आपण हरलो आहोत

               
         

मनाबी बंधोपाध्याय या भारतातल्या प्रथम तृतीयपंथी मुख्याध्यापक.दिड वर्षांपूर्वी त्यांनी पश्चिम बंगालमधल्या कृष्णानगर महिला कॉलेजच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला. मोठं कौतुक केलं आपण.यानिमित्ताने  आपण भारतीय किती पुढारलेले आहोत हे घसा कोरडा होईपर्यंत आणि किबोर्डची बटणे तुटेपर्यंत सगळ्या जगाला आपण सांगत होतो. आज दिड वर्षानंतर काय स्थिती आहे? २३ डिसेंबरला मनाबी यांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा आपल्या कॉलेज प्रशासनाकडे सुपूर्त केलाय. कारण हे आहे कि, त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि विद्यार्थ्यांकडून त्यांना सहकार्य मिळत नाही.



मोठ्या शरमेची ही बाब आहे. एक तर तृतीयपंथी असणं,त्यांनी समाजात सन्मानानं वागणं हे भारतीय समाजात सहजसहजी पचनी पडत नाही.  त्यांचा शारीरिक/लैगिक  केमिकल लोचा आहे, या कारणावरून समाजातून त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. तृतीयपंथी लोकांच्या विविध समस्या आपण कायम ऐकत असतो, त्यावर अनेकदा चर्चा होते. सेवाभावी वृत्तीने, कारुण्यतेने त्यावर विविध अंगाने चर्चा घडते. पण केवळ चर्चाच  घडते.त्यातून निष्पन्न काहीच होत नाही.आपली  पुरुषप्रधान व्यवस्था महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपाय रावबत असते , पण जो वर्ग महिलाही नाही आणि पुरुषही नाही त्यांचं काय? त्यांच्यासाठी डिजिटल इंडिया, स्किल इंडिया, स्टार्ट अप इंडिया असे कोणतेच कार्यक्रम नसतात. स्मार्ट सिटीमध्ये त्यांच्यासाठी कुठलीही तरतूद नसते. त्यांच्या असण्याला, नसण्याला कुठलीही किंमत नसते. मनाबी यांच्या निमित्तानं हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. आपण आज पुन्हा एकदा हरलो आहोत. आपण हरण्यामागे महत्वाचं कारण आहे तें म्हणजे आपली पुरुषी व्यवस्था. या व्यवस्थेत केवळ पुरुषांना नावे ठेवून चालणार नाही. पुरुषी व्यवस्था राबविणाऱ्या महिलांनादेखील तितकेच दोषी ठरविले पाहिजे. बऱ्याचवेळा समाजातील महिलाच पुरुषसत्ताक व्यवस्थेची प्रतीके जपण्याचा प्रयत्न करत असतात. मनाबी बंधोपाध्याय यांच्या सोबत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जर त्यांना नैतिक पाठबळ दिल असत, तर त्या खचल्या नसत्या आणि त्यांनी माघार देखील घेतली नसती. त्यांची माघार घेणं म्हणजे तुम्ही आम्ही  इतिहासाच्या काळ्याकुट्ट परीक्षेपात जाण्यासारखं आहे.  वर्तमानाची हाक आपण अजूनही ऐकत नसू, तर सावित्री -फातिमा यांचा वारसा सांगण्याची आपली काहीही एक लायकी नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे.

मागे एक  मित्र विचारत होता कि, तृतीयपंथीयाने जर काही गुन्हा केला आणि त्याला जर तुरुंगात कैद करायचं असेल तर त्याला कुठल्या तुरुंगात ठेवणार? महिलांच्या कि पुरुषांच्या? मी याबद्दल कधी विचार केलेला नव्हता, या प्रश्नामुळे पुरता गोंधळून गेलो  होतो. मित्र सांगत होता, त्याच्या ओळखीतल्या एका तृतीयपंथीयाला कोणत्यातरी आरोपाखाली अटक केली गेली तेव्हा, पोलिसांना असलेले कायद्याचे अज्ञान म्हणा किंवा न्यायव्यवस्थेत  तृतीयपंथीयांना विचारात घेतलं नसण्याचं कारण म्हणा, त्या तृतीयपंथीयाला रात्रभर कोठडीच्या बाहेर ठेवलं गेलं.
मानवाधिकार कार्यकर्त्यांना जेव्हा  ही घटना कळली, तेव्हा त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाला याबद्दल विचारणा केली. त्याबद्लच्ची कारवाई सध्या चालू न्यायालयात चालू आहे,. सकारात्मक निर्णय येईल अशी अपेक्षा.
सकारात्मक असलो तरी,  मनाबी बंधोपाध्याय यांच्या राजीनाम्याची नकारात्मक बातमी मनाला चटका लावून गेली आहे.पुढचे काही दिवस यावर चर्चा होईल, परिसंवाद होतील, सगळं काही होईल. कालांतराने आपण सगळे विसरून जाऊ. संस्कृतीरक्षक LGBT च्या हक्कांसाठी विरोध करतील, पण त्यांच्या मानवी हक्कांसाठी, संविधानिक हक्कांसाठी त्यांच्या बाजूने उभं राहणार नाहीत. तें उभे राहणार नाहीत, कारण ते पुरुषीसत्तेचे वाहक आहेत. या सगळ्या लढ्यात विवेकवादी परंपरेने तृतीयपंथीयांच्या लढ्यात त्यांच्या बाजूने उभं राहील पाहिजे. इथली माणसं जगली तरच या जगाच्या अस्तित्वाला अर्थ आहे. इथल्या प्रत्येकाचं अस्तित्व टिकलं पाहिजे, महिलांचं, पुरुषांचं आणि तृतीयपंथीयांचं देखील.मनाबी बंधोपाध्याय यांचं अस्तित्व मिटता कामा नये, आजच्या फाटाफुटीच्या काळात त्यांच्या बाजूने आज उभे राहण्याची गरज आहे. 

भीम लढाया शिकवतो...



६ डिसेंबरला दादरच्या चैत्यभूमीवर लाखो भीमसैनिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी दाखल होतात. १ डिसेंबरपासूनच चैत्यभूमी परिसरात लोकांची गजबज बघायला मिळते. केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून लाखो बांधव त्यांच्या उद्धारकर्त्या महामानवाला भेटण्यासाठी इथे येत असतात. इथे विचारांचा जागर असतो. इथे येणारा प्रत्येक व्यक्ती, बाबासाहेबांना देवाप्रमाणे आदर देतो. देव म्हणजे आहे तरी काय? देवाला कुणी पाहिलंय का? देव नावाची संकल्पना व्यक्तिपरत्वे,विचारपरत्वे बदलत असते.इथे तर बाबासाहेबच एक विचार आहे. जो विचार मानवमुक्तीकडे घेऊन जातो. माणसाला माणूपण देतो.

सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे, वैचारिक वारसा देऊन, अनंतकाळाचं संचित सोडून  गेलेला देवमाणूस म्हणजे बाबासाहेब ! बाबासाहेबांना इथे कुठलेही गंडे-दोरे, अंगारे-धुपारे अर्पण करत नाहीत. बाबासाहेब काही नवसाला पावत नाही,त्यांचा काही कोप होत नाही,अशा गोष्टी घडण्याचा देखील येथे सुतराम संबंध नाही. गेली काही वर्षे दरवर्षी महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीला जात असतो. प्रत्येकवेळी येथे नवे अनुभव भेटतात. येथे नव्याने बाबासाहेब भेटतात,नव्याने बाबासाहेब कळतात.




यादिवशी चैत्यभूमी परिसर निरीक्षण करण्यासारखा असतो. वेगळ्या वेगळ्या प्रांतातले,राज्यातले लोक इथे पाहायला मिळतात.प्रत्येकाचे प्रश्न वेगवेगळे. जात मात्र समान! प्रेरणा मात्र समान, ती म्हणजे बाबासाहेब!
सगळ्यांना येथे एकत्र आणणारी ऊर्जा म्हणजे बाबासाहेब!
ही ऊर्जा सगळ्यांना एकसंघ बांधून ठेवते.इथे कुणीही कुणाशी प्रांतावरून,भाषेवरून भांडत नाही. एकोप्याने आपले सुखदुःख येथे वाटून घेतले जातात.
चैत्यभूमीवर फिरताना एक गृहस्थ भेटले. रामकुमार बर्मा अरजत असं त्यांचं संपूर्ण नाव. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यातील रतवार या छोट्याश्या गावातून हा माणूस आला होता.शेतमजुरी करणारे रामकुमार दरवर्षी दादरला येतात.गेल्या २५ वर्षांपासून त्यांची प्रत्येक महापरिनिर्वाणदिनाला हजेरी असते. बिहारच्या 'सोशीत समाज दल' या लेनिन जगदेव प्रसाद यांच्या संघटनेत त्यांना काम केलं. त्यांची हत्या झाल्यानंतर बिहारच्या समाजवादी चळवळीत उलथापालथ झाली.त्यांनतर रामकुमार यांनी या संघटनेचं सक्रिय काम सोडून दिल. त्यानंतर आजतागायत आपल्या गावात शिक्षणासंबंधी जनजागृतीचं काम हा माणूस करतो आहे.

दस का शासन नब्बे पर,
नहीं चलेगा, नहीं चलेगा.
सौ में नब्बे शोषित है,
नब्बे भाग हमारा है.
धन-धरती और राजपाट में,
नब्बे भाग हमारा है.

   अशा घोषणा रामकुमार सांगत होते. ९०% बहुजनांवर १०% अभिजनांनी काय म्हणून आपली मते लादावीत? आपल्या प्रश्नावर आपण स्वतः लढलं पाहिजे असं हा माणूस सांगत होता. त्यांच्या बोलण्यात विद्रोह शब्दाशब्दाला जाणवत होता.  स्वतः केवळ पाचवी शिकलेला हा माणूस आपल्या मुलांनी-नातवंडांनी डॉक्टर व्हव, वकीव व्हावं,उच्चशिक्षित व्हावं,बाबासाहेब व्हावं म्हणून झटतो आहे. त्यांच्या रतवार गावात केवळ आठवीपर्यंत शाळा आहे. पुढचे शिक्षण घेण्याची सोय नसल्यामुळे इथे शिक्षणगळतीचे प्रमाण अधिक असल्याचं ते सांगत होते. बाबासाहेबांनी सांगितलेला 'शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा संदेश रामकुमार तंतोतंत पळतायेत.

रामकुमार बर्मा अरजत

'दो दो बातें,मोटी मोटी
सबको चाहिये,इज्जत रोटी'

असं सांगत ते म्हणतात कि, आम्हाला काही संपत्तीची आस नाही.आम्ही श्रीमंत व्हावं,गाडी बंगल्यात फिरावं असं काही आमचं ध्येय नाही.आम्हाला केवळ माणूस म्हणून इज्जत हवी आहे आणि पोटाला भाकर हवी आहे. या दोन गोष्टी तेव्हाच मिळतील जेव्हा संपूर्ण समाज शिक्षित होईल,साक्षर होईल. शिक्षणाचं राष्ट्रीयीकरण झालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. 'राष्ट्रपती हो या गरीब कि संतान,सबको शिक्षा एक समान' हे लोहियांचं तत्व अंमलात आणलं पाहिजे अशी रामप्रसाद जोरदार मागणी करतात. सरकारी शाळांमध्ये दिल जाणार शिक्षण आणि खाजगी शाळांमध्ये दिले  जाणारे  शिक्षण सामान असले पाहिजे, शिक्षणात समानता असेल तर समाजात समानता येईल असं त्यांचं म्हणणं होत.

त्यांच्या सगळ्याच गोष्टी पटल्या. इथे ते केवळ दलित वर्गासाठीच बोलत नाहीत तर सर्वांगीण समाजासाठी बोलतात. शिक्षानीतीवर त्यांनी उपस्थित केलेली नाराजी कुणालाही अपील होईल अशीच आहे. या माणसाच्या बोलण्यात आंबेडकरवादाचा प्रभाव जाणवला. केवळ पाचवी शिकलेला या माणसाला एवढी समज आली कुठून? स्वतः शिक्षित नसलेला हा माणूस आपल्या गावातील प्रत्येक मूल शिकावं म्हणून किती धडपड करतोय. ही दृष्टी आहे बाबासाहेब आंबेडकरांची. जी तुम्हाला जागृत करते ,विज्ञानवादी बनवते,चौकस बनवते.


सध्याच्या दलित राजकारणावर देखील ते टीका करतात. रामविलास पासवान यांच्याबद्दल ते प्रचंड नाराजी व्यक्त करतात. ते म्हणतात कि जेव्हा रामविलास पासवान राजकारणात आले,तेव्हा दलितांचे नेते म्हणून मिरवण्यासाठी आणि दलितांना आपल्याकडे आकर्षीत करण्यासाठी त्यांनी नारा दिला होता कि,
'उस घर मैं दिया जलांना है, जिस घर मैं अंधेरा छाया है!' आज तेच  पासवान भाजप सोबत सत्तेत गेलेत. ते विचारतात कि भाजपच्या घरात कुठला अंधार होता कि रामविलास पासवान यांनी तेथे दिवा लावण्यासाठी जावं लागलं?
या सगळ्यांची  समाधानकारक उत्तरे रामविलास पासवान-रामदास आठवले-उदीतराज यांना सुद्धा देता येणार नाहीत.
चौफेर विचार करणारा रामकुमार बर्मा अरजत हा त्या विवेकवादी आंबेडकरी चळवळीचं प्रतीक आहे, जो प्रत्येकाला विचार करायला भाग पाडतो. तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी तो तुम्हाला मार्गस्थ करतो. भीमसूर्याची प्रेरणा यामागे असते. इतकं सहजासहजी हे घडत नसत.


याच चैत्यभूमीवर भेटलेला दुसरा माणूस म्हणजे मन्नूलाल. मन्नूलाल हे मध्य प्रदेशमधील अशोकनगर येथून आले होते. त्यांच्या गावातील २४-२५ लोकांनी मिळून १ डिसेंबरला चैत्यभूमीवर येण्यासाठी आपलं गाव सोडलं. ३ तारखेपासून ते शिवाजीपार्कात मुक्कामी आहेत. त्यांना विचारलं कि,इतक्या लांबून प्रवास करून येताना भीती नाही वाटत? त्यांचं उत्तर होत, बाबासाहेब ज्या दिवशी जन्माला आले त्याचदिवशी होती नव्हती ती सगळी भीती संपली. 
मन्नूलाल हे चर्मकार समाजातील आहे. गेल्या २० वर्षांपासून आपल्या  कुटुंबासह ते  चैत्यभूमीवर येतात. त्यांच्या सोबत त्यांचा २०-२५ वर्षाचा मुलगा देखील आला होता. त्याच नववी पर्यंत शिक्षण झालंय. पुढे  गरिबीमुळं शिक्षणाची संधी मिळाली नाही म्हणून शिक्षण अपूर्ण राहील हे तो खेदानं सांगत होता. चैत्यभूमीवरून काय घेऊन जाता आपल्या गावी? असं विचारल्यावर मन्नूलाल आणि त्याच्या मुलगा उत्तर होत, पुस्तकं !

मध्यप्रदेशहून आलेला मन्नूलाल,आंबेडकरी चळवळ  जिवंत ठेवणारा एक भीमसैनिक 

किती ही सजगता! केवढी मोठी ही क्रांती! ज्यांना शिक्षणापासून आजवर वंचित ठेवलं गेलं तो समाज आज कितीतरी पुढारलेला विचार करतो आहे. त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आजदेखील संपलेले नाहीत. उपरेपणाचं जीवन ते आजही जगतायेत. पण अशाही परिस्थितीत बाबासाहेबांचं तत्व जगणारे मन्नूलाल आणि रामकुमार यांच्यासारखे लोक बाबासाहेबांची चळवळ टिकून ठेवून आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाची ताकद त्यांना हत्तीचं बळ देते.बाबासाहेबांची चळवळ ही सत्ताखोर पुढाऱ्यांमुळे जरी लयाला गेली  असली तरी  मन्नूलाल आणि रामकुमार यांच्यासारख्या भीमसैनिकांमुळे ती आजही तग धरून आहे. अशी माणसे चळवळीचा आधार आहेत.जोपर्यंत अशी  लोक आहेत तो पर्यंत समतेची गाथा अखंडपणे सुरु राहील. भीम केवळ तुम्हाला आधार देत नाही, तर तुम्हाला मार्गदर्शन करतो. तुम्हाला विचारी बनवतो.तुम्हाला संघर्ष करायला शिकवतो,तुम्हाला लढायला शिकवतो.

मन्नूलाल आणि रामकुमारसारखी असंख्य मंडळी मला अजून भेटायची आहेत.पुढच्या वर्षी जेव्हा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवर जाईल तेव्हा खात्री आहे कि अशा लोकांमुळे पुन्हा नव्याने बाबासाहेब कळतील...

-सागर भालेराव 



   












मुंबईतली वेश्यावस्ती आणि नोटबंदी

                 
'घाल,अंगावर गाडी पोरा.नाहीतरी जगून काय फायदा?  एखादी गाडी यावी आणि आम्हाला चिरडून जाव असं वाटतंय आता'. मुंबई महानगरातील कायम कलंकित समजल्या जाणाऱ्या वस्तीत आम्ही उभे होतो. कामाठीपुरा. वेश्यावस्ती म्हणून प्रसिद्ध असलेला हा मुंबईचाच एक भाग ,येथे देहव्यापार चालतो.वस्तीत शिरल्यावर जिथे आम्ही आमची  दुचाकी लावायला थांबलो ,तिथे साठी ओलांडलेली एक महिला बसलेली होती ,त्या महिलेने आम्हाला हे बोल सुनावले होते. म्हटलं, काय झालं आंटी? एवढ्यात काय मरायचे स्वप्न बघताय? जगा कि पोटभरून. आंटी बोलायला लागल्या,विनाकारण जगण्यात काय मजा? जवानीत असताना भरपूर पैसा कमवला.आता या वयात कोण विचारतंय? पोटात घालायला अन्न नाही.शेजारी गिऱ्हाईकांची वाट बघत उभ्या असलेल्या मुलींकडे बघत म्हणाली, या पोरी देत असतात दिवसाला १०-२० रुपये, तेव्हा जेवण-चहा,नाश्ता याची सोय होत असते. या आंटी हेंद्राबादवरुन ४० वर्षांपूर्वी मुंबईत आल्या. अगोदरच घरच अठराविश्वे दारिद्र्य.तेव्हा झटपट पैसे कमावण्याचा मार्ग म्हणजे वेश्याव्यवसाय. हा काटेरी मार्ग पत्करला आणि उभ्या आयुष्याचं वाळवंट झालं. आज या आंटीच्या मागेपुढे बघणार कुणीही नाही.नातेवाईक काय म्हणून मला संभाळतील असा आंटीचा प्रश्न आहे,तेव्हा लाचारीचं जगणं नातेवाईकांच्या दारात काढण्यापेक्षा,ज्या कामाठीपुऱ्यानं बदनाम केलं,लाचार केलं, तिथेच भीक मागून खाण्यात काय वाईट असं तिचं म्हणणं आहे.


यांचा भूतकाळ,वर्तमानकाळ अंधारात होता,आणि आहे.भविष्याबद्दल माहिती नाही.

 ५००-१००० च्या नोटबंदी बद्दल विचारलं तर आंटी सांगते, कि पैशाची बचत कधी केलीच नाही.आलेला पैसे कायम मौजमस्तीत घालवला. म्हातारपणी आधार होईल म्हणून पैसे साठवले नाहीत.जनधन योजनेत बँक अकाउंट काढलं खरं,पण त्यात टाकायला पैसे कुठे आहेत? अगोदरच हलाखीचं जीवन जगत होतो,आता त्यात अजून भर पडलीये.

***
२.

आंटीसोबत गप्पा झाल्यावर वस्तीमध्ये शिरलो. पुण्याच्या बुधवार पेठेत एकदा गेलो होतो.पुण्याची ही वेश्यावस्ती त्यामानाने अधिक फुललेली वाटली होती. वेश्यावस्ती फुललेली असणं म्हणजे समाजाचं बदफैली असणं आहे. बदफैली असं म्हणजे तरी काय? या वेश्यासमाजाला बिघडवतात काय? कि बिघडलेला समाज यांना असा दूर अंधारात लोटतो? ही शोषणाची प्रक्रिया दोन्ही बाजूने चालते कि एकाच बाजूने अव्याहत सुरु आहे? या सगळ्या प्रक्रियेचा लगाम कुणाचा हातात आहे? याच मूळ शोधायला वेळ आहे का आपल्याकडे ? या सगळ्यांची उत्तरे नकारात्मक भेटतात.जिथे सुरुवात माहित नाही,शेवट काय असेल याचा कयास लावता येत नाही त्या भानगडीत पडायच तरी कशाला!

मायानगरी मुंबईमधली वेश्यावस्ती म्हणजे ग्लॅमर असलेली हवी,झगमगाट असावा,सुंदर सुंदर ललना असाव्यात. असं काहीस चित्र माझ्या मनात होत.कदाचित चित्रपटांचा,कादंबऱ्यांचा हा प्रभाव असावा. परंतु असं काहीही चित्र इथं नव्हतं. अगदी शांतपणे इथला कारभार चालू होता.नेहमीची गिऱ्हाईक मंडळी नेहमीच्या ठिकाणी जात होती.सगळं काही नेहमीसारखं. नावीन्य त्यात नव्हतंच.देहव्यापार करणाऱ्या स्रिया एकमेकींशी गप्पा मारण्यात गुंग होत्या. चहाच्या टपरीवर एका  दारुड्याला टपरीचा मालक मारहाण करत होता. प्रत्येकजण आपलं आपलं काम करण्यात गुंग होते.हे सगळं निरखण्यात वेगळी मजा होती. या वस्तीतून चालत चालत एका चाळीत शिरलो.दणादण डीजेचा आवाज येत होता. 'अफगाण जिलेबी' हे गाणं मोठ्यानं वाजत होत. जवळ जाऊन पाहिलं, तर कळलं कि तिथे कुणाचा तरी वाढदिवस होता.कुणा वेश्येच्या मुलाचा तो पहिलाच वाढदिवस होता. मस्तपैकी मंडप,रोषणाई,सजावट,अशा थाटात तो वाढदिवस त्या चाळीतील प्रत्येक वेश्या साजरा करत होती. डीजेच्या तालावर दंग होऊन कामाठीपुऱ्यातल्या त्या स्रिया नाचत होत्या. नेहमी इतरांची वासना शमविण्यासाठी नाचणाऱ्या त्या, आज स्वतःसाठी नाचत होत्या.बेफाम होऊन नाचत होत्या. त्यात समोरच्याला खुश करण्याचा भाव नव्हता, तर स्वतःसाठी,त्यांच्या त्या लहान मुलासाठी त्या नाचत होत्या.
         लहानग्या मुलाच्या वाढदिवसाचा आनंदोत्सव 

आपल्या लहानग्या मुलाचा पहिला वाढदिवस मोठ्या धामधुमीत साजरा केला जावा असं कोणत्या आईबापाला वाटणार नाही? ज्याचा वाढदिवस होता त्याला आई आहे,पण बापाचं नाव नाही. या वस्तीत 'बाप' लोक येतात पण ते इथल्या स्रियांना आईपण द्यायला. त्यांच्यासोबत अल्पकाळाची शय्या केली जाते खरी पण आयुष्यभराची साथ द्यायला त्यांना कुणीही तयार होत नाही.अगदी त्यांचे सख्खे जन्मदाते सुद्धा. नाचगाणी सुरु असताना कुणी एक माणूस ५०० ची नोट ओवाळणी टाकण्यासाठी घेऊन आला.नाचणाऱ्यांपैकी एकीनेही ती घेतली नाही.घेतील तरी कशाला? ही नावाजलेली एक वेश्यावस्ती आहे, रद्दीचे दुकान थोडेच आहे जिथे जीर्ण कागद देखील स्वीकारले जातील.

***

३.

वाढदिवसाचा जश्न पाहिल्यावर तेथून निघालो. समोर एक तीनमजली माडी आहे. त्या गंजलेल्या जीर्ण वस्तीत ही माडी सहज ओळखू येईल अशी चकचकीत आहे. मित्राची तिथे ओळख असते.आम्ही दोघे इमारतीमध्ये शिरतो,जिन्याने पहिल्या माळ्यावर जातो. आम्हाला बघून तिथले दलाल आमच्याकडे येतात.आम्ही 'गिऱ्हाईक' आहोत अशी त्यांची समजूत झालेली असते.आमच्या हाताला धरून ते समोरच्या खोलीकडे  जाण्यासाठी आम्हाला सांगतात. दरवाज्यात नटून-थटून उभ्या असलेल्या स्रिया आमच्याकडे बघून सौम्य हास्य करत असतात. या सगळ्यांना चुकवून आम्ही आता दुसऱ्या माळ्यावर जाण्यासाठी जिना चढतो. दुसऱ्या माळ्यावर दरवाजात उभी असलेली आक्का आम्हाला बघून नमस्कार करते.मित्र सरळ आतमध्ये घुसतो. त्याच्या पाठोपाठ मी देखील त्या खोलीत शिरतो. खोलीत शिरल्यावर सुरवातीला एक हॉल लागतो. तिथे छानपैकी एक सोफा ठेवलेला असतो. त्या सोफ्यावर आम्ही बसतो.आक्का जवळ येते आणि कुणासोबत जाणार ?,असं विचारते.

समोर ४-५ तरुण मुली उभ्या असतात.आमच्या गोंधळलेल्या नजारा बघून त्यांना मजा येते आहे. त्या आपापसात कुजबुजतात.आम्ही आक्काला येथे येण्याचं प्रयोजन सांगतो. वेश्यावस्तीत ५००-१००० नोटांच्या बंदीचा काय परिणाम झालाय हे जाणून घ्यायला आलोय हे सांगतो. आमचं प्रयोजन ऐकून आक्का जवळजवळ आमच्यावर ओरडतेच. धंद्याच्या वेळी गप्पा मारायला वेळ नाही असं सांगते. मित्र हळूच आक्काच्या हातात १०० ची नोट टेकवतो, आता आक्का हसून आमच्यासोबतच सोफ्यावर बसते.

 आक्का आमच्याशी बोलायला तयार असते.एका पोरीला आवाज देऊन आमच्यासाठी थंड पाणी घेऊन यायला सांगते.अधूनमधून जेव्हा  गिऱ्हाईक येतात तेव्हा आक्का त्यांना बंद खोलीपर्यंत सोडते, कोणत्या तरुणीसोबत जायचं हे सांगते,आणि परत आमच्यासोबत येऊन गप्पा मारते.

हळूहळू आक्का प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात करते.थोड्या वेळानंतर तिला काहीही विचारण्याची गरज भासत नाही.आक्का आता सगळं कथन करायला सुरुवात करते.

आक्का सांगते कि ५००-१००० च्या नोटा बंद झाल्यापासून इथे गिऱ्हाईक येणं कमी झालंय. अगोदर दिवसाला १०० गिऱ्हाईक यायचे,तर आता केवळ २०-२५ येतात. इकडे एका शय्येचा भाव ४७० रुपये आहे असं ती सांगते. ५०० रुपयांच्या जुन्या नोटा घ्यायला आमच्या शेठने सांगितलंय तेव्हा जुन्या-नव्या सगळ्या नोटा आम्ही घेतोय. ५०० ची नोट घेऊन कोणी आलं तर ३० रुपये मात्र आम्ही परत देत नाही असं अक्का स्पष्ट करते.

आम्ही बोलत असताना २५-२७ वर्षे वयाचा एक तरुण आत शिरतो.त्याच्या हालचालींवरून तो दारू पिऊन आलेला आहे हे आम्ही सगळे ओळखतो. आक्का त्याला विचारते , किती रुपये आणले? तो खिशातून ५०० ची नोट काढतो.आक्का ती नोट घेते आणि नोट खरी आहे कि खोटी आहे हे निरखून बघते. नोट खरी असल्याची खात्री झाल्यावर त्या तरुणाला एका मुलीसोबत जायला सांगते,आणि सुनावते कि, १० मिनिट जास्त घे हवं तर , पण ३० रुपये परत मिळणार नाहीत.

***

४.

आमच्या गप्पा चालूच असतात.प्रीती नावाची एक तरुणी आमच्याशेजारी येऊन बसते. २८-३० वर्षाची असेल. ही कलकत्त्याची आहे.आमचं बोलणं ऐकून ती स्वतःहून आमच्याकडे आली. तिच्याशी बोट असताना हे कळलं कि, दर तीन महिन्यांनी ही कलकत्त्याला जात असते. हिला लहान-लहान ३ मुले आहेत.आईवडिलांकडे लहानग्या मुलांना टाकून ही इकडे जीवाची मुंबई करते आहे. प्रीती सांगत होती कि प्रत्येक गिऱ्हाईकाकडून इथला दलाल ४७० रुपये घेतो. त्यातले १५० रुपये आम्हाला मिळतात. महिन्याला कसेबसे १०,००० रुपये कमाई होत असते. त्यात घरी मुलांना पैसे पाठवायचे असतात.मुलांची शाळा आहे,आईवडिलांचं दुखणं आहे,कपडालत्ता आहे,खाणंपिणं आहे,माझा इकडचा खर्च आहे.या सगळ्यात पैश्याची मोठी ओढाताण होत असते .आत धंदा मंदीत चालू आहे म्हटल्यावर पैशाची मिळकत होत नाहीये. घरी पैसे कसे पाठवणार याची चिंता हिला लागून राहिलेली आहे.
बोलताना प्रीती आता आगतिक झालेली वाटली.लाली -पावडरने सजवलेल्या तिच्या खोट्या चेहऱ्यावरचं खोटं हसू आता निवळलं होत.

***
५.
तिथेच थोड्या वेळाने समोरच्या बंद खोलीतून एका तरुणासोबत शय्या करून आलेली,आणि त्याच तरुणाला अश्लील शिव्या देणारी बॉबी आमच्या समोर बसली. आत खोलीत या दोघांचं काही तरी वाजलं असेल हे आम्ही ओळखलं.बळजबरीने तो माझे फोटो काढत होता असं ती सांगत होती.ही बॉबी देखील तिशीच्या आतली. बंद झालेल्या ५००-१००० च्या नोटांमुळे ही कमालीची चिंतीत होती.१० वर्षांपासून कामाठीपुऱ्यात देहाचा व्यापार करणाऱ्या हिचे कुठल्याही बँकेत अकाउंट नाही.अकाउंट नाही म्हटल्यावर पैसे कुठे जमा करणार? नोटा कुठे बदलणार? धंदा करायचा कि नोटा बदलीसाठी बँकेच्या  रांगेत उभं राहायचं असे असंख्य प्रश्न हिला पडलेले होते. कालच एका मैत्रिणीच्या अकाउंटवर १५,००० रुपये टाकून आल्याचं ती सांगत होती. जानेवारीत आता तिला तिचे पैसे भेटतील,पण केवळ १३०००. तिची मैत्रीण २००० रुपये कमिशन घेणार आहे.

***
६.
सुरेशसोबत बोलत होतो. सुरेश इथला दलाल आहे. त्याचीसुद्धा कहाणी काही वेगळी नाही.धंदा मंदीत असल्यामुळे तो देखील चिंतेत आहे. पोलिसांना महिन्याला २ लाख रुपये हप्ता द्यावा लागतो,तेव्हाच आमचा हा व्यापार चालतो असं तो सांगत होता. पोलिसांना द्यावा लागणारा २ लाखाचा हप्ता कसा भरून काढायचा, याच प्रश्नावर तो राहून राहून बोलत होता.
रोजचा हप्ता वसूल करायला आलेले पोलीस देखील आता सुट्टे पैसे  मागतात, ५००-१००० च्या नोटा घ्यायला मनाई करतात.तेव्हा त्यांना कुठून पैसे द्यायचे हे सुरेशच आम्हाला विचारतो.
आम्ही '२ लाखांचा हप्ता' हे ऐकूनच स्तब्ध झालो होतो.हा 'व्यापार' किती मोठा आणि किती खोटा आहे हे त्यानिमित्ताने जाणवत होतं. प्रत्येक गिऱ्हाईकामागे  १५० रुपये मिळविणाऱ्या आणि महिन्याला कसेबसे १०००० रुपये कमावणाऱ्या या  वेश्या किती मोठ्या आर्थिक शोषणाचा भाग आहे हे जाणवलं. यांचं सामाजिक शोषण आहेच पण त्याहून भयानक आर्थिक शोषण आहे,हे शोषण थांबावं म्हणून आपल्याकडे आहे का काही कार्यक्रम? कोणाच्या अजेंडयावर आहेत यांचे प्रश्न? यांच्यासाठी कोणता 'स्किल इंडिया' चा कार्यक्रम आहे आपल्याकडे? स्मार्टसिटीच्या योजनेत कामाठीपुरा येईल का कधी? याची उत्तरे १००% नकारात्मक भेटणार आहेत.

कामाठीपुरा- आर्थिक आणि सामाजिक शोषणाचा काळा बाजार 

इथला सगळं व्यापार हा रोखीच्या व्यवहारातून चालतो.इथे कुठलेही स्वॅप मशीन चालत नाही.सेवा घ्या आणि रोख पैसे ठेवा अशी इथली व्यवहार पद्धत आहे. ५००-१००० च्या नोटबंदीमुळे इथे आलेली आर्थिक मंदी भयानक आहे. महिला सहनशील असतात हे खरं,पण  या महिला इतर महिलांपेक्षा वेगळ्या आहेत. त्या अधिक सहनशील आहेत.त्यांचं होणार लैगिक शोषण,सामाजिक दमन, आर्थिक शोषण त्या निमूटपणे सहन करत आलेल्या आहेत आणि आजही सहन करत आहेत.बचत म्ह्णून साठवलेले पैसे कुठे भरायचे,कुठल्या बँकेत भरायचे,त्यासाठी काय प्रक्रिया असते,एका वेळी किती पैसे भरायचे,किती पैसे काढायचे हे त्यांना अजूनही स्पष्ट नाही.शिक्षण नसल्यामुळे अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागत आहे.

शेवटी निघताना आक्काचा निरोप घ्यायला गेलो,तेव्हा हातात हात घेत आक्का म्हणाली, पोरा,आमच्याकडे येणारा प्रत्येक पैसा हा काळाच असतो. आमचा धंदा हा काळा बाजाराचं आहे हे आम्ही मान्य करतो.पण देशाचे लुटेरे तिथे कर्ज बुडवून देशातून पळून जातात त्यांना पकडायचं सोडून आमच्यासारख्या गरिबांच्या मागे हे सरकार का लागतंय? सरकार कुठलंही येऊ दे,आमच्यासाठी कुणीच काही करत नाही.आम्ही काल देखील उपरेच होतो,आज थोडं आणखी उपरे झालोत एवढंच.

                 
              

माध्यमांची नैतिकता,रवीशकुमार आणि सरकार

NDTV वर सरकारने केलेल्या कारवाईनंतर अनेकांगी चर्चा चालू झाल्या.  भाजप सरकार सत्तेवर आहे म्हणून भाजप विरोधी लोक आकांडतांडव करत आहेत असे समजण्याचे कारण नाही. संपुआ सरकारच्या कार्यकाळात देखील झाल्या होत्या अशा घटना.देशहिताच्या, समाजहिताच्या विरोधात काही प्रक्षेपण होत असेल तर त्याला आळा घालणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तसे त्यांना संविधानिक अधिकार देखील आहेत. त्याबद्दल वाद नाही. 2005 ते 2013 या कार्यकाळात एकूण 28 वेळा सुमारे 20 चॅनेलवर NDTV वर जशी कारवाई झाली, अगदी तशाच स्वरूपाच्या कारवाई झाल्या आहेत.



आजवर कोणत्या चॅनेल वर कारवाई केली गेली.

 1. जनमत, 2007
 2007 मध्ये जनमत टीव्ही वर कारवाई केली गेली. कारण होते बनावट स्टिंग ऑपरेशन.सुमार महिनाभर या टीव्हीवर प्रसारणासाठी बंदी घालण्यात आली होती. प्रकरण असे होते कि, एक महिला शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत सेक्स रॅकेट चालवते आहे असे जनमतचे संशोधन होते. त्यांनी त्यानुसार स्टिंग ऑपेरेशन केले, झाल्या प्रकारामुळे खळबळ माजली. संबंधित महिला शिक्षिकेवर लोकांनी जीवघेणा हल्ला देखील केला.परंतु तपासात असे निष्पन्न झाले कि महिला शिक्षिका निर्दोष होती. समाजस्वास्थ बिघडवण्याचे काम जनमत ने केले होते म्हणून त्यांच्या  प्रसारणावर महिनाभर बंदी घातली गेली.
हे स्टिंग जेव्हा केले गेले तेव्हा,सुधीर चौधरी हे जनमतचे सीईओ-संपादक होते.आता ते झी न्यूजचे एडिटर आहेत. त्यांच्यावर कोळसा घोटाळ्याची बातमी न दाखवण्यासाठी जिंदाल समूहाकडून 100 कोटी लाच मागितल्याचा आरोप होता.सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. जेएनयु मधल्या कथित देशविरोधी प्रकरणाची कुठलीही शहानिशा न करता खोटे व्हिडियो न्यूज चॅनेलवर दाखवून संपूर्ण जेएनयुमधल्या विद्यार्थ्यांना देशद्रोही ठरविण्यात यांचा मोठा वाटा राहिला आहे.

2. फैशन टीवी, 2007, 2010, 2013
फॅशनच्या दुनियेतील महत्वाचा आणि कायम चर्चेत राहणारं हे चॅनेल. 2007 ते 2013 दरम्यान 3 वेळा हा चॅनेल ऑफ एयर केला गेला.पहिली बंदी 2 महिन्यांसाठी होती.कारण होते ‘मिडनाइट हॉट’ हा कार्यक्रम. अश्लील दृश्य दाखविल्याप्रकरणी ही कारवाई होती.2010 मध्ये पुन्हा एकदा बंदी घातली गेली, ही बंदी 9 दिवसांची होती, यावेळी कारण होते टॉपलेस महिला मॉडेल दाखविल्याचे. 2013 मध्ये पुन्हा एकदा अश्लील दृश्य दाखविल्याप्रकरणी 10 दिवसांसाठी या चॅनेलच्या प्रसारणावर बंदी होती.

3. महुआ टीवी, 2013
25 एप्रिल  , 2013 ला महुआ टीव्ही एक दिवसासाठी बंद ठेवला गेला. कारण हे होते कि प्राईम टाइम मध्ये या चॅनेलने ‘ए’ सर्टिफिकेट असलेल्या  ‘औलाद’ आणि  ‘एक और कुरुक्षेत्र’ या दोन चित्रपटांचे प्रक्षेपण केले.

4. AXN, 2013
25 एप्रिल  , 2013 ला AXN चॅनेल वर देखील एकदिवसीय बंदी घातली गेली. या चॅनेलने देखील  ‘ए’ सर्टिफिकेट असलेला डार्कनेस फॉल्स' हा सिनेमा प्रदर्शित केला होता.

5. मूवीज ओके, 2013
1 मे 2013 रोजी मुव्हीज ओके या चॅनेलवर देखील एक दिवसाच्या प्रक्षेपणावर बंदी घातली गेली.कारण होते कि त्यांनी देखील प्राईम टाईम दरम्यान ‘दिलजले’ हा ‘ए’ सर्टिफिकेट असलेला सिनेमा प्रदर्शित केला होता.

6. कॉमेडी सेंट्रल, 2013
17 मई, 2013 रोजी,या चॅनेलवर 10 दिवसांच्या प्रक्षेपण बंदीची कारवाई केली गेली.कारण होते, ‘स्टैंड अप क्लब’ हा प्रोग्रॅम. यात अश्लील शेरेबाजी करण्यात आल्याचा आरोप होता.

7. WB, 2014
16 जनवरी, 2014 रोजी  ‘WB’ चॅनेलवर देखील एकदिवसीय प्रक्षेपणावर बंदी घातली गेली होती.कारण होते त्यांनी दाखविलेला  ‘इट्स अ बॉय गर्ल थिंग’ हा अडल्ट सिनेमा.

हा सगळा झाला आतापर्यंतचा इतिहास. माहिती व प्रसारण मंत्रालय, मग ते भाजप चे असोत किंवा काँग्रेसचे असोत, त्यांनी अशा  प्रकारच्या कारवाई आजपर्यंत केल्या असल्याचा इतिहास आहे. तसे त्यांना संविधानिक अधिकार आहेत. वर पाहिलेल्या 7 प्रकरणात एकटे न्यूज देणारे जनमत चॅनेल सोडले तर बाकी सगळे मनोरंजन करणारे चॅनेल आहेत.न्यूज चॅनेलवर अशा कारवाई फार कमी झाल्या आहेत. आपल्याकडे माध्यमांचे स्वातंत्र्य अजूनही अबाधित आहे. ऑथोरॅटरियन रुल आपल्याकडेही आता लागू होतो आहे कि काय अशी शंका आहे. कारण, सुरक्षेच्या कारणावरून जर NDTV वर  कारवाई होत असेल, तर मग ज्या ज्या चॅनेल ने पठाणकोट हल्ल्याचे सविस्तर वृत्तांकन केले त्यांच्यावर देखील तसाच नियम लागू करायला हवा होता. पण तसे झाले नाही. रवीशकुमार हा प्रतिभावंत पत्रकार कायम हुकूमशाहीच्या विरोधी भूमिका घेत असतो, भांडवलदारी व्यवस्थेच्या विरोधात कष्टकऱ्यांच्या बाजूने उभा असतो. माध्यमांची नैतिकता काय आहे हे या माणसाकडून शिकावे. अर्णब गोस्वामी सारखा आततायीपणा रविशच्या कुठल्याही कार्यक्रमात आजवर दिसलेला नाही. बायस न होता वार्तांकन करणे हे फार कमी पत्रकारांना जमते, रवीशकुमार त्यातलेच एक आहेत.

खरे तर या निमित्ताने चर्चा अशी व्हायला हवी कि, आणीबाणीच्या काळात देशहितासाठी कसे वार्तांकन केले जावे यासाठी माध्यमांना कुठल्या गाईडलाईन्स असाव्यात. 26/11 हल्ल्यानंतर आपल्याला हा प्रश्न भेडसावला होता. अतिरेकी हल्ला कसा कव्हर केला पाहिजे याचे ज्ञान भारतीय माध्यमांकडे नव्हते (नेपाळ भूकंपानंतर आणि उत्तराखंड जलप्रलयानंतर भारतीय माध्यमांनी केलेल्या वार्तांकनानंतर अजूनही हे भान आपल्याकडल्या माध्यमांना नाही हे जाणवले आहे) त्यामुळे जे भेटेल ते लाईव्ह दाखविणाच्या फंदात आपण सगळं काही पाकिस्तानस्थित अतिरेक्यांना आयत दाखवलं.त्याचा व्हायचा तो परिणाम झाला. त्यातून देखील आपण काही शिकलो नाही. अजूनही आपल्याकडे माध्यमांना अशा गाईडलाईन्स नाही. PTI ने घालून दिलेले नियम या देशातला एकही वृत्तपत्र, न्यूजचॅनल पाळत नाही.नियम करून सगळे प्रश्न सुटत नाही.तसे असले असते तर जेएनयु देशद्रोही ठरले नसते आणि झी मीडियाने जाहीरपणे देशाची माफी मागितली असती.

असो, तर मुद्दा हा आहे कि NDTV घातलेली एकदिवसीय प्रक्षेपणाची बंदी चूक कि बरोबर. ही बंदी म्हटलं तर चुक आणि म्हटलं तर बरोबर देखील आहे. चूक यासाठी कि रवीशकुमारसारख्या संयमित पत्रकारावर हेतुपुरस्पर केलेली कारवाई. NDTV ला वेगळा न्याय आणि इतर चॅनेलला वेगळा न्याय कशासाठी? समाजस्वास्थाची एवढीच चिंता होती तर मग झी न्यूजबद्दल अशी कारवाई का केली गेली नाही?

सर्जिकल स्ट्राईकच्या गप्पांमध्ये  आपला देश मागच्या आठवड्यात ढवळून निघाला. सर्जिकल स्ट्राईक बद्दल आपापल्या विद्यमान सरकारने संपूर्ण जगाला माहिती दिली. कारवाई कशी केली, कधी केली आदी गोष्टी सविस्तर सांगितल्या. आपल्या सैन्याच्या कूटनीतीबद्दल जर सरकारच असा खुलासा जगासमोर करत असेल तर माध्यमांकडून सरकारने अपेक्षा का ठेवावी?
देशहितासाठी हे  किती घातक आहे हे 56 इंच छाती असलेल्या प्रधानसेवकाला अजून कळलेले दिसत नाही. NDTV वर कारवाई करण्यासाठी सरसावलेले सरकार, खुद्द संरक्षणमंत्र्यांबाबत काय भूमिका घेईल? सरकार भूमिका घेणार नाही. सरकारला तशी भूमिका घेण्याची सवय देखील नाही. केवळ आणि केवळ आततायीपणा दाखविण्यात विद्यमान सरकार सरसावलेले आहे. पूर्वग्रह ठेऊन सरकार निर्णय घेतंय.
परवा रामनाथ गोयंका पत्रकारिता पुरस्कार सोहळ्या दरम्यान पत्रकार राजकमल झा यांनी व्यक्त केले मत अगदी बरोबर आहे,ते म्हणतात  "ज्यांना वाटते कि चांगली पत्रकारिता आता उरली नाही आणि सरकारने पत्रकारांना विकत घेतले आहे. चांगली पत्रकारिता मेलेली नाही,मरत नाही.उलट अशी पत्रकारिता वाढते आहे, बहरते आहे.एक वाईट गोष्ट मात्र ही आहे कि, खोटी पत्रकारिता सध्या मोठ्या प्रमाणात गोंगाट करते आहे, गेल्या 5 वर्षात असे चित्र नव्हते".
हे खरे आहे कि खोटी पत्रकारिता आता जास्त गोंगाट करते आहे, पण वैषम्य या गोष्टींचं आहे कि सरकार देखील आता या गोंगाटात आपला सूर मिळविण्याच्या कामी लागली आहे. सरकार यात इतकं व्यस्त आहे कि, बागो मैं बहार है? या सध्या प्रश्नाचे उत्तर देताना देखील त्यांना अनेकदा डोके खाजवावे लागत आहे.

मोदींसमोर पत्रकार राजकमल झा यांनी केलेलं चर्चित भाषण.

बुधवारी नवी दिल्लीत पत्रकारितेत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'रामनाथ गोयंका पुरस्काराचे वितरण केले गेले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण केले गेले.मोदी सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या पत्रकारांना देखील या कार्यक्रमात मोदींना पुरस्काराने सन्मानित करावे लागले. पत्रकार आणि लेखक म्हणून नावाजलेले अक्षय मुकुल यांना देखील हा पुरस्कार जाहीर झाला होता, परंतु या कार्यक्रमाला न येणे त्यांनी पसंद केले आणि कारण सांगितले कि  मोदींच्या सोबत एकाच 'फ्रेम' मध्ये येणे आवडणार नाही!

अक्षय मुकुल यांच्या या भूमिकेपेक्षा अधिक चर्चा झाली ती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना राजकमल झा यांनी केलेल्या भाषणाची. राजकमल झा हे गोयंका ग्रुपच्या 'द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाचे संपादक आहेत. अक्षय मुकुल यांच्या प्रमाणे कार्यक्रमापासून दूर राहण्या ऐवजी संवादाचा मार्ग त्यांनी स्वीकारला. या आभार प्रदर्शन भाषणात त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्याजोगे आहेतच,सोबतच मोदींच्या समोर त्यांनी व्यक्त केलेली भूमिका सरकारला आणि पत्रकारिता जगताला ठिकाणावर आणणारी आहे. त्यांच्या भाषणाचा हा मराठी अनुवाद.
प्रधानमंत्री मोदींसोबत सेल्फी घेण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे पत्रकार आणि स्वतः मोदीजी 



राजकमल झा, हे मोदींच्या भाषणानंतर विचारपीठावर आले आणि बोलायला लागले...

खूप खूप धन्यवाद प्रधानमंत्री मोदीजी.
तुमच्या 'स्पीच' नंतर आम्ही सगळे 'स्पीचलेस' झालो आहोत.परंतु मला आभार मानताना आणखी काही बोलायचे आहे.तुमच्या शब्दांसाठी आभार.तुमचे येथे असणे म्हणजे एक मजबूत संदेश आहे.आम्ही विश्वास व्यक्त करतो कि चांगली पत्रकारिता ही अशा कामांमुळे चर्चिली जावी ज्या कारणामुळे इथे आजच्या संध्याकाळी  पत्रकारांना आणि संपादकांना सन्मानित केले गेले आहे.

चांगली पत्रकारिता काय असते हे 'सेल्फी पत्रकार' ठरवणार नाहीत. ही सेल्फी पत्रकारिता करताना आजकाल आपल्याला अनेकजण दिसतील.हे लोक त्यांचे 'चेहरे' आणि 'विचार' यांत अंतर ठेवतात, कॅमेराचे तोंड हे लोक कायम स्वतःकडे ठेवतात.त्यांच्या दृष्टीने एकच गोष्ट महत्वाची असते, त्यांचा आवाज आणि त्यांचा चेहरा.याशिवाज जे काही आहे ते सगळे इथल्या भूमीत आहे.जसे कि विनाकारण केलेला गोंगाट! या सेल्फी पत्रकारितेत तुमच्याकडे काही तथ्य नसले तरी हरकत नाही, फ्रेम मध्ये केवळ एखादा झेंडा असायला हवा, आणि तुम्ही त्या झेंड्यामागे लपा!

धन्यवाद सर, तुम्ही विश्वसनीयता बद्दल बोललात.ही खूप महत्वाची गोष्ट आहे ज्यातून आम्ही पत्रकार काही शिकू शकतो. तुम्ही पत्रकारांबद्दल काही चांगल्या-चांगल्या गोष्टी देखील बोललात, त्याबद्दल आम्ही थोडे नर्वस आहोत.

तुम्हाला ही गोष्ट  विकिपीडियावर मिळणार नाही,परंतु मी इंडियन एक्सप्रेसच्या संपादक पदावर असल्याकारणाने सांगू शकतो कि, रामनाथ गोयंका यांनी एका पत्रकाराला नोकरीवरून काढले होते. याचे कारण होते, कि कोणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले कि, तुमचा पत्रकार खूप छान काम करतो आहे.
या वर्षी मो 50 वर्षांचा होणार आहे, तेव्हा मी हे सांगू शकतो कि आजच्या काळात आपल्याकडे असे पत्रकार आहेत जे रिट्विट आणि लाईक्स च्या युगात तरुण होत आहेत, ज्यांना माहित नाही  कि सरकारकडून आपली केली जाणारी निंदा आपल्यासाठी खरे तर अभिमानाची गोष्ट आहे.
आपण जेव्हा कधी कुना पत्रकारची स्तुती ऐकू तेव्हा, ज्यापद्धतीने चित्रपटात स्मोकिंग सीनच्या दरम्यान स्क्रीनवर खबरदारीचा उपाय म्हणून पट्टी चालते, त्यापद्धतीने आपण देखील एक पट्टी चालवायला हवी कि, सरकारतर्फे केली जाणारी आलोचना पत्रकारितेसाठी शानदार खबर आहे. मला वाटते कि ही गोष्ट पत्रकारितेसाठी खूप खूप महत्वाची आहे.

आभारप्रदर्शन भाषण करताना गोयंका ग्रुपच्या 'द इंडियन एक्स्प्रेस' या दैनिकाचे संपादक राजकमल झा.

या वर्षी आमच्याकडे या पुरस्कारासाठी 562 निवेदने आली.गेल्या 11 वर्षातील ही सगळ्यात जास्त निवेदने आहेत.हे त्या लोकांना उत्तर आहे ज्यांना वाटते कि चांगली पत्रकारिता आता उरली नाही आणि सरकारने पत्रकारांना विकत घेतले आहे. चांगली पत्रकारिता मेलेली नाही,मरत नाही.उलट अशी पत्रकारिता वाढते आहे, बहरते आहे.एक वाईट गोष्ट मात्र ही आहे कि, खोटी पत्रकारिता सध्या मोठ्या प्रमाणात गोंगाट करते आहे, गेल्या 5 वर्षात असे चित्र नव्हते.

शेवटी मी आजच्या संध्याकाळी येथे आलेल्या प्रत्येकाचे धन्यवाद मानतो. इथे सत्तेत असलेले लोक आहेत, विरोधी पक्षातले लोक आहेत.आपण सगळे जाणतो कि कोण कोण आहेत.परंतु ते जेव्हा पत्रकारितेची स्तुती करतात तेव्हा काही फरक पडत नाही.तुम्ही हे जाणून घेऊ शकत नाही कि कोण सत्तेत आहे आणि कोण विरोधी पक्षात आहे.हे अशाच पद्धतीने झाले पाहिजे.
खूप खूप धन्यवाद.



अनुवाद: सागर भालेराव

भविष्य आपल्याला न्याहाळत आहे: नेहरूंचं भाषण

`अखंड भारताची (ब्रिटिश इंडिया) रक्तरंजित फाळणी झाल्यानंतर भारत (15 ऑगस्ट 1947) आणि पाकिस्तान (14 ऑगस्ट 1947) स्वतंत्र झाले. त्यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान  पं. जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे पहिले गर्व्हनर जनरल मोहम्मद  अली जीना यांनी आपापल्या देशाला मार्गदर्शन करणारी भाषणं केली.  नेहरूंचे 'नियतीशी करार' आणि जीनांचे 'पहिलं अध्यक्षीय मनोगत' ही भाषणं गाजली. दोन्ही देशांनी  कोणत्या दिशेने  वाटचाल करावी, हे सुचवणारी ही भाषणं 'जग बदलवणाऱ्या  भाषणांच्या' मालिकेत , स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने....

भविष्य आपल्याला न्याहाळत आहे
 पं. जवाहरलाल नेहरू



पुष्कळ वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार वेत्र्ला होता, आणि आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु बर्याच अंशी प्रत्यक्षात आणण्याचा आज क्षण आला आहे. मध्यरात्रीच्या या प्रहरी, जेव्हा सगळे जग झोपले आहे, तेव्हा भारत जागा होतोय; त्याच्या जीवनाप्रति आणि स्वातंत्र्याप्रति!

इतिहासात क्वचितच  येणार्या क्षणी आपण जुन्याकडून नव्याकडे जात आहोत. एका युगाचा अंत होतो आहे. अन् वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी; भारतभूमीप्रति, तिच्या जनतेप्रति आणि त्याहूनही महान अशा मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ, अशी प्रतिज्ञा करणे हे अत्यंत औचित्यपूर्ण ठरेल.
इतिहासाच्या उषःकालात भारताने आपला न संपणारा शोध सुरू वेत्र्ला. शतकानुशतके  अविरत संघर्ष करून अन् जयापजयाचे डोंगर पार करून! चांगल्या वाईट शक्तींशी भारताने सामना केला परंतु भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही किंवा ज्या आदर्शांनी तिला सामर्थ्य दिले  त्यांना भारत विसरला देखील  नाही. आपला अंधःकारमय गतकाळ आज संपतो आहे. भारताला पुन्हा एका स्वत्वाची जाणीव होते आहे.

आज आपण साजरी करत असलेली उद्दिष्टपूर्ती ही आपली वाट पाहणार्या विजयश्रीच्या प्रसादाची केवळ एक पायरी आहे. प्रश्न आहे तो, ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य आपल्यात आहे काय?
स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारी देखील  येत असते. भारताच्या सार्वभौम जनतेचे प्रतिनिधित्व करणार्या या घटनासमितीवर ही फार मोठी जबाबदारी आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वी आपण काही प्रसववेदना सहन केल्या आहेत; त्यातील दुःखद  आठवणींनी आपले अंतःकरण भरलेले आहे; त्यातील काही वेदनांचा  सल अजूनही आपण अनुभवीत आहोत. असो, भूतकाळ संपला आहे अन् भविष्यकाळ आता आपल्यासमोर उभा आहे.

हा भविष्यकाळ सहजसाध्य किंवा आरामायक नक्कीच नाही. अविरत आणि प्रचंड महत्त्वाकांक्षेतून आपण वेळोवेळी एक प्रतिज्ञा केलेली आहे, ती प्रतिज्ञा आज आपण पूर्ण करण्यास जातो आहोत. ती प्रतिज्ञा म्हणजे, भारताची सेवा म्हणजे लाखो पीडितांची सेवा आहे. दारिद्र्य, अज्ञान, रोगराई  यांचे निर्मूलन करणे आणि संधींच्या विषमतेचे निर्मूलन करणे होय. प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे, अशी आपल्या पिढीतील महामानवाची महत्त्वाकांक्षा आहे. हे आपल्या आवाक्यापलीडचे असेल; परंतु जोपर्यंत अश्रू आहेत, दुःख आहे तोपर्यंत आपले कार्य संपणार नाही.
आणि म्हणूनच आपण हे सगळे सोसले पाहिजे, त्याच्या निराकरणासाठी काम केले पाहिजे, असले दुःख नष्ट व्हावे म्हणून कठोर परिश्रम केले पाहिजेत; तरच आपली ही स्वप्ने साकार होऊ शकतील. ही भारताची स्वप्ने आहेत, इतकेच नव्हे तर संपूर्ण जगाची आहेत, जगातील सर्व राष्ट्रांची आहेत, सर्व जनतेची आहेत. आज मानव एकमेकांशी अनेकविध धाग्यांनी इतका जोडला गेला आहे की एकमेकांच्या सहकार्याशिवाय त्याला जगणे अशक्य  आहे. ज्याप्रमाणे शांतता ही विभागता येत नाही; स्वातंत्र्य विभागता येत नाही, त्याचप्रमाणे आता वैभवसंपन्नाता आणि जगातील सर्वनाशही विभागता येणार नाही. तेव्हा आता फार काळ इतरांपासून वेगळे असे एकट्याचे काही असणार नाही. जे काही असेल ते सर्वांचे असेल.

ज्या भारतीयांचे आम्ही प्रतिनिधित्व करतो, त्यांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आमच्या पाठीशी विश्वासाने आणि निश्चयपूर्वक उभे राहावे. आताची ही वेळ क्षूद्र आणि फुटकळ टीकेची, अनिष्ट चिंतनाची वा दुसऱ्यावर दोषारोप  करण्याची नाही. जेथे भावी पिढी सुखाने नांदेल अशा स्वतंत्र भारताच्या प्रसादाची  उभारणी आपण केली  पाहिजे. मान्यवर, मी असा प्रस्ताव करण्याची विनंती करतो की, असे निर्णय घेतले जावेत

1. मध्यरात्रीचे टोले पडल्यानंतर याप्रसंगी उपस्थित घटना सभेच्या सदस्यांनी  अशी शपथ घ्यावी  की  'तमाम भारतीयांनी हाल अपेष्टा अणि त्यागातून मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या या पवित्र क्षणी, मी भारतीय घटना सभेचा सदस्य, भारत व भारतवासीयांच्या सेवेसाठी स्वतःस अर्पित करत असून, प्राचीन परंपरा लाभलेल्या या पावन भूमीची प्रतिष्ठा व वैभव पुन्हा एका प्राप्त करून देण्यासाठी  त्याचबरोबर जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मानवी कल्याण साधण्यासाठी मी सर्वतोपरी आपले योगदान देण्यास कटिबद्घ आहे.'
2. जे सदस्य  यावेळी उपस्थित नाहीत. ते पुढील वेळी या अधिवेशनात उपस्थित असतील; त्यावेळी त्यांनी ही शपथ घ्यावी.

Reference: Constituent Assembly Debates.
अनुवा : सागर भालेराव
पूर्व प्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट 2016

संविधान सभेतील मोहम्मद अली जिनांचं भाषण

           


हिंदू समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमांमध्येखील आपल्याला पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी असे पंथ पाहायला मिळतात तर हिंदू  समाजात ब्राह्मण, वैष्णव, खत्री, बंगाली, मद्रासी अशा जाती पाहायला मिळतात.

न्याय, सकारात्मकता ही आपली तत्त्वं
 कायदे आजम मोहम्मद अली जीना.



आपण मला दिलेल्या आदर  सत्काराबाबत मी आपला मनापासून आभारी आहे. घटना समितीने माझी प्रथम राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड केली  गौरव केला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझ्याबद्दल ज्यांनी ज्यांनी कौतुकाचे बोल काढले आहेत, त्यांचादेखील मी आभारी आहे. मला प्रखर आशावाद आहे की, आपल्या सर्वांच्या अनुमतीने, आपल्या सर्वांच्या सहकार्याने ही घटना समिती संपूर्ण जगासाठी एक उत्तम उाहरण ठरेल. घटना समितीला महत्त्वाची दोन  कामे प्रामुख्याने करायची आहेत. प्रथम अग्रणी  असलेले काम म्हणजे पाकिस्तान देशासाठी संविधाननिर्मिती आणि दुसरे काम म्हणजे पाकिस्तान संघराज्याचे प्रशासन व्यवस्थितपणे चालवण्याचे काम. पाकिस्तान संघराज्याचे संविधान बनविताना आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तुम्हांला ही गोष्ट माहीत पाहिजे की, एकाच द्वीपखंडातील दोन देश  एकमेकांपासून विभक्त होत आहेत. आपणच नाही तर संपूर्ण जग या घटनेकडे कुतूहलाने, आश्चर्याने बघत आहे. ही एकमेवाद्वितीय घटना आहे. जगात कुठेही आजवर घडली नसेल अशी ही घटना आहे. मुख्य म्हणजे क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण शांततेने हे मिळविले आहे. संविधाननिर्मितीच्या बाबतीत काय काय केले  पाहिजे याबद्दल या ठिकाणी मी काही भाष्य करणार नाही, परंतु हे सांगू इच्छितो की, तुम्ही सर्व एका सार्वभौम देशाच्या वैधानिक व्यवस्थेचा भाग आहात, तुम्हांला या वैधानिक व्यवस्थेने काही अधिकार दिलेले  आहेत. त्यामुळे तुम्ही काय निर्णय घ्याल व कसे घ्याल हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना याबाबतीत जबाबदारीने वागावे लागणार आहे, हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. एका मुद्द्यावर आपण सगळे सहमत असलो पाहिजे की,देशात कायदा  व सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी  आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे नागरिकांचे जीवन, मालमत्ता, धार्मिक स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टींची काळजी घेणे आपले आदिम कर्तव्य असायला हवे.

दुसरी एक गोष्ट आपणांस सांगू इच्छितो की, सध्या अखंड भारत देश  एका भयंकर शापाने प्रभावित आहे. तो शाप म्हणजे लाचखोरी आणि भ्रष्टाचार होय. इतर देशांना  हा शाप नाही असे नाही. परंतु आपली स्थिती इतर देशांपासून फारच बिकट आहे. लाचखोरी व भ्रष्टाचार हे विष आहे. त्यांच्याशी आपल्याला दोन  हात करावे लागतील. मला आशा आहे की, आपण सगळे या विषयाची गांभीर्याने दखल घ्याल आणि या विषाचे आपल्या देशातून उच्चाटन कराल.

काळा बाजार हा आणखी एक शाप आहे. आपल्याला माहीत आहे की काळा बाजार करणारे लोक फार कमी प्रमाणात पकडले जातात आणि त्यांना शिक्षा केली  जाते. काळा बाजार हा भयंकर राक्षस असून, आपल्या समाजात तो हैदोस घालतो आहे. त्यामुळे आपल्याला अन्नाधान्याच्या टंचाईला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने दखल घेत, कठोरातले कठोर कायदे आपण बनवले पाहिजे.

पुढचा मुद्दा म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी वारसाने मिळालेल्या आहेत. जशा चांगल्या गोष्टी मिळाल्या आहेत तशा वाईट गोष्टीे देखील आपल्याला वारशाने मिळालेल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे नोकरशाही आणि तिचा भ्रष्ट कारभार. याठिकाणी मला हे प्रकर्षाने अधोरेखित करायचे आहे की, नोकरशाहीचा मनमानी कारभार मी खपवून घेणार नाही. जिथे कुठे  मला असे चित्र दिसेल  तिथे मी कडक कारवाई केल्यावाचून  राहणार नाही.

मला माहीत आहे की काही लोक फाळणीबद्दल, पंजाब आणि बंगालच्या विभाजनाबद्दल खूश नाहीत. बर्याच लोकांनी आपली नाराजी बोलूनसुद्धा दाखवली आहे. परंतु आता जी परिस्थिती आपल्यासमोर आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. मी मागे म्हटल्याप्रमाणे एकाच द्वीपखंडातील भूभागाची ही फाळणी न भूतो न भविष्यती अशीच आहे. काही लोकांना हेखील आवडलेले नाही की एकाच समुदायातील दोन  घटक वेगळेवेगळे झालेले आहेत. जिथे एक समाज बहुसंख्य आहे तर दुसरा अल्पसंख्याक आहे.

अल्पसंख्याक व बहुसंख्याक यांना घेऊन काम करता येईल की नाही हा प्रश्न लोकांकडून फाळणीच्या अगोदर  विचारला जात होता. आता फाळणी झालेली आहे, आपण विभक्त झालेलो आहोत. मागचे सोडून देत  आपण ती परिस्थिती स्वीकारायला हवी. मला पूर्ण खात्री आहे की, येणार्या काळात आपण घेतलेला निर्णय फायद्याचा  ठरणार आहे. अखंड भारताची संकल्पना कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. अखंड भारताची संकल्पना ही विनाशाकडे नेणारी संकल्पना आहे. या संकल्पनेचे पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. सोबत एकाच देशात एक समाज प्रभावशाली असणं आणि दुसरा  समाज अल्पसंख्याक असणं हे संयुक्तिक नाही. त्यामुळे आपण फाळणीचा विचार केलेला  होता, तो आता पूर्ण झालेला आहे. पाकिस्तानचे हे विशाल साम्राज्य जर आपल्याला सुखी व समाधानी ठेवायचे असेल तर आपल्याला आपल्या नागरिकांवर लक्ष केंद्रित  करावे लागेल. मुख्यत्वेकरून गरीब जनतेकडे लक्ष दिले पाहिजे. आपण सहकार्याने काम केले , भूतकाळाकडे दुर्लक्ष केले  तर आपल्याला विजय नक्की मिळेल. आपल्याला आपला भूतकाळ विसरून काम करायचे आहे, आपल्या सगळ्यांमध्ये तो उत्साह असला पाहिजे. तेव्हा व्यक्ती कुठल्या  धर्माची आहे, जातीची आहे, रंगाची आहे हे न पाहता आपण काम केले पाहिजे . दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क, अधिकार, असणार आहे. असे असले तरच आपण विकास करू शकू.

हिंदू  समाजव्यवस्था व मुस्लीम समाजव्यवस्था फार वेगळ्यावेगळ्या आहेत असे समजण्याचे कारण नाही. मुस्लिमांमध्येखील आपल्याला पठाण, पंजाबी, शिया, सुन्नी असे पंथ पाहायला मिळतात तर हिंदू समाजात ब्राह्मण, वैष्णव, खत्री, बंगाली, मद्रासी अशा जाती पाहायला मिळतात. हे सगळं संपायला हवं, संपेलही. कोणी म्हणेल की, या व्यवस्थेमुळे भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यात अडथळा आला, म्हणून आपण देखील  या सगळ्या गोष्टी फार अगोदरच सोडायला हव्या होत्या.

फार काळ कोणी तुमच्यावर अधिराज्य गाजवू शकत नाही. 40 करोड लोकसंख्या असलेल्या देशावर  तर नाहीच नाही. आपण पारतंत्र्यात होतो तरी फार काळ आपण त्यांच्या गुलामगिरीत राहू शकलो नाही. आपण यापासून योग्य तो धडा घ्यायला हवा. तुम्ही आता मुक्त आहात. तुमच्या मंदिरांमध्ये  जाण्यास तुम्ही मुक्त आहात. तुमच्या मशिदींमध्ये जाण्यास तुम्ही मुक्त आहात. या पाकिस्तानात हवे तेथे आपले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्याचे तुम्हांला स्वातंत्र्य आहे. तुम्ही कुठल्याही वंशाचे असाल किंवा  धर्माचे असाल, तुमच्या स्वातंत्र्यात अधिकारात पाकिस्तानचे सरकार ढवळाढवळ करणार नाही.

तुम्हाला माहिती असेल की, इतिहासात नोंद आढळते की सध्याच्या भारताची परिस्थिती बघता इंग्लंडची परिस्थिती त्याहून दयनीय  होती. रोमन कॅथलिक आणि प्रोटेस्टंट हे ख्रिश्चन धर्माचे दोन  मुख्य पंथ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. आतासुद्धा इंग्लंडमध्ये प्रोटेस्टंट आणि रोमन कॅथलिक  यांच्यात भेदभाव राखला जातो. ईश्वराचे आभार मानले पाहिजेत की अशा विषमतेच्या काळात आपल्याला स्वातंत्र्य मिळाले नाही. आपण सुरुवात केली आहे, जिथे समानता आहे, जिथे धर्माच्या, जातीच्या, वंशाच्या, वर्णाच्या आधारावर कुठेही विषम वागणूक दिली जात नाही. सर्व नागरिक समान आहेत या तत्त्वावर आपण आपल्या देशाची  उभारणी करत आहोत. रोमन कॅथलिक व प्रोटेस्टंट यांच्यातील वादविवाद  मिटवण्यासाठी इंग्लंड सरकारला बराच कालावधी लागला. अनुभवातून हा देश  शिकला व सध्या सर्वांना समान हक्क, समान नागरिकत्व इंग्लंडमध्ये दिले जाते. प्रोटेस्टंट असो किंवा  रोमन कॅथलिक सर्व पंथाचे लोक तेथील नागरिक आहेत. मला वाटते आपण हा आदर्श  घ्यायला हवा. या देशातील  मुस्लीम हे मुस्लीम म्हणून ओळखले जावेत,हिंदू हे हिंदू  म्हणून ओळखले जावेत, केवळ धार्मिक कारणासाठी नाही तर ते या देशाचे नागरिक आहेत व आपले धार्मिक आचरणाचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे सांगण्यासाठी आपण तसे केले पाहिजे. असो, मी तुमचा फार वेळ घेणार नाही. मला दिलेल्या  मानाबद्दल, गौरवाबद्दल तुमचे पुन्हा आभार मानतो. मी कायम न्यायाला आणि सकारात्मकतेला आपले तत्त्व मानले आहे.

मी सुचवलेली मार्गर्शक तत्त्वे न्यायाच्या बाजूने आणि अन्यायाच्या विरोधात असतील असे मी ठामपणे सांगू इच्छितो. तुम्हां सर्वांच्या सहकार्याने व आधाराने पाकिस्तानला आपण जगातला एक महान देश बनवून दाखवू , असा विश्वास मी व्यक्त करतो.
धन्यवाद!

Reference: Constituent Assembly Debates.
अनुवाद  : सागर भालेराव
पूर्व प्रसिद्धी : लोकमुद्रा मासिक, ऑगस्ट 2016


              

बेझवादा विल्सन


बेझवादा विल्सन यांना या वर्षीची मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालाय. त्यांचे अभिनंदन!
बऱ्याच लोकांना अजूनही बेझवादा विल्सन यांचे नाव माहिती नाही, त्यांचे कार्य काय हे देखील माहिती नाही. प्रत्येकाला ते माहिती हवे असा हट्ट नाही, पण त्यांचे कार्य माहिती नाही याची खंत मात्र नक्की आहे. कर्नाटकात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बेझवादा विल्सन नावाचा माणूस, हाताने मानवी मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांच्या हक्कासाठी लढतो आहे.त्याची आणि माझी पहिली भेट झाली ती आमिर खानमुळे. 'सत्यमेव जयते'च्या पहिल्या पर्वात अस्पृश्यतेचा विषय घेऊन एक कार्यक्रम सादर केला गेला होता.त्या कार्यक्रमात बेझवादा मला पहिल्यांदा भेटले. त्यांची पोटतिडकी त्यावेळी दिसली, नुसती दिसलीच नाही तर ती जाणवली देखील. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शूद्रांना जी काही कामे ठरवून दिलेली आहे, तीच कामे आजच्या लोकशाही युगात देखील दलित समाजाकडून करून घेतली जातात. उदाहरण बघायचे झाल्यास कर्नाटकातील कोलार गावी तुम्ही जाऊन बघू शकता. कोलार हे बेझवादा  विल्सन यांचे गाव. त्या गावात अजूनही  लोकांचा मैला हा तिथले दलित लोक हाताने साफ करतात. हे चित्र पाहिलं कि मॅग्ना कार्टा टराटरा फाडावासा वाटतो, मानवी हक्काची सनद धगधगत्या अग्नीत पेटवून द्यावीशी वाटते.   21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर जिथे आपण महासत्तेची स्वप्ने बघतो आहोत, तिथे या दलित,श्रमिक वर्गाचा आणि जातीचा आपण विचार कधी करणार आहोत? विकासाच्या प्रक्रियेत हे लोक नेमके आहेत कुठे? यांचा नेमका वर्ग कोणता? स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय हि संविधानाची मूल्ये या समाजासाठी आहेत कि नाही? कि अजूनही लोकशाही प्रक्रियेत आपण त्यांचा विटाळ धरतो आहोत? 




स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारमार्फत देशभरात राबवलं जातंय. आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही. चांगल्या गोष्टीचा विरोध करणे करंटेपणाचे लक्षण आहे,ते मी करणार नाही. पण हे अभियान राबविताना सफाई कामगारांच्या समस्या हे सरकार कसे दुर्लक्षित करू शकते? हातात झाडू घेऊन  रस्ते साफ करणारे अमिताभ बच्चन, नीता अंबानी, स्मृती इराणी व अन्य लोक आणि सोबतच प्रधानसेवक मोदीजी आपल्या हाताने मानवी मैला साफ करायला तयार होतील काय? स्वच्छतेत कशाला अस्पृश्यता असायला हवी? वरवरची आपुलकी दाखवून प्रश्न सुटतील काय? अजिबात नाही! त्यासाठी सरकारी पातळीवर जसे कार्यक्षम निर्णय घेण्याची गरज आहे, तशीच संपूर्ण समाजमन बदलणे आवश्यक आहे. बेझवादा विल्सन यांची चळवळ ही केवळ त्यांची चळवळ राहता काम नये. ती लोकचळवळ व्हावी. आरक्षणाच्या मुद्दयांवरून कायम दलितांना टारगेट केलं जात. सफाई कामगार म्हणून तर दलितांना इथे 100% आरक्षण असत ,तिथे आपल्या समाजाला आरक्षण हवं म्हणून कोणी सवर्ण समाज आंदोलन करताना दिसत नाही. तेव्हा, जातीअंताची मांडणी न करता, समतेची भाषा न करता जे सवर्ण आरक्षणाची मागणी करतात त्यांची खरी मानसिकता यातून प्रतीत होत असते. आजवर वेळोवेळी ती झालेली आहे. 
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकर्षाने ज्या घटनेचा उल्लेख केला पाहिजे ती घटना म्हणजे गुजरातमध्ये कातडी कामविणाऱ्या दलित युवकांना झालेली अमानुष मारहाण. कातडी कमविणे हा तसा वर्णव्यवस्थेने सांगितलेला जातिगत व्यवसाय. मेलेल्या गाईची कातडी कामविणाऱ्या 4 दलित तरुणांना गाडीला बांधून अमानुषपणे मारहाण केली गेली. गाई सारख्या जनावराला देवत्वाची वागणूक आणि हाडामासाच्या माणसांना अशी निर्दयी मारहाण कुठल्या मानवी मूल्यात बसते माहीत नाही. देशाच्या पंतप्रधानांना देखील याचे उत्तर माहिती नसेल, म्हणून कदाचित ते या प्रश्नावर गप्प आहेत. देशोविदेशी दौरे करताना भारतभूमी ही गांधी आणि बुद्धाची भूमी आहे असे सांगायचे, मात्र देशात अखलाक मारला जातो, मोहसीन शेखची हत्या केला जाते, दलितांना अमानुष मारहाण केली जाते आणि बेजवादा विल्सनला आपल्या मानवी हक्कासाठी अजूनही झगडावं लागत ही निंदनीय गोष्ट आहे. 
हाताने मैला साफ करणारी महिला कामगार 

23 वर्षांपूर्वी माणसांकरवी मैला साफ केला जाऊ नये यासाठी कायदा केला गेला.कायदा अस्तित्वात आला तो कागदावर.त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.गेल्या 2 वर्षात 1268 सफाई कामगार हे आरोग्याच्या समस्येमुळे मरण पावले असा अहवाल बेझवादा यांनी सरकारला सादर केलाय. 
सामाजिक न्यायाची बीजे ज्यांनी संविधानात रोवली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 35,000 किलोमीटरचा प्रवास करत सफाई कर्मचारी आंदोलनातील लोक दिल्लीला पोहोचले होते. आपल्या समस्या घेऊन त्यांनी 13 एप्रिल 2016 ला दिल्ली गाठली. मात्र त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणाही तथाकथित दलित  नेत्याला  वेळ नव्हता.ज्या बाबासाहेब आंबेडकरांना हायजॅक करत संघाने केंद्रात सत्ता स्थापन केली,त्यांना याबद्दल सोयरेसुतक नव्हते. बाबासाहेबांशी आपलं नातं सांगत हे लोक पुन्हा आपल्या आपल्या गावी पोहोचले.देशात मोठ्या उत्साहात भीमजयंतीचा जल्लोष होता.आपले बांधव मात्र तेव्हा हाताने कुणाचा तरी मैला साफ करत होते, आताही करत आहेत. 
बेझवादा विल्सन यांचा सन्मान देशाची वेगळी ओळख आता जगाला देणार आहे, इथे अजूनही अशा अमानवी प्रथा चालतात हे आता सगळ्या जगाला कळले आहे.ही नक्कीच शरमेची बाब आहे. बेझवादा यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली, भारतीय समाज मात्र अजूनही याबद्दल अनभिद्न्य आहे.आम्ही शिकलेले लोक तुमच्या कामी येऊ शकलो नाही याची खंत आहे.  आमचे सुख तुमचे व्हावे, तुमचे दुःख आमचे व्हावे असं  म्हणू तरी कसं? तुमच्या समाजाचं दुखणं कुणाच्याही नशिबाला येऊ नये. मी तुमचं दुःख वाटून घ्यायला तयार नाही, मीच काय या देशातला कोणीही माणूस ते घ्यायला तयार होणार नाही हे खात्रीपूर्वक सांगतो. माफ करा आम्हाला.
आम्ही तुमचं अभिनंदन तेवढं करू शकतो,यापेक्षा अधिक काही करण्याची आमची माणुसकी केव्हाच गोठलेली आहे.

कोपर्डी : संवादाची प्रक्रिया वाढायला हवी

कोपर्डी : संवादाची प्रक्रिया वाढायला हवी

२४ जुलै रोजी कोपर्डीला भेट दिली. भेट देण्याशिवाय बाकी काय करू शकतो आपण? कुणाही मानवी मनाला चीड़ येईल असे कृत्य कोपर्डीमधे घडले. या अमानवी कृत्यामुळे काही काळातच नगर जिल्ह्यातील हे गाव देशाच्या नकाशावर झळकायला लागले. अहमदनगर जिल्हा प्रसिद्ध आहे तो सहकार चळवळीसाठी, मात्र अलिकडच्या काळातली या जिल्ह्याची ओळख म्हणजे दलित अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून. जिल्ह्यात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या अहंगंडापाई अनेकदा अमानुष अत्याचार घडले आहेत, घडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोपर्डीचे बलात्कार प्रकरण वेगळे ठरते. या प्रकरणात आरोपी हे तथाकथित 'दलित' समाजातले आहेत,पहिल्यांदाच असे घडलेय. या अगोदरच्या सगळ्या प्रकरणात चित्र नेमके उलटे होते.

झाल्या प्रकारणाचे समर्थन बुद्धी ठिकाणावर असलेला कोणताही व्यक्ति करू शकत नाही. ज्या क्रूर पद्धतीने त्या कोवळया मुलीची विटंबना केली गेली ती घटना मानवी समुहाची 'माणूस' म्हणून उत्क्रांती होणे अजुन बाकी आहे असे सांगणारी आहे.

कोपर्डीत पोहोचताना अगोदर कुळधरण नावाचं गाव लागते. या गावात 'जगदंब' नावाची एक माध्यमिक शाळा आहे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या कोणा नामी व्यक्तीची ही शाळा आहे. ही शाळा ते कोपर्डी हे अंतर सुमारे 4 किलोमीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी. जीव मुठीत घेवून इथल्या महिला, मुली या मार्गावरुन प्रवास करतात. गावात दारुचे अड्डे आहेत, दारू पिऊन या झाड़ाझुडपात गावातले रिकामटेकड़े बसलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर,महिलांवर अश्लील शेरेबाजी इथे अगोदर पासून होत होती. पोरीची 'जात' म्हणून घरच्यांनी अगोदर दुर्लक्ष केले, आणि त्याचे पर्यवसान म्हणजे कोपर्डी प्रकरण!

या प्रकरणातला मुख्य आरोपी हा तरबेज गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे, या अगोदर त्याने एक खून पचवलाय, 3 लग्न केली आहेत. त्याच्या या कृत्यांचा गावकऱ्यांना अंदाज होता, वेळीच पाऊल उचलले असते, पोलिसांनी त्याला वेळीच चाप घातला असता, तर आज नगरची निर्भया जिवंत असती. असो, हे झाले बोलण्यासाठी. प्रत्यक्ष प्रकरण आता वेगळ्या थराला गेले आहे. मराठा विरूद्ध दलित असा वाद यानिमित्ताने उभा राहिला आहे. कोपर्डीतले सगळे दलित लोक सध्या गावातून भूमिगत आहेत. गावात वातावरण तणावपूर्ण असल्याने त्यांनी इतर ठिकाणी आसरा घेतलाय. समुहातील एका माणसाच्या चुकीमुळे इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. ही परिस्थिती त्यांनी स्वतः निर्माण केली आहे. वेळीच सगळ्या समाजबांधवांनी अशा उपद्रवी लोकांना जरब बसवली असती तर एवढी मोठी घटना घडलीच नसती.

पीड़ित कुटुंबियाना भेटायला गेलो असता, पीड़ित मुलीचे चुलत आजोबा प्रथम भेटतात. त्यांच्या शर्टला 'शेतकरी संघटने'चा  बिल्ला असतो, विचारल्यावर सांगतात की शरद जोशींच्या समवेत त्यांनी काम केले आहे. घरात एकूणच चळवळीची पार्श्वभूमी. पीड़ित मुलीचे मामा, मावशी उच्चशिक्षित आहेत. झाल्या प्रकरणावर कमालीचा संयम त्यांनी बाळगला आहे त्याच्या मागे ही कारणे आहेत. पीड़ित मुलीचे प्राध्यापक असलेले मामा सांगतात की, आमची मुलगी तर गेली परंतु इतर मुली वाचल्या पाहिजेत म्हणून काय प्रयत्न करता येईल ते बघा.

मुलीचे चुलत आजोबा मात्र सरकारी यंत्रणेवर आणि आरोपींवर आगपाखड़ करतात, ते स्वाभाविक आहे.  अॅट्राॅसिटीचे संरक्षण दलितांना असल्यामुळे ते असे प्रकरण करायला धजतात असे त्यांच म्हणणे आहे. या अगोदर त्या आरोपीने गावातल्या लोकांना अॅट्राॅसिटीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. कायद्याची कवचकुंडले असलेली ही हत्यारे आपलीच लोक कशी बोथट करतात याचे आणखी एक उदाहरण पहायला भेटले. या अगोदर देखील अशा घटना मी स्वतः पाहिलेल्या आहेत, बघतो आहे.

या सगळ्या प्रकरणात एक नाव कायम चर्चेत राहीले, ते म्हणजे शिवप्रहार या संघटनेचे संजीव भोर पाटिल यांचे. त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे आहे की,अॅट्राॅसिटी कायदा रदद् केला पाहिजे असे आपले मत नाही, पण त्याचा दुरूपयोग होऊ नये ही आपली मागणी आहे. जवखेड़ा हत्याकांडाचे ते प्रकर्षाने उदहारण देतात. या प्रकरणात आरोपी हे पीड़ित कुटुंबातलेच निघाले, मात्र चौकशी होण्याच्या अगोदरच संपूर्ण मराठा समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल गेल, हे चुक असल्याचं ते सांगतात. सोनई हत्याकांडाबद्दल देखील त्यांचे गंभीर असे आरोप आहेत, नितीन आगे खून प्रकरणात तथाकथित दलित नेत्यांनी अॅट्राॅसिटी कलम लागू नये यासाठी आरोपींसोबत 'अर्थ'पूर्ण व्यवहार केले आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे. या गोष्टीत तथ्य असू शकते. अहमदनगरचे दलित राजकारण मी स्वतः जवळून पाहिले आहे, त्यामुळे याची शक्यता नाकारता येत नाही असे मत मी व्यक्त करू शकतो.

या सगळ्या गोष्टीचे माइलेज मिळवण्याचा प्रयत्न आता दलितविरोधी संघटना घेत आहे हे नक्की. अगोदरच्या काळातली घडलेली प्रकरणे बघता, या प्रकरणात त्याचा वचपा काढण्याची संधी कोणी सोडलेली नाही.
रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांना कोपार्डीमधे येण्यास मज्जाव करणे हा त्याचाच एक भाग. घडल्या प्रकारणानंतर ज्यांच्याकड़े दलित समुदायाचे नेतृत्व म्हणून बघितले जाते त्यांच्याकडून, प्रकरण घडून गेल्यानंतर 7 दिवसांनी देखील काही भूमिका घेतली जात नाही हे त्यामागचे कारण. या बलात्कार प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली गेली असती तर समाजात वेगळा मेसेज गेला असता, जो सामाजिक कलह रोखण्यास उपयोगी पडला असता. गावकरी देखील ही खंत व्यक्त करतात.

एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी लागेल,की या घटनेकड़े जातीच्या चष्म्यातुन न बघता सामजिक मूल्यांतुन बघितले पाहिजे. मुलीच्या आजोबांचे दारुचे दुकान आहे, याच दारूच्या दुकानातून हे आरोपी दारु पिऊन आले होते. दारुची व्यसनाधिनता यामागे आहे हे मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मुलीचे सख्खे आजोबा कुणाला भेटत नाहीत, त्यांच्याही मनात ती सल असणार, असायलाच पाहिजे.

या प्रकरणात केवळ जातीचे मेक्यानिज्म नाही, तर अनेक व्यवस्था काम करत आहेत. तरबेज गुन्हेगाराला पोलिसांची सूट, दारुचा अवैध व्यापार, लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि स्रीला उपभोग्य वस्तु म्हणून बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या घटकांचा पदर या घटनेला आहे. त्यामुळे अॅट्राॅसिटी कायदा रदद् झाला पाहिजे ही मागणी चुकीची आहे, या उलट अॅट्राॅसिटीचा गैरवापर होऊ नये यासाठी मागणी केली तर ती परिवर्तनवादी चळवळीतले लोक देखील सहज स्वीकारतील इतकी ती वास्तविक आहे.

गावगाड्यातील सवर्ण आणि दलित यांच्यातील संवादाला मध्यंतरी सुरुवात झालेली होती, पण जेव्हा प्रतिष्ठेच राजकारण आड़ आले तेव्हा सगळे थांबल. मराठा सेवा संघाने केलेला हां प्रयोग लोकांना नवविचार देणारा होता.परंतु या चळवळीने टोकाचा ब्राम्हणविरोध स्वीकारला तेव्हा मानवी मूल्ये जपणारी लोक त्यांच्याशी फारकत घेत बाहेर पडले. हीच मानवी मूल्ये जपणारे लोक आज कोपर्डी प्रकरणात आपला निषेध नोंदवित आहेत.

यथावकाश आरोपींना शासन होईल, पीड़ित मुलीला न्याय मिळेल. परंतु आपल्या मानसिकतेचे काय? संस्कृतीची वाहक म्हणून स्रीची पूजा करणारे आपण, लैंगिक वासनेसाठी जर तिचे असे हाल करत असू, तर आपला प्रवास हा पुन्हा अश्मयुगाकडे जाणारा ठरणार आहे.

पीड़ित कुटुंबियाने आणि कोपर्डी ग्रामस्थांनी दाखवलेली कमालीची संयमित भूमिका मनावर खोलवर परिणाम करणारी ठरली आहे. पुढील काळात याचे पर्यावसान कशात होईल हे काही सांगता येत नाही. समाजातल्या प्रत्येक घटकाने याचा निषेध केला पाहिजे आणि कोपर्डीच्या ग्रामस्थासोबत खंबीरपणे उभ राहीले पाहिजे. सदर प्रकरणात खंडित झालेली संवादाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु झाली पाहिजे. दलित नेत्यांनी यात पुढाकार घ्यायला हवा आणि वाढलेला दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. पीड़ित मुलगी ही केवळ कोपर्डीच्या लोकांचीच बहिण-बाळ नव्हती. तर आपल्या सर्वांशी तीच एक नाते होत, ते नाते म्हणजे माणुसकिचे!

आता मात्र हे नाते अधिक घट्ट व्हावे. बीडच्या प्रकरणात, गुजरातच्या प्रकरणातून त्याची प्रतिक्रिया येऊ नये. कारण प्रकृतीचा नियम आहे, सुख्यासोबत ओले देखील जळते. आपल्याला लागलेली आग विझवायची आहे, त्यात तेल घालणे हा मानवधर्म नक्कीच नाही.

- सागर भालेराव
sagobhal@gmail.com


बुरहान वानी काश्मिरी तरुणांचा हिरो का?



बुरहान वानीच्या हत्येनंतर संपूर्ण काश्मिरात आगडोंब उसळला आहे. काश्मीरची जनता बुरहान वानीला आतंकवादी मानायला तयार नाही. त्यांच्यासाठी बुरहान हा 'शहीद' झालेला आहे. कित्येक सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला असेल की, ज्या व्यक्तीला आतंकवादी, दहशतवादी म्हटलं पाहिजे, त्याला शहीद म्हटलं तरी का जात?
प्रत्येकाची आतंकवादाची वेगवेगळी परिभाषा असू शकते. असेलही.माझ्या मते जो व्यक्ती सामाजिक-राजकीय आणि मुख्य म्हणजे धार्मिक फायद्यासाठी निष्पाप लोकांची हत्या करतो त्याला आतंकवादी म्हटलं पाहिजे. मग ते कोणीही असो. गांधीजींची हत्या करणारा नथुराम असू देत किंवा दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांची क्रमाक्रमाने हत्या घडवून आणणारे सनातन संस्थेचे साधक असू देत.केवळ सामाजिक-राजकीय-धार्मिक स्वार्थासाठी या सगळ्यांनी निष्पाप माणसांच्या कत्तली घडवल्या आहेत,विवेकवादाच्या तिलांजली देत.असो, आपली कृती किती योग्य होती यासाठी असल्या आतंकी लोकांकडे वाद-प्रतिवाद असतीलही, परंतु माझ्यालेखी ते दहशतवादीच ! असल्या आतंकवादाचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. बुरहान वानी याच परंपरेतला आहे. लोकशाहीत हिंसा करण्याचा अधिकार केवळ पोलीस आणि आर्मीला दिला गेला आहे. सामाजिक स्थैर्य टिकून राहावं यासाठी समाजहिताला  हानिकारक असलेल्या शक्तींवर हिंसक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असतात. त्याचा गैरफायदा घेणारे देखील नथुरामच्या परंपरेतले आहेत असे बोलल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सध्याच्या मणिपूर प्रकरणात कोर्टाने दिलेले कारवाईचे आदेश याप्रकरणी अधिक बोलके आहे. काही पोलीस लोकसेवेची ओळख असलेली खाकी घालून सेवा करतात, तर काही पोलीस संघी मानसिकता घेऊन 'खाकी' परिधान करतात  आणि त्याचे पर्यावसान म्हणजे  मनोहर कदमच्या हातून रमाबाई नगर हत्याकांड घडते!

बुरहान वानीच्या अंत्ययात्रेला नागरिकांनी गर्दी केली होती

बुरहान वानी हा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता.हिजबुल मुजाहिदीनचा आजवर इतिहास पाहीला तर तो फुटीरतावादाचा राहिलेला आहे. परंतु बुरहान वानी जर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पोलिसांसोबत लढत होता, तर त्याला विद्रोही म्हटलं पाहिजे असा काहीसा काश्मिरी नागरिकांचा सूर आहे. अनेक विदेशी वृत्तपत्रांनी त्याचा उल्लेख 'मिलिटन्ट' अर्थात विद्रोही असाच केलाय.बुरहान वानीच्या बंदुकीने किती लोकांच्या नरडीचा घोट घेतलाय हे मला माहीत नाही, पण केवळ माध्यमे त्याला 'दहशतवादी' ठरवत असेल तर आपण  देखील ते अंध म्हणून कसं स्वीकारायचं? ज्या काश्मिरी लोकांचा हा प्रश्न आहे त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही? काश्मीरच्या लोकांना भारतात राहण्याची अजिबात इच्छा नाही. सरकारला देखील हे पक्के ठाऊक आहे. कुणापासून ही गोष्ट लपलेली नाही, म्हणून तिथे जनमत घ्यायला सरकार घाबरते आहे. काश्मीर हा भारतात आहे तो केवळ सैन्याच्या धाकापोटी. कधी कधी तिथल्या तरुणांची घुसमट बाहेर येते आणि हे तरुण पोलिसांवर दगडफेक करायला लागतात, जसे नक्षलवादी पोलिसांवर वार करतात अगदी तसेच. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश काश्मिरात जनमत घ्यायला तयार नसतो, लोक असंतुष्ट असतात, दगडफेक करतात, सरकारवर अविश्वास दाखवतात. नेमकी ही गोष्ट कुरापतखोर पाकिस्तान ओळखतो,आणि काश्मीर घाटीत आगडोंब कसा कायम राहील यासाठी प्रयत्न करतो.आपण मात्र धुमसत असतो.


बुरहान वानी आता काश्मिरी खोऱ्यातील युवकांचा हिरो बनलाय.


ही घुसमट किती दिवस आपण दाबू शकू? यावर काही तोडगा आपण काढणार आहोत काय? एक तर काश्मिरी तरुणांनी 'सत्याचे प्रयोग' करत अच्छे दिनची वाट पहावी, किंवा माओने सांगितलेल्या मेक्यानिजमचा वापर करत हातात शस्रे घेऊन स्वतःची मुक्तता करावी, अथवा काहीच करू नये.जे काही होतंय ते निमूटपणे सहन करावं.शांतपणे, अविचलपणे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी हातात शस्रे घेणारे काही कमी क्रांतिकारक नव्हते. भगतसिंग,राजगुरू,सुखदेव, सुभाषचंद्र बोस या सगळ्यांनी तो प्रयत्न केला,त्यात ते अयशस्वी ठरले, तरी ते आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी लढलेला लढा हा आपल्यासाठी फायद्याचा होता, अस्मितेचा होता.बुरहान वानी हा देखील काश्मीरच्या लोकांच्या मनात धुमसणाऱ्या प्रश्नासाठी लढणारा एक युवक होता. त्याला तिथले लोक आता शहीद म्हणतील, आपण त्याला काय म्हणायचं ते आपलं आपण ठरवूया. पण बुरहान वानीच्या अंत्ययात्रेला 20 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहतात,त्यात तरुणांचा आणि महिलांचा सहभाग अधिक असतो, ही गोष्ट काही आपल्या पथ्यावर पडणारी नाही. तूर्तास उसळलेला आगडोंब आणखी काही दशके शमणार नाही असे दिसते.



मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है

१६ डिसेंबर २०१४ ची गोष्ट. पाकिस्तानातील पेशावरच्या सैनिकी शाळेत ७ बंदुकधारी शिरले. माणसांच्या वेषातली सैतान. अंधाधुंद गोळीबारात तब्बल १४१ लोकांचा त्यांनी जीव घेतला. पैकी १३२ लहान मुले होती. या निरागस मुलांचा गुन्हा काय होता? पाकिस्तानात जन्म घेतला हा काय गुन्हा ठरू शकतो? ज्या तालिबानी कट्टरपंथीयांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली त्यांचा धर्म आणि मारल्या गेलेल्या निरागस मुलांचा धर्म एकच होता.धर्माच्या नावावर ज्यांनी हे हत्याकांड घडवलं त्यांना मग नेमका धर्माचा कोणता अर्थ अभिप्रेत होता? धर्माची कोणती शिकवण त्यांनी आत्मसात केली होती? त्यांच्या या पाशवी पराक्रमाने कोणती  स्वर्गीय देवता खुश होणार होती? कोणता देव लहान मुलांचा बळी मागतो? कोणता धर्म अशा अमानवी कत्तली सांगतो?

असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले. जगभर याबद्दल चर्चा झाली,अजूनही होते आहे. सुन्न करणार, काळीज पिळवटून टाकणार हे हत्याकांड होत. जगभरातून याचा निषेध झाला. व्हायलाच हवा होता. कोणी मेणबत्ती लाऊन निषेध व्यक्त केला, कोणी चेहरे रंगवून, कोणी कविता लिहून, कोणी मोर्चे काढून या अमानवी घटनेचा निषेध केला. पैकी, एका उर्दू गीतकाराने लिहिलेलं गीत मोठ्या प्रमाणात युट्यूबवर चर्चिले गेले.मोठ्या प्रमाणत त्याला प्रसिद्धी मिळाली.
गाण्याचे बोल होते,

'मुझे मां उनसे बदला लेने जाना है, मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है'



काय ताकद आहे या गाण्यात.आपला शाळेतला मित्र अतिरेकी कारवाईत मारला गेला, त्याच्या मारेकऱ्याला शिक्षा द्यायला पाहिजे असा तो ठाम विश्वास आपल्या आईकडे व्यक्त करतो. बदला घेण्याची भावना त्याच्या मनात जरूर आहे, पण तो बदला पुन्हा स्फोट घडवून आणणारा, गोळ्यांनी लोकांचे मुडदे पडणारा नक्कीच नाही. हा लहानगा अभिनव पद्धतीने बदला घेण्याच्या तयारीत आहे. ज्या अतिरेक्यांनी आपल्या वर्गमित्रांना जीवे मारल, या अतिरेक्यांच्या मुलांना माणुसकीचे धडे शिकवण्याची इच्छा हा मुलगा जाहीर करतो. किती हे शहाणपण! जोपर्यंत संवादाची प्रक्रिया सुरु होणार नाही आणि मनातली कटुता जोवर निघणार नाही तोपर्यंत सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. पाकिस्तानचा नैसर्गिक शत्रू म्हणून भारताची ओळख आहे. दहशतवादी कारवायांचा बळी भारत देश देखील ठरलाय. दहशतवादी कारवायांच्या विरोधात संपूर्ण देश एकसंधपणे उभा राहिला. परंतु आता घरचेच लोक घर पोखरायला सुरुवात करत आहेत. सनातन संस्था हे त्याचे ज्वलंत उदाहरण.सनातनचा राष्ट्रवाद हा दुसरा तिसरा काहीही नसून, दहशतवादच आहे. पेशावरच्या हल्ल्यातील मारेकऱ्यांचा आणि मृत मुलांचा धर्म जसा एक होता, तसाच मडगाव स्फोटातील मृतांचा आणि सनातनच्या साधकांचा देखील धर्म एकच होता. किती ही साम्यस्थळे! कालपर्यंत ज्यांना कट्टरपंथी म्हणून नावे ठेवत होतो, त्यांच्याच वाटेवर आपण निघालो आहोत. ज्यापद्धतीने अफजलगुरु दहशतवादी झाला याचा अर्थ सगळे भारतीय मुस्लिम दहशतवादी आहेत असा होत नाही, त्याचपद्धतीने दादरीमध्ये मोहम्मद अखलाखला गोमांस खाण्याच्या संशयावरून काही कट्टर हिंदूंनी जीवे मारले म्हणून सगळा देश असहिष्णू ठरत नाही. मोजक्या लोकांच्या करंटेपणामुळे इतर लोकांना त्यांचा सामना करावा लागतो.त्यामागे राजकीय फायदे-तोटे असतात हे सर्वांना ज्ञात आहेच. एकानंतर एक अशा ३ परिवर्तनवादी चळवळीतल्या नायकांचा खून झाल्यावर भारतात काही दंगली घडल्या नाहीत. घडायलाही नकोत. त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुलांना 'समतेच' गाण शिकवण्याचाच ध्यास इथल्या पुरोगामी चळवळीनी घेतला हे विशेष! कारण आपण संवादावर विश्वास ठेवतो,विचारांवर विश्वास ठेवतो, माणुसकीवर विश्वास ठेवतो. नाहीतर बंदुका आपल्यालाही चालवता येतात,पण आपण मार्ग स्वीकारलाय तो म्हणजे ,'मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है'.


एकदा निदा फाजली पाकिस्तानात एका मुशायराच्या कार्यक्रमाला गेले होते, तिथल्या पाकिस्तानी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला, कि भारतात मुस्लिमांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालले आहेत, त्याबद्दल तुमचे मत काय? कवी मनाच्या निदांनी त्या पत्रकारांना एका नज्म मधून उत्तर दिले, त्यांचे हे उत्तर समकालीन परिस्थितीत देखील तेवढेच कालातीत आहे.

इन्सान में हैवान यहाँ भी है वहा भी
अल्लाह निगहबान यहाँ भी है वहा भी

खूखार दरिंदो के फकत नाम अलग है
शहरो में बयाबान यहाँ भी है वहा भी

रहमत कि कुदरत हो या भगवान कि मूरत
हर खेल का मैदान यहाँ भी है वहा भी

हिन्दू भी मजे में है, मुसलमा भी मजे
इंसान परेशान यहा भी है वहा भी

उठता है दिलो जान से धुवा दोनो तरफ ही
ये मीर का दीवान यहा भी है वहा भी
- निदा फाजली



अनफ्रीडम

             
       'अनफ्रीडम' नावाचा सिनेमा पाहिला, बऱ्याच उशिरा पाहिला, पण योग्य वेळी पाहिलाय.ओर्लान्डोमध्ये समलैगिक भावंडांच्या क्लबमध्ये झालेला बॉम्बस्फोट, धर्माच्या नावावर पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी याचं झालेली हत्या आणि त्यात सहभागी असलेले धर्मरक्षक आणि सोबत 'उडता पंजाब' च्या निमित्ताने समोर आलेली सेन्सोर बोर्डची आरेरावी. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ या सिनेमात पाहायला मिळाला, किंबहुना मीच तो लावला असण्याची शक्यता अधिक आहे.हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो, एकाच वेळी अनेक पातळ्यांवर विचार करायला लावतो.
"मी माझा मार्ग निवडलाय, तुम्ही तुमचा मार्ग निवडा पप्पा" , अस ठामपणे पोलिस असलेल्या आपल्या बापाला लीला सांगते.
प्रसंग १:

एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीला मुली आवडतात, अमेरिकन चित्रकार असलेल्या एक मुलीच्या ती प्रेमात पडते.जगाची परवा न करता ही मुलगी घरातून पळून जाते,पोलिस असलेल्या बापाच्या हातातून ही मुलगी सुटणार तरी कशी? मुलगी आणि तिची प्रेयसी पोलिसांच्या हाती लागतात, समलैगिक असण म्हणजे महापाप! शिवाय एका पोलिसाच्या पोरीने असे  थेर करावेत, म्हणजे गहजबच. जेव्हा आपली मुलगी आपले म्हणणे ऐकायला तयार होत नाही, सामान्य मुलगी म्हणून जगायला तयार होत नाही असे दिसल्यावर हाच बाप पोलिस स्टेशनमध्ये इतर पोलिसांकरवी आपल्या पोरीचा आणि तिच्या प्रेयसीचा बलात्कार करवतो. पोलिस असलेल्या बापासमोर त्याच्याच संमतीने हे सगळ चालू असत. मुलगी अगोदर विरोध करते, पण बापाच्या निगरगट्ट पुरुषी अहंकाराला बळेच दुखावण्यासाठी ही मुलगी ,बळजबरीने होत असलेला 'संभोग'देखील आनंदाने उपभोगते, बाप मात्र बघत राहतो.शांतपणे. हतबलपणे.



प्रसंग २:

मुस्लिम म्हणजे कट्टरता आणि कट्टरता म्हणेज दहशतवाद हे सध्याचं 'युनिवर्सल' समीकरण. इस्लामची चिकित्सा करण हे कट्टरतावाद्यांनी निषिद्ध ठरवल. संपूर्ण जगात हे वास्तव आहे.हे वास्तव नाकारणारे मूर्खच, असो.

भले बुरे पाहिले मी ।
किती खरे अन् कितीक खोटे ।
भल्यात माझा भला मुहम्मद ।।
खर्यात माझा खरा मुहम्मद ।।

सुरेश भटांना समजलेले मुहम्मद सांगण्याचा प्रयत्न ते करतात,जे  सहिष्णू हिंदूंना देखील पटते. परंतु, अमेरिकेत राहणारा एक बडा  लेखक मुहम्मदाचे विचार नव्या मांडणीसह सांगण्याचा प्रयत्न करतो. सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन सारखे याच्याविरुध्द देखील फतवे निघतात. सदर लेखकाला थेट पाकिस्तान मधून मारण्यासाठी मारेकरी मागवले जातात. अल्लाहच्या दारात मोक्याची जागा पटकाविण्यासाठी पाकिस्तानातून आलेला हा मारेकरी तरुण या परिवर्तनवादी लेखकाला बंदुकीच्या धाकावर गाडीत बसवतो आणि गाडी चालवायला सांगतो, लेखकाचा प्रश्न असतो, 'गाडी पुढच्या दिशेने चालवू कि मागच्या दिशेने ?'

विवेकवादी लोक आपल्याला ओरडून ओरडून सत्य सांगत असतात, त्यांना समजून घ्यायचं कि त्यांना गोळ्या घालायच्या हे ज्यांनी त्यांनी आपल्या विचारांच्या कुवतीनुसार ठरवायचं.

हे दोन्ही प्रसंग आपल्याल अंतर्मुख करायला लावतात, या दोन वेगवेगळ्या गोष्टी दोन वेगवेगळ्या देशांत घडत असतात. तस पाहिलं तर एकमेकांशी या गोष्टींचा काहीएक संबंध नाही. परंतु, संबंध लावायचाच अस  ठरवल तर मग बरीच साम्यस्थळ यात पाहायला मिळतील. समलैगिकता आणि दहशतवाद या दोन भिन्न गोष्टींना एकत्र आणण्याचा राम अमित कुमार या दिग्दर्शकाने प्रयत्न केलाय. १०००% त्याने या सिनेमाला न्याय दिलाय अस मी म्हणेन.कथानक मस्तच.
छायांकन तर विचारूच नका, आपल्या समोर हे सगळ घडतंय अस तुम्हाला वाटेल इतक ते वास्तविक दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय. तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा भाव खाऊन जातो. गेलाच पाहिजे.
सिनेमा संपतो आणि तुमच डोक गरगरायला लागत. एक गोष्ट जाणवते, जगातल्या सगळ्या असहिष्णू गोष्टीच्या मुळाशी जा, कारण एकच सापडेल. धर्म. धर्म नावाच्या एका संस्थेपाशी सगळ्या जगाची नैतिकता येऊन ठेपते. धर्म सांगतो म्हणून पुरुषाने स्रीबरोबरच लग्न केले पाहिजे, संसार केला पाहिजे. धर्म सांगतो म्हणून अनाचाराला ठेचून मारले पाहिजे, त्याचा आवाज दाबला पाहिजे. सगळ काही झाल पाहिजे ते केवळ धर्माच्या चौकटीत, चौकट ओलांडली कि तुमच्यावर बलात्कार केला जाईल, सगळ्या देखत, सगळे मानवी संबंध बाजूला ठेवून. वेळ पडलीच तर तुमच्यावर गोळ्या घातल्या जातील.त्या परिवर्तनवादी लेखकाला आणि त्याच्या कुटुंबाला ज्या पद्धतीने हाल करुन संपवले गेले तसेच तुम्हाला  देखील संपवले जाईल. ज्या डोळ्यांनी तुम्ही उद्याचे समतावादी जग पाहता आहात , ते डोळे कात्रीने  फोडले जातील ,ज्या लेखणीने तुम्ही जग बदलण्याची भाषा करता, ती बोटे कापली जातील. येशूला ज्या पद्धतीने क्रुसावर लटकवले, तसे तुम्ही कितीही विवेकवादी असू देत, येशुसारखे तुमचे देखील क्रुसावर लटकवले जाणे निश्चित.
आता हे सगळ बाजूला ठेवू, वर कथित केलेल्या सगळ्याच हिंसक गोष्टीतून धर्म बाजूला काढा. सगळ काही निवांत असेल. तुमचे डोळे, तुमचे बोटे आहे तसेच शाबूत असतील. तुमच्यावर धर्माची चौकट ओलांडली म्हणून बलात्कार होणार नाहीत. माणूस म्हणून एकमेकांना तुम्ही ओळख द्याल. दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गी शहीद नसतील, ते आपल्या आसपास कुठेतरी असतील. आपल्याला विचारांची नवी दिशा देत असतील.
मला वाटत, पहिल्यापेक्षा दुसरा पर्याय अधिक योग्य आहे,कारण त्यात 'विचार' आहे, अविचार नाही. हा सिनेमा या सगळ्या गोष्टींवर तुम्हा आम्हाला विचार करायला लावतो. सिनेमात समलैगिकता विषय हाताळला आहे आणि त्यात लैगिकता असलेले दृश्य देखील आहेत म्हणून सेन्सोर बोर्डाने सिनेमाच्या निर्मात्यांना काही दृश्य वगळून टाकण्यास सांगितले होते, ते दृश्य वगळले असते तर सिनेमा पूर्ण झालाच नसता हे माझ वैयक्तिक मत आहे. त्यामुळे सिनेमाच्या दिग्दर्शकाने लैगिक दृश्ये  न वगळण्याचा घेतलेला निर्णय चित्रपटाला न्याय देणारा आहे. सदर सिनेमाच्या प्रदर्शनावर सेन्सोर बोर्डाने बंदी घातली होती,परंतु हा सिनेमा 'टोरेंट'वर आपल्याला पाहायला मिळेल, भेटल्यास जरूर बघा.
सिनेमातल्या लेखकाने कट्टरपंथी मारेकऱ्याला विचारलेला प्रश्न अजूनही मला अस्वस्थ करतोय,  'गाडी पुढच्या दिशेने चालवू कि मागच्या दिशेने ?'. माणूस म्हणून आजवर आपला झालेला प्रवास पुढे न्यायचा कि मागे न्यायचा, हे सगळ तुमच्या आमच्याच हातात. धर्म तर तुम्ही आम्ही बनवलाय.

समर खडस यांना पत्र




















प्रती,
मा. समर खडसजी,
वरिष्ठ सहाय्यक संपादक,
महाराष्ट्र टाइम्स

विषय: मंजुळेजी, फुले-आंबेडकरांनी असे केले असते का? या आपल्या लेखाबाबत.

नमस्कार !
आपला लेख वाचला.म्हटल आपल्याशी या विषयावर बोललं पाहिजे.एखाद्या विषयाबद्दल मत मांडण्याचा जसा आपल्याला घटनादत्त अधिकार आहे, तसाच तुमच्या वादाला प्रतिवाद देण्याचा  मी माझा अधिकार समजतो म्हणून हा लेखनप्रपंच करतो आहे. मी नागराज मंजुळेचे वकीलपत्र घेवून बोलेल अस तुम्हाला वाटण्याची दाट शक्यता आहे ,तेव्हा मी 'भक्त' प्रवर्गातला नाही हे अगोदरच जाहीर करतो म्हणजे मला बोलायला आणि तुम्हाला समजायला सोपे जाईल.
आपले म्हणणे आहे कि, "अर्धशिक्षित गरीब बाईच्या आयुष्यात काय भोग वाट्याला आले याचा काडीमात्र विचार भक्तांपैकी कुणीही केला नाही".व्यवहारी जगात स्रीला कायम दुय्यम स्थान दिले गेले आहे, हे जसे तुम्हाला मान्य आहे तसेच मलादेखील. हे नाकारण्याइतके करंटे आपण  नक्कीच नाही.बाई अर्धशिक्षित राहिली कि काय होत हे या प्रकरणातून दिसतय. तेव्हा कायद्याने घटस्फोट झालेल्या बाईशी तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याशी नेमका कसा व्यवहार असायला हवे हे तुम्ही सांगायला विसरलात सोबतच नागराज मंजुळेवर तोंडसुख घ्यायला मात्र तसूभर जागा ठेवली नाही. 'स्रीसक्षमीकरण' आणि 'स्रीमुक्ती' या दोन वेगवेगळ्या गोष्टीत आपला गोंधळ उडालेला दिसतो आहे. तस पाहिलं तर मंजुलेंचा विवाह हा काही आंतरजातीय नाही.तो सजातीयच होता.त्यामुळे आपण डॉ. आंबेडकर लिखित 'कास्ट ईन इंडिया' या शोधनिबंधाचा उल्लेख करून काय सध्या करू पाहता आहात हे कळाले नाही.
या शोधनिबंधात बाबासाहेब म्हणतात कि, गटांतर्गत विवाह करणाऱ्या रूढीने गटबाह्य लग्न करण्याच्या रूढीवर मिळवलेला विजय म्हणजे जातीची निर्मिती होय.जातीत परावर्तीत होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाला त्यांच्यातील स्री-पुरुष संख्येत समानता राखणे हे अनिवार्य ठरते.लग्नपद्धती टिकून ठेवायची असेल तर लोकांचा लग्नविषयक अधिकार त्यांना गटातल्या गटात पूर्ण करता आला पाहिजे.नेमका हा मुद्दा घेवून 'सैराट' आला. 'आंबेडकर' हे नाव ऐकून ज्यांना दचकायला होत, त्यांना हा विचार पटणार तरी कसा? ऋतिक रोशनच्या बायकोला  पोटगीदाखल काय काय मिळाल याचा प्रश्न आपल्याला पडत नाही, कारण तो एका 'क्लास' चा विषय असतो, त्यात आपले काय काम असा उक्तिवाद केला जातो. मात्र गल्लेभरू(आपलाच शब्द) दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्याच्या सुलभ मानवी भावनेला परिपूर्ण न्याय देण्यास आपल्याला बरोबर जमले. सवर्ण स्रीला कायम लिंगभेदाशी संघर्ष करावा लागतो तर दलित स्रीला जातिभेद आणि लिंगभेद असा दुहेरी संघर्ष करावा लागतो. नागराजच्या घटस्फोटीत बायकोला या दोघांपैकी नेमका कोणता संघर्ष करावा लागतो आहे हा तुमचा संशोधनाचा विषय का झाला नाही कुणास ठावूक?
आपले आणखी एक म्हणणे आहे कि,जातीय शोषणाच्या चर्चा करणारे किंवा जात अत्याचाराच्या विरोधात रणशिंग फुंकल्याचा आव आणणारे या चर्चा व आंदोलनातही कायम स्त्री मुक्ती वजा करूनच ती चर्चा करतात.मला वाटते आपला हा फार मोठा गैरसमज झालाय. शतकातील क्रूर हत्याकांड अशी ज्या हत्याकांडाची ओळख करून देता येईल अशा खैरलांजी हत्याकांडात तथाकथित स्रीवादी कार्यकर्त्यांचे मेणबत्ती मोर्चे निघाले नाहीत त्यासाठी जातीय शोषणाच्या चर्चा करणाऱ्या लोकांनाच संघर्षाचा मार्ग पत्करावा लागला हे सत्य तुम्हीदेखील नाकारु शकत नाही. डेल्टा मेघवाल या दलित मुलीची राजस्थानमध्ये बलात्कार करून हत्या झाली त्यावेळी आपली लेखणी आपण स्रीवादी भूमिकेतून का झिजवली नाही हा प्रश्नदेखील निरुत्तर आहे.फुले आंबेडकर यांचे नाव घेतल्यानंतर वागण्यात काहीपथ्ये पाळावी लागतात,असे तुमचे म्हणणे आहे , परंतु नेमकी कोणती पथ्ये पाळायला हवी यासाठी आपण यादी दिलेली नाही तेव्हा कृपया करून ही तयार करावी, जेणेकरून देशातील तमाम घटस्फोटीत पुरुषांना ती कामी येईल.एकदा कि फुले-आंबेडकर विचारांच्या शाळेत दाखल झालो कि घटस्फोट घ्यायचा नाही असा काहीसा मतितार्थ आपल्या लिखाणाचा आहे असे समजते. तेव्हा लिव-ईन-रिलेशनशिपला तर आपल्या विचारप्रणालीत जागाच नसेल असे दिसते.याबद्दलही आपल्याकडून जाणून घ्याला आवडेल. माणूस हा समाजशील प्राणी आहे, तेव्हा आपल्या सारख्या समाजाचे कायम भले पाहणाऱ्या व्यक्तीकडून समाजात घटस्फोटीत स्री-पुरुषाबद्दल काय आचारसंहिता असायला हवी हे जाणून घ्यायला आवडेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या 'कास्ट ईन इंडिया' या शोधनिबंधाचा शेवट करताना म्हणतात कि, बंडखोर विचारवंत धर्मसंप्रदायाच्या स्वरुपाची जात निर्माण करत असतो. जातीचा भंग करण्याचे धाडस करणाऱ्या पापी माणसासाठी जातीजवळ दया-मया नसते. बहिष्कार हा त्याला दंड असतो व त्याचा परीणाम म्हणून नवी जात निर्माण होते. जातीबहिष्कृत लोक नवी जात निर्माण करतात, त्याला कारण आहे ती आपली समाजव्यवस्था. सैराटमध्ये माणुसकीच्या आधारावर फुलू बघणारी 'जात' रक्ताच्या अभिषेकाने संपवली जाते, तर तुमच्या  'मंजुळेजी, फुले-आंबेडकरांनी असे केले असते का?'  या प्रश्नाने तुम्हीच  'मंजुळे' नावाची एक नवी जात निर्माण करता आहात,ते देखील फुले आंबेडकरांचे नाव घेवून.यानिमित्ताने एक मात्र पक्क जाणवलं कि, जब्याने मारलेला दगड ज्या ज्या लोकांच्या जिव्हारी लागला होता त्या सगळ्यांनी या निमित्ताने छोटे-छोटे दगड,विटा घेवून परतफेड करण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला.असो,माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलाय,तुम्हाला पटलेच पाहिजे हा आग्रह नाही.

जय भीम ! जय जगत!

-सागर भालेराव