मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है

१६ डिसेंबर २०१४ ची गोष्ट. पाकिस्तानातील पेशावरच्या सैनिकी शाळेत ७ बंदुकधारी शिरले. माणसांच्या वेषातली सैतान. अंधाधुंद गोळीबारात तब्बल १४१ लोकांचा त्यांनी जीव घेतला. पैकी १३२ लहान मुले होती. या निरागस मुलांचा गुन्हा काय होता? पाकिस्तानात जन्म घेतला हा काय गुन्हा ठरू शकतो? ज्या तालिबानी कट्टरपंथीयांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली त्यांचा धर्म आणि मारल्या गेलेल्या निरागस मुलांचा धर्म एकच होता.धर्माच्या नावावर ज्यांनी हे हत्याकांड घडवलं त्यांना मग नेमका धर्माचा कोणता अर्थ अभिप्रेत होता? धर्माची कोणती शिकवण त्यांनी आत्मसात केली होती? त्यांच्या या पाशवी पराक्रमाने कोणती  स्वर्गीय देवता खुश होणार होती? कोणता देव लहान मुलांचा बळी मागतो? कोणता धर्म अशा अमानवी कत्तली सांगतो?

असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले. जगभर याबद्दल चर्चा झाली,अजूनही होते आहे. सुन्न करणार, काळीज पिळवटून टाकणार हे हत्याकांड होत. जगभरातून याचा निषेध झाला. व्हायलाच हवा होता. कोणी मेणबत्ती लाऊन निषेध व्यक्त केला, कोणी चेहरे रंगवून, कोणी कविता लिहून, कोणी मोर्चे काढून या अमानवी घटनेचा निषेध केला. पैकी, एका उर्दू गीतकाराने लिहिलेलं गीत मोठ्या प्रमाणात युट्यूबवर चर्चिले गेले.मोठ्या प्रमाणत त्याला प्रसिद्धी मिळाली.
गाण्याचे बोल होते,

'मुझे मां उनसे बदला लेने जाना है, मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है'



काय ताकद आहे या गाण्यात.आपला शाळेतला मित्र अतिरेकी कारवाईत मारला गेला, त्याच्या मारेकऱ्याला शिक्षा द्यायला पाहिजे असा तो ठाम विश्वास आपल्या आईकडे व्यक्त करतो. बदला घेण्याची भावना त्याच्या मनात जरूर आहे, पण तो बदला पुन्हा स्फोट घडवून आणणारा, गोळ्यांनी लोकांचे मुडदे पडणारा नक्कीच नाही. हा लहानगा अभिनव पद्धतीने बदला घेण्याच्या तयारीत आहे. ज्या अतिरेक्यांनी आपल्या वर्गमित्रांना जीवे मारल, या अतिरेक्यांच्या मुलांना माणुसकीचे धडे शिकवण्याची इच्छा हा मुलगा जाहीर करतो. किती हे शहाणपण! जोपर्यंत संवादाची प्रक्रिया सुरु होणार नाही आणि मनातली कटुता जोवर निघणार नाही तोपर्यंत सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. पाकिस्तानचा नैसर्गिक शत्रू म्हणून भारताची ओळख आहे. दहशतवादी कारवायांचा बळी भारत देश देखील ठरलाय. दहशतवादी कारवायांच्या विरोधात संपूर्ण देश एकसंधपणे उभा राहिला. परंतु आता घरचेच लोक घर पोखरायला सुरुवात करत आहेत. सनातन संस्था हे त्याचे ज्वलंत उदाहरण.सनातनचा राष्ट्रवाद हा दुसरा तिसरा काहीही नसून, दहशतवादच आहे. पेशावरच्या हल्ल्यातील मारेकऱ्यांचा आणि मृत मुलांचा धर्म जसा एक होता, तसाच मडगाव स्फोटातील मृतांचा आणि सनातनच्या साधकांचा देखील धर्म एकच होता. किती ही साम्यस्थळे! कालपर्यंत ज्यांना कट्टरपंथी म्हणून नावे ठेवत होतो, त्यांच्याच वाटेवर आपण निघालो आहोत. ज्यापद्धतीने अफजलगुरु दहशतवादी झाला याचा अर्थ सगळे भारतीय मुस्लिम दहशतवादी आहेत असा होत नाही, त्याचपद्धतीने दादरीमध्ये मोहम्मद अखलाखला गोमांस खाण्याच्या संशयावरून काही कट्टर हिंदूंनी जीवे मारले म्हणून सगळा देश असहिष्णू ठरत नाही. मोजक्या लोकांच्या करंटेपणामुळे इतर लोकांना त्यांचा सामना करावा लागतो.त्यामागे राजकीय फायदे-तोटे असतात हे सर्वांना ज्ञात आहेच. एकानंतर एक अशा ३ परिवर्तनवादी चळवळीतल्या नायकांचा खून झाल्यावर भारतात काही दंगली घडल्या नाहीत. घडायलाही नकोत. त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुलांना 'समतेच' गाण शिकवण्याचाच ध्यास इथल्या पुरोगामी चळवळीनी घेतला हे विशेष! कारण आपण संवादावर विश्वास ठेवतो,विचारांवर विश्वास ठेवतो, माणुसकीवर विश्वास ठेवतो. नाहीतर बंदुका आपल्यालाही चालवता येतात,पण आपण मार्ग स्वीकारलाय तो म्हणजे ,'मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है'.


एकदा निदा फाजली पाकिस्तानात एका मुशायराच्या कार्यक्रमाला गेले होते, तिथल्या पाकिस्तानी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला, कि भारतात मुस्लिमांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालले आहेत, त्याबद्दल तुमचे मत काय? कवी मनाच्या निदांनी त्या पत्रकारांना एका नज्म मधून उत्तर दिले, त्यांचे हे उत्तर समकालीन परिस्थितीत देखील तेवढेच कालातीत आहे.

इन्सान में हैवान यहाँ भी है वहा भी
अल्लाह निगहबान यहाँ भी है वहा भी

खूखार दरिंदो के फकत नाम अलग है
शहरो में बयाबान यहाँ भी है वहा भी

रहमत कि कुदरत हो या भगवान कि मूरत
हर खेल का मैदान यहाँ भी है वहा भी

हिन्दू भी मजे में है, मुसलमा भी मजे
इंसान परेशान यहा भी है वहा भी

उठता है दिलो जान से धुवा दोनो तरफ ही
ये मीर का दीवान यहा भी है वहा भी
- निदा फाजली



अनफ्रीडम

             
       'अनफ्रीडम' नावाचा सिनेमा पाहिला, बऱ्याच उशिरा पाहिला, पण योग्य वेळी पाहिलाय.ओर्लान्डोमध्ये समलैगिक भावंडांच्या क्लबमध्ये झालेला बॉम्बस्फोट, धर्माच्या नावावर पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी याचं झालेली हत्या आणि त्यात सहभागी असलेले धर्मरक्षक आणि सोबत 'उडता पंजाब' च्या निमित्ताने समोर आलेली सेन्सोर बोर्डची आरेरावी. या सगळ्या गोष्टींचा संदर्भ या सिनेमात पाहायला मिळाला, किंबहुना मीच तो लावला असण्याची शक्यता अधिक आहे.हा सिनेमा आपल्याला खिळवून ठेवतो, एकाच वेळी अनेक पातळ्यांवर विचार करायला लावतो.
"मी माझा मार्ग निवडलाय, तुम्ही तुमचा मार्ग निवडा पप्पा" , अस ठामपणे पोलिस असलेल्या आपल्या बापाला लीला सांगते.
प्रसंग १:

एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलीला मुली आवडतात, अमेरिकन चित्रकार असलेल्या एक मुलीच्या ती प्रेमात पडते.जगाची परवा न करता ही मुलगी घरातून पळून जाते,पोलिस असलेल्या बापाच्या हातातून ही मुलगी सुटणार तरी कशी? मुलगी आणि तिची प्रेयसी पोलिसांच्या हाती लागतात, समलैगिक असण म्हणजे महापाप! शिवाय एका पोलिसाच्या पोरीने असे  थेर करावेत, म्हणजे गहजबच. जेव्हा आपली मुलगी आपले म्हणणे ऐकायला तयार होत नाही, सामान्य मुलगी म्हणून जगायला तयार होत नाही असे दिसल्यावर हाच बाप पोलिस स्टेशनमध्ये इतर पोलिसांकरवी आपल्या पोरीचा आणि तिच्या प्रेयसीचा बलात्कार करवतो. पोलिस असलेल्या बापासमोर त्याच्याच संमतीने हे सगळ चालू असत. मुलगी अगोदर विरोध करते, पण बापाच्या निगरगट्ट पुरुषी अहंकाराला बळेच दुखावण्यासाठी ही मुलगी ,बळजबरीने होत असलेला 'संभोग'देखील आनंदाने उपभोगते, बाप मात्र बघत राहतो.शांतपणे. हतबलपणे.



प्रसंग २:

मुस्लिम म्हणजे कट्टरता आणि कट्टरता म्हणेज दहशतवाद हे सध्याचं 'युनिवर्सल' समीकरण. इस्लामची चिकित्सा करण हे कट्टरतावाद्यांनी निषिद्ध ठरवल. संपूर्ण जगात हे वास्तव आहे.हे वास्तव नाकारणारे मूर्खच, असो.

भले बुरे पाहिले मी ।
किती खरे अन् कितीक खोटे ।
भल्यात माझा भला मुहम्मद ।।
खर्यात माझा खरा मुहम्मद ।।

सुरेश भटांना समजलेले मुहम्मद सांगण्याचा प्रयत्न ते करतात,जे  सहिष्णू हिंदूंना देखील पटते. परंतु, अमेरिकेत राहणारा एक बडा  लेखक मुहम्मदाचे विचार नव्या मांडणीसह सांगण्याचा प्रयत्न करतो. सलमान रश्दी, तस्लिमा नसरीन सारखे याच्याविरुध्द देखील फतवे निघतात. सदर लेखकाला थेट पाकिस्तान मधून मारण्यासाठी मारेकरी मागवले जातात. अल्लाहच्या दारात मोक्याची जागा पटकाविण्यासाठी पाकिस्तानातून आलेला हा मारेकरी तरुण या परिवर्तनवादी लेखकाला बंदुकीच्या धाकावर गाडीत बसवतो आणि गाडी चालवायला सांगतो, लेखकाचा प्रश्न असतो, 'गाडी पुढच्या दिशेने चालवू कि मागच्या दिशेने ?'

विवेकवादी लोक आपल्याला ओरडून ओरडून सत्य सांगत असतात, त्यांना समजून घ्यायचं कि त्यांना गोळ्या घालायच्या हे ज्यांनी त्यांनी आपल्या विचारांच्या कुवतीनुसार ठरवायचं.

हे दोन्ही प्रसंग आपल्याल अंतर्मुख करायला लावतात, या दोन वेगवेगळ्या गोष्टी दोन वेगवेगळ्या देशांत घडत असतात. तस पाहिलं तर एकमेकांशी या गोष्टींचा काहीएक संबंध नाही. परंतु, संबंध लावायचाच अस  ठरवल तर मग बरीच साम्यस्थळ यात पाहायला मिळतील. समलैगिकता आणि दहशतवाद या दोन भिन्न गोष्टींना एकत्र आणण्याचा राम अमित कुमार या दिग्दर्शकाने प्रयत्न केलाय. १०००% त्याने या सिनेमाला न्याय दिलाय अस मी म्हणेन.कथानक मस्तच.
छायांकन तर विचारूच नका, आपल्या समोर हे सगळ घडतंय अस तुम्हाला वाटेल इतक ते वास्तविक दाखविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेलाय. तांत्रिकदृष्ट्या हा सिनेमा भाव खाऊन जातो. गेलाच पाहिजे.
सिनेमा संपतो आणि तुमच डोक गरगरायला लागत. एक गोष्ट जाणवते, जगातल्या सगळ्या असहिष्णू गोष्टीच्या मुळाशी जा, कारण एकच सापडेल. धर्म. धर्म नावाच्या एका संस्थेपाशी सगळ्या जगाची नैतिकता येऊन ठेपते. धर्म सांगतो म्हणून पुरुषाने स्रीबरोबरच लग्न केले पाहिजे, संसार केला पाहिजे. धर्म सांगतो म्हणून अनाचाराला ठेचून मारले पाहिजे, त्याचा आवाज दाबला पाहिजे. सगळ काही झाल पाहिजे ते केवळ धर्माच्या चौकटीत, चौकट ओलांडली कि तुमच्यावर बलात्कार केला जाईल, सगळ्या देखत, सगळे मानवी संबंध बाजूला ठेवून. वेळ पडलीच तर तुमच्यावर गोळ्या घातल्या जातील.त्या परिवर्तनवादी लेखकाला आणि त्याच्या कुटुंबाला ज्या पद्धतीने हाल करुन संपवले गेले तसेच तुम्हाला  देखील संपवले जाईल. ज्या डोळ्यांनी तुम्ही उद्याचे समतावादी जग पाहता आहात , ते डोळे कात्रीने  फोडले जातील ,ज्या लेखणीने तुम्ही जग बदलण्याची भाषा करता, ती बोटे कापली जातील. येशूला ज्या पद्धतीने क्रुसावर लटकवले, तसे तुम्ही कितीही विवेकवादी असू देत, येशुसारखे तुमचे देखील क्रुसावर लटकवले जाणे निश्चित.
आता हे सगळ बाजूला ठेवू, वर कथित केलेल्या सगळ्याच हिंसक गोष्टीतून धर्म बाजूला काढा. सगळ काही निवांत असेल. तुमचे डोळे, तुमचे बोटे आहे तसेच शाबूत असतील. तुमच्यावर धर्माची चौकट ओलांडली म्हणून बलात्कार होणार नाहीत. माणूस म्हणून एकमेकांना तुम्ही ओळख द्याल. दाभोलकर,पानसरे आणि कलबुर्गी शहीद नसतील, ते आपल्या आसपास कुठेतरी असतील. आपल्याला विचारांची नवी दिशा देत असतील.
मला वाटत, पहिल्यापेक्षा दुसरा पर्याय अधिक योग्य आहे,कारण त्यात 'विचार' आहे, अविचार नाही. हा सिनेमा या सगळ्या गोष्टींवर तुम्हा आम्हाला विचार करायला लावतो. सिनेमात समलैगिकता विषय हाताळला आहे आणि त्यात लैगिकता असलेले दृश्य देखील आहेत म्हणून सेन्सोर बोर्डाने सिनेमाच्या निर्मात्यांना काही दृश्य वगळून टाकण्यास सांगितले होते, ते दृश्य वगळले असते तर सिनेमा पूर्ण झालाच नसता हे माझ वैयक्तिक मत आहे. त्यामुळे सिनेमाच्या दिग्दर्शकाने लैगिक दृश्ये  न वगळण्याचा घेतलेला निर्णय चित्रपटाला न्याय देणारा आहे. सदर सिनेमाच्या प्रदर्शनावर सेन्सोर बोर्डाने बंदी घातली होती,परंतु हा सिनेमा 'टोरेंट'वर आपल्याला पाहायला मिळेल, भेटल्यास जरूर बघा.
सिनेमातल्या लेखकाने कट्टरपंथी मारेकऱ्याला विचारलेला प्रश्न अजूनही मला अस्वस्थ करतोय,  'गाडी पुढच्या दिशेने चालवू कि मागच्या दिशेने ?'. माणूस म्हणून आजवर आपला झालेला प्रवास पुढे न्यायचा कि मागे न्यायचा, हे सगळ तुमच्या आमच्याच हातात. धर्म तर तुम्ही आम्ही बनवलाय.