जगात आस्तिक-नास्तिक वाद अनादी काळापासून सुरु आहे. आजही त्यावर वेळोवेळी चर्चा होत असते. असे असंले तरी अशा वादविवादात न पडता देवावर श्रद्धा ठेऊन आपल्या कार्यात आनंद मानणारे खूप आहेत. तसेच देवावर विश्वास न ठेवता केवळ स्वतःवर विश्वास ठेऊन नवनिर्माणाची प्रेरणा वाहणारे देखील तेवढेच आहेत. आपलं आस्तिक असणं, नास्तिक असणं किंवा निरीश्वरवादी असणं हे सगळं बाजूला ठेवून कर्मसिद्धांतावर विश्वास ठेवण्याची शिकवण देणाऱ्या निष्काम कर्मयोगाची हीच तर खरी प्रेरणा. हाच प्रेरणेचा स्रोत भारतीयांना मदर टेरेसांच्या रूपाने चैतन्य देऊन गेला. त्यांनी घालून दिलेला आदर्श आजच्या असहिष्णुतेच्या वातावरणात आवर्जून अभ्यासावा असाच आहे.
क्षमा करणे ही प्रेमाची सुरुवात असते- मदर तेरेसा
१६ ऑगस्ट १९४६ ला स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगने 'प्रत्यक्ष कृती' कार्यक्रम सुरु केला. बंगालात हिंदू-मुस्लिम दंगली पेटल्या. रक्ताच्या थारोळयांनी कलकत्ता शहर माखलेलं असताना, शहरात दंगली उफाळून आलेल्या असताना आपल्या पदराखाली असलेल्या २०० अनाथांना सांभाळत असलेली ही मायमाऊली दंगलग्रस्तांना देखील मदत करत होती. पुढे १९४७ भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. इंग्रज देश सोडून गेले. भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला. पण फाळणीमुळे देशाचं जनमानस बिघडलेलं होत. सीमाभागात दंगली पेट घेत होत्या. अशा वेळी मदर तेरेसांना देश सोडून जाणं सहजशक्य होत. पण इथेच त्यांचं वेगेळेपण पाहायला मिळत. त्या मिशनरीचं काम करत असल्या तरी मानवता या मूल्याला त्यांनी अग्रक्रम दिला. या घटनेचा त्यांच्यावर खोल परिणाम झाला आणि त्यांनी भारतातच राहून लोकांची सेवा करण्याचं ठरवलं.
धर्मकार्यासाठी आलेल्या तेरेसांना लोकसेवा करण्याची संमती घ्यावी लागली. ही संमती थेट व्हॅटिकन चर्चमधून मिळवावी लागली. त्यांच्या कामाचा आवाका लक्षात घेता त्यांना तशी संमती दिली गेली. शिक्षिका असलेल्या या बाईने भारतीय नागरिकत्व स्वीकारलं आणि नर्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. हा त्याच्या जीवनातला दुसरा असा महत्वाचा टप्पा म्हणता येईल. क्षय,मलेरिया, कुपोषणग्रस्त, कुष्ठरोगी अशा समस्या असलेल्या वातावरणात हे काम हाती घेणं नक्कीच सोपं नव्हतं. त्यांची काम करण्याची जिद्द पाहून काहींनी त्यांचं कौतुक केलंच, पण कर्मठ धर्मगुरूंनी टीकादेखील सुरु केली. तेरेसा यांनी ख्रिश्चन धर्माची शिकवण द्यावी, लोकांचे धर्मांतर करावे म्हणून त्यांना नेमण्यात आल्याची मिशनरींची धारणा होती. तर आपले काम हे देवाचे आणि धार्मिक सेवेचे आहे असं तेरेसांना वाटत होत. मिशनरी म्हणत, 'सिस्टर तेरेसा या धर्मोपदेशक आहेत', तर तेरेसा म्हणत , 'मी कर्मोपदेशक आहे'.
आजचे जग हे केवळ अन्नासाठी भुकेलेले नाही. ते प्रेम,आपुलकी आणि मायेचा स्पर्श यासाठी तडफडत आहे. - मदर तेरेसा
फिरते दवाखाने आज आपण आपल्या आसपास पाहतो आहोत. त्याची मूळ प्रेरणा आणि कल्पना ही मदर तेरेसांचीच. ज्या महारोग्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचणे देखील शक्य नाही, अशा रोग्यांपर्यंत स्वतः पोहचून सेवा देण्याचा त्यांचा यामागचा विचार होता. मदर तेरेसा म्हणत, 'जगातील सर्वात मोठा रोग कोणता असेल तर तो म्हणजे आपण नकोसे झाल्याची भावना'. आज जर त्या ह्यात असत्या तर काश्मीर प्रश्नावर नक्कीच व्यक्त झाल्या असत्या. काश्मिरी नागरिकांच्या मनात असलेली एकाकीपणाची भावना,न्यूनगंड त्यांनी जाणून घेऊन संवादाची सुरुवात नक्कीच केली असती.
मदर तेरेसा म्हणजे ख्रिश्चन धर्मसत्तेला पडलेलं एक कोडं होत. त्यांनी धर्मोपदेशक न बनता कर्मोपदेशक होऊन आपल्याच धर्मसत्तेला आव्हान दिलं. त्यांना संतपद द्यावं कि नाही याविषयी धर्मसत्तेतील धुरिणांनी व्यापक चिंतन केलं. धर्मसत्ता कुठलीही असू द्या ती पुरुषसत्ताकच असते. तेव्हा कुठलाही प्रस्थापित धर्म एखाद्या स्त्रीला संतपद देण्यास तयार नसतो. धर्माचे ठेकेदार मरणोत्तरही तेरेसांना संतपद देण्यास तयार नव्हते. परंतु, देवावर श्रद्धा ठेऊन मानवतेची शिकवण देणाऱ्या महामानवांना धर्मसत्तेने नव्हे तर लोकांनीच संत मानले. शेवटी या महान बाईसमोर धर्मसत्तेला झुकावे लागले. चर्चने घालून दिलेल्या साऱ्या अटी त्यांनी मान्य केल्या होत्या. आयुष्यभर त्यांनी या कठोर अटींचे पालन केले,परंतु धर्मप्रसार मात्र केला नाही.असहाय लोकांची सेवा हीच आपली प्रभूभक्ती असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्या या विचारामुळे त्यांना चर्चची नाराजी भोगावी लागली. मृत्यूपश्चातही त्यांना चर्चचा विरोध कायम राहिला. हा विरोध नंतर मावळला. भारतीय समाजात काम करत असताना इथल्या सामाजिक-सांस्कृतिक आणि राजकीय पटलावर जे काही भलेबुरे परिणाम घडत होते त्या सर्वांचा परिणाम तेरेसांवर झालेला आढळतो. शेवटच्या श्वासापर्यंत त्या मानवतावाद सांगत होत्या. आज भारतात जेव्हा मॉब लिंचिंगसारख्या घटना घडत आहेत, अशा काळात त्यांची शिकवण महत्वाची वाटते. त्या म्हणतात, ' जर प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्यात प्रभूचे रूप पाहण्याचे ठरविले तर जगातील संहारक अण्वस्रे कालबाह्य ठरतील'. तुकोबांपेक्षा त्या वेगळं काय सांगत होत्या? धर्मसत्तेने त्यांना संतपद देण्याअगोदर भारतीय समाजाने त्यांना संतपद बहाल केलं. त्यांना आई मानलं. जननीचा दर्जा दिला.आपल्या सहिष्णू परंपरेचं इतकं विशाल आणि व्यापक उदाहरण आपण कसे काय विसरलो?
चंद्रावर जरी गरीब-कष्टी आढळला, तरी त्याच्या सेवेसाठी मी चंद्रावरसुद्धा जाईन.- मदर तेरेसा
धार्मिक असणं आणि धर्मांध असणं यातला खरा फरक मदर तेरेसांनी आपल्याला समजून सांगितला. काही धर्मांध अधेमधे कधी लहर आली की मदर तेरेसांच्या कार्यावर शंका घेत असतात,पण त्यामुळे त्यांचं मोठेपण कमी होत नाही. धर्मप्रसार केला नाही म्हणून धर्मसत्तेची नाराजी ओढून घेणाऱ्या मदर तेरेसांच्या कार्यावर जेव्हा संघप्रमुख मोहन भागवत शंका घेतात तेव्हा खरं त्यांचं खुजेपण आपल्यासमोर येतं. साऱ्या जगाने जिला आपली 'आई' मानलं तिच्याविषयी अधिक जाणून घेणं म्हणजे आपल्या आईकडेच नव्या नजरेनं पाहणं असंच नाही का? भागवतांसारख्या अनेकांना अशी नजर लाभो, ही असलेल्या-नसलेल्या देवाला प्रार्थना.
पूर्वप्रसिद्धी: मॅक्समहाराष्ट्र, २६ ऑगस्ट, २०१९


