2019 मध्ये व्हॅलेंटाईन डेचा दिवस होता. त्या दिवशी, मी आणि माझा चुलत भाऊ 'गली बॉय' हा चित्रपट पाहण्यासाठी जम्मूच्या वेव्ह मॉलमध्ये गेलो होतो. जम्मूपासून दूर पुलवामामध्ये भारतीय सैन्यावर हल्ला झाल्याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही चित्रपटगृहातून बाहेर पडल्यानंतर आम्हाला ही घटना समजली.
मी जम्मू शहरातील मुस्लिमबहुल भागात, गुज्जर नगरमध्ये भाड्याने राहत होतो. दुसर्या दिवशी, 15 फेब्रुवारी 2019 रोजी, सकाळी सकाळी बाहेरच्या विचित्र आवाजांनी माझी झोप उघडली. मी कॉलेजला जाण्यासाठी तयार व्हायला निघालो तेव्हा पाहिलं कि माझ्या मोबाईलवर माझ्या कुटुंबियांचे आणि हितचिंतकाचे जवळपास 50 कॉल येऊन गेले होते. मला आश्चर्यही वाटलं आणि काळजीही वाटली. माझ्या कुटुंबियांबद्दल मला चिंता वाटू लागली. मी घरी फोनवर बोललो तेव्हा तर आणखीनच चक्रावलो. एका काश्मिरी मुलाने भारताच्या निमलष्करी दलाच्या काफिल्यावर आत्मघातकी हल्ला केल्याचे न्यूज अँकर ओरडून ओरडून सांगत होते. या हल्ल्यात दुर्दैवाने आपले 40 जवान शहीद झाले होते. हे सर्वच दुखःद होत. कारण इस्लाम किंवा मानवता कोणालाही आत्मघाती हल्ला करण्यास परवानगी देत नाही. याहून वाईट गोष्ट म्हणजे टीव्हीवरचे न्यूज अँकर सामान्य काश्मिरींना दोष देत होते. आपल्या वातानुकुलित स्टुडियोतून त्यांनी छेडलेला विषय माझ्यावर थेट परिणाम करत होता. या घटनेनंतर अचानकपणे मी सर्वांचा शत्रू बनलो. माझ्यापासून दूर कुठे घडलेल्या कृत्यासाठी मलाच दोषी धरलं जात होत. खरं तर हे कुणी केलं?, का केलं? याची कुणालाही कल्पना नव्हती. जम्मू हे माझ्यासाठी दुसरं घर होतं. पण त्या दिवासानंतर अचानक मला, आपण कुणीतरी परके आहोत, अपराधी आहोत अस विनाकारण वाटायला लागलं. हे सगळं भारतातील न्यूज वाहिन्यांनी माझ्यासारख्या अनेकांवर लादलं होतं. एक काश्मिरी मुस्लीम असल्याकारणाने मला जम्मू सोडण्यास भाग पाडलं गेलं. त्यासाठी जनमाणसात वातावरणनिर्मिती करण्याचं काम अर्णब गोस्वामीच्या रिपब्लिक टीव्हीने केलं होतं.
या घटनेच्या दोन वर्षांनंतर, पुलवामा हल्ल्याविषयी टेलिव्हिजन रेटिंग एजन्सीचे तत्कालीन सीईओ पार्थो दासगुप्ता यांच्याशी अर्णबने केलेले चॅट सार्वजनिक झाले. हे चॅट वाचल्यावर माझे रक्त अक्षरशः उसळायला लागले.
मी आजवर हे ऐकलं होतं कि आपल्याकडे काही पत्रकार मेलेल्यांच्या टाळूवरचं लोणी खातात. इथे तर टीआरपीसाठी सैन्यातील जवानांच्या मृत्यूचा उपयोग केला गेला होता. या सगळ्याची कुणीही कल्पना देखील केली नव्हती. आपल्या चॅनलचा टीआरपी वाढला असल्याचे सांगताना 'हा हल्ला आपण वेड्यासारखा जिंकला आहे' (This attack we have won like crazy) असे अर्णबने दासगुप्ता यांना लिहिलं आहे.
घरच्यांशी फोनवर बोलल्यानंतर मी जेव्हा चित्र-विचित्र आवाज ऐकून बाहेर आलो तेव्हा प्रचंड गोंगाट होता. मी रहात असलेल्या गुज्जरनगरमध्ये एक जमाव घुसला होता आणि आरडाओरडा करत होता. काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी मी घराच्या छतावर गेलो तेव्हा काळ्या धुराने आकाश व्यापलं होत. काश्मीर खोऱ्यातील गाड्यांच्या नंबर प्लेट बघून त्या गाड्यांची तोडफोड केली जात होती आणि त्या गाड्या पेटवून दिल्या जात होत्या. दंगा करणारे हे सगळे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते होते. या जमावाने, आमच्या घरांवर, काचेच्या खिडक्यांवर दगडफेक केली. राष्ट्रवादाच्या नावाखाली काश्मिरी मुस्लिमांच्याबद्दल हिंदूंच्या मनात द्वेष निर्माण करण्यात अर्णबसारख्या पत्रकारांना यश आलं होतं.
मला आठवतंय, तो शुक्रवारचा दिवस होता. आम्ही एकमेकांच्या आधाराने नमाजसाठी मशिदीत गेलो. आम्हांला कळून चुकलं होतं कि कुणीही आमच्या मदतीला येणार नाही. आम्ही ईश्वराकडे दैवी मदतीसाठी याचना करत होतो. महिला देखील रडत-गागत मोठमोठ्याने ईश्वराकडे प्रार्थना करत होत्या. प्रार्थनेनंतर शेजारच्या वस्तीतील मुस्लीम बांधव देखील आमच्या मदतीला आले. सगळ्यांनी मिळून हिंसक जमावाला गुज्जरनगरच्या बाहेर काढलं आणि आमच्या वस्तीचं रक्षण केलं. अनेकांना यावेळी १९४७ साली झालेल्या हत्याकांडाची आठवण झाली. या हत्याकांडात अडीज लाख मुस्लीम नागरिक मारले गेले होते आणि शेकडो लोक विस्थापित झाले होते. या हत्याकांडानंतर जम्मूच लोकसंख्याशास्त्र बदललं आणि मुस्लीम अल्पसंख्याक बनले.
पण हे सगळ इथवर थांबलं नाही.
भारतातील टेलिव्हिजन अँकरांनी काश्मिरी नागरिकांना शत्रू म्हणून चित्रित करण्यात कुठलीही कसर सोडली नव्हती. आपले सगळे चॅनल केवळ टीआरपीसाठी लढले. आम्ही मात्र आमच्या जीवासाठी आणि गुज्जर नगरमधील महिलांवर होणाऱ्या संभाव्य हल्ल्याला आळा घालण्यासाठी लढा दिला. या हिंसक जमावामुळे आमच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.
खरं तर आम्ही टेलिव्हिजन स्टुडिओतून आमच्याविरूद्ध चालवलेल्या लढाईचा प्रतिकार करण्यासाठी जमलो होतो.दंगल घडवणारा जमाव हजारोंच्या संख्येने होता तर आम्ही केवळ शे-दीडशे लोक होतो. रोमन साम्राज्यात राजाच्या करमणुकीसाठी कुणा गरीब कारागिराची आणि बलाढ्य सैनिकाशी किंवा जनावराशी जीवघेणी कुस्ती लावली जात असे, आमचीही अवस्था अशीच काहीशी झाली होती.
या घटनेनंतर देशभरात ठिकठिकाणी काश्मिरी नागरिकांना धमकावण्यात आले, त्यांच्यावर हल्ले केले गेले. गाझियाबादच्या एसआरएम विद्यापीठात शिकत असलेल्या माझ्या एका मित्राला विद्यापीठ सोडावं लागलं. देशभरात काश्मिरी नागरिकांना त्रास दिला जाऊ लागला, त्यांना बळजबरीने 'भारत माता की जय' असा जयघोष करायला भाग पाडलं गेलं. देहरादूनमध्ये राहत असलेल्या एका मित्राला हिंदुत्ववादी जमावापासून वाचण्यासाठी आणि खालसा सहायता कार्यालयाकडे पोहोचण्यासाठी कपाळावर टिळा लावावा लागला. देहरादूनमध्येच अनेक महाविद्यालयीन अधिकाऱ्यांनी काश्मिरी विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडून जायला भाग पाडलं.आमच्या आणखी एका मित्राला हरयाणामध्ये जमावाने मारहाण केली. अशा घटना देशभरात घडत असताना गरज होती ती एकीची. लोक एकत्र येत होते खरे परंतु एकीसाठी नाही, तर आमच्यासारख्या अल्पसंख्याकांच्या विरुध्द!
अशा घटनांमध्ये वाढ होत असताना आम्ही जम्मू सोडण्याचा निर्णय घेतला. उधमपूरमध्ये एका मुस्लिम ड्रायव्हरला जिवंत जाळल्याची अफवा ऐकल्यावर आम्ही थांबलो. हे सगळ ऐकून आमचं अवसान गळाल. स्थानिकांनी दाखवलेल्या ऐक्यामुळे आम्हाला धीर आला होता आणि जम्मूच्या या मुस्लीम वस्तीतच राहण्याचा आम्ही निर्णय घेतला. लवकरच भारताच्या इतर भागांतूनही जीव मुठीत घेऊन काही काश्मिरी नागरिक येथे येऊ लागले.कालांतराने आम्ही जेव्हा पुन्हा निघण्याचा निर्णय घेतला,तेव्हा देखील आम्ही हिंमत करू शकलो नाही कारण घरी जाण्याच्या आमच्या रस्त्यात उधमपूर येणार होतं.आधीच तिथल्या बातम्या ऐकून आम्ही भयभीत होतो, म्हणून दहशतीच्या वातावरणात आम्ही जम्मूतच थांबलो.
काही दिवसांनी काश्मीरकडे जाणाऱ्या गाड्या, बसेस आणि खासगी वाहनांना मध्यरात्री जाण्याची परवानगी दिली गेली. कसेबसे आम्ही आमच्या घरी, काश्मीरला पोहोचलो. परंतु या जातीय दंग्यांनी आमच्यावर खोल परिणाम केला आहे. दोन वर्षानंतरही आमच्या मनातली दहशत काही कमी झालेली नाही. न्यूजरूममधून आमच्यावर केलेल्या हल्ल्यांमुळे आमचं संपूर्ण आयुष्याच बदललं. आमचे मित्र आमच्यापासून दुरावले गेले, अनेकांवर मानसिक परिणामही झाला. मी अजूनही स्वतःला विचारतो कि, जम्मूतल्या त्या हिंसेसाठी,मला तेथून पळून जाण्यासाठी, माझ्यासारख्या अनेकांना शत्रू म्हणून चित्रित करण्यासाठी कोण जबाबदार आहे? न्यूज अँकर की तो हिंदू जमाव? आमच्या दुःखाचा फायदा घेऊन नागरिकांमध्ये फुट पाडण्यासाठी मी अर्णबसारख्या न्यूज अँकरला दोष देतो. भारतातील प्रसारमाध्यमे केवळ लोकशाहीची दमछाक करूच शकत नाहीत तर हिंदू-मुस्लिम विभाजनासमवेत जनतेचे ध्रुवीकरण देखील करू शकतात हे आता स्पष्ट झाले आहे.माझ्यासाठी दुसरं घर असलेलं जम्मू आता मला आपलंसं वाटत नाही. मी हे जड मनाने सांगत आहे की जम्मूमध्ये मुस्लिम सुरक्षित नाहीत.
मूळ लेखक: मेहराज नियाज बाजदार
अनुवाद: सागर भालेराव


देशद्रोहीच आज उजळमाथ्याने वावरतात.सत्य समोर यईपर्यंत.
ReplyDelete