मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है

१६ डिसेंबर २०१४ ची गोष्ट. पाकिस्तानातील पेशावरच्या सैनिकी शाळेत ७ बंदुकधारी शिरले. माणसांच्या वेषातली सैतान. अंधाधुंद गोळीबारात तब्बल १४१ लोकांचा त्यांनी जीव घेतला. पैकी १३२ लहान मुले होती. या निरागस मुलांचा गुन्हा काय होता? पाकिस्तानात जन्म घेतला हा काय गुन्हा ठरू शकतो? ज्या तालिबानी कट्टरपंथीयांनी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली त्यांचा धर्म आणि मारल्या गेलेल्या निरागस मुलांचा धर्म एकच होता.धर्माच्या नावावर ज्यांनी हे हत्याकांड घडवलं त्यांना मग नेमका धर्माचा कोणता अर्थ अभिप्रेत होता? धर्माची कोणती शिकवण त्यांनी आत्मसात केली होती? त्यांच्या या पाशवी पराक्रमाने कोणती  स्वर्गीय देवता खुश होणार होती? कोणता देव लहान मुलांचा बळी मागतो? कोणता धर्म अशा अमानवी कत्तली सांगतो?

असे अनेक प्रश्न या निमित्ताने उभे राहिले. जगभर याबद्दल चर्चा झाली,अजूनही होते आहे. सुन्न करणार, काळीज पिळवटून टाकणार हे हत्याकांड होत. जगभरातून याचा निषेध झाला. व्हायलाच हवा होता. कोणी मेणबत्ती लाऊन निषेध व्यक्त केला, कोणी चेहरे रंगवून, कोणी कविता लिहून, कोणी मोर्चे काढून या अमानवी घटनेचा निषेध केला. पैकी, एका उर्दू गीतकाराने लिहिलेलं गीत मोठ्या प्रमाणात युट्यूबवर चर्चिले गेले.मोठ्या प्रमाणत त्याला प्रसिद्धी मिळाली.
गाण्याचे बोल होते,

'मुझे मां उनसे बदला लेने जाना है, मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है'



काय ताकद आहे या गाण्यात.आपला शाळेतला मित्र अतिरेकी कारवाईत मारला गेला, त्याच्या मारेकऱ्याला शिक्षा द्यायला पाहिजे असा तो ठाम विश्वास आपल्या आईकडे व्यक्त करतो. बदला घेण्याची भावना त्याच्या मनात जरूर आहे, पण तो बदला पुन्हा स्फोट घडवून आणणारा, गोळ्यांनी लोकांचे मुडदे पडणारा नक्कीच नाही. हा लहानगा अभिनव पद्धतीने बदला घेण्याच्या तयारीत आहे. ज्या अतिरेक्यांनी आपल्या वर्गमित्रांना जीवे मारल, या अतिरेक्यांच्या मुलांना माणुसकीचे धडे शिकवण्याची इच्छा हा मुलगा जाहीर करतो. किती हे शहाणपण! जोपर्यंत संवादाची प्रक्रिया सुरु होणार नाही आणि मनातली कटुता जोवर निघणार नाही तोपर्यंत सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. पाकिस्तानचा नैसर्गिक शत्रू म्हणून भारताची ओळख आहे. दहशतवादी कारवायांचा बळी भारत देश देखील ठरलाय. दहशतवादी कारवायांच्या विरोधात संपूर्ण देश एकसंधपणे उभा राहिला. परंतु आता घरचेच लोक घर पोखरायला सुरुवात करत आहेत. सनातन संस्था हे त्याचे ज्वलंत उदाहरण.सनातनचा राष्ट्रवाद हा दुसरा तिसरा काहीही नसून, दहशतवादच आहे. पेशावरच्या हल्ल्यातील मारेकऱ्यांचा आणि मृत मुलांचा धर्म जसा एक होता, तसाच मडगाव स्फोटातील मृतांचा आणि सनातनच्या साधकांचा देखील धर्म एकच होता. किती ही साम्यस्थळे! कालपर्यंत ज्यांना कट्टरपंथी म्हणून नावे ठेवत होतो, त्यांच्याच वाटेवर आपण निघालो आहोत. ज्यापद्धतीने अफजलगुरु दहशतवादी झाला याचा अर्थ सगळे भारतीय मुस्लिम दहशतवादी आहेत असा होत नाही, त्याचपद्धतीने दादरीमध्ये मोहम्मद अखलाखला गोमांस खाण्याच्या संशयावरून काही कट्टर हिंदूंनी जीवे मारले म्हणून सगळा देश असहिष्णू ठरत नाही. मोजक्या लोकांच्या करंटेपणामुळे इतर लोकांना त्यांचा सामना करावा लागतो.त्यामागे राजकीय फायदे-तोटे असतात हे सर्वांना ज्ञात आहेच. एकानंतर एक अशा ३ परिवर्तनवादी चळवळीतल्या नायकांचा खून झाल्यावर भारतात काही दंगली घडल्या नाहीत. घडायलाही नकोत. त्यांच्या मारेकऱ्यांच्या मुलांना 'समतेच' गाण शिकवण्याचाच ध्यास इथल्या पुरोगामी चळवळीनी घेतला हे विशेष! कारण आपण संवादावर विश्वास ठेवतो,विचारांवर विश्वास ठेवतो, माणुसकीवर विश्वास ठेवतो. नाहीतर बंदुका आपल्यालाही चालवता येतात,पण आपण मार्ग स्वीकारलाय तो म्हणजे ,'मुझे दुश्मन के बच्चे को पढ़ाना है'.


एकदा निदा फाजली पाकिस्तानात एका मुशायराच्या कार्यक्रमाला गेले होते, तिथल्या पाकिस्तानी पत्रकारांनी त्यांना प्रश्न केला, कि भारतात मुस्लिमांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चालले आहेत, त्याबद्दल तुमचे मत काय? कवी मनाच्या निदांनी त्या पत्रकारांना एका नज्म मधून उत्तर दिले, त्यांचे हे उत्तर समकालीन परिस्थितीत देखील तेवढेच कालातीत आहे.

इन्सान में हैवान यहाँ भी है वहा भी
अल्लाह निगहबान यहाँ भी है वहा भी

खूखार दरिंदो के फकत नाम अलग है
शहरो में बयाबान यहाँ भी है वहा भी

रहमत कि कुदरत हो या भगवान कि मूरत
हर खेल का मैदान यहाँ भी है वहा भी

हिन्दू भी मजे में है, मुसलमा भी मजे
इंसान परेशान यहा भी है वहा भी

उठता है दिलो जान से धुवा दोनो तरफ ही
ये मीर का दीवान यहा भी है वहा भी
- निदा फाजली



No comments:

Post a Comment