संघर्षकन्या ते चिक्कीकन्या...



शेवटी पंकजाताई बोलल्या. ब्लॉगच्या माध्यमातून का होईना त्यांनी आपली बाजू मांडली. स्वागत. लोकशाही समाजव्यवस्था असलेल्या आपल्या देशात आपली बाजू पडकी, खोटी,थिल्लर असली तरी मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार बजावला म्हणून काही कौतुक करण्याची गरज नाही. "मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असा स्वयंघोष भरसभेत करणाऱ्या ताई ब्लॉगच्या माध्यमातून आपली बाजू मांडतात तेव्हाच  यातील नेमकी गोम काय आहे हे सुजाण नागरिकांच्या  लक्षात यावे. २०६ कोटी रुपयाची खरेदी एक दिवसात उरकती घेण्याचा मान पंकजाताई यांना मिळाला, महाराष्ट्राची संघर्षकन्या म्हणून आम्हाला या गोष्टीचा काय अभिमान वाटावा? अजिबात नाही.भावनेच्या राजकारणात आपण कशा तरबेज आहात हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही आपल्या स्वर्गीय पित्याच्या नावाचे भांडवल करावे? स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे आमच्या आदरस्थानी आहेत, याबाबत वाद नाही. पण केवळ, आपले आरोप फेटाळताना त्यांच्या नावाचा वापर करून, मुंडे नावाचे भावनिक भांडवल करून जर तुम्ही भावनेचे राजकारण करत असाल तर हे प्रकरण इथले सुजाण नागरिक नक्कीच विसरू पाहता विसरणार नाहीत. आपण सध्या लंडनमध्ये आहात,आपल्या मुलाच्या प्रकृती संदर्भात आपण तेथे गेल्या आहात. उत्तम. आपल्या सारख्या मंत्री असलेल्या आईचे हे हाल असतील, तर विचार करा मेळघाटात, सातपुड्याच्या जंगलात, जिथे अजूनही प्राथमिक सुविधा पोहोचू शकल्या नाहीत तिथल्या आपल्या आईबहिणी कशा आपल्या मुलांवर उपचार करत असतील? आपण मंत्री आहात म्हणून आपल्याला हा उपचार पेलवत असेल, पण अजूनही आदिवासी पाड्यावरचे आमचे भाऊबंध तुम्ही दिलेली ब्लेड,तार, दगड असलेली चिक्की खात आहेत. आपल्या मुलाचे सौभाग्य कि त्यांना अशी भ्रष्टाचारात बरबटलेली 'चिक्की' अजून नशिबी आली नाही.
आपल्या उत्तरात आपण म्हणालात कि," मी, पिडीत,वंचित,मागासवर्गीय महिलांच प्रतिनिधीत्व करते,अंत्योदय हे खरचं मी अंमलात आणते" . ताई, मनापासून विचाराव वाटत,मंत्री झाल्यापासून आपण किती पिडीत, वंचित आणि मागासवर्गीय महिलांसाठी धावून गेलात? भगवान गडाच्या मेळाव्यात छातीठोकपणे "माझ सरकार हे दिनदलितांच असणार आहे"  असे सांगणाऱ्या आपणाला चिक्की घोटाळा होत असताना थोडीसुद्धा कष्टकरी,कामगार वर्गाची आठवण येऊ नये? एवढी जनतेची काळजी आपण घेतच आहात,तेव्हा  आपल्या रॅडीको कंपनीतील केमिकलमिश्रित सांडपाणी शेतात आणि विहिरीत  सोडल्यामुळे संपुर्ण गावातील शेतजमिन नापिक झाली, त्या गावातला शेतकरी देशोधडीला लागला त्यावेळी तुम्ही एका शब्दानेही प्रतिक्रीया दिली नाही.ज्यांनी निवडून दिले त्यांच्याशी अस व्यवहार स्वर्गीय मुंडे साहेबांनी तरी केला असता का? सत्तेचा हा उन्माद तर नाही? गेल्या वर्षभर आपण झोपलेल्या नाहीत, आश्चर्य! अतिशयोक्ती करण्यात आणि स्रीदाक्षिण्य मिळविण्यात आपला हाथ कोणी धरू शकणार नाही.कुंभकर्णाची कहाणी आठवली. असो, लंडनची हवा खावून झाली असेल, मुलाचा उपचार झाला असेल तर भारतात परत या. समस्त महाराष्ट्राची जनता या संघर्षकन्येची सॉरी, सॉरी... चिक्कीकन्येची वाट पाहत आहे.सत्य काही लपणार नाही, जे सत्य असेल ते आम्हाला मान्य असेल पण उगाच भावनिकतेच भांडवल नको.बाकी, चांगली झोप घ्या, मुलाची काळजी घ्या, जेवणही वेळेवर करा. आणि हो, रस्त्याने येताना "सुर्यकांता चिक्की" दिसली, मुलाने कितीही आग्रह केला तरी घेवू नका. त्यात ब्लेड,काचा,दगड, तार असे काहीबाही असते.
सत्यमेव जयते!

बरे झाले,FTII चे मुले बोलते झाले !

FTII ची मुले शेवटी बोललीच! राजकारणापुरत भगवा ठीक आहे हो, पण शिक्षण-कला क्षेत्रात भगवीकरण नामंजूर. जिथे येणाऱ्या काळातील रंगकर्मी घडणार आहेत, तिथे आरएसएसचा अजेंडा राबविन्याचा अच्छे दिन वाल्या सरकारचा मनसूबा विद्यार्थ्यांनी धुळीस मिळविण्याचा विडा उचलला आहे. गजेंद्रसिंग चौहान यांची संचालक म्हणुन नियुक्ति यनिमित्ताने वादग्रस्त ठरली. त्यांच्या नियुक्तीच्या विरोधात गेले काही दिवस पुण्याच्या FTII मधे विद्यार्थ्यांनी आंदोलन करून, इंस्टिट्यूट बंद पाडलय. लक्षात घ्या, ह्याच मुलांनी अच्छे दिनला भुलुन भाजप सरकारला मतदान केल होत. तीच मुले आता भाजपच्या कुटनीतिला ओळखून त्यांच्या विरोधात उभी ठाकली आहेत. ही खरी परिवर्तनाला सुरुवात आहे असे मानायला हरकत नाही.मागे चित्रपट सेंसोर बोर्डाच्या लीला सैमसन यांनाही आपल्या पदापासून सरकारच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे फारकत घ्यावी लागली होती. या प्रकारणावरून तेव्हाच अधोरेखित झाले होते की, आता कला, चित्रपट, संगीत क्षेत्राचे हिंदुत्विकरण चालु होणार. आहिस्ते आहिस्ते भाजप हे सगळे करत आहे.कला क्षेत्रात त्यांना फार रस आहे असेही समजन्याचे कारण नाही. पथनाट्य करुण समाजजागृति करणाऱ्या सफदर हश्मीला भर रस्त्यात मारणाऱ्या कांग्रेस मानसिकतेत आणि भाजप मानसिकतेमधे थोड़ा काय तो फरक. आपल्या मार्जितली लोक प्रत्येक सरकारला आवडतात, पण तेच लोक डोइजड झाल्यास त्यांना ठेचून काढण्यासही ह्या शक्ति मागेपुढे पाहत नाहीत. समाजप्रबोधनचि चळवळ गाण्यातून चालविणाऱ्या कलाकरांना इथली व्यवस्था कशी वागविते हे महाराष्ट्राला वेगळे सांगावयास नको.गाणे गाणारे लोक आणि विचार गाणारे लोक यांच्यात नेमका फरक कसा करावा हे समकालीन सरकारकडून शिकावे.असो, एकटे गजेंद्र चव्हाण यांना विरोध नाही, त्यांच्यासोबत असलेले नरेंद्र पाठक हे महाराष्ट्र अभाविपचे माजी अध्यक्ष राहिलेली व्यक्ति आहे. सोबतच, संघ परिवारातील संस्कार भारती या कला विभागाच्या पदाधिकारी राहिलेल्या प्रांजल सैकिया या देखील संघ मानसिकता घेवुन येतील यात शंका नाही. अनघा घैसास, राहुल सोलपुरकर अशी हिंदुत्ववादी मंडळी संचालकपदी येणार म्हटल्यावर पुढे काय वाढून ठेवले असणार याची कल्पना केलेली बरी! अशाही परिस्थितीत बरे झाले युवक बोलायला लागले, ज्यांच्या उर्जेचे भांडवल करुन जे भांडवालदार सत्तेत आले आहेत त्यांना ठिकानावर आणण्यासाठी या युवकांना पाठिंबा हा दिलाच पाहिजे!
अशोक भार्गव एका ठिकाणी फार छान सांगतात,

युग की जड़ता के खिलाफ, एक इंकलाब है,
हिंद के जवानों का एक सुनहरा ख्वाब है,
भारतीय सांस्कृतिक क्रांति,
मानवीय सांस्कृतिक क्रान्ति।।
भारतीय सांस्कृतिक क्रांति ही मानवीय आधारावर व्हावी हाच अट्टहास!
जिंदाबाद !!!

इंजि. सागर भालेराव
9595842238

पत्रकारीतेतला विवेकवाद- निखिल वागळे

प्रसिद्धिमाध्यमे जन्माला आली आणि चळवळीची भाषा अनेकांगाने बदलली. कार्यकर्ता पत्रकारिता करण्यापेक्षा पत्रकारितेतला कार्यकर्ता होण्याची कित्येक लोकांनी स्वप्ने पाहिली. त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आणि समाजवादाची व्याख्या माध्यमांच्या माध्यमातून कुठल्याही भांडवलदाराची मध्यस्ती न करता सांगण्याचा प्रयत्न करण्यात फार कमी पत्रकार यशस्वी झाले. आ. कपिल पाटिल, विवेक पंडित, निखिल वागळे हे त्यापैकीच् काही नावे. या सगळ्यांनी उत्तरार्धात वेगवेगळी क्षेत्रे निवडली. पैकी निखिल वागळे अजूनही पत्रकारितेतिल एक धारदार नाव म्हणून आपल्या सगळ्यांसमोर आहे. वागळे म्हटले की आक्रमक पत्रकार अशी छबी तयार झाली. आक्रमक असताना आपली मांडणी कालसुसंगत आणि संदर्भासहित असावी असा कायम प्रयत्न त्यांनी केलेला दिसतो. ज्या बिनभिंतीच्या शाळेत त्यांची जडणघडन झाली त्याचे हे द्योतक! खोटा मुद्दा रेटून नेणाऱ्याला उघडा नागड़ा करण्याचे कसब वागळे सरांना चांगले जमते. म्हणून तर जितका त्यांचा चाहता वर्ग या महाराष्ट्रात आहे तेवढाच मोठा विरोधक वर्गहि आहे,आणि वेळेच्या उपलब्धतेनुसार हे विरोधक आपले तोंड वर काढत असतात हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे.

शिवसेना ही त्यापैकीच् एक विरोधक. प्रचंड भावनिक असलेल्या कार्यकर्त्यांचा हा पक्ष! आवाज कुणाचा म्हटल की यांचाच! मग वेळ सुसंगतपणा, भान, आकलन त्यात आहे किंवा काय याचे काही घेणेदेने यांच्या कार्यकर्त्यांना नसते.म्हणून तर वागळे सर IBN लोकमतला असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. वागळे सरांना धाक बसन्यापेक्षा त्यांच्यातील निडर पत्रकारिता आणखी जोमाने चालु राहिली. पत्रकारितेच्या माध्यमातून संविधानाची बीजे समाजात पेरती करण्याचा प्रयत्न आजवर वागळे सर करत आले आहेत. भंडावलदारी व्यवस्थेला कायम विरोध करणारे वागळे वेळेवर नोकरिवरही लाथ मारतात तेव्हा या अवलीयाची भुमिका स्पष्टपणे जाणवते. तोड़देखले फुले-शाहु-आंबेडकरांचा वारसा जपणारे अनेक पत्रकार आपल्या आजुबाजूला आहेत, परंतु निखिल वागळे म्हणजे अजब रसायन!
आपले म्हणणे कुणी ऐकत नाही असे दिसल्यास समोरच्या व्यक्तीला बदनाम करण्याची जुनी परंपरा आपल्याला आहे.वागळे सरांच्या वैयक्तिक आयुष्यवारही खुलेआमपणे पोस्टरबाजी करत प्रश्न उपस्थित केले गेले.आजही या घानेरड्या परंपरेचे आपण पाईक आहोत हे सांगताना खेद वाटावा. काल परवा अशीच एक ऑडियो क्लिप व्हाट्स एप्प वर फिरत होती. कुणी अनिरुद्ध 'जोशी' आणि वागळे सर यांच्यातील तो संवाद होता.त्यात वागळे सर आपली भूमिका ठनकावुन सांगतात. इथल्या सामाजिक व्यवस्थेने जी काही पेरले आहे त्याला विरोध करण्याचा प्रयत्न आजतागायत वागळे करत आले आहेत आणि तेच त्यांच्या या संभाषणावरून लक्षात यावे.सर्व ब्राम्हण वाईट असे स्वतः वागळे सर सुद्धा मानत नाहीत. तेव्हा वाईट प्रवृत्ती,मूलतत्ववाद घातकच हेच वागळे सर सांगतात.पुरोगामी चळवळीतील लोक ब्राम्हण आणि ब्राम्हणत्व यातील फरक जाणतात.मानसिक गुलाम तयार करण्यासाठीची पोषक मूल्ये समाजात रुजविण्याचा जो प्रयत्न इथल्या ब्राम्हण्यत्व असलेल्या व्यवस्थेने केला त्याला विरोध अगदी महात्मा फुले, पेरियार स्वामी, आंबेडकर आदी महापुरुषांनी केलेला आहे. फुले, आंबेडकर हायजैक करताना त्यांचा ब्राम्हणविरोध पद्धतशीरपणे हे 'समरसता' करायला निघालेले लोक विसरतात याचे नवल वाटावे! अगदी लांब जायला नको, आपले पंतप्रधान मोदीजी ह्यांना देखील सनातनी वृत्तिचे म्हणून टीकेचे धनी व्हावे लागते, मोदी काही ब्राम्हण नाही, मुख्तार अब्बास नकवी काय जानवे घालुन पौराहित्य करत नाही, हे लक्षात घेतले तर नेमके ब्राम्हण आणि ब्राम्हणयत्व यातील फरक स्पष्ट होईल. एका रुपकार्थाने याचा विचार केला तर मुलतत्ववादी असलेले ओवेसी बंधु देखील ब्राम्हण्यत्व सांगत असून दूसरे काहीही सांगत नाही, येणाऱ्या काळात ही प्रतिमा अनिरुद्ध जोशी सारखे परपोषी मानसिकता असलेली ब्राम्हण मंडळीच् खरी करुण दाखवतील. झाल्या प्रकाराने वागळे काही गप्प बसणाऱ्यांमधले नाही. विद्रोह हां ज्याचा स्थायीभाव आहे तो थांबेल थोडेच! विवेकवादी आहोत, विचारांची लढाई विचारांनी करणार. संविधानावरची श्रद्धा कायम आहे. माझ्यासारख्या पत्रकारितेत नविन असलेल्या कित्येक तरुणांचा आदर्श असलेले वागळे कायम स्फूर्ति देत राहतील. विवेकवादाचा पुरस्कार करणारे आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत!
लड़ेंगे-जीतेंगे!

इंजि. सागर भालेराव
9595842238