलेल्या ऐक्यामुळे आम्हाला धीर आला होता आणि जम्मूच्या या मुस्लीम वस्तीतच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. लवकरच भारताच्या इतर भागांतूनही जीव मुठीत घेऊन काही काश्मिरी नागरिक येथे येऊ लागले.कालांतराने आम्ही जेव्हा पुन्हा निघण्याचा निर्णय घेतला,तेव्हा देखील आम्ही हिंमत करू शकलो नाही कारण घरी जाण्याच्या आमच्या रस्त्यात उधमपूर येणार होतं.आधीच तिथल्या बातम्या ऐकून आम्ही भयभीत होतो, म्हणून दहशतीच्या वातावरणात आम्ही जम्मूतच थांबलो. 


काही दिवसांनी काश्मीरकडे जाणाऱ्या गाड्या, बसेस आणि खासगी वाहनांना मध्यरात्री जाण्याची परवानगी दिली गेली. कसेबसे आम्ही आमच्या घरी, काश्मीरला पोहोचलो. परंतु या जातीय दंग्यांनी आमच्यावर खोल परिणाम केला आहे. दोन वर्षानंतरही आमच्या मनातली दहशत काही कमी झालेली नाही. न्यूजरूममधून आमच्यावर केलेल्या हल्ल्यांमुळे आमचं संपूर्ण आयुष्याच बदललं. आमचे मित्र आमच्यापासून दुरावले गेले, अनेकांवर मानसिक परिणामही झाला. मी अजूनही स्वतःला विचारतो कि, जम्मूतल्या त्या हिंसेसाठी,मला तेथून पळून जाण्यासाठी, माझ्यासारख्या अनेकांना शत्रू म्हणून चित्रित करण्यासाठी कोण जबाबदार आहे? न्यूज अँकर की तो हिंदू जमाव? आमच्या दुःखाचा फायदा घेऊन नागरिकांमध्ये फुट पाडण्यासाठी मी अर्णबसारख्या न्यूज अँकरला दोष देतो. भारतातील प्रसारमाध्यमे केवळ लोकशाहीची दमछाक करूच शकत नाहीत तर हिंदू-मुस्लिम विभाजनासमवेत जनतेचे ध्रुवीकरण देखील करू शकतात हे आता स्पष्ट झाले आहे.माझ्यासाठी दुसरं घर असलेलं जम्मू आता मला आपलंसं वाटत नाही. मी हे जड मनाने सांगत आहे की जम्मूमध्ये मुस्लिम सुरक्षित नाहीत.


मूळ लेखक: मेहराज नियाज बाजदार

अनुवाद: सागर भालेराव

जन आंदोलनातील हिंसा आणि संघाचा परस्परसंबंध

 २६ जानेवारीला दिल्लीत झालेला राडा आपण सर्वांनी पाहिला. गेल्या ५०-६० दिवसांपासून दिल्लीत शेतकऱ्यांनी शांततापूर्ण वातावरणात आंदोलन केले. निगरगट्ट सरकार मात्र त्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाही. २६ जानेवारीला शेतकरी ट्रॅक्टर यात्रा काढतील अस जाहीर झाल्यांनतर आशा होती कि सरकार या यात्रेला परवानगी देणार नाही. परंतु घडलं अगदी उलट. सरकारने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर यात्रेला परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयाने शेतकऱ्यांसोबत सामान्य नागरिक देखील आश्चर्यचकित होते. ही खेळी खेळण्यामागे सरकारची मनीषा काय होती हे काल स्पष्ट झालं. 

पोलिसांकडून आखून देण्यात आलेल्या रस्त्यावरून शेतकऱ्यांनी त्यांची ट्रॅक्टर यात्रा सुरु केली. यात देशभरातून शेतकरी आपापल्या परीने सामील झाले होते. महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे येथून लोकसंघर्ष मोर्चाच्या आंदोलकांच नेतृत्व प्रतिभाताई शिंदे करत होत्या. ट्रॅक्टरवर जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी यांची वेशभूषा केलेल्या शेतकरी माय-माऊल्या दिसत होत्या. तिकडे दिल्लीत काय घडतंय याचे अपडेट्स प्रतिभाताई शिंदे, योगेंद्र यादव यांच्या मेसेजवरून कळत होते. 

महाराष्ट्राची झलक दाखवणारी 'किसान गणतंत्र परेड'  

एकीकडे सगळ काही सुरळीत असताना अचानकपणे शेतकऱ्यांवर लाठीहल्ला, पोलिसांशी झडप अशा बातम्या येऊ लागल्या. गेला महिने-दोन महिने संयम बाळगून असलेले शेतकरी इतकं आततायी कसं वागू शकतात हाच प्रश्न सगळ्यांना पडला होता. कुणी एक तरुण लाल किल्ल्यावर जातो काय, तिथे झेंडा फडकवतो काय आणि स्वतःच हसं करून घेतो काय, हे सगळ समजण्यापलीकडे होत. 



परंतु काही तासांत त्या युवकाची ओळख पटली. लाल किल्ल्याच्या एका पोलवर शिख धर्मियांच निशाण साहिब फडकावणारा व्यक्ती होता दीप सिद्धू. हा एक नवखा अभिनेता असून भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सनी देओल यांच्या प्रचाराची  धुरा हाच सांभाळत होता. सुरुवातीला आंदोलनात आल्यानंतर त्याने आंदोलनाचे वातावरण बिघडवण्याचे काम सुरू केल. आंदोलनात तो खलिस्तानवादी भाषणं द्यायला लागला.आंदोलनाच्या संयोजकांनी त्याला वेळीच थांबवलं. 

परंतु शेतकऱ्यांच हेआंदोलन बदनाम करण्याचा चंग बांधलेल्या दीपने ट्रॅक्टर यात्रेत घुसखोरी केली आणि जाणीवपूर्वक लाल किल्ल्यावर झेंडा फडकावला. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत त्याची छायाचित्रेही प्रकाशित झालेली आहेत. यावरून दीप सिद्धूचा आणि भाजपचा परस्परसंबंध तुमच्या लक्षात आला असेल. 

Deep Siddhu with Narendra Modi

मा. प्रधानमंत्री आणि दीप सिद्धू, खा. सनी देओल 

असंवेदनशील राज्यकर्ते जर सत्तेत असतील तर विरोधकांची मते ऐकली जात नाहीच पण सोबतच त्यांना वाट्टेल त्या मार्गाने नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. शाहीन बाग आंदोलनात गुंजा कपूर नावाची एक आरएसएसची कार्यकर्ती बुरखा घालून शामिल झाली होती. या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लावताना तिला इतर आंदोलकांनी पकडल होत. तिचं पुढ काय झालं? 

शाहीनबागेतच महिला आंदोलाकांवर गोळीबार करू पाहणाऱ्या कपिल गुर्जरची  भाजप,आरएसएसशी जवळीक जगजाहीर आहे. 

जामिया विद्यापीठातील आंदोलकांवर गोळ्या झाडणारा गोपाल देखील उजव्या विचारसरणीच्या संघटनेचा कार्यकर्ता राहिलेला आहे. अराजक तत्वे सामजिक आंदोलनात सोडून आंदोलन हाणून पडण्याचा डाव खुद्द सरकार दरबारी आणि मंत्र्यांच्या सांगण्यावरून होत असल्याचं आता स्पष्ट झालय. 


शाहीनबागेत गोळीबार करणाऱ्या कपिल गुर्जरचा भाजप प्रवेश झाला आहे. 

यापुढे आंदोलनात कोण कोण सहभागी होत आहेत आणि कुठल्या विचारधारेचे आहेत हे तपासून घ्याव लागणार आहे.

 सत्तेने मस्तवाल झालेले राज्यकर्ते आता कुठल्याही थराला जाऊ शकतात हे कालच्या घटनेने आपल्याला कळून चुकलंय. 


 

स्वातंत्र्याचा सनातनी गाळ






स्वातंत्र्याच्या डोहात 

डुबकी लावणाऱ्या प्रत्येकाला आज करावा लागतोय सामना,

तळाशी असलेल्या सनातनी गाळाचा!


हा गाळ खेचत असतो तुमचे-आमचे  पाय

आणि जाणीव करून देत असतो आपल्याच पुरातन,विखारी रुढींची!


हा गाळ घेतोय जीव रोहित वेमुलाचा,

डेल्टा मेघवालचा, नजीबचासुद्धा!

विचारवंतांवर गोळ्या झाडून बंदुका फेकल्या जातायेत याच गाळात.

झुंडबळी घेऊन आलेला जमाव सूर्याला देतो अर्घ्य याच डोहात उतरून. 

हा गाळ दिवसेंदिवस बनत चाललाय अक्राळविक्राळ, 

हिटलरच्या नाझीवादासारखा, नमरुदच्या आततायीपणासारखा!


हा गाळ साफ करू पाहणाऱ्या प्रज्ञावंताना  दाखवला जातोय तुरुंगाचा रस्ता,

आणि पहारेकऱ्यांना विचारले जातायेत त्यांच्या नागरिकत्वाचे पुरावे!


मायबाप शेतकऱ्यांना देखील या तळ्याच्या काठाशी विश्रांती घेण्याची सवलत नाही. 

प्रवासी कामगारांना इथे घोटभर पाणी देखील मिळू शकत नाही,

तुम्ही-आम्ही  कुणीच सांगू शकत नाहीये हक्क या डोहावर! 


स्वातंत्र्य ही तर केवळ मनाची अवस्था ना? 

वाटलं तर स्वंतत्र नाही तर गुलाम!

मनावरचा हा गाळ देखील उपसावा लागेल. 

डोहाच्या काठावर असलेल्या लोकांनाही आता डोहात उतरावं लागेल,

गाळात अडकलेल्या स्वातंत्र्य, बंधुता, समता आणि सामाजिक न्याय 

या मूल्यांना बरबाद होण्याआधीच वर काढावं लागेल!


चला, सुरुवात करताय ना? 

हा सनातनी गाळ उपसायला?

याच डोहाच्या तळाशी  'आनंदी तरंग' घेऊन तुकोबा उभा आहे, 

आपल्या विद्रोहाच्या पोथ्या घेऊन! 


- सागर भालेराव 

मो. ९९६७०५५६३०

मुकनायकाच्या शब्दाला धार येईल ग...

आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागला. या निकालात लढाऊ तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून आल्याचं आशावादी चित्र तर आहेच. सोबतच जळगावच्या भादली बुद्रुक गावातून अंजली पाटील ही तृतीयपंथीय उमेदवार देखील निवडून आलीये. अंजलीचं निवडून येणं हे अनेकार्थाने महाराष्ट्राच्या जनतेला समजून घ्यावं लागेल. प्रत्येक नवनिर्मितीमागे संघर्ष हा असतोच. याच संघर्षातून अंजलीला देखील जावं लागलं. 



निवडणूक अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज नाकारला होता.  तिने स्त्री राखीव वार्डातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. आपली ओळख 'तृतीयपंथी' सांगणाऱ्या अंजलीला मात्र जुन्या कायद्याच्या आधारे या राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवल गेलं. ज्यांच्या हाती प्रशासकीय सत्ता आहे त्यांनाच जर नवीन कायदे माहिती नसतील तर मनस्ताप हा सामान्य नागरिकांनाच होत असतो हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अंजलीच्या बाबतीतही तेच झालं. तिसऱ्या महिला आयोगाने महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांना सवलती दिल्या जाव्यात असा निर्वाळा केला होता. तसेच २०१९ च्या कायद्यानुसार कुठलीही सज्ञान व्यक्ती आपले लिंग निश्चित करू शकतो/शकते हे ही सरकारी अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं. अशावेळी अंजलीची मैत्रीण, समलैंगिक हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती शामिभा पाटील ही तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सरळ औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत कायद्याचे दाखले न्यायपिठासमोर सादर केले. न्यायालयात मानवी हक्काची लढाई अंजली जिंकली. तिचा अर्ज वैध ठरवला गेला आणि तिला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.

भादलीचे ग्रामस्थ अंजलीची ही चिकाटी न्याहाळत होते. विकासाच्या गप्पा केवळ दाढीची लांबी आणि छातीची रुंदी बघून होत नसते हे त्यांना चांगलच ठाऊक होत. अंजली आरोग्य, शिक्षण, समानता या मुद्द्यावर प्रचार करत होती. लोकांनी तिची तळमळ ओळखली. खोटेपणाचा आलाप जसा कर्कश भासतो तसाच खरेपणा सोन्यासारखा चकाकत असतो. अंजली आणि शामिभा या दोघीही वंचित बहुजन आघाडीचं काम करतात. ऍड.प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही निवडणूक लढवली होती. वंचित समूह घटकांना अजूनही मानवी हक्कांसाठी लढावं लागतं आणि जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हे अनेकांनी पाहिलंय. जातीपातीच्या भिंतींना आता कुठे हादरे बसू लागले आहेत. लिंगाधारित समतेवर, त्यातही समलैगिंकतेवर बोलणं अजूनही पाप समजलं जात अशा समाजात अंजलीचं निवडून येणं ही नव्या युगाची नांदी आहे. महाराष्ट्रात विजयी झालेली अंजली ही एकुलती एक तृतीयपंथी उमेदवार आहे. तिचे मनापासून अभिनंदन! 

समतेच्या, समानतेच्या चळवळीत अंजली आणि शामिभा सारख्या लढाऊ कार्यकर्त्यांनी सूत्रे हाती घेतली तर येणारा काळ प्रत्येकासाठी संधीची समानता घेऊन येईल.काल-परवा पर्यंत आपापल्या मुद्द्यावर एकएकटे लढणारे हे जीव संसदीय लोकशाहीत पाऊल ठेऊ मागतायेत, याचाच अर्थ मुकनायकाच्या शब्दाची धार येत्या काळात आणखी वाढणार आहे.