बेझवादा विल्सन


बेझवादा विल्सन यांना या वर्षीची मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालाय. त्यांचे अभिनंदन!
बऱ्याच लोकांना अजूनही बेझवादा विल्सन यांचे नाव माहिती नाही, त्यांचे कार्य काय हे देखील माहिती नाही. प्रत्येकाला ते माहिती हवे असा हट्ट नाही, पण त्यांचे कार्य माहिती नाही याची खंत मात्र नक्की आहे. कर्नाटकात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बेझवादा विल्सन नावाचा माणूस, हाताने मानवी मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांच्या हक्कासाठी लढतो आहे.त्याची आणि माझी पहिली भेट झाली ती आमिर खानमुळे. 'सत्यमेव जयते'च्या पहिल्या पर्वात अस्पृश्यतेचा विषय घेऊन एक कार्यक्रम सादर केला गेला होता.त्या कार्यक्रमात बेझवादा मला पहिल्यांदा भेटले. त्यांची पोटतिडकी त्यावेळी दिसली, नुसती दिसलीच नाही तर ती जाणवली देखील. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शूद्रांना जी काही कामे ठरवून दिलेली आहे, तीच कामे आजच्या लोकशाही युगात देखील दलित समाजाकडून करून घेतली जातात. उदाहरण बघायचे झाल्यास कर्नाटकातील कोलार गावी तुम्ही जाऊन बघू शकता. कोलार हे बेझवादा  विल्सन यांचे गाव. त्या गावात अजूनही  लोकांचा मैला हा तिथले दलित लोक हाताने साफ करतात. हे चित्र पाहिलं कि मॅग्ना कार्टा टराटरा फाडावासा वाटतो, मानवी हक्काची सनद धगधगत्या अग्नीत पेटवून द्यावीशी वाटते.   21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर जिथे आपण महासत्तेची स्वप्ने बघतो आहोत, तिथे या दलित,श्रमिक वर्गाचा आणि जातीचा आपण विचार कधी करणार आहोत? विकासाच्या प्रक्रियेत हे लोक नेमके आहेत कुठे? यांचा नेमका वर्ग कोणता? स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय हि संविधानाची मूल्ये या समाजासाठी आहेत कि नाही? कि अजूनही लोकशाही प्रक्रियेत आपण त्यांचा विटाळ धरतो आहोत? 




स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारमार्फत देशभरात राबवलं जातंय. आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही. चांगल्या गोष्टीचा विरोध करणे करंटेपणाचे लक्षण आहे,ते मी करणार नाही. पण हे अभियान राबविताना सफाई कामगारांच्या समस्या हे सरकार कसे दुर्लक्षित करू शकते? हातात झाडू घेऊन  रस्ते साफ करणारे अमिताभ बच्चन, नीता अंबानी, स्मृती इराणी व अन्य लोक आणि सोबतच प्रधानसेवक मोदीजी आपल्या हाताने मानवी मैला साफ करायला तयार होतील काय? स्वच्छतेत कशाला अस्पृश्यता असायला हवी? वरवरची आपुलकी दाखवून प्रश्न सुटतील काय? अजिबात नाही! त्यासाठी सरकारी पातळीवर जसे कार्यक्षम निर्णय घेण्याची गरज आहे, तशीच संपूर्ण समाजमन बदलणे आवश्यक आहे. बेझवादा विल्सन यांची चळवळ ही केवळ त्यांची चळवळ राहता काम नये. ती लोकचळवळ व्हावी. आरक्षणाच्या मुद्दयांवरून कायम दलितांना टारगेट केलं जात. सफाई कामगार म्हणून तर दलितांना इथे 100% आरक्षण असत ,तिथे आपल्या समाजाला आरक्षण हवं म्हणून कोणी सवर्ण समाज आंदोलन करताना दिसत नाही. तेव्हा, जातीअंताची मांडणी न करता, समतेची भाषा न करता जे सवर्ण आरक्षणाची मागणी करतात त्यांची खरी मानसिकता यातून प्रतीत होत असते. आजवर वेळोवेळी ती झालेली आहे. 
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकर्षाने ज्या घटनेचा उल्लेख केला पाहिजे ती घटना म्हणजे गुजरातमध्ये कातडी कामविणाऱ्या दलित युवकांना झालेली अमानुष मारहाण. कातडी कमविणे हा तसा वर्णव्यवस्थेने सांगितलेला जातिगत व्यवसाय. मेलेल्या गाईची कातडी कामविणाऱ्या 4 दलित तरुणांना गाडीला बांधून अमानुषपणे मारहाण केली गेली. गाई सारख्या जनावराला देवत्वाची वागणूक आणि हाडामासाच्या माणसांना अशी निर्दयी मारहाण कुठल्या मानवी मूल्यात बसते माहीत नाही. देशाच्या पंतप्रधानांना देखील याचे उत्तर माहिती नसेल, म्हणून कदाचित ते या प्रश्नावर गप्प आहेत. देशोविदेशी दौरे करताना भारतभूमी ही गांधी आणि बुद्धाची भूमी आहे असे सांगायचे, मात्र देशात अखलाक मारला जातो, मोहसीन शेखची हत्या केला जाते, दलितांना अमानुष मारहाण केली जाते आणि बेजवादा विल्सनला आपल्या मानवी हक्कासाठी अजूनही झगडावं लागत ही निंदनीय गोष्ट आहे. 
हाताने मैला साफ करणारी महिला कामगार 

23 वर्षांपूर्वी माणसांकरवी मैला साफ केला जाऊ नये यासाठी कायदा केला गेला.कायदा अस्तित्वात आला तो कागदावर.त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.गेल्या 2 वर्षात 1268 सफाई कामगार हे आरोग्याच्या समस्येमुळे मरण पावले असा अहवाल बेझवादा यांनी सरकारला सादर केलाय. 
सामाजिक न्यायाची बीजे ज्यांनी संविधानात रोवली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 35,000 किलोमीटरचा प्रवास करत सफाई कर्मचारी आंदोलनातील लोक दिल्लीला पोहोचले होते. आपल्या समस्या घेऊन त्यांनी 13 एप्रिल 2016 ला दिल्ली गाठली. मात्र त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणाही तथाकथित दलित  नेत्याला  वेळ नव्हता.ज्या बाबासाहेब आंबेडकरांना हायजॅक करत संघाने केंद्रात सत्ता स्थापन केली,त्यांना याबद्दल सोयरेसुतक नव्हते. बाबासाहेबांशी आपलं नातं सांगत हे लोक पुन्हा आपल्या आपल्या गावी पोहोचले.देशात मोठ्या उत्साहात भीमजयंतीचा जल्लोष होता.आपले बांधव मात्र तेव्हा हाताने कुणाचा तरी मैला साफ करत होते, आताही करत आहेत. 
बेझवादा विल्सन यांचा सन्मान देशाची वेगळी ओळख आता जगाला देणार आहे, इथे अजूनही अशा अमानवी प्रथा चालतात हे आता सगळ्या जगाला कळले आहे.ही नक्कीच शरमेची बाब आहे. बेझवादा यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली, भारतीय समाज मात्र अजूनही याबद्दल अनभिद्न्य आहे.आम्ही शिकलेले लोक तुमच्या कामी येऊ शकलो नाही याची खंत आहे.  आमचे सुख तुमचे व्हावे, तुमचे दुःख आमचे व्हावे असं  म्हणू तरी कसं? तुमच्या समाजाचं दुखणं कुणाच्याही नशिबाला येऊ नये. मी तुमचं दुःख वाटून घ्यायला तयार नाही, मीच काय या देशातला कोणीही माणूस ते घ्यायला तयार होणार नाही हे खात्रीपूर्वक सांगतो. माफ करा आम्हाला.
आम्ही तुमचं अभिनंदन तेवढं करू शकतो,यापेक्षा अधिक काही करण्याची आमची माणुसकी केव्हाच गोठलेली आहे.

कोपर्डी : संवादाची प्रक्रिया वाढायला हवी

कोपर्डी : संवादाची प्रक्रिया वाढायला हवी

२४ जुलै रोजी कोपर्डीला भेट दिली. भेट देण्याशिवाय बाकी काय करू शकतो आपण? कुणाही मानवी मनाला चीड़ येईल असे कृत्य कोपर्डीमधे घडले. या अमानवी कृत्यामुळे काही काळातच नगर जिल्ह्यातील हे गाव देशाच्या नकाशावर झळकायला लागले. अहमदनगर जिल्हा प्रसिद्ध आहे तो सहकार चळवळीसाठी, मात्र अलिकडच्या काळातली या जिल्ह्याची ओळख म्हणजे दलित अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून. जिल्ह्यात सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांच्या अहंगंडापाई अनेकदा अमानुष अत्याचार घडले आहेत, घडत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोपर्डीचे बलात्कार प्रकरण वेगळे ठरते. या प्रकरणात आरोपी हे तथाकथित 'दलित' समाजातले आहेत,पहिल्यांदाच असे घडलेय. या अगोदरच्या सगळ्या प्रकरणात चित्र नेमके उलटे होते.

झाल्या प्रकारणाचे समर्थन बुद्धी ठिकाणावर असलेला कोणताही व्यक्ति करू शकत नाही. ज्या क्रूर पद्धतीने त्या कोवळया मुलीची विटंबना केली गेली ती घटना मानवी समुहाची 'माणूस' म्हणून उत्क्रांती होणे अजुन बाकी आहे असे सांगणारी आहे.

कोपर्डीत पोहोचताना अगोदर कुळधरण नावाचं गाव लागते. या गावात 'जगदंब' नावाची एक माध्यमिक शाळा आहे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सदस्य असलेल्या कोणा नामी व्यक्तीची ही शाळा आहे. ही शाळा ते कोपर्डी हे अंतर सुमारे 4 किलोमीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी. जीव मुठीत घेवून इथल्या महिला, मुली या मार्गावरुन प्रवास करतात. गावात दारुचे अड्डे आहेत, दारू पिऊन या झाड़ाझुडपात गावातले रिकामटेकड़े बसलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर,महिलांवर अश्लील शेरेबाजी इथे अगोदर पासून होत होती. पोरीची 'जात' म्हणून घरच्यांनी अगोदर दुर्लक्ष केले, आणि त्याचे पर्यवसान म्हणजे कोपर्डी प्रकरण!

या प्रकरणातला मुख्य आरोपी हा तरबेज गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे, या अगोदर त्याने एक खून पचवलाय, 3 लग्न केली आहेत. त्याच्या या कृत्यांचा गावकऱ्यांना अंदाज होता, वेळीच पाऊल उचलले असते, पोलिसांनी त्याला वेळीच चाप घातला असता, तर आज नगरची निर्भया जिवंत असती. असो, हे झाले बोलण्यासाठी. प्रत्यक्ष प्रकरण आता वेगळ्या थराला गेले आहे. मराठा विरूद्ध दलित असा वाद यानिमित्ताने उभा राहिला आहे. कोपर्डीतले सगळे दलित लोक सध्या गावातून भूमिगत आहेत. गावात वातावरण तणावपूर्ण असल्याने त्यांनी इतर ठिकाणी आसरा घेतलाय. समुहातील एका माणसाच्या चुकीमुळे इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. ही परिस्थिती त्यांनी स्वतः निर्माण केली आहे. वेळीच सगळ्या समाजबांधवांनी अशा उपद्रवी लोकांना जरब बसवली असती तर एवढी मोठी घटना घडलीच नसती.

पीड़ित कुटुंबियाना भेटायला गेलो असता, पीड़ित मुलीचे चुलत आजोबा प्रथम भेटतात. त्यांच्या शर्टला 'शेतकरी संघटने'चा  बिल्ला असतो, विचारल्यावर सांगतात की शरद जोशींच्या समवेत त्यांनी काम केले आहे. घरात एकूणच चळवळीची पार्श्वभूमी. पीड़ित मुलीचे मामा, मावशी उच्चशिक्षित आहेत. झाल्या प्रकरणावर कमालीचा संयम त्यांनी बाळगला आहे त्याच्या मागे ही कारणे आहेत. पीड़ित मुलीचे प्राध्यापक असलेले मामा सांगतात की, आमची मुलगी तर गेली परंतु इतर मुली वाचल्या पाहिजेत म्हणून काय प्रयत्न करता येईल ते बघा.

मुलीचे चुलत आजोबा मात्र सरकारी यंत्रणेवर आणि आरोपींवर आगपाखड़ करतात, ते स्वाभाविक आहे.  अॅट्राॅसिटीचे संरक्षण दलितांना असल्यामुळे ते असे प्रकरण करायला धजतात असे त्यांच म्हणणे आहे. या अगोदर त्या आरोपीने गावातल्या लोकांना अॅट्राॅसिटीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या होत्या. कायद्याची कवचकुंडले असलेली ही हत्यारे आपलीच लोक कशी बोथट करतात याचे आणखी एक उदाहरण पहायला भेटले. या अगोदर देखील अशा घटना मी स्वतः पाहिलेल्या आहेत, बघतो आहे.

या सगळ्या प्रकरणात एक नाव कायम चर्चेत राहीले, ते म्हणजे शिवप्रहार या संघटनेचे संजीव भोर पाटिल यांचे. त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे आहे की,अॅट्राॅसिटी कायदा रदद् केला पाहिजे असे आपले मत नाही, पण त्याचा दुरूपयोग होऊ नये ही आपली मागणी आहे. जवखेड़ा हत्याकांडाचे ते प्रकर्षाने उदहारण देतात. या प्रकरणात आरोपी हे पीड़ित कुटुंबातलेच निघाले, मात्र चौकशी होण्याच्या अगोदरच संपूर्ण मराठा समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल गेल, हे चुक असल्याचं ते सांगतात. सोनई हत्याकांडाबद्दल देखील त्यांचे गंभीर असे आरोप आहेत, नितीन आगे खून प्रकरणात तथाकथित दलित नेत्यांनी अॅट्राॅसिटी कलम लागू नये यासाठी आरोपींसोबत 'अर्थ'पूर्ण व्यवहार केले आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे. या गोष्टीत तथ्य असू शकते. अहमदनगरचे दलित राजकारण मी स्वतः जवळून पाहिले आहे, त्यामुळे याची शक्यता नाकारता येत नाही असे मत मी व्यक्त करू शकतो.

या सगळ्या गोष्टीचे माइलेज मिळवण्याचा प्रयत्न आता दलितविरोधी संघटना घेत आहे हे नक्की. अगोदरच्या काळातली घडलेली प्रकरणे बघता, या प्रकरणात त्याचा वचपा काढण्याची संधी कोणी सोडलेली नाही.
रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर यांना कोपार्डीमधे येण्यास मज्जाव करणे हा त्याचाच एक भाग. घडल्या प्रकारणानंतर ज्यांच्याकड़े दलित समुदायाचे नेतृत्व म्हणून बघितले जाते त्यांच्याकडून, प्रकरण घडून गेल्यानंतर 7 दिवसांनी देखील काही भूमिका घेतली जात नाही हे त्यामागचे कारण. या बलात्कार प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली गेली असती तर समाजात वेगळा मेसेज गेला असता, जो सामाजिक कलह रोखण्यास उपयोगी पडला असता. गावकरी देखील ही खंत व्यक्त करतात.

एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी लागेल,की या घटनेकड़े जातीच्या चष्म्यातुन न बघता सामजिक मूल्यांतुन बघितले पाहिजे. मुलीच्या आजोबांचे दारुचे दुकान आहे, याच दारूच्या दुकानातून हे आरोपी दारु पिऊन आले होते. दारुची व्यसनाधिनता यामागे आहे हे मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मुलीचे सख्खे आजोबा कुणाला भेटत नाहीत, त्यांच्याही मनात ती सल असणार, असायलाच पाहिजे.

या प्रकरणात केवळ जातीचे मेक्यानिज्म नाही, तर अनेक व्यवस्था काम करत आहेत. तरबेज गुन्हेगाराला पोलिसांची सूट, दारुचा अवैध व्यापार, लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि स्रीला उपभोग्य वस्तु म्हणून बघण्याचा दृष्टिकोन, या सगळ्या घटकांचा पदर या घटनेला आहे. त्यामुळे अॅट्राॅसिटी कायदा रदद् झाला पाहिजे ही मागणी चुकीची आहे, या उलट अॅट्राॅसिटीचा गैरवापर होऊ नये यासाठी मागणी केली तर ती परिवर्तनवादी चळवळीतले लोक देखील सहज स्वीकारतील इतकी ती वास्तविक आहे.

गावगाड्यातील सवर्ण आणि दलित यांच्यातील संवादाला मध्यंतरी सुरुवात झालेली होती, पण जेव्हा प्रतिष्ठेच राजकारण आड़ आले तेव्हा सगळे थांबल. मराठा सेवा संघाने केलेला हां प्रयोग लोकांना नवविचार देणारा होता.परंतु या चळवळीने टोकाचा ब्राम्हणविरोध स्वीकारला तेव्हा मानवी मूल्ये जपणारी लोक त्यांच्याशी फारकत घेत बाहेर पडले. हीच मानवी मूल्ये जपणारे लोक आज कोपर्डी प्रकरणात आपला निषेध नोंदवित आहेत.

यथावकाश आरोपींना शासन होईल, पीड़ित मुलीला न्याय मिळेल. परंतु आपल्या मानसिकतेचे काय? संस्कृतीची वाहक म्हणून स्रीची पूजा करणारे आपण, लैंगिक वासनेसाठी जर तिचे असे हाल करत असू, तर आपला प्रवास हा पुन्हा अश्मयुगाकडे जाणारा ठरणार आहे.

पीड़ित कुटुंबियाने आणि कोपर्डी ग्रामस्थांनी दाखवलेली कमालीची संयमित भूमिका मनावर खोलवर परिणाम करणारी ठरली आहे. पुढील काळात याचे पर्यावसान कशात होईल हे काही सांगता येत नाही. समाजातल्या प्रत्येक घटकाने याचा निषेध केला पाहिजे आणि कोपर्डीच्या ग्रामस्थासोबत खंबीरपणे उभ राहीले पाहिजे. सदर प्रकरणात खंडित झालेली संवादाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु झाली पाहिजे. दलित नेत्यांनी यात पुढाकार घ्यायला हवा आणि वाढलेला दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा. पीड़ित मुलगी ही केवळ कोपर्डीच्या लोकांचीच बहिण-बाळ नव्हती. तर आपल्या सर्वांशी तीच एक नाते होत, ते नाते म्हणजे माणुसकिचे!

आता मात्र हे नाते अधिक घट्ट व्हावे. बीडच्या प्रकरणात, गुजरातच्या प्रकरणातून त्याची प्रतिक्रिया येऊ नये. कारण प्रकृतीचा नियम आहे, सुख्यासोबत ओले देखील जळते. आपल्याला लागलेली आग विझवायची आहे, त्यात तेल घालणे हा मानवधर्म नक्कीच नाही.

- सागर भालेराव
sagobhal@gmail.com


बुरहान वानी काश्मिरी तरुणांचा हिरो का?



बुरहान वानीच्या हत्येनंतर संपूर्ण काश्मिरात आगडोंब उसळला आहे. काश्मीरची जनता बुरहान वानीला आतंकवादी मानायला तयार नाही. त्यांच्यासाठी बुरहान हा 'शहीद' झालेला आहे. कित्येक सामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला असेल की, ज्या व्यक्तीला आतंकवादी, दहशतवादी म्हटलं पाहिजे, त्याला शहीद म्हटलं तरी का जात?
प्रत्येकाची आतंकवादाची वेगवेगळी परिभाषा असू शकते. असेलही.माझ्या मते जो व्यक्ती सामाजिक-राजकीय आणि मुख्य म्हणजे धार्मिक फायद्यासाठी निष्पाप लोकांची हत्या करतो त्याला आतंकवादी म्हटलं पाहिजे. मग ते कोणीही असो. गांधीजींची हत्या करणारा नथुराम असू देत किंवा दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांची क्रमाक्रमाने हत्या घडवून आणणारे सनातन संस्थेचे साधक असू देत.केवळ सामाजिक-राजकीय-धार्मिक स्वार्थासाठी या सगळ्यांनी निष्पाप माणसांच्या कत्तली घडवल्या आहेत,विवेकवादाच्या तिलांजली देत.असो, आपली कृती किती योग्य होती यासाठी असल्या आतंकी लोकांकडे वाद-प्रतिवाद असतीलही, परंतु माझ्यालेखी ते दहशतवादीच ! असल्या आतंकवादाचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. बुरहान वानी याच परंपरेतला आहे. लोकशाहीत हिंसा करण्याचा अधिकार केवळ पोलीस आणि आर्मीला दिला गेला आहे. सामाजिक स्थैर्य टिकून राहावं यासाठी समाजहिताला  हानिकारक असलेल्या शक्तींवर हिंसक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असतात. त्याचा गैरफायदा घेणारे देखील नथुरामच्या परंपरेतले आहेत असे बोलल्यास अतिशयोक्ती ठरू नये. सध्याच्या मणिपूर प्रकरणात कोर्टाने दिलेले कारवाईचे आदेश याप्रकरणी अधिक बोलके आहे. काही पोलीस लोकसेवेची ओळख असलेली खाकी घालून सेवा करतात, तर काही पोलीस संघी मानसिकता घेऊन 'खाकी' परिधान करतात  आणि त्याचे पर्यावसान म्हणजे  मनोहर कदमच्या हातून रमाबाई नगर हत्याकांड घडते!

बुरहान वानीच्या अंत्ययात्रेला नागरिकांनी गर्दी केली होती

बुरहान वानी हा हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर होता.हिजबुल मुजाहिदीनचा आजवर इतिहास पाहीला तर तो फुटीरतावादाचा राहिलेला आहे. परंतु बुरहान वानी जर काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी पोलिसांसोबत लढत होता, तर त्याला विद्रोही म्हटलं पाहिजे असा काहीसा काश्मिरी नागरिकांचा सूर आहे. अनेक विदेशी वृत्तपत्रांनी त्याचा उल्लेख 'मिलिटन्ट' अर्थात विद्रोही असाच केलाय.बुरहान वानीच्या बंदुकीने किती लोकांच्या नरडीचा घोट घेतलाय हे मला माहीत नाही, पण केवळ माध्यमे त्याला 'दहशतवादी' ठरवत असेल तर आपण  देखील ते अंध म्हणून कसं स्वीकारायचं? ज्या काश्मिरी लोकांचा हा प्रश्न आहे त्यांना विश्वासात का घेतलं जात नाही? काश्मीरच्या लोकांना भारतात राहण्याची अजिबात इच्छा नाही. सरकारला देखील हे पक्के ठाऊक आहे. कुणापासून ही गोष्ट लपलेली नाही, म्हणून तिथे जनमत घ्यायला सरकार घाबरते आहे. काश्मीर हा भारतात आहे तो केवळ सैन्याच्या धाकापोटी. कधी कधी तिथल्या तरुणांची घुसमट बाहेर येते आणि हे तरुण पोलिसांवर दगडफेक करायला लागतात, जसे नक्षलवादी पोलिसांवर वार करतात अगदी तसेच. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही असलेला देश काश्मिरात जनमत घ्यायला तयार नसतो, लोक असंतुष्ट असतात, दगडफेक करतात, सरकारवर अविश्वास दाखवतात. नेमकी ही गोष्ट कुरापतखोर पाकिस्तान ओळखतो,आणि काश्मीर घाटीत आगडोंब कसा कायम राहील यासाठी प्रयत्न करतो.आपण मात्र धुमसत असतो.


बुरहान वानी आता काश्मिरी खोऱ्यातील युवकांचा हिरो बनलाय.


ही घुसमट किती दिवस आपण दाबू शकू? यावर काही तोडगा आपण काढणार आहोत काय? एक तर काश्मिरी तरुणांनी 'सत्याचे प्रयोग' करत अच्छे दिनची वाट पहावी, किंवा माओने सांगितलेल्या मेक्यानिजमचा वापर करत हातात शस्रे घेऊन स्वतःची मुक्तता करावी, अथवा काहीच करू नये.जे काही होतंय ते निमूटपणे सहन करावं.शांतपणे, अविचलपणे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी हातात शस्रे घेणारे काही कमी क्रांतिकारक नव्हते. भगतसिंग,राजगुरू,सुखदेव, सुभाषचंद्र बोस या सगळ्यांनी तो प्रयत्न केला,त्यात ते अयशस्वी ठरले, तरी ते आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी लढलेला लढा हा आपल्यासाठी फायद्याचा होता, अस्मितेचा होता.बुरहान वानी हा देखील काश्मीरच्या लोकांच्या मनात धुमसणाऱ्या प्रश्नासाठी लढणारा एक युवक होता. त्याला तिथले लोक आता शहीद म्हणतील, आपण त्याला काय म्हणायचं ते आपलं आपण ठरवूया. पण बुरहान वानीच्या अंत्ययात्रेला 20 हजारांहून अधिक लोक उपस्थित राहतात,त्यात तरुणांचा आणि महिलांचा सहभाग अधिक असतो, ही गोष्ट काही आपल्या पथ्यावर पडणारी नाही. तूर्तास उसळलेला आगडोंब आणखी काही दशके शमणार नाही असे दिसते.