फाई कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नव्हते आणि सफाईचा प्रश्न बिकट होत चालला होता. त्यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी गांधीजी स्वतः गेले. स्वतः हातात झाडू घेतला आणि शौचालयाची स्वच्छता केली. 'हरी आला रे, हरी आला, भंग्या घरी, हरी आला' असं म्हणतं कर्मचाऱ्यांनी संप मिटवला. गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाई केली. त्यांची नकल करणाऱ्या मोदींनी गांधीजींकडून काय आदर्श घेतला?
काल प्रधानमंत्री मोदींनी अलाहाबादमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले. यावेळी पाय धुतांना कॅमेऱ्याची साग्रसंगीत व्यवस्था पहायला मिळाली. आदरणीय पंतप्रधानांनी ५ सफाई कर्मचाऱ्यांचे कचऱ्यात न माखलेले पाय धुतले. याचा व्हिडियो, फोटो कालपासून सामाजिक माध्यमांवर इकडून-तिकडे आणि तिकडून -इकडे पाठवला जात आहे. एकाचा पाय धुवून झाला कि दुसरा लगेच आपले पाय पुढे करतो आहे. असं शक्यच नाही. कोण भला माणूस आपले पाय धुवून घेईल? आणि ते सुद्धा साक्षात प्रधानमंत्र्यांकडून?
आजकाल प्रधानमंत्र्यांची प्रत्येक गोष्ट राजकीय असते. त्यांचं बोलणं, वागणं, मुरडन, हसणं सगळंच राजकीय. पोलिटिकल स्टंट आहे हा. याप्रसंगी अनेक गोष्टी आठवतायेत. दोन वर्षांपूर्वी गुजरातच्या उना येथे ४ दलित तरुणांना बेदम मारहाण केली गेली. कारण होतं गोहत्येचा आरोप. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने लादलेलं काम ते करत होते. मेलेल्या जनावरांचं कातडं काढणं हे काम निश्चितच संघातले कार्यकर्ते, बजरंग दलाचे दहशतवादी करत नसतील. हे काम एका जातीवर लादलं गेलंय. या घटनेचा देशविदेशात विरोध होत असताना, निंदा होत असताना मोदीजी गप्प होते.सामाजिक माध्यमांवर या दलित युवकांना मारहाण करणारा व्हिडियो वायरल झाल्यावर अनेक जणांना ही घटना समजली. संसदेत काही खासदारांनी प्रश्न मांडल्यावर मीडियाने हा मुद्दा उचलून धरला. त्यानंतरही आपले प्रधानमंत्री गप्प होते. वर्णव्यवस्थेला त्यांनी दिलेलं हे मूक समर्थन होत. जेव्हा खूप टीका व्हायला लागली, आपल्या 'गुजरात मॉडेल'च नाव खराब व्हायला लागलं अशी उपरती आल्यावर त्यांनी मन मारून एका सभेत वक्तव्य केलं. त्यात ते म्हणाले कि गरीब दलितांना का मारता? मारायचं असेल तर मला मारा!
म्हणजे बघा, देशाचा प्रधानमंत्री त्या नालायक झुंडीला शासन द्यायची कारवाई न करता म्हणतो कि मारायचं असेल तर मला मारा!
आपल्या मूक संमतीसह इथल्या झुंडीने प्रत्येक स्वातंत्र्य उपभोगलं पाहिजे. निरागस दलितांना आणि मुसलमानांना ठेचलं पाहिजे ही सगळी व्यवस्था त्यांनी करून ठेवली आहे.
दुसरा प्रसंगही असाच. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जन्मवर्षात हा घडला. कर्नाटकातील बेजवाडा विल्सन हा माणूस सफाई कामगारांचा लॉंग मार्च घेऊन दिल्लीच्या दिशेने निघाला. हे बेजवाडा विल्सन मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत. सफाई कर्मचारी आंदोलन नावाने ते सफाई कर्मचाऱ्यांची संघटना चालवतात. त्यांची मागणी ही होती कि आजही भारतात डोक्यावरून मानवी मैला वाहून न्यायची प्रथा आहे. अर्थातच दलित समुदाय हे कामे करतो. या कर्मचाऱ्यांची मागणी अशी आहे कि आम्हाला सफाईयंत्रे उपलब्ध करून द्यावीत. डोक्यावरून मैला वाहून न्यायाचा आणि साफसफाई करायची ही पद्धतच अमानवीय आहे. कुठलाही भला माणूस याला अमानवीय म्हणेल. दिल्लीत या सफाई कर्मचाऱ्यांचा मोर्चा जेव्हा पोहोचला तेव्हा मोदीजींनी त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. तेव्हा त्यांचे पाय धुवून त्यांच्या कुठल्याही समस्या सुटणार नाहीत. त्यांचे आयुष्यमान वाढणार नाही. त्यांना किमान वेतन मिळणार नाही. अगोदरच साफ असलेले पाय धुवून तर नाहीच नाही.
वर्ध्यात गांधीजी असताना सफाई कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होते, संप केला होता. त्या संपकाऱ्यांना भेटायला गांधी गेले होते. त्याकाळी या दलितांचं नेतृत्व निर्विवादपणे डॉ. आंबेडकरांकडे होतं. सफाई कर्मचारी संप मागे घ्यायला तयार नव्हते आणि सफाईचा प्रश्न बिकट होत चालला होता. त्यावेळी त्यांची समजूत घालण्यासाठी गांधीजी स्वतः गेले. स्वतः हातात झाडू घेतला आणि शौचालयाची स्वच्छता केली. 'हरी आला रे, हरी आला, भंग्या घरी, हरी आला' असं म्हणतं कर्मचाऱ्यांनी संप मिटवला. गांधींनी स्वतः हातात झाडू घेऊन सफाई केली. त्यांची नकल करणाऱ्या मोदींनी गांधीजींकडून काय आदर्श घेतला?
मीरा-भायंदर मध्ये ३ सफाई कर्मचारी गटारीत उतरली आणि त्यातच विषारी गॅसमुळे गुदमरून मेली. दिल्लीतही अशीच घटना घडली. हे ऐकून कुणाचीही तळपायाची आग मस्तकाला जाईल. पण मरणारे साधेसुधे सफाई कर्मचारी होते. त्यांच्या मरणाने आपल्याला काय दुःख होणार होत? काय नुकसान होणार होत? निश्चितच काहीच नाही. घडल्या प्रसंगावर मोदीजींनी अथवा त्यांच्या कुठल्याही मंत्र्याने निषेध नोंदविल्याचे पाहण्यात नाही. सफाई कर्मचाऱ्यांवरचं हे प्रेम निश्चितच पुतना मावशीच आहे.कपटी आहे. स्वच्छ भारत अभियानातही अशीच चमकोगिरी केली गेली. सॅनिटायझर घेऊन स्मृती इराणी अगोदरच साफ असलेला रस्ता झाडायला निघालेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. तेव्हा उघड आहे कि हा राजकीय स्टंट आहे, त्यातून जास्तीत जास्त लाईक, शेयर आणि कॉमेंट मिळू शकती. सहानुभूती तर नाहीच नाही.


No comments:
Post a Comment