अमेरिकेत वंशवादी वृत्तीतून जॉर्ज फ्लॉड या एका कृष्णवर्णीय माणसाची हत्या करण्यात आली. हत्या करणारे दुसरे तिसरे कुणी नसून पोलिस प्रशासनातील अधिकारी आहे.जसा भारताला जातीव्यवस्थेचा काळाकुट्ट इतिहास आहे तसाच इतिहास अमेरिकेला वंशवादाचा आहे. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांनी अमेरिकेतील वंशवादविरोधी चळवळ जगासमोर आणली. कृष्णवर्णीय नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात राजसत्तेला त्यांनी सळो की पळो करून सोडले. कृष्णवर्णीय नागरिकांना समानतेची संधी नाकारली जात होती, त्यांना नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या अशा काळात 1963 साली वॉशिंग्टन येथे 2.5 लाखांच्या समुदायासमोर त्यांनी 'I Have a Dream' हे एक जगप्रसिद्ध भाषण केले.मार्टिन ल्युथर किंग यांनी पाहिलेले स्वप्न फॅसिस्ट ट्रम्प सरकारने धुळीस मिळवण्याचे काम सुरू केले आहे.अशा परिस्थितीत किंग यांचे विचार पुन्हा समजून घ्यावे लागतील. त्यांच्या इंग्लिश भाषणाचा हा मराठी अनुवाद.
◆◆◆
मी अशा वेळी तुमच्या सगळ्यांच्या सोबत आहे जेव्हा हे आंदोलन ,या देशाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या मागणीसाठी होणारे सर्वात मोठे आंदोलन म्हणून ओळखले जाणार आहे आणि त्यामुळेच मी आज आनंदी आहे.
शंभर वर्षापूर्वी, एक महान अमेरिकी, ज्यांच्या प्रतीकात्मक सावलीखाली आपण सगळे उभे आहोत, त्यांनी मानवमुक्तीची उद्घोषणा (Emancipation Proclamation) केली,त्यावर सहमतीच्या स्वाक्षऱ्या केल्या.या महत्वपूर्ण निर्णयामुळे गुलामगिरी सहन करणाऱ्या लाखो निग्रो लोकांच्या मनात आशेचा किरण जागवला गेला. हा त्यांचा आनंद म्हणजे अनेक वर्षे अंधारात राहिल्यावर प्रकाश अनुभवण्याची अनुभूती देणारा ठरला.
परंतु आज शंभर वर्षानंतर देखील निग्रो लोक स्वतंत्र नाहीत. या शंभर वर्षानंतर देखील निग्रो लोकांचे जीवन हे अस्पृश्यतेच्या हातकड्यांनी आणि भेदभावाच्या साखळ्यांनी बांधले गेलेले आहे.शंभर वर्षानंतर देखील निग्रो लोक समृद्धीच्या, संपन्नतेच्या विशाल समुद्रात, दारिद्राच्या एका बेटावर राहत आहेत. या शंभर वर्षानंतर देखील अमेरिकी समाजात निग्रो लोक कुठल्यातरी कोपऱ्यात सडत पडलेले आहेत, स्वतःच्याच देशात त्यांना परकीय लोकांसारखी वागणूक मिळते आहे.त्यामुळे या अपमानास्पद परिस्थितीची जाणीव इथल्या व्यवस्थेला व्हावी म्हणून इथे एकत्र आलो आहोत.
खर पाहिलं तर आम्ही देशाच्या राजधानीत आमचा एक चेक कॅश करून घ्यायला आलो आहोत. जेव्हा आपल्या देशाचे संविधान निर्माते स्वातंत्र्याची घोषणा दिव्य शब्दात लिहित होते , तेव्हा खरे तर ते एक अशा वचनपत्रावर हस्ताक्षर करत होते कि प्रत्येक अमेरिकी नागरिक त्याचा वारस होणार होता.हा जाहिरनामा असे आश्वासन देतो कि या देशातील सगळे लोक, मग ते काळे किंवा गोरे असोत, सर्वांना जीवन, स्वाधीनता आणि स्वतःच्या उन्नतीसाठी अग्रेसर राहण्याची संधी मिळणार होती.
आता ही गोष्ट स्पष्ट झाली आहे कि गौरवर्णीय लोक हे आश्वासन पूर्ण करण्यास असमर्थ ठरलेले आहेत. खरे तर अशा पवित्र दायित्वाचा सन्मान करण्यापेक्षा अमेरिकी गौरवर्णीयांनी कृष्णवर्णीय लोकांना एक 'बिनकामाचा' चेक दिला आहे.एक असा चेक ज्यावर 'अपर्याप्त राशी' असे लिहिलेले आहे. परंतु, आम्ही सगळे ही गोष्ट अमान्य करतो कि या देशातील न्यायाची तिजोरी ओस पडली आहे.आम्ही हे देखील अमान्य करतो कि ह्या देशात संधीची समानता देणारी तिजोरी ओस पडलेली आहे.त्यामुळे आम्ही आमचा चेक कॅश करायला येथे आलेलो आहोत, एक असा चेक जो आम्हाला आर्थिक स्थैर्य देइलच सोबत न्यायची सुरक्षितता देखील देईल.
खोटी नोट वापरली म्हणून जवळजवळ 9 मिनिटे हा पोलीस अधिकारी निशस्त्र जॉर्जच्या मानेवर पाय रोवून होता.त्यातच त्याचा मृत्यू झाला.
आम्ही या पवित्रस्थळी यासाठी जमलेलो आहोत कि, आम्ही अमेरिकेला लक्षात आणून देवू इच्छितो कि आमच्या मागणीचा तत्काळ विचार करण्याची तीव्र आवश्यकता आहे. लोकशाहीने देलेल्या वचनांची पूर्ती करण्याची आता आवश्यकता आहे. आता शांत राहण्याची आणि स्वतःचीच समजूत काढत बसण्याची ही वेळ नाही.आता वेळ आहे आपले संविधानिक हक्क मिळवण्याचा. आता वेळ आहे ती निर्दयी आणि अंधारलेल्या काळाला दूर लोटत, वांशिक हक्कासाठी असलेल्या प्रकाशमार्गावर चालण्याची. आता वेळ आहे ती आपल्या देशाला वांशिक भेदभावाच्या दलदलीतून बाहेर काढण्याची आणि बंधुभावाच्या अच्युत शिखरावर आपला देश उभा करण्याची.आता वेळ आहे ती प्रभूच्या सर्व लेकरांना वांशिक मतभेदापासून दूर करण्याची.
या सगळ्या बाबींना दुर्लक्षित करणे राष्ट्रासाठी घातक ठरणार आहे. निग्रो लोकांच्या असंतोषाचा उन्हाळा तोपर्यंत संपणार नाही, जोपर्यंत स्वतंत्रता आणि समानता यांचा ऋतू या देशात येत नाही. १९६३ हा काही शेवट नाही तर प्रारंभ आहे.जे लोक अशी आशा करतात कि निग्रो लोकांनी आपला असंतोष दाखविल्यानंतर परत शांत होतील आणि पुन्हा आपला देश आहे तशा व्यवस्थेप्रमाणे चालेल जसे कि काही झालेच नाही, त्या सर्व लोकांना असभ्य जागृतीचा सामना करावा लागणार आहे. अमेरिकेत तोपर्यंत सुखशांती राहणार नाही जोपर्यंत निग्रो लोकांना नागरीकातेचा अधिकार मिळणार नाही.विद्रोहाचा एल्गार तोवर इथल्या व्यवस्थेला धडका मारत राहील जोवर न्यायाची प्रभात होणार नाही.परंतु, न्यायाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या माझ्या लोकांना मी सांगू इच्छितो कि, आपले उचित स्थान मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्याही चुकीच्या कामाचे धनी बनायचे नाही. आपल्याला आपली स्वातंत्र्याची तहान घृणा आणि कटुतेचा प्याला पिऊन भागवायची नाहीये.
आपल्याला आपला संघर्ष हा अनुशासन आणि सन्मान यांच्या जोडीनेच करावा लागणार आहे.आपल्याला कधीही रचनात्मक विरोधाला शारीरिक हिंसेत परावर्तीत करायचे नाहीये.आपल्याला अनेकदा शारीरिक बळाचा सामना हा आत्मबालाशी करावा लागणारा आहे.आज निग्रो समाज वेगळ्याच अशा आतंकवादाने ग्रस्त आहे, आपल्याला असे काहीही कृत्य करायचे नाहीये जे गौरवर्णीयांमध्ये आपल्याप्रती अविश्वास निर्माण करेल.कारण आपल्या गौरवर्णीय बांधवांना आता याची जाणीव झालेली आहे कि त्यांचे भविष्य देखील हे आपल्या भविष्याशी जोडले गेलेले आहे.ह्या सगळ्या गोष्टी याठिकाणी गौरवर्णीय लोकांच्या उपस्थितीतून अधिक स्पष्ट होत आहे.त्यांना ही गोष्ट प्रतीत झालेली आहे कि त्यांचे स्वातंत्र्य हे आपल्या स्वातंत्र्यावर अवलंबून आहे.
आपण एकटे चालू शकत नाही.जेव्हा जेव्हा आपण लढत राहू,तेव्हा तेव्हा आपल्याला स्वतःशीच प्रण करावा लागेल कि आपण कायम पुढेच चालले पाहिजे,आपल्याला परत मागे फिरायचे नाहीये. काही लोक आम्हाला विचारतात कि 'तुम्ही संतुष्ट केव्हा होणार?" , जोपर्यंत निग्रो लोक पोलिसांच्या भयावह वागणुकीचे शिकार होणार नाहीत तेव्हा आम्ही संतुष्ट असू. ज्यावेळी प्रवासाने थकलेले आमचे शरीर राजमार्गाच्या कुठल्या धाब्यावर आणि शहरांच्या उपहारगृहात विश्रामासाठी आम्ही नेऊ शकत असू तेव्हा आम्ही संतुष्ट असू. जोपर्यंत एखादा निग्रो आपल्या छोट्याश्या वस्तीतून मोठ्या वस्तीत जोपर्यंत जात नाही तोवर आम्ही असंतुष्ट असणार आहोत. आम्ही तोपर्यंत असंतुष्ट असणार आहोत जोवर आमच्या लहान मुलांपासून त्यांची ओळख हिरावून घेतली जाणार आहे.आम्ही तोपर्यंत असंतुष्ट असणार आहोत जोवर मिसिसिप्पी मध्ये राहणारे कृष्णवर्णीय लोक मतदान करू शकत नाही आणि न्यूयॉर्क मध्ये राहणारा कृष्णवर्णीय आपल्याकडे निवडणूक लढविण्यासाठी काहीही नाही अशी स्वतःचीच समजूत काढत राहील.आम्ही संतुष्ट नाहीच आहोत, जोपर्यंत न्याय जलाप्रमाणे आणि धर्म एका तेजस्वी धारेप्रमाणे प्रवाहित होणार नाही.
मी या गोष्टीशी अनभिज्ञ नाही कि आपण सगळे मोठ्या कष्टाने याठिकाणी आला आहात.आपल्यापैकी काही लोक तर आता आताच जेल मधून बाहेर आलेले आहेत.काही लोक अशा परिस्थितून आलेले आहेत जेथे स्वातंत्र्याच्या शोधासाठी निघालेल्या त्यांना पोलिसांचा जाच आणि अत्याचार सहन करावा लागला.तुम्हाला आता योग्य पद्धतीने अन्याय सहन करण्याचा अनुभव आहे, त्यामुळे मला विश्वास वाटतो कि आजची आपल्याला होणारी ही पिडा आपल्याला उद्या फळ देईल, त्यासाठी आपण आपले काम चालू ठेवले पाहिजे.
मिसिसिपीला परत जा, अलबामाला परत जा, साऊथ कैरोलिनाला परत जा, जोर्जियाला परत जा, लूजीआनाला परत जा, उत्तरीय शहरांच्या झोपडीत आणि वस्तीत पुन्हा जा, विश्वास ठेवा कि कोणत्या न कोणत्या प्रकारे ही स्थिती बदलेल.आपण आशावादी असायला हवे, निराशेच्या गर्तेत आता आपल्याला परत जायचे नाहीये.
मित्रांनो, आज मला हे आपल्याला सांगायचे आहे कि , आज आपण अनेक अडचणींना सामोरे जातो आहोत, तरीही मी एक स्वप्न पाहिलेले आहे (I have a dream),एक असे स्वप्न जे अमेरिकी नागरिकांच्या स्वप्नाचाच एक भाग आहेत.
माझे स्वप्न आहे कि ,एक दिवस हा देश नक्कीच प्रगती करेल आणि खऱ्या अर्थाने आपल्या सैद्धांतिक मुल्यांवर आधारलेला असेल.संपूर्ण मानवजात एकसमान आहे, या सत्याला आम्ही मानतो.
माझे स्वप्न आहे कि, एक दिवस जॉर्जियाच्या लाल डोंगरांवर गुलामांची मूले आणि त्यांच्या मालकांची मूले एकाच टेबलावर बंधुभावाने बसलेले असतील.
माझे स्वप्न आहे कि,एक दिवस , जेथे कृष्णवर्णीय नागरिकांवर होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराने कळस गाठला आहे अशा मिसिसिपी राज्यात सुद्धा स्वतंत्रता आणि न्याय नांदावेत.
माझे स्वप्न आहे कि, एक दिवस माझे चारही मूले एका अशा देशात राहतील जेथे त्यांचे मुल्यांकन त्याच्या चमडीच्या रंगावरून नाही तर त्यांच्या चारित्र्याच्या ताकदीवर केले जाईल.
आज माझे स्वप्न आहे कि,
एक दिवस, अलबामा सारख्या देशात, जेथे जातीयवादाचा उन्माद आहे, जेथे गव्हर्नर देखील न्याय व्यवस्थेला धाब्यावर बसवून तोंडाला जे येईल ते बरळतात, तेथे लहान लहान गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय मूले एकमेकांचा हात आपल्या भावंडाप्रमाणे हातात घेऊ शकतील.,
एक दिवस , इथली हर एक दरी उंच होवो, हर एक डोंगर आखूड व्हावा, बेढंग दऱ्याखोऱ्या सपाट व्हाव्यात, वेडेवाकडी रस्ते सरळ व्हावीत त्यावेळी ईश्वराचा महिमा दिसेल आणि सगळे लोक हा बदल पाहतील.
ही आपल्या सगळ्यांची आशा आहे, याच आशेसह मी दक्षिणेस (दक्षिण अमेरिका) परत जाणार आहे.याच विश्वासाने आपण निराशेच्या पर्वताला आशेच्या दगडाने फोडू शकणार आहोत.याच विश्वासाने आपण कलहाच्या कोलाहलाला बंधुत्वाच्या मधुर स्वरुपात बदलू शकणार आहोत.याच विश्वासाने आपण सगळे एकत्र काम करू शकणार आहोत, याच विश्वासाने आपण संघर्ष करू शकणार आहोत, जेलमध्ये जाऊ शकणार आहोत.याच विश्वासाने आपण स्वातंत्र्यासाठी एकत्र लढणार आहोत, विश्वास असेल कि एक दिवस आपण नक्कीच मुक्त होणार आहोत.
एक असा दिवस येईल जिथे सर्व प्रभूची लेकरे नव्या अर्थाने गाऊ शकतील,
”My country
’tis of thee, sweet land of liberty, of thee I sing. Land where my fathers died, land of the pilgrim’s pride, from every mountainside, let freedom ring.”
जर अमेरिकेला एक महान देश बनायचे असेल तर हे सगळे सत्यात उतरावे लागेल.
यासठी न्यू हैम्पशायरच्या विलक्षण अशा टेकड्यांवरून आजादीचा जयघोष होऊ द्या, न्यूयोर्कच्या विशाल पर्वतावरून आजादीचा जयघोष होऊ द्या,पेंसिलवेनियाच्या अल्घेनीज़ पर्वतावरून आजादीचा जयघोष होऊ द्या, बर्फाने आच्छादित अशा कोलराडोच्या पर्वतांमधून आजादीचा जयघोष होऊ द्या,कैलिफोर्नियाच्या वेड्यावाकड्या वळणदार घाटामधून आजादीचा जयघोष होऊ द्या,जार्जियाच्या इस्टोन पर्वतावरून आजादीचा जयघोष होऊ द्या, टेनेसीच्या लुकआउट पर्वतावरून आजादीचा जयघोष होऊ द्या, मिस्सिसिप्पिच्या उंच पर्वतरांगामधून आणि दऱ्याखोर्यांमधून आजादीचा जयघोष होऊ द्या, हर एक पर्वतांमधून आजादीचा जयघोष होऊ द्या.
असे जेव्हा होईल, जेव्हा आपण सगळे आजादीचा जयघोष करू, जेव्हा प्रत्येक गाव आणि खेडे, प्रत्येक राज्य आणि शहर आजादीचा जयघोष करू लागतील तेव्हा आपण तो दिवस लवकर आणू शकू जेव्हा प्रभूची सर्व लेकरे मग ते कृष्णवर्णीय असो कि गौरवर्णीय, यहुदी असोत किंवा कोणा अन्य जातीचे, प्रोटेस्टंट असोत किंवा कैथोलिक,आपण सगळे हातात हात घालून नोग्रो लोकांचे अध्यात्मिक गाणे गाऊ शकू,
”Free at last! free at last! thank God Almighty, we are free at last!”” (शेवटी आम्ही मुक्त झालो, हे महान परमेश्वरा, शेवटी आम्ही मुक्त झालो)
मार्टिन लूथर किंग
(Martin Luther King )
◆◆◆