मतपेटी, तुरुंग
आणि फावडं
पुढच्या काळात आपल्याला जो सत्याग्रह करायचा आहे त्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे.संघर्षाच्या अत्युच्च काळातही गांधीजी आश्रमात जात असत. तसेच, गांधींनी तुरुंगात जाण्यासाठीही कधी नाही म्हटले नाही. गांधीजींचा सत्याग्रह, गांधींच जेलमध्ये जाणं याचा विसर पडता कामा नये. आज ती वेळ आलेली आहे . सर्वोच्च न्यायालयात आज आपले प्रशांत भूषण यांच्यासमोर जो प्रसंग आलेला आहे त्याबद्दल बोलूया. त्यांना आज आरोपीच्या पिंजर्यात उभे केले गेले आहे आणि त्यांना सांगितले गेले आहे की तुम्हाला उद्या शिक्षा होणार आहे. मी वाट पाहतो आहे की काय निर्णय होतो आहे. न्यायालय स्वतः सांगत आहे कि तडजोड करा पण प्रशांत भूषण हे तडजोड करणार नाही हे उघड आहे. या माणसाला बहुतेक जेलमध्ये जावं लागेल आणि मला असं वाटतं की हा आनंदाचा क्षण असेल, ही खरी कसोटी असेल. आता तुम्ही जो महाराष्ट्र सोशल फोरम सुरु केला आहे, त्याच्या पाठीमागचा इतिहास मात्र विसरू नका. महाराष्ट्रात विषमता निर्मूलन समितीची शिबिरे दरवर्षी होत असत. या शिबिरांच्या व्यासपीठावर इथे उपस्थित असलेले कार्यकर्ते, आपले प्रश्न मांडत होते. मी त्या इतिहासात फारसा जात नाही. मला असं वाटतं की आपण जर पुढे चालत असू तर भूतकाळात जास्त रमू नये. आता या संपूर्ण चर्चेत असंघटित मजुरांचा प्रश्न पुढे , लॉकडाऊन काळात कामगारांचे लोंढेच्या लोंढे रस्त्यावरती चालत होते. हे चित्र संपूर्ण दुनियेने पाहिलं. मला सेवादलाच्या मंडळींना आठवण करून द्यायची आहे ,आपण एक फोटो नेहमी लावत आलो आहोत. ज्यात कोणता मार्ग सांगितला? मतपेटी, तुरुंग आणि फावडं !
मतपेटीचं काय झालं हे आपण सगळे पाहतो आहोत. फावड्याचं काय झालं हे देखील तुम्हाला माहिती आहे. तुरुंगाबद्दल जर बोलायचं झालं तर असं दिसतं, एक अशी वेळ आली आहे जिथे शिक्षण आणि आरक्षणाच्या माध्यमातून जो मध्यमवर्ग तयार झाला तो मध्यमवर्ग सत्याग्रहाला नकार देतो. त्याला असं वाटतं की तुरुंगात गेल्याने माझ्या संबंध चरित्रावर त्याचा प्रभाव पडेल आणि मला गुन्हेगार म्हणून घोषित केलं जाईल. त्यामुळे होत काय कि मध्यमवर्गातील काही माणसं यात उतरत नाहीत. मी आमच्या रविशबाबूंना एक विनंती करणार आहे. रवीशजी वय वाढलं म्हणून सत्याग्रह करू शकत नाही असे नाही! सत्याग्रहाला कुठे वयाची अट आहे? माझं म्हणणं आहे की की माझ्या सकट, आपल्या समाजातील वयस्कर मंडळींनी देखील रस्त्यावर उतरून कायदेभंग केला पाहिजे. यात कुणाला शिवी द्यायची नाही, कुणावर हिंसा करायची नाही. आमच्या काळात रचनात्मक संघर्ष हा शब्द होता. त्यावेळी आमच्या अनेक चर्चा चालायच्या. ज्या वेळेला प्रकल्पग्रस्तांच्या धरणाखाली जमिनी गेल्या, अगदी कुलाब्यापासून जिथे उद्योगधंदे उभे राहिले. अशा लोकांच्या जमिनी गेल्यावर आंदोलने उभी राहिली. त्यावेळी काही राज्यकर्ते असे होते की त्यांनी उत्तर दिलं, यज्ञात काही बळी द्यावेच लागतात!
यावर एस एम जोशी ताडकन म्हणाले, काय बोलत आहात तुम्ही? याप्रसंगी एस एम जोशी जे काही म्हणाले ते मला मुद्दाम तुम्हाला सांगायचे आहे.वसंतराव नाईकांना एस एम म्हणाले, तुम्ही राज्यघटनेने सांगितलेला लोकशाही समाजवाद मान्य केला आहे ना? तुम्ही समाजवादी आहात की नाही? जुन्या संपत्तीचा फेरवाटप तर सोडा पण देशात जेव्हा केव्हा नवीन संपत्ती निर्माण होते, धरणं बनतात, सार्वजनिक खर्चाने बनणाऱ्या या मालमत्तेत या विस्थापितांना, धरणग्रस्तांना काही देणार आहात की नाही? जे लोक धरणाचं पाणी वापरणार आहेत त्यांना सांगा की, आपल्या बुडणाऱ्या भावासाठी जमिनीचा तुकडा द्या म्हणून! त्यासाठी कायदा करा. हे उदाहरण तुम्हाला मी यासाठी सांगतो आहे की 'रचनात्मक संघर्षाला' यश आलं आणि तो कायदा अस्तित्वात आला. आज महाराष्ट्रातील मनरेगा सर्व देशभरात पोहोचला आहे. पुनर्वसनाचा कायदा झालेला आहे. यानिमित्ताने रचनात्मक संघर्षाचे काही किस्से, काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे. सोबतच सेवा दलाच्या मंडळींना मला सांगायचं आहे की, जसा तुरुंग, फावड आणि मतपेटी याबद्दल मी तुम्हाला सांगितल, तसेच रविशकुमार म्हणतात तसे मीडियाच्या बाजूने नाही तर जनतेच्या बाजूने आणि जनतेत जाऊन आपल्याला बोलावे लागेल. आपण काय सूत्र अवलंबले होते? संपर्क, संवाद, प्रबोधन, रचना आणि संघर्ष. यात कुठलीही हिंसा नाही. आज आपण एकमेकांशी संपर्क ठेवला पाहिजे.मी महाराष्ट्रभर फिरलो. सीमाभागात जेव्हा गेलो तेव्हा तिथे नंदीबैलवाले भेटले, रोजगार हमी योजनेच्या कामावर अशी लोक भेटली ज्यांनी मला भाषा शिकवली, ज्यांनी मला गाणी शिकवली, ज्यांनी मला म्हणी शिकवल्या.अशी काही माणसं भेटली ज्यांनी समाजाची वेगळी भाषा मला शिकवली.अशीच एक महिला मला बोलता बोलता म्हणाली, 'माणसाला नुसतं पोट नसतं, इज्जतही असते'. माणूस एक वेळेस पोटावर मारेल पण इज्जतीच्या प्रश्नावर तो गप्प राहणार नाही. आज सुद्धा आपण संघटित मजुरांबद्दल बोलतो आहोत, पण बांधवांनो हे मजूर का सहन करतात? त्यांच्या मेंदूत हे लिहून ठेवले आहे की तुझ्या कर्मातच ते होतं. मजुरांच होणार शोषण खोडण्यासाठी आपल भांडण आहे. मनुस्मृतीच्या विरोधात आपलं भांडण आहे. जे मोहन भागवत आजसुद्धा राम मंदिराच्या भूमीपूजनाच्या वेळेस मनुस्मृति गाऊन दाखवतात ती मनुस्मृति बाबासाहेबांनी जाळलेली आहे.या मनुस्मृतीच्या निर्मात्याचा, मनूचापुतळा पाडण्यासाठी आम्ही लॉंगमार्च काढला होता. इथे सेवादलासारख्या संस्थेमुळे किंवा तुम्ही जो फोरम निर्माण केला आहे त्यामुळे, तुमची वैचारिक बैठक पक्की झाली आहे असं समजायचं कारण नाही. वैचारिक जडणघडण सर्व समाजाची झाली पाहिजे आणि म्हणून मग काय करायचं ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला संविधान वाचवायचा आहे ना? मग एक गोष्ट लक्षात असू द्या की आता सत्तेत असलेले सरकार हे संविधान ठेवणार नाही. त्यांनी संविधानाची तोडफोड सुरू केली आहे. त्यांनी 'समाजवाद' 'सेक्युलर' हा शब्द काढून टाकलेला आहे. याबद्दल काय करणार आहोत आपण? दुसऱ्या बाजूल आर्थिक विषमतेचे संकट आहे. मगाशी इथे साडेतीन टक्के वाली बात केली गेली.लॉकडाऊनमध्ये जेव्हा रस्त्यावर आपले मजूर बांधव चालत होते तेव्हा आपल्याला काय दिसलं? आपल्याला तीच विषमता दिसली. कुणाचं शोषण चालू आहे हे आपल्याला माहिती आहे. या देशाची संपत्ती आमच्या शोषणातून निर्माण झाली आहे. याबाबत मला सांगायचं आहे की आर्थिक धोरणाच्या बाबतीत काँग्रेस काय, भाजप काय किंवा राष्ट्रवादी काय यांचे मतभेद नाहीत. या मंडळींनी मुक्त अर्थव्यवस्थेचा सिद्धांत स्वीकारलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्या पप्रश्नांना बगल देण्यासाठी मग नको ते मुद्दे पुढे आणले जातात. मला डॉ. गणेश देवींना एवढच सांगायचं आहे की सेवादलाचे अध्यक्ष या नात्याने तुम्ही खूप छान काम सुरू केले आहे. कपिल पाटील यांना देखील मी सांगू इच्छितो की आता जी कोंडी आपल्यासमोर आहे ती फोडावी लागेल. मुखी रामाचे नाव घेऊन हे लोक राजकारण करत आहे, गांधीजी देखील शेवटी म्हणाले होते ना हे राम! गांधीजींची तत्वे, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांचे स्री उद्धारक कार्य आणि डॉ. आंबेडकरांनी दिलेला मताचा अधिकार याबद्दल आपण सतत बोललं पाहिजे.या सर्व महापुरुषांचे विचार समाजातील शेवटच्या घटकापर्यंत नेले पाहिजे. शिवाजी महाराजांबद्दल शिकवताना आपण काय शिकवतो? शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला असं नाटकीय रुपात विद्यार्थ्यांना दाखवलं जातं. माझ्या बांधवांनो आपल्याला नवीन मूल्ये रुजवायची आहेत. त्यासाठी आपले माध्यम असेल आपले विधायक काम.आपल्याला आपली राज्यघटना जिवंत ठेवायची असेल तर घटनेतील मूल्ये अगोदर रुजवावी लागतील. अनेक लोकांना घटनेच्या शब्दावली देखील माहित नाही. लोकांना जेव्हा मी विचारतो की रामाला वनवासाची शिक्षा का झाली? रामाने असा कोणता अपराध केला होता? लोक उत्तर देतात की माहीत नाही. ते सांगतात की रामाच्या सावत्र आईने त्यांना घरातून घालवलं. यावर मी विचारतो की जे झालं ते योग्य झालं की अयोग्य? लोक म्हणतात, जे घडलं ते चुकीचं होतं. याचा अर्थ योग्य काय आणि अयोग्य काय हे लोकांना समजत. यासाठी आपल्याला लोकांशी बोलावं लागेल आणि नुसतं
शिक्षित कामगारांना नाही तर अशिक्षित कामगारांना देखील समजून घ्यावे लागेल. त्यांच्या विचारांना देखील समजून घ्यावे लागेल. त्यांच्यात संविधानातला नवा विचार रुजवला पाहिजे आणि संविधानच त्यांची पोथी बनली पाहिजे. रोजच्या जीवना तर आपण कायम समतेची गाणी म्हणतो, कार्यक्रमात संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करतो, शाहू फुलेंनी सांगितलेली प्रार्थना घेतो. परंतु महात्मा फुल्यांनी सांगीतलेली प्रार्थना अभ्यासक्रमात कुठे आहे?
“सत्य सर्वांचे आदि घर, सर्व धर्मांचे माहेर।
जगामाजी सुख सारे, खास सत्याची पोरे।।”
सत्याचे माहेर आणि जगामाजी सुख लोकांना समजावून सांगणारे महात्मा फुले आपल्याला घराघरात पोहोचवावे लागतील.
क्रांती जिंदाबाद रहेगी क्रांती जिंदाबाद , मरणाच्या दारात घातली तुम्ही आम्हाला साथ!
हे क्रांतीचक्र सदैव चालू ठेवत रहावे लागते. आज आपल्या हातात मोबाईल आला. हे नवीन तंत्रज्ञान आहे. परंतु विज्ञान कधी समाजवादाचा विचार करत नाही.विज्ञानाला मूल्ये असतात आपल्या संबंध माणुसकीला बांधून ठेवणारी मूल्ये जपायची आहेत.डॉ. देवींना मी हेच सांगेल की, तुम्ही जे काम करत आहात त्याबद्दल मी ऐकतोच आहे.तुम्ही देशभरात सगळ्या लोकांशी बोला. वयाचा विचार न करता सत्याग्रहात उतरण्यासाठी उत्सुक असलेल्या नागरिकांना एकत्र करा. सत्याग्रह करण्याची तयारी सुरू करा.

No comments:
Post a Comment