जनकवी - शैलेंद्र कुमार

जनकवी - शैलेंद्र कुमार

३० ऑगस्टला जनकवी शैलेंद्र कुमार यांची जयंती आपण साजरी केली. त्यानिमित्ताने केलेला हा लेखनप्रपंच. 

लहानपणापासून आपण त्यांची गाणी ऐकत आलो आहोत. अंताक्षरी खेळताना त्यांनी लिहिलेली सिनेमातील गाणी आपण गातो, पण ही गाणी लिहिणारा हा कवी कोण हे आपल्याला माहीत नसतं. तुम्ही 'आवारा हु, या गर्दीश में आसमान का तारा हूँ', 'बरसात में हमको मिले तुम सजन, तुमसे मिले हम',  'मेरा जूता है जापानी' ही सगळी गाणी आपण कधी ना कधी ऐकली असतील, आजही ऐकत असाल. ही एकाहून एक सर्रास गाणी लिहिणारा कवी म्हणजे शैलेंद्र कुमार. रावळपिंडीतल्या एका दलित कुटुंबात जन्माला आलेले शैलेंद्र पोटापाण्यासाठी मथुरा येथे स्थायिक झाले. पुढे नोकरीनिमित्त परेलच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये कामाला लागले. मुंबईत खऱ्या अर्थाने त्यांची प्रतिभा फुलली-फळली. पुढे कामगार चळवळीत डाव्या विचारधारेने प्रभावित होऊन त्यांनी 'इप्टा' मध्ये आपला राबता वाढवला. आपल्या कवितांमधून सामाजिक विचार आणि वर्गसंघर्षाची ठिणगी पेटवण्याचं काम त्यांनी केलं. इप्टाच्या एका संमेलनात  'जलता है पंजाब' नावाची त्यांची कविता राज कपूर यांनी ऐकली आणि त्यांना सिनेसृष्टीसाठी एक कोहिनूर सापडला. त्यावेळी राज कपूर 'बरसात' च्या चित्रीकरणात व्यस्त होते. बरसात  चित्रपटासाठी गाणी लिहिण्याची विचारणा राज कपूरांनी त्यांना केली. सिनेगीत लिहिण्यासाठी शैलेंद्र कुमारांनी त्यांना नकार दिला.पुढे आर्थिक चणचण भासल्यावर त्यांनी राज कपूरची भेट घेतली आणि बरसातसाठी गाणी लिहिण्याची तयारी दर्शवली. त्यांनी लिहिलेल 'बरसात में हमको मिले तुम' हे गाणं सुपरहिट ठरलं. कुणा चित्रपटासाठी टायटल सॉंग लिहिण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याच संपूर्ण श्रेय शैलेंद्र कुमार यांचंच. येथून शैलेंद्र यांची हिंदी चित्रपटसृष्टीत कारकीर्द सुरु झाली. 
'आवारा हूँ' हे गाणं देखील तसंच गाजलं. नोबेल पुरस्कृत रशियन लेखक ऍलेक्सझंडार सोल्जेनिट्स यांनी आपल्या 'केन्सर वार्ड' या पुस्तकात सदर गाण्याचा सन्मानपूर्वक उल्लेख केला. आवारा सिनेमा जेव्हा फ्रांसमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा त्यातील गाणी ऐकून वन्स मोअरच्या आवाजाने सभागृह दणाणलं होतं. खचितच इतकी प्रसिद्धी कुण्या हिंदी गाण्याला परकीय भूमीवर मिळाली असेल. याच पद्धतीने 'श्री 
४२०' मधील 'मेरा जुता है जापानी' या गीताला हॉलिवूडने केलेल्या एका सर्वेक्षणात सर्वश्रेष्ठ गीतांच्या यादीत स्थान दिले आहे.आजवरचे हे एकमेव उदाहरण ठरले आहे. १९५३ मध्ये प्रदर्शित झालेला 'बूट पॉलिश' हा सिनेमा देखील अतिशय गाजला. त्यात शैलेंद्र यांनी 'नन्हें मुन्ने बच्चे 'तेरी मुठ्ठी में क्या है' हे गाणं लिहिलं. प्रश्नोत्तर शैलीत लिहिलेलं हे पहिलं गीत ठरलं. 
१९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मासूम' या चित्रपटासाठी त्यांनी एक गीत लिहिलं. आजही हे बालगीत घराघरात गायलं जात. गीत होतं,
नानी तेरे मोरनी को मोर ले गये 
बाकी जो बचा था काले चोर ले गये 
बालगीतांपासून चळवळीच्या गीतांपर्यंत सर्वांगी लिहिणारा हा कवी एक अजब रसायन होता. 
लोकप्रियता आणि उत्कृष्टता यांचा नितांत सुंदर आविष्कार साधण्यात ज्या फार कमी कवींना यश प्राप्त झालंय,त्यात शैलेंद्र कुमारांचं नाव सगळ्यात पुढे आहे. साध्यासोप्या अभिव्यक्तीचा आविष्कार आपल्याला त्यांच्या गीतांमधुन पाहायला, अनुभवायला मिळतो. आपल्या रचनेत सामान्य माणसाला चितारण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगं आहे. त्यांच्या कविता सरळ तुमच्याशी संवाद साधतात. त्यांच्या कवितांचा अर्थ समजून घेण्यासाठी तुम्हाला कुणा प्राध्यापकाची, विश्लेषकाची गरज नाही. कदाचित त्यामुळेच समीक्षकांनी या जनकवीकडे म्हणावे तितके लक्ष दिले नाही. त्याबाबतीत त्यांची उपेक्षाच केली गेली. परंतु साहित्यसेवेने समाजसेवा केली जाऊ शकते याचं उदाहरण त्यांनी भारतीय समाजला घालून दिल. 
१९४२ च्या लढ्यात गांधी विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.त्यात त्यांना अटकही झाली. परंतु स्वतंत्रप्राप्ती नंतर बदलत्या स्थित्यंतरावर ते नाराज होते. गोरे साहेब जाऊन काळे साहेब आले अशीच त्यांची धारणा होती. कामगार चळवळीत सक्रिय असलेल्या शैलेन्द्रांनी चळवळीची गाणी लिहिली. 'हर जोर जुलूम कि टक्कर में, संघर्ष हमारा नारा है' हा वापरला जाणारा नारा शैलेंद्र यांचीच रचना आहे.आंदोलनात आपलं मनोबल वाढविणारा हा नारा कुणी लिहिला याची चळवळीतल्या फार कमी लोकांना कल्पना असेल. त्यांची गीतं लोकगीतं का बनली याचं स्पष्टीकरण आपल्याला या उदाहरणातून मिळतं. साधी सरळ रचना हे त्यामागचं कारण आहे.१९५५ मध्ये त्यांचा 'न्योता और चुनौती' हा कवितासंग्रह प्रकाशित केला गेला. त्यांचा हा एकमेव कवितासंग्रह त्यांनी कॉ. अण्णाभाऊ साठेंना समर्पित केला.
चित्रपटांसाठी लिहिलेल्या गाण्यांमधूनही साम्यवादी विचार प्रदर्शित करण्याचा त्यांचा हेतू असायचा. खालील उदाहरणांवरून आपल्याला त्याची कल्पना येईल. 

पंडित जी मंतर पढ़ते है 
वो गंगा जी नहलाते है 
हम पेट का मंतर पढ़ते है 
जूते का मुँह चमकाते है 
पंडितजी की पांच चवन्नी है 
अपनी तो एक इकन्नी है 
फिर भेदभाव ये कैसा है 
जब सब को प्यारा पैसा है  {बूट पॉलिश} 

तत्कालीन समाजव्यवस्थेचं चित्रण करताना ब्राम्हणवादावर शैलेंद्र कुमार टिका करताना दिसतात. 

रात दिन हर घडी एक सवाल 
रोटी कम है क्यों अकाल 
क्यों दुनिया में कमी है 
ये चोरी किसने की है 
कहाँ है सारा माल 
कहाँ है सारा माल {छोटी बहन}

वामनदादा कर्डक यांच्या 'सांगा आम्हाला टाटा बिर्ला बाटा कुठं हाय हो' या गाण्याशी भावार्थ सांगणार हे गीत चळवळीतल गीत वाटावं असच आहे. सिनेमांच्या गीतातही वैचारिक लिखाण करणारे शैलेन्द्र कुमार म्हणून तर इतर कवींच्या तुलनेत वेगळे आहेत. 
आज या पद्धतीने समाजव्यवस्थेच चित्रण करणारा कवी असता तर नक्कीच 'अर्बन नक्षलवादी' ठरला असता. आपल्या गीतांमधून राजव्यवस्थेला प्रश्न विचारणारा हा कवी लिहितो, 

'भगतसिंग इस बार न लेना काया भारतवासी की, 
देशभक्ति के लिए आज भी सजा मिलेगी फांसी की' 

भगतसिंगला या देशात पुन्हा जन्म घेऊ नको, अन्यथा देशद्रोही ठरवला जाशील असा सल्ला देणारा हा जनकवी खऱ्या अर्थाने जनतेचा, शोषितांचा आणि वंचितांचा आवाज होता. मुख्य प्रवाहातील समीक्षकांनी त्याला दुर्लक्षित केलं पण जनतेच्या मनात हा जनकवी आजही आपलं अढळ स्थान अबाधित ठेऊन आहे. 

भारतमाता मदर तेरेसा

जगात आस्तिक-नास्तिक वाद अनादी काळापासून सुरु आहे. आजही त्यावर वेळोवेळी चर्चा होत असते. असे असंले तरी अशा वादविवादात न पडता देवावर श्रद्धा ठेऊन आपल्या कार्यात आनंद मानणारे खूप आहेत. तसेच देवावर विश्वास न ठेवता केवळ स्वतःवर विश्वास ठेऊन नवनिर्माणाची प्रेरणा वाहणारे देखील तेवढेच आहेत. आपलं आस्तिक असणं, नास्तिक असणं  किंवा निरीश्वरवादी असणं हे सगळं बाजूला ठेवून कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवण्याची शिकवण देणाऱ्या निष्काम कर्मयोगाची हीच तर खरी प्रेरणा. हाच प्रेरणेचा स्रोत भारतीयांना मदर टेरेसांच्या रूपाने चैतन्य देऊन गेला. त्यांनी घालून दिलेला आदर्श आजच्या असहिष्णुतेच्या वातावरणात आवर्जून अभ्यासावा असाच आहे.

क्षमा करणे ही प्रेमाची सुरुवात असते- मदर तेरेसा 

सातासमुद्रापार जन्मलेली बाई येशू ख्रिस्ताची मानवतावादी शिकवण घेऊन भारतात येते आणि भारताचीच होऊन जाते ही घटना सामान्य नक्कीच नाही. तत्कालीन परिस्थितीचा धांडोळा घेतला तर धार्मिक वृत्तीच्या मदर तेरेसांना भारतीय समाजात राहून कार्य करताना कुठल्या राजकीय,सामाजिक, धार्मिक आणि मानसिक परिस्थितून जावं लागलं असेल हे समजून घेणं महत्वाचं ठरतं. वयाच्या अठराव्या वर्षी नन बनलेली ही बाई भारताला आपलं कार्यक्षेत्र निवडते. कलकत्ताजवळच्या एंटाली गावात शिक्षिका म्हणून काम सुरु करते. सलग १७ वर्षे शिक्षिका-मुख्याध्यापिका म्हणून भूमिका बजावते. भारताच्या एकूण समाजरचनेत अगदी खालच्या वर्गातून आलेल्या लहानग्यांना शिक्षणाची गोडी लावते हे विशेष. ही कॉन्व्हेंट शाळा होती. सहाजिक तेथे धार्मिक शिक्षण दिलं जायचं. ख्रिश्चन मिशनरीज धर्मप्रचारासाठीच भारतात कार्यरत होत्या हा तो काळ होता.  अशा परिस्थितीत जेव्हा त्या शिक्षिका म्हणून काम करायच्या तेव्हा  धार्मिक बाजूने कमी आणि मानवतेच्या अंगाने त्या अधिक काम करायच्या.यादरम्यान दुसरं महायुद्ध सुरु झालं होत. जपानने ब्रम्हदेश ताब्यात घेतलं आणि इंग्रजांना देखील पश्चिम बंगालात खबरदारी म्हणून लष्करी तळ उभारावं लागलं. त्यात मदर तेरेसांची शाळा अन्यत्र हलवली गेली. दरम्यान गांधीजींच्या नेतृत्वाखाली १९४२ साली चाले जावं चळवळ जोर धरत होती. बंगाल तर स्वातंत्र्यसैनिकांची भूमी. राजा राममोहन रॉय ते सुभाषबाबू असा या मातीचा इतिहास. पाहायला गेलं तर धर्माच्या आधारे तेरेसांनी ब्रिटिशांना मदत करायला हवी होती. ब्रह्मदेशातून भारतात स्थलांतरित झालेल्या नागरिकांना त्यांच्या नशिबावर सोडून द्यायला हवं होतं. ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन उभारणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडून दयायला हवं होत. पण त्यांनी तस काही केलं नाही. धर्मप्रचारासाठी जरी त्या भारतात आल्या असल्या तरी त्यांनी मानवतेलाच सर्वश्रेष्ठ मानलं. पुढे याची त्यांना किंमत चुकवावी लागली.

१६ ऑगस्ट १९४६ ला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगने 'प्रत्यक्ष कृती' कार्यक्रम सुरु केला. बंगालात हिंदू-मुस्लिम दंगली पेटल्या. रक्ताच्या थारोळयांनी कलकत्ता शहर माखलेलं असताना, शहरात दंगली उफाळून आलेल्या असताना आपल्या पदराखाली असलेल्या २०० अनाथांना  सांभाळत असलेली ही मायमाऊली दंगलग्रस्तांना देखील मदत करत होती. पुढे  १९४७ भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. इंग्रज देश सोडून गेले. भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. पण फाळणीमुळे देशाचं जनमानस बिघडलेलं होत. सीमाभागात दंगली पेट घेत होत्या. अशा वेळी मदर तेरेसांना देश सोडून जाणं सहजशक्य होत. पण इथेच  त्यांचं वेगेळेपण पाहायला मिळत. त्या मिशनरीचं काम करत असल्या तरी मानवता या मूल्याला त्यांनी अग्रक्रम दिला. या घटनेचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी भारतातच राहून लोकांची सेवा करण्याचं ठरवलं.

धर्मकार्यासाठी आलेल्या तेरेसांना लोकसेवा करण्याची संमती घ्यावी लागली. ही संमती थेट व्हॅटिकन चर्चमधून मिळवावी लागली. त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेता त्यांना तशी संमती दिली गेली. शिक्षिका असलेल्या या बाईने भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आणि नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. हा त्याच्या जीवनातला दुसरा असा महत्वाचा टप्पा म्हणता येईल. क्षय,मलेरिया, कुपोषणग्रस्त, कुष्ठरोगी अशा समस्या असलेल्या वातावरणात हे काम हाती घेणं नक्कीच सोपं नव्हतं. त्यांची काम करण्याची जिद्द पाहून काहींनी त्यांचं कौतुक केलंच, पण कर्मठ धर्मगुरूंनी टीकादेखील सुरु केली. तेरेसा यांनी ख्रिश्चन धर्माची शिकवण द्यावी, लोकांचे धर्मांतर करावे म्हणून त्यांना नेमण्यात आल्याची मिशनरींची धारणा होती. तर आपले काम हे देवाचे आणि धार्मिक सेवेचे आहे असं तेरेसांना वाटत होत. मिशनरी म्हणत, 'सिस्टर तेरेसा या धर्मोपदेशक आहेत', तर तेरेसा म्हणत , 'मी कर्मोपदेशक आहे'.

आजचे जग हे केवळ अन्नासाठी भुकेलेले नाही. ते प्रेम,आपुलकी आणि मायेचा स्पर्श यासाठी तडफडत आहे. - मदर तेरेसा 

फिरते दवाखाने आज आपण आपल्या आसपास पाहतो आहोत. त्याची मूळ प्रेरणा आणि कल्पना ही मदर तेरेसांचीच. ज्या महारोग्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचणे देखील शक्य नाही, अशा रोग्यांपर्यंत स्वतः पोहचून सेवा देण्याचा त्यांचा यामागचा विचार होता. मदर तेरेसा म्हणत, 'जगातील सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो म्हणजे आपण नकोसे झाल्याची भावना'. आज जर त्या ह्यात असत्या तर काश्मीर प्रश्नावर नक्कीच व्यक्त झाल्या असत्या. काश्मिरी नागरिकांच्या मनात असलेली एकाकीपणाची भावना,न्यूनगंड त्यांनी जाणून घेऊन संवादाची सुरुवात नक्कीच केली असती. 

मदर तेरेसा म्हणजे ख्रिश्चन धर्मसत्तेला पडलेलं एक कोडं होत. त्यांनी धर्मोपदेशक न बनता कर्मोपदेशक होऊन आपल्याच धर्मसत्तेला आव्हान दिलं. त्यांना संतपद द्यावं कि नाही याविषयी धर्मसत्तेतील धुरिणांनी व्यापक चिंतन केलं. धर्मसत्ता कुठलीही असू द्या ती पुरुषसत्ताकच असते. तेव्हा कुठलाही प्रस्थापित धर्म एखाद्या स्त्रीला संतपद देण्यास तयार नसतो. धर्माचे ठेकेदार मरणोत्तरही तेरेसांना संतपद देण्यास तयार नव्हते. परंतु, देवावर श्रद्धा ठेऊन मानवतेची शिकवण देणाऱ्या महामानवांना धर्मसत्तेने नव्हे तर लोकांनीच संत मानले. शेवटी या महान बाईसमोर धर्मसत्तेला झुकावे लागले. चर्चने घालून दिलेल्या साऱ्या अटी त्यांनी मान्य केल्या होत्या. आयुष्यभर त्यांनी या कठोर अटींचे पालन केले,परंतु धर्मप्रसार मात्र केला नाही.असहाय लोकांची सेवा हीच आपली प्रभूभक्ती असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारामुळे त्यांना चर्चची नाराजी भोगावी लागली. मृत्यूपश्चातही त्यांना चर्चचा विरोध कायम राहिला. हा विरोध नंतर मावळला. भारतीय समाजात काम करत असताना इथल्या सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर जे काही भलेबुरे परिणाम घडत होते त्या सर्वांचा परिणाम तेरेसांवर झालेला आढळतो. शेवटच्या श्वासापर्यंत त्या मानवतावाद सांगत होत्या. आज भारतात जेव्हा मॉब लिंचिंगसारख्या घटना घडत आहेत, अशा काळात त्यांची शिकवण महत्वाची वाटते. त्या म्हणतात, ' जर प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यात प्रभूचे रूप पाहण्याचे ठरविले तर जगातील संहारक अण्वस्रे कालबाह्य ठरतील'. तुकोबांपेक्षा त्या वेगळं काय सांगत होत्या? धर्मसत्तेने त्यांना संतपद देण्याअगोदर भारतीय समाजाने त्यांना संतपद बहाल केलं. त्यांना आई मानलं. जननीचा दर्जा दिला.आपल्या सहिष्णू परंपरेचं इतकं विशाल आणि व्यापक उदाहरण आपण कसे काय विसरलो?

चंद्रावर जरी गरीब-कष्टी आढळला, तरी त्याच्या सेवेसाठी मी चंद्रावरसुद्धा जाईन.- मदर तेरेसा 

धार्मिक असणं आणि धर्मांध असणं यातला खरा फरक मदर तेरेसांनी आपल्याला समजून सांगितला. काही धर्मांध अधेमधे कधी लहर आली की मदर तेरेसांच्या कार्यावर शंका घेत असतात,पण त्यामुळे त्यांचं मोठेपण कमी होत नाही. धर्मप्रसार केला नाही म्हणून धर्मसत्तेची नाराजी ओढून घेणाऱ्या मदर तेरेसांच्या कार्यावर जेव्हा संघप्रमुख मोहन भागवत शंका घेतात तेव्हा खरं त्यांचं खुजेपण आपल्यासमोर येतं. साऱ्या जगाने जिला आपली 'आई' मानलं तिच्याविषयी अधिक जाणून घेणं म्हणजे आपल्या आईकडेच नव्या नजरेनं पाहणं असंच नाही का? भागवतांसारख्या अनेकांना अशी नजर लाभो, ही असलेल्या-नसलेल्या देवाला प्रार्थना. 


पूर्वप्रसिद्धी: मॅक्समहाराष्ट्र, २६ ऑगस्ट, २०१९

...लोकशाहीचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही.



विंग कमांडर #अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना भारतीय माध्यमं ज्या पद्धतीने वागली त्याच विश्लेषण आताच्या परिस्थितीत व्हायलाच हवं. ते टाळून आपण पुढे जात असू तर आपल्यासारखे अविचारी आपणच ठरणार आहोत. माध्यमांची म्हणून एक नैतिकता असते. ती पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकातून शिकवली जाते. परंतु जेव्हा याच नैतिकतेला डावलून आपण स्वतःच एक व्यवस्था आहोत या अविर्भावात आपलं काम करणार असू तर भारतीय पत्रकारितेला घरघर लागली आहे असे समजण्यास भरपूर वाव आहे. संविधानात पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचं कुठलही वेगळं कलम नाही. पत्रकारांना कुठलीही वेगळी सवलत नाही, विशिष्ट वागणूक नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे काही हक्क आणि मर्यादा कुठल्याही भारतीय नागरिकाला आहेत त्याचा मर्यादा आणि हक्क पत्रकारांना देखील लागू आहेत. नेमकं हेच आपण विसरलो आहोत. कमांडर अभिनंदन ज्या दिवसापासून पाकिस्तानच्या अटकेत होते त्या दिवसापासून भारतीय माध्यमांनी आक्राळस्तेपणाने वागायला सुरुवात केली. माध्यम म्हणून आपल्या काही मर्यादा आहेत हे जवळजवळ सर्वच पत्रकार विसरले. अर्थातच याला सन्माननीय अपवाद आहेत. हिंदी, इंग्रजी सहित सर्व माध्यमांनी युद्ध पुकारलंच पाहिजे, ठेचून काढा, गाडून टाका अशी अविचारी भाषा वापरली. परस्पर माध्यमांनीच युद्ध पुकारल्यासारखी परिस्थिती आहे. वर्तमानपात्र वाचून, टीव्ही चॅनेल पाहून निश्चितच जनमत बनतं. जेव्हा माहिती मिळण्याची कुठलीच व्यवस्था नसते तेव्हा आपल्या सर्वांची भिस्त असते ती माध्यमांवर. माध्यमे जी काही माहिती देतील त्यावर आपण विश्वास ठेवतो. 


याठिकाणी माध्यमांच्या नैतिकतेच, विचारीपणाचं आणि विवेकीपणाचं दर्शन घडवायला हवं होत. भारतीय माध्यमांनी ही संधी गमावली. हातात खेळण्यातली बंदूक घेऊन, सैनिकांच्या वेशात राष्ट्रवादाने, राष्टभक्तीने भारलेले पत्रकार न्यूजरूम मध्ये बातम्यांचे निवेदन देताना आपण पहिले. आपले विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानात कुठलीही माहिती देत नव्हते. जे काही प्रश्न त्यांना विचारले गेले त्याची माहिती देण्याचं त्यांनी टाळलं. देशहितासाठी हे महत्वाचं होत. शत्रूराष्ट्राला कुठलीही गोपनीय माहिती मिळता कामा नये यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. कमांडर अभिनंदच्या अगदी विरुद्ध भारतीय माध्यमे वागली. कमांडर अभिनंदनच्या आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध आपल्या माध्यमांनी घेतला. त्यांचं गाव शोधून काढलं, तिथे आपले कॅमेरामन, ओबी व्हॅन पाठवल्या गेल्या. कुठल्या विमानातून त्यांनी कारवाई केली, कोणत्या वेळेला केली याचं विस्तृत वर्णन प्राईम टाईमच्या भपकेबाज फालतू चर्चेमध्ये केलं गेलं. निवृत्त सेनाधिकाऱ्यांना शोधून शोधून न्यूजरूममध्ये आणलं गेलं. टीआरपी वाढवण्यासाठी हा सगळा खेळ खेळला गेला. चर्चेत निवृत्त सैन्याधिकारी कमी बोलू दिल गेलं, पण न्यूज अँकर गळा फाडून ओरडताना आपण पाहिले. माध्यमांनी संवादाचं काम करायचं आहे हे विसरता काम नये. घडल्या प्रकारावरून हे मात्र स्पष्ट झालं की भारतीय माध्यमे अजूनही बाल्यावस्थेत आहेत. भावी पिढीला विचारी बनवायचं असेल आणि सामाजिक एकता अबाधित ठेवायची असेल तर आपल्या माध्यमांना खूप मेहनत घ्यावी लागेल. सरकारलाही हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं लागेल. युद्धजन्य परिस्थितीत माध्यमांनी कसं वागलं पाहिजे, कसं वार्तांकन केलं पाहिजे याची नियमावली बनवली पाहिजे, आणि अर्थातच त्याची अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे. असे जर होणार असेल तरच लोकशाहीच्या चौथ्या खांबाला किंमत आहे. असे होणार नसेल तर हाच चौथा खांब लोकशाहीचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही. 

पाय धुवून तळपायाची आग शांत होणार नाही !

फाई कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नव्हते आणि सफाईचा प्रश्न बिकट होत चालला होता. त्यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी गांधीजी स्वतः गेले. स्वतः हातात झाडू घेतला आणि शौचालयाची स्वच्छता केली. 'हरी आला रे, हरी आला, भंग्या घरी, हरी आला' असं म्हणतं कर्मचाऱ्यांनी संप मिटवला. गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाई केली. त्यांची नकल करणाऱ्या मोदींनी गांधीजींकडून काय आदर्श घेतला? 



काल प्रधानमंत्री मोदींनी अलाहाबादमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. यावेळी पाय धुतांना कॅमेऱ्याची साग्रसंगीत व्यवस्था पहायला मिळाली. आदरणीय पंतप्रधानांनी ५ सफाई कर्मचाऱ्यांचे कचऱ्यात न माखलेले पाय धुतले. याचा व्हिडियो, फोटो कालपासून सामाजिक माध्यमांवर इकडून-तिकडे आणि तिकडून -इकडे पाठवला जात आहे. एकाचा पाय धुवून झाला कि दुसरा लगेच आपले पाय पुढे करतो आहे. असं शक्यच नाही. कोण भला माणूस आपले पाय धुवून घेईल? आणि ते सुद्धा साक्षात प्रधानमंत्र्यांकडून?


आजकाल प्रधानमंत्र्यांची प्रत्येक गोष्ट राजकीय असते. त्यांचं बोलणं, वागणं, मुरडन, हसणं  सगळंच राजकीय. पोलिटिकल स्टंट आहे हा. याप्रसंगी अनेक गोष्टी आठवतायेत. दोन वर्षांपूर्वी गुजरातच्या उना येथे ४ दलित तरुणांना बेदम मारहाण केली गेली. कारण होतं गोहत्येचा आरोप. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने लादलेलं काम ते करत होते. मेलेल्या जनावरांचं कातडं काढणं हे काम निश्चितच संघातले कार्यकर्ते, बजरंग दलाचे दहशतवादी करत नसतील. हे काम एका जातीवर लादलं गेलंय. या घटनेचा देशविदेशात विरोध होत असताना, निंदा होत असताना मोदीजी गप्प होते.सामाजिक माध्यमांवर या दलित युवकांना मारहाण करणारा व्हिडियो वायरल झाल्यावर अनेक जणांना ही घटना समजली. संसदेत काही खासदारांनी प्रश्न मांडल्यावर मीडियाने हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतरही आपले प्रधानमंत्री गप्प होते. वर्णव्यवस्थेला त्यांनी दिलेलं हे मूक समर्थन होत. जेव्हा खूप टीका व्हायला लागली, आपल्या 'गुजरात मॉडेल'च नाव खराब व्हायला लागलं अशी उपरती आल्यावर त्यांनी मन मारून एका सभेत वक्तव्य केलं. त्यात ते म्हणाले कि गरीब दलितांना का मारता? मारायचं असेल तर मला मारा!

म्हणजे बघा, देशाचा प्रधानमंत्री त्या नालायक झुंडीला शासन द्यायची कारवाई न करता म्हणतो कि मारायचं असेल तर मला मारा!
आपल्या मूक संमतीसह इथल्या झुंडीने प्रत्येक स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे. निरागस दलितांना आणि मुसलमानांना ठेचलं  पाहिजे ही सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे. 
दुसरा प्रसंगही असाच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जन्मवर्षात हा घडला. कर्नाटकातील बेजवाडा विल्सन हा माणूस सफाई कामगारांचा लॉंग मार्च घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाला. हे बेजवाडा विल्सन मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत. सफाई कर्मचारी आंदोलन नावाने ते सफाई कर्मचाऱ्यांची संघटना चालवतात. त्यांची मागणी ही होती कि आजही भारतात डोक्यावरून मानवी मैला वाहून न्यायची प्रथा आहे. अर्थातच दलित समुदाय हे कामे करतो. या कर्मचाऱ्यांची मागणी अशी आहे कि आम्हाला सफाईयंत्रे उपलब्ध करून द्यावीत. डोक्यावरून मैला वाहून न्यायाचा आणि साफसफाई करायची ही पद्धतच अमानवीय आहे. कुठलाही भला माणूस याला अमानवीय म्हणेल. दिल्लीत या सफाई कर्मचाऱ्यांचा मोर्चा जेव्हा पोहोचला तेव्हा मोदीजींनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तेव्हा त्यांचे पाय धुवून त्यांच्या कुठल्याही  समस्या सुटणार नाहीत. त्यांचे आयुष्यमान वाढणार नाही. त्यांना किमान वेतन मिळणार नाही. अगोदरच साफ असलेले पाय धुवून तर नाहीच नाही. 



वर्ध्यात गांधीजी असताना सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होते, संप केला होता. त्या संपकाऱ्यांना भेटायला गांधी गेले होते. त्याकाळी या दलितांचं नेतृत्व निर्विवादपणे डॉ. आंबेडकरांकडे होतं. सफाई कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नव्हते आणि सफाईचा प्रश्न बिकट होत चालला होता. त्यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी गांधीजी स्वतः गेले. स्वतः हातात झाडू घेतला आणि शौचालयाची स्वच्छता केली. 'हरी आला रे, हरी आला, भंग्या घरी, हरी आला' असं म्हणतं कर्मचाऱ्यांनी संप मिटवला. गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाई केली. त्यांची नकल करणाऱ्या मोदींनी गांधीजींकडून काय आदर्श घेतला? 

मीरा-भायंदर मध्ये ३ सफाई कर्मचारी गटारीत उतरली आणि त्यातच विषारी गॅसमुळे गुदमरून मेली. दिल्लीतही अशीच घटना घडली. हे ऐकून कुणाचीही तळपायाची आग मस्तकाला जाईल. पण मरणारे साधेसुधे  सफाई कर्मचारी होते. त्यांच्या मरणाने आपल्याला काय दुःख होणार होत? काय नुकसान होणार होत? निश्चितच काहीच नाही.  घडल्या प्रसंगावर मोदीजींनी अथवा त्यांच्या कुठल्याही मंत्र्याने निषेध नोंदविल्याचे पाहण्यात नाही. सफाई कर्मचाऱ्यांवरचं हे प्रेम निश्चितच पुतना मावशीच आहे.कपटी आहे. स्वच्छ भारत अभियानातही अशीच चमकोगिरी केली गेली. सॅनिटायझर घेऊन स्मृती इराणी अगोदरच साफ असलेला रस्ता झाडायला निघालेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. तेव्हा उघड आहे कि हा राजकीय स्टंट आहे, त्यातून जास्तीत जास्त लाईक, शेयर आणि कॉमेंट मिळू शकती. सहानुभूती तर नाहीच नाही.