हनुमानाप्रमाणेच शेतकरी आंदोलनही चिरंजीवी- योगेंद्र यादव

 या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाविषयी एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे कि जेव्हा जेव्हा हे आंदोलन क्षीण झालंय असं बोललं जात, आंदोलनाला ब्रेक लागला अशी चर्चा होते तेव्हा हे आंदोलन अधिक जोमाने आणि उत्स्फुतपणे जोर धरते. आतापर्यंत अनेक टीकाकारांना या आंदोलनाला दुषणे लावली. शांततेच्या मार्गाने होत असलेले हे आंदोलन आता चौथ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. या अगोदर तीन वेळा टीकाकारांची तोंडे आंदोलनकारी शेतकऱ्यांनी बंद केलेली आहेत. 

या अर्थाने या शेतकरी आंदोलनाचे पात्र हनुमानासारखे आहे. हनुमानासारखी त्याची शक्ती अमर्याद आहे. तो समुद्र पार करू शकतो, डोंगर उचलू शकतो, आणि आपल्या शत्रूचा नाशही करू शकतो.



परंतु हनुमानाप्रमाणेच शेतकर्‍यालाही त्याची शक्ती कळत नाही. जर त्याला योग्य दिशा देणारा मर्यादा पुरुषोत्तम राम सापडला तर लक्ष्य गाठण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही. हनुमानाची भक्ती जशी वैष्णव, शैव, शाक्य पंथांच्याही वर आहे, तशी किसान चळवळ ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या ध्वजाच्या पलीकडेही आहे. हनुमानाप्रमाणेच शेतकरी आंदोलनही चिरंजीवी आहे. पहिल्यांदाच,  नोव्हेंबर महिन्यात या आंदोलनाने टीकाकारांचे तोंड बंद केले. 

पहिल्या टप्प्यात पंजाबमध्ये अभूतपूर्व जनजागृती व आंदोलन झाले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने 9 ऑगस्ट,25 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबरला या तीन कायद्याविरोधात राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले होते. तोपर्यंत असे म्हटले जात होते की हे आंदोलन केवळ पंजाब पुरते मर्यादित आहे. काही समीक्षक असेही म्हणू लागले होते की पंजाबात सुरु  झालेले हे आंदोलन तिथेच शमेल. अशा परिस्थितीत, 26 नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली ' असा पुकारा देत शेतकरी दिल्लीला पोहोचले आणि आंदोलनाने अभूतपूर्व यश मिळवलं.

पंजाबमध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाने, चळवळीने दिल्लीला वेढा घातला. आता हरियाणा मधले शेतकरी  बांधव देखील या आंदोलनात सामील झाले आहेत.  शेतकरी चळवळ ही आता राष्ट्रीय चळवळ बनली आहे. दुसर्‍या टप्प्यात दिल्लीत पोहोचलेले हे शेतकरी आंदोलन 5-7  दिवसही टिकणार नाही असा काही समीक्षकांनी कयास लावला होता.याच टप्प्यात उन, वारा, पाऊस यांची कुठलीही पर्वा न करता शेतकरी खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखलं गेलं. 
ऐतिहासिक 'किसान परेड'ने शेतकरी आंदोलन जगभरात पोहचवले. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूरचे आंदोलन  देशभरातील शेतकर्‍यांसाठी तीर्थक्षेत्र बनले. किसान आंदोलनाने हनुमानाच्या चिरंजीवी शक्तीची प्रचीती परत दिली जेव्हा लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर शेतकऱ्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि चिरडण्याचा प्रयत्नही केला गेला. 

सर्वात अगोदर माध्यमांना हाताशी धरून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले गेले. पोलिसांच्या उपस्थितीत स्वतःला 'स्थानिक' म्हणवून घेणारे गुंड आंदोलकांवर हल्ला करू लागले. हे अगल बघून सत्ताधार्यांना वाटले कि रातोरात हे आंदोलन संपेल.  गोदी मिडीयाने तर हे आंदोलन संपल्याचे जाहीर देखील केले. परंतु गाजीपूरच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने चित्र पालटून टाकले. राकेश टिकैत यांचे अश्रू शेतकऱ्यांच्या अपमानाचे प्रतिक बनले आणि दिल्लीच्या आसपास असलेले शेतकरी बांधव आंदोलनस्थळी पोहचू लागले.यावेळी उत्स्फूर्तपणे शेतकरी महापंचायतींचे आयोजन केले गेले. आंदोलनाचा आवाज.दाबण्याऐवजी हा आवज सर्वदूर पोहोचल. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी महापंचायतींची प्रक्रिया आजही सुरू आहे.





आता ही शेतकऱ्यांची ऐतिहासिक चळवळ चौथ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. आता पुन्हा एकदा मोर्चांमधील शेतकर्‍यांची संख्या कमी झाली आहे, समर्थन ओसरत आहे असा दावा सरकार करत आहे. सरकारचे निर्दयी वागणे हीच सरकारची ताकद आहे अस चित्र उभ केल जात आहे. 'मोदी झुकणार नाहीत' आणि शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागेल असे टीकाकार म्हणत आहेत. परंतु संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात सुरु असलेली ही ऐतिहासिक चळवळ आगामी काळात पुन्हा एकदा शिखर गाठेल, हा आम्हां सगळ्यांना विश्वास आहे. 

आधी शेतकरी चळवळीचे रणांगण उत्तर भारत होते परंतु दिवसेंदिवस दक्षिण व पूर्व भारतामध्येही हे आंदोलन पसरत चालले आहे.शेतीमालाला  किमान आधारभूत किंमत मिळावी आणि या मागणीला कायद्याचं संरक्षण मिळाव अशी आम्ही मागणी करत आहोत.  तसेच अध्यादेश आणून लागू केलेले 3 कायदे रद्द करण्याची मागणी जोरदारपणे येणाऱ्या काळातही मांडली जाईल. मतदानासाठी आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या सामर्थ्याला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शेतकरी योग्य धडा शिकवतील. 

केवळ हे सरकारच नाही, तर भविष्यातील कोणतेही सरकार या तिन्ही किंवा त्यांच्यासारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्याची हिंमत करणार नाही. सत्य हे आहे की ही शेतकरी चळवळ आता या तीन कायद्याच्या पलीकडे गेली आहे. आता ही चळवळ शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची चळवळ बनली आहे. खर तर हा संघर्ष केवळ या सरकारच्या विरोधात नाही. शेतकरी विरुध्द सत्ताधारी असा हा संघर्ष आहे. सत्ताधाऱ्यांनी याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला गेलेलं सत्ताधाऱ्यांना महागात पडणार आहे. 


मूळ लेखक: योगेंद्र यादव 
अनुवाद: सागर भालेराव 

टीआरपीच्या खेळाने काश्मीरमधल्या मुस्लिमांना काय सहन करावं लागलं?

 2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेचा दिवस होता. त्या दिवशी, मी आणि माझा चुलत भाऊ 'गली बॉय' हा चित्रपट पाहण्यासाठी जम्मूच्या वेव्ह मॉलमध्ये गेलो होतो. जम्मूपासून दूर पुलवामामध्ये भारतीय सैन्यावर हल्ला झाल्याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला ही घटना समजली. 


मी जम्मू शहरातील मुस्लिमबहुल भागात,  गुज्जर नगरमध्ये भाड्याने राहत होतो. दुसर्‍या दिवशी, 15 फेब्रुवारी 2019 रोजी, सकाळी सकाळी बाहेरच्या विचित्र आवाजांनी माझी झोप उघडली. मी कॉलेजला जाण्यासाठी तयार व्हायला निघालो तेव्हा पाहिलं कि माझ्या मोबाईलवर माझ्या कुटुंबियांचे आणि हितचिंतकाचे जवळपास 50 कॉल येऊन गेले होते. मला आश्चर्यही वाटलं आणि काळजीही वाटली. माझ्या कुटुंबियांबद्दल मला चिंता वाटू लागली. मी घरी फोनवर बोललो तेव्हा तर आणखीनच चक्रावलो. एका काश्मिरी मुलाने भारताच्या निमलष्करी दलाच्या काफिल्यावर आत्मघातकी हल्ला केल्याचे न्यूज अँकर ओरडून ओरडून सांगत होते. या हल्ल्यात दुर्दैवाने आपले 40 जवान शहीद झाले होते. हे सर्वच दुखःद होत. कारण इस्लाम किंवा मानवता कोणालाही आत्मघाती हल्ला करण्यास परवानगी देत नाही. याहून वाईट गोष्ट म्हणजे टीव्हीवरचे न्यूज अँकर सामान्य काश्मिरींना दोष देत होते. आपल्या वातानुकुलित स्टुडियोतून त्यांनी छेडलेला विषय माझ्यावर थेट परिणाम करत होता. या घटनेनंतर अचानकपणे मी सर्वांचा शत्रू बनलो. माझ्यापासून दूर कुठे घडलेल्या कृत्यासाठी मलाच दोषी धरलं जात होत. खरं तर हे कुणी केलं?, का केलं? याची कुणालाही कल्पना नव्हती. जम्मू हे माझ्यासाठी दुसरं घर होतं. पण त्या दिवासानंतर अचानक मला, आपण कुणीतरी परके आहोत, अपराधी आहोत अस विनाकारण वाटायला लागलं. हे सगळं भारतातील न्यूज वाहिन्यांनी माझ्यासारख्या अनेकांवर लादलं होतं. एक काश्मिरी मुस्लीम असल्याकारणाने मला जम्मू सोडण्यास भाग पाडलं गेलं. त्यासाठी जनमाणसात वातावरणनिर्मिती करण्याचं काम अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीने केलं होतं. 


PC: Newlaundry 

या घटनेच्या दोन वर्षांनंतर, पुलवामा हल्ल्याविषयी टेलिव्हिजन रेटिंग एजन्सीचे तत्कालीन सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्याशी अर्णबने केलेले चॅट सार्वजनिक झाले. हे चॅट वाचल्यावर माझे रक्त अक्षरशः उसळायला लागले.


 मी आजवर हे ऐकलं होतं कि आपल्याकडे काही पत्रकार मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खातात. इथे तर टीआरपीसाठी सैन्यातील जवानांच्या मृत्यूचा उपयोग केला गेला होता. या सगळ्याची कुणीही कल्पना देखील केली नव्हती. आपल्या चॅनलचा टीआरपी वाढला असल्याचे सांगताना 'हा हल्ला आपण वेड्यासारखा जिंकला आहे' (This attack we have won like crazy) असे अर्णबने दासगुप्ता यांना लिहिलं आहे. 


 घरच्यांशी फोनवर बोलल्यानंतर मी जेव्हा चित्र-विचित्र आवाज ऐकून बाहेर आलो तेव्हा प्रचंड गोंगाट होता. मी रहात असलेल्या गुज्जरनगरमध्ये एक जमाव घुसला होता आणि आरडाओरडा करत होता. काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी मी घराच्या छतावर गेलो तेव्हा काळ्या धुराने आकाश व्यापलं होत. काश्मीर खोऱ्यातील गाड्यांच्या नंबर प्लेट बघून त्या गाड्यांची तोडफोड केली जात होती आणि त्या गाड्या पेटवून दिल्या जात होत्या. दंगा करणारे हे सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते. या जमावाने, आमच्या घरांवर, काचेच्या खिडक्यांवर दगडफेक केली.  राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मिरी मुस्लिमांच्याबद्दल हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण करण्यात अर्णबसारख्या पत्रकारांना यश आलं होतं. 

मला आठवतंय, तो शुक्रवारचा दिवस होता. आम्ही एकमेकांच्या आधाराने नमाजसाठी मशिदीत गेलो. आम्हांला कळून चुकलं होतं कि कुणीही आमच्या मदतीला येणार नाही. आम्ही ईश्वराकडे दैवी मदतीसाठी याचना करत होतो. महिला देखील रडत-गागत मोठमोठ्याने ईश्वराकडे प्रार्थना करत होत्या. प्रार्थनेनंतर शेजारच्या वस्तीतील मुस्लीम बांधव देखील आमच्या मदतीला आले. सगळ्यांनी मिळून हिंसक जमावाला गुज्जरनगरच्या बाहेर काढलं आणि आमच्या वस्तीचं रक्षण केलं. अनेकांना यावेळी १९४७ साली झालेल्या हत्याकांडाची आठवण झाली. या हत्याकांडात अडीज लाख मुस्लीम नागरिक मारले गेले होते आणि शेकडो लोक विस्थापित झाले होते. या हत्याकांडानंतर जम्मूच लोकसंख्याशास्त्र बदललं आणि मुस्लीम अल्पसंख्याक बनले. 

 



पण हे सगळ इथवर थांबलं नाही.

भारतातील टेलिव्हिजन अँकरांनी काश्मिरी नागरिकांना शत्रू म्हणून चित्रित करण्यात कुठलीही कसर सोडली नव्हती. आपले सगळे चॅनल केवळ टीआरपीसाठी लढले. आम्ही मात्र आमच्या जीवासाठी आणि गुज्जर नगरमधील महिलांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला आळा घालण्यासाठी लढा दिला. या हिंसक जमावामुळे आमच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. 

 

खरं तर आम्ही टेलिव्हिजन स्टुडिओतून आमच्याविरूद्ध चालवलेल्या लढाईचा प्रतिकार करण्यासाठी जमलो होतो.दंगल घडवणारा जमाव हजारोंच्या संख्येने होता तर आम्ही केवळ शे-दीडशे लोक होतो. रोमन साम्राज्यात राजाच्या करमणुकीसाठी कुणा गरीब कारागिराची आणि बलाढ्य सैनिकाशी किंवा जनावराशी जीवघेणी कुस्ती लावली जात असे, आमचीही अवस्था अशीच काहीशी झाली होती.


 या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी काश्मिरी नागरिकांना धमकावण्यात आले, त्यांच्यावर हल्ले केले गेले. गाझियाबादच्या एसआरएम विद्यापीठात शिकत असलेल्या माझ्या एका मित्राला विद्यापीठ सोडावं लागलं. देशभरात काश्मिरी नागरिकांना त्रास दिला जाऊ लागला, त्यांना बळजबरीने 'भारत माता की जय' असा जयघोष करायला भाग पाडलं गेलं. देहरादूनमध्ये राहत असलेल्या एका मित्राला हिंदुत्ववादी जमावापासून वाचण्यासाठी आणि खालसा सहायता कार्यालयाकडे पोहोचण्यासाठी कपाळावर टिळा लावावा लागला. देहरादूनमध्येच अनेक महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडून जायला भाग पाडलं.आमच्या आणखी एका मित्राला हरयाणामध्ये जमावाने मारहाण केली. अशा घटना देशभरात घडत असताना गरज होती ती एकीची.  लोक एकत्र येत होते खरे परंतु एकीसाठी नाही, तर आमच्यासारख्या अल्पसंख्याकांच्या विरुध्द!


अशा घटनांमध्ये वाढ होत असताना आम्ही जम्मू सोडण्याचा निर्णय घेतला. उधमपूरमध्ये एका मुस्लिम ड्रायव्हरला जिवंत जाळल्याची अफवा ऐकल्यावर आम्ही थांबलो. हे सगळ ऐकून आमचं अवसान गळाल. स्थानिकांनी दाखवलेल्या ऐक्यामुळे आम्हाला धीर आला होता आणि जम्मूच्या या मुस्लीम वस्तीतच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. लवकरच भारताच्या इतर भागांतूनही जीव मुठीत घेऊन काही काश्मिरी नागरिक येथे येऊ लागले.कालांतराने आम्ही जेव्हा पुन्हा निघण्याचा निर्णय घेतला,तेव्हा देखील आम्ही हिंमत करू शकलो नाही कारण घरी जाण्याच्या आमच्या रस्त्यात उधमपूर येणार होतं.आधीच तिथल्या बातम्या ऐकून आम्ही भयभीत होतो, म्हणून दहशतीच्या वातावरणात आम्ही जम्मूतच थांबलो. 


काही दिवसांनी काश्मीरकडे जाणाऱ्या गाड्या, बसेस आणि खासगी वाहनांना मध्यरात्री जाण्याची परवानगी दिली गेली. कसेबसे आम्ही आमच्या घरी, काश्मीरला पोहोचलो. परंतु या जातीय दंग्यांनी आमच्यावर खोल परिणाम केला आहे. दोन वर्षानंतरही आमच्या मनातली दहशत काही कमी झालेली नाही. न्यूजरूममधून आमच्यावर केलेल्या हल्ल्यांमुळे आमचं संपूर्ण आयुष्याच बदललं. आमचे मित्र आमच्यापासून दुरावले गेले, अनेकांवर मानसिक परिणामही झाला. मी अजूनही स्वतःला विचारतो कि, जम्मूतल्या त्या हिंसेसाठी,मला तेथून पळून जाण्यासाठी, माझ्यासारख्या अनेकांना शत्रू म्हणून चित्रित करण्यासाठी कोण जबाबदार आहे? न्यूज अँकर की तो हिंदू जमाव? आमच्या दुःखाचा फायदा घेऊन नागरिकांमध्ये फुट पाडण्यासाठी मी अर्णबसारख्या न्यूज अँकरला दोष देतो. भारतातील प्रसारमाध्यमे केवळ लोकशाहीची दमछाक करूच शकत नाहीत तर हिंदू-मुस्लिम विभाजनासमवेत जनतेचे ध्रुवीकरण देखील करू शकतात हे आता स्पष्ट झाले आहे.माझ्यासाठी दुसरं घर असलेलं जम्मू आता मला आपलंसं वाटत नाही. मी हे जड मनाने सांगत आहे की जम्मूमध्ये मुस्लिम सुरक्षित नाहीत.


मूळ लेखक: मेहराज नियाज बाजदार

अनुवाद: सागर भालेराव