मानवाधिकाराचे उदगाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मानवाधिकाराचे  उदगाते  डॉ.बाबासाहेब आंबेडकर!

      जगात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही हक्क आणि अधिकार हे जन्मतः मिळत असतात तर काही हक्क आणि अधिकार हे तो कोणत्या देशात,कोणत्या भूमीवर आणि मुख्य म्हणजे कोणत्या सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर जन्माला आला या निकषावर मिळत असतात.१० डिसेंबर १९४८ साली संयुक्त राष्ट्रसंघाने मानवाधिकार संबंधी जागतिक स्तरावर एका नियमाची अंमलबजावणी केली.तेव्हापासून जगभरात मानवी हक्कांसाठीचा लढा अधिक वेगाने सुरु झाला. मानवी इतिहासात मानवाधिकारासाठी लढणारे अनेक महान  विभूती होऊन गेल्या, भगवान बुद्धापासून थोमस पेन पर्यंत , महात्मा फुल्यांपासून मार्टिन लुथर किंगपर्यंत आणि कार्ल मार्क्सपासून ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंतचा प्रवास हा मानवी हक्कसंघर्षाने भरलेला आणि भारलेला आहे.विषमतेच्या निबिड अरण्यात समतेची पायवाट निर्माण करत केवळ अस्पृश्यच नाही तर तमाम मानवी मुल्यांपासून वंचित असलेल्या  समाज घटकांना न्याय, ओळख, हक्क आणि अधिकार  मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आजीवन लढले.त्यांच्या पश्चात केवळ 'दलितांचे नेते 'हि बिरुदावली त्यांना लावली गेली आणि त्यांचे मानवी हक्कांसादर्भात असलेल्या कामाला आपण भारतीयांनी कुठेतरी नजरेआड केले आहे. बाबासाहेब आंबेडकर हे एका अस्पृश्य मानल्या गेलेल्या समाजासाठी  न्याय मिळवू पाहत होते, हे करताना त्यांनी इथल्या समाजव्यवस्थेला त्यांनी अक्षरशः हादरे दिले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेची चौकट निस्तेनाबूत करून समतेची हाक त्यांनी दिली.हजारो वर्षांच्या या परंपरेविरुध्द लढणे हा काही पोरखेळ नव्हता, कितीतरी पैलू ,कितीतरी  संदर्भ यांचा अभ्यास बाबासाहेबांना करावा लागला.बाबासाहेब जेव्हा परदेशात उच्च शिक्षणसाठी गेले  तेव्हा तिथे त्यांना जागतिक पातळीवर काय घटना घडत आहेत,याचे आकलन झाले.जागतिक पातळीवर जातीसंघर्ष नसला तरी वर्गसंघर्ष आहे हे वास्तव त्यांनी अनुभवलं. त्यांच्या या जाणीव आणि नेनिवातून आलेला परिपाक म्हणजे त्यांनी आजन्म स्वीकारलेले जातीअंताचे व्रत होते.
      बाबासाहेब हे इथल्या सामाजिक परिस्थितून घडले हे सांगताना ते जागतिकीकरणा मधूनही  घडेल हे आपल्याला मान्य करावे लागेल. त्यांचे कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण, लंडन स्कूल ऑफ इकोनोमीक्स मधील शिक्षण या सगळ्यांचा  प्रभाव त्यांच्या विचारावर पडलेला होता. कोलंबिया विद्यापीठात  वेगवेगळ्या वर्णाचे,जातीचे आणि परदेशातील विद्यार्थी बाबासाहेबांचे सहकारी होते.ज्या भारतात केवळ जातीच्या आधारे अस्पृश्य वर्गाला  शिक्षण नाकारले जात होते,तेथे असले जागतिक शिक्षण घेताना बाबासाहेब या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने पहात होते.त्यातूनच मानवी हक्कांसाठी आपली लढाई सुरु करावी असे बाबासाहेबांना जाणवले.पुढे त्यांनी भारतात आल्यावर सर्वहारा समाजासाठी काय काय कार्य केले हे आपणा सर्वांना ज्ञात आहे.आपल्या प्रत्येक आंदोलनात बाबासाहेबांनी  हे अधोरेखित केले आहे कि त्यांची लढाई हि स्वातंत्र्य ,बंधुता आणि समता प्रस्थापित करण्यासाठी आहे.इथली हिंदू संकृती जोवर वर्णाधारित समाजव्यवस्था नाकारत नाही आणि जन्माच्या आधारावर माणसाची ओळख आणि पत ठरवणे सोडत नाही तोवर हा संघर्ष अटळ आहे. चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह,मुखेडचा सत्याग्रह या संदर्भात बाबासाहेब व्यापक दृष्टीकोनातून बघतात.जे पाणी पिण्याचा सवर्णांना अधिकार आहे, ते पिण्याचा अधिकार अस्पृश्यांना का असू  नये? म्हणून ,निसर्गतः निर्माण होणाऱ्या पाण्यावरही इथल्या सवर्ण समाजाची मक्तेदारी बाबासाहेब खोडून काढतात.रस्त्यावरची लढाई लढलेले बाबासाहेब वैचारिक लढाईसुद्धा त्याच शक्तीनिशी लढलेले दिसतात. धर्माधारित मानवी संकृतीवर बाबासाहेब आपल्या लेखणीतून हल्ला चढवितात.'रिडल्स इन हिंदुजम' या पुस्तकातून त्यांनी धर्माचे थोतांड असलेल्या पुरांनकथांवर आक्षेप घेतला.जातीभेदाची बीजे रोवणाऱ्या वेदांवर त्यांनी कडाडून टीका केली.काळानुसार इथले धर्मग्रंथ आणि  जातीव्यवस्था बदलली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या संघर्षाबद्दल बोलताना गांधीजी म्हणतात कि, 'भारतीय संस्कृतीतील वेद हे भारतीय संस्कृतीची ओळख आहे, वेदांची मांडणी बदलणे , ते नाकारणे शक्य नाही. तेव्हा जे शास्रांना मानत नाहीत ते हिंदू असू शकत नाही.' बाबासाहेबांनी  इथल्या व्यवस्थेला सुधारण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला.परंतु आपला मेंदू गहन ठेवलेल्या इथल्या व्यवस्थेच्या डोक्यात प्रकाश पडत नाही हे जाणवल्यावर, पुढे हिंदुधर्मातील कर्मकांडाला, जातीव्यवस्थेला लाथाडत बाबासाहेबांनी  मानवी मूल्याची आणि समतेची शिकवण देणाऱ्या बौध्ह धम्माचा स्वीकार केला.आपल्या एका भाषणात बाबासाहेब नमूद करतात कि माझा विरोध हा हिंदू धर्माला नाही, तर हिंदू धर्मातील अमानवी मूल्यांना  आहे.जी संस्कृती आपल्याला माणूस म्हणून ओळख देत नसेल त्या संस्कृतीत राहणे निव्वळ मूर्खपणा आहे असे बाबासाहेब सांगतात.
अस्पृश्य वर्गाचे मानवी अधिकार स्पष्ट करताना बाबासाहेब समस्त महिला वर्गाच्या अधिकारासाठी लढले.भारताच्या इतिहासात सर्वात प्रथम डॉ. आंबेडकरांनी महिलांसाठी एक आशादायक व सकारात्मक पैलूंचा पाया घातला .यापूर्वीचा हिंदू वारसा हक्ककायदा १९५६, हिंदू विवाह कायदा १९५५ आणि  हिंदू लॉ, यांचे कायद्यातर रूपांतर होऊ शकले नाही. कारण समाजातील कट्टर हिंदू सनातन्यांनी या कायद्यांना प्रखर विरोध केला. हिंदू कोड बिलावर भारतीय इतिहासातील परंपरेचे सावट होते. संसदेत आणि संसदेच्या बाहेर या बिलाला प्रकर्षाने इथल्या सनातनी वृत्तीने विरोध केला. हिंदु कोड बीलात, स्त्रीचे संपत्तीचे अधिकार,संपत्तीच्या अधिकाराचे वारसांचे क्रम,निर्वाह, विवाह, घटस्फोट व दत्तक घेण्याचा अधिकार सज्ञान व पालकत्व इत्यादी स्त्रियांच्या अधिकरांचा समावेश आहे.डॉ. बाबासाहेबांनी हिंदू कोड बीला व्दारे विवाह घटस्फोट, वारसा हक्‍क, दत्तक कायदा स्त्रीच्या हक्कात प्रदान करून तिला तिचे मानवाधिकार प्रदान केले.
वर्णाधारित समाजव्यवस्थेचा बळी केवळ अस्पृश्य समाजच नाही तर संपूर्ण स्री जाती आहे असे बाबासाहेब म्हणतात.स्रियांसाठी आणि अस्पृश्य वर्गासाठी कायदे करणारी ब्राम्हणी व्यवस्था ही स्री आणि शूद्रांच्या अधःपतनाला जबाबदार आहे.(डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखाण आणि भाषण, खंड ९, पा.नं. २१५-२१६). मनुस्मृतीचे दहन करून बाबासाहेबांनी इथल्या महिलांना माणूस म्हणून नाकारणाऱ्या व्यवस्थेला आग लावली. भारतातील महिलांचे प्रश्न सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी प्रथम प्रकर्षाने मांडले आणि या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बाबासाहेबांनी संविधानाची कवचकुंडले देवून समस्त स्री जातीचा उद्धार केला आहे असे म्हटल्यास अजिबात वावगे  ठरणार नाही.
"मी हिंदू धर्मात जन्माला आलो, तरी हिंदू धर्मात मरणार नाही" या बाबासाहेबांच्या घोषणेनंतर संपूर्ण भारतात त्याचे पडसाद  उमटले,सावरकरांना मग सामाजिक समरसता यायला हवी असा साक्षात्कार झाला तेव्हा सवर्ण आणि अस्पृश्यांच्या जेवणावळया घालण्याचा अपयशी उपक्रम करण्यात आला.अशा जेवणावळया घालून जर अस्पृश्यता मिटली असती तर इतका संघर्ष करण्याची परिस्थिती आलीच नसती अशी खोचक टीका बाबासाहेबांनी सावरकरांवर केली होती. सावर्कारांप्रमाने कॉंग्रेसलाही आता अस्पृश्यांचा पुळका आला होता आणि त्यांनी अस्पृश्यता निवारण समिती स्थापन केली,त्याचे अध्यक्ष होते,ठक्कर बाप्पा. नोव्हेंबर १९३२ ला ठक्कर बाप्पा यांना लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब म्हणतात कि, 'अस्पृश्यांचा सामाजिक स्तर वाढावा  यासाठी प्रयत्न  झाले पाहिजे, त्यांचे नागरी हक्क त्यांना मिळावेत म्हणून आपल्या समितीने काम करावे. परंतु हिंदू धर्माच्या चौकटीत राहून हे काम करता येणार नाही हिंदू धर्मातील गुलामगिरी संपवायची असेल तर धर्माची चिकित्सा व्हायला हवी आणि ही जुलमी संस्कृतीही बदलायला हवी'.अस्पृश्यता म्हणजे मानवाचा मानवाप्रती असलेला अमानवी व्यवहार असे बाबासाहेब मनात होते. चिकित्सक पद्धतीने भारतीय सामाजिक परिस्थितीवर भाष्य  करणारे बाबासाहेब हे मानवी मुक्तीच्या इतिहासातील अपरिहार्य पात्र ठरले आहे.
    आधुनिक मानवी मूल्यांच्या संदर्भाने विचार केला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समस्त मानवजातीसाठी कल्याणकारी ठरतात.सामाजिक न्याय आणि लोकशाहीची मुल्ये त्यांच्या प्रत्येक आंदोलनात आणि संघर्षात स्पष्टपणे जाणवतात.त्यांच्या विचारधनात सोशितांच्या, सर्वहारा समाजाच्या, कामगारांच्या आणि स्रीवर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी सैद्धांतिक आणि क्रियाशील असा मार्ग सापडतो.त्यांच्या विचारांची कालसापेक्षता लक्षात घेता, आजच्या परिस्थितीतही त्यांचे विचार कसे सर्वसमावेशक आहेत याची खात्री पटते.त्यांच्या जीवनसंघर्षाला मानवी मुक्तीच्या परीक्षेपातून पाहिल्यास बाबासाहेबांचे "विश्वरूपदर्शन" झाल्यावाचून राहणार नाही.

इंजी. सागर भालेराव
पत्रकारिता विभाग, मुंबई विद्यापीठ,
मुंबई

1 comment: