या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनाविषयी एक गोष्ट मात्र निश्चित झाली आहे कि जेव्हा जेव्हा हे आंदोलन क्षीण झालंय असं बोललं जात, आंदोलनाला ब्रेक लागला अशी चर्चा होते तेव्हा हे आंदोलन अधिक जोमाने आणि उत्स्फुतपणे जोर धरते. आतापर्यंत अनेक टीकाकारांना या आंदोलनाला दुषणे लावली. शांततेच्या मार्गाने होत असलेले हे आंदोलन आता चौथ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. या अगोदर तीन वेळा टीकाकारांची तोंडे आंदोलनकारी शेतकऱ्यांनी बंद केलेली आहेत.
या अर्थाने या शेतकरी आंदोलनाचे पात्र हनुमानासारखे आहे. हनुमानासारखी त्याची शक्ती अमर्याद आहे. तो समुद्र पार करू शकतो, डोंगर उचलू शकतो, आणि आपल्या शत्रूचा नाशही करू शकतो.
परंतु हनुमानाप्रमाणेच शेतकर्यालाही त्याची शक्ती कळत नाही. जर त्याला योग्य दिशा देणारा मर्यादा पुरुषोत्तम राम सापडला तर लक्ष्य गाठण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही. हनुमानाची भक्ती जशी वैष्णव, शैव, शाक्य पंथांच्याही वर आहे, तशी किसान चळवळ ही कुठल्याही राजकीय पक्षाच्या ध्वजाच्या पलीकडेही आहे. हनुमानाप्रमाणेच शेतकरी आंदोलनही चिरंजीवी आहे. पहिल्यांदाच, नोव्हेंबर महिन्यात या आंदोलनाने टीकाकारांचे तोंड बंद केले.
पहिल्या टप्प्यात पंजाबमध्ये अभूतपूर्व जनजागृती व आंदोलन झाले. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने 9 ऑगस्ट,25 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबरला या तीन कायद्याविरोधात राष्ट्रीय कार्यक्रम आयोजित केले होते. तोपर्यंत असे म्हटले जात होते की हे आंदोलन केवळ पंजाब पुरते मर्यादित आहे. काही समीक्षक असेही म्हणू लागले होते की पंजाबात सुरु झालेले हे आंदोलन तिथेच शमेल. अशा परिस्थितीत, 26 नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली ' असा पुकारा देत शेतकरी दिल्लीला पोहोचले आणि आंदोलनाने अभूतपूर्व यश मिळवलं.
पंजाबमध्ये सुरु झालेल्या या आंदोलनाने, चळवळीने दिल्लीला वेढा घातला. आता हरियाणा मधले शेतकरी बांधव देखील या आंदोलनात सामील झाले आहेत. शेतकरी चळवळ ही आता राष्ट्रीय चळवळ बनली आहे. दुसर्या टप्प्यात दिल्लीत पोहोचलेले हे शेतकरी आंदोलन 5-7 दिवसही टिकणार नाही असा काही समीक्षकांनी कयास लावला होता.याच टप्प्यात उन, वारा, पाऊस यांची कुठलीही पर्वा न करता शेतकरी खंबीरपणे उभे राहिले. शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून रोखलं गेलं.
ऐतिहासिक 'किसान परेड'ने शेतकरी आंदोलन जगभरात पोहचवले. सिंघू, टिकरी, गाझीपूर आणि शाहजहांपूरचे आंदोलन देशभरातील शेतकर्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले. किसान आंदोलनाने हनुमानाच्या चिरंजीवी शक्तीची प्रचीती परत दिली जेव्हा लाल किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर शेतकऱ्यांना आणि त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा आणि चिरडण्याचा प्रयत्नही केला गेला.
सर्वात अगोदर माध्यमांना हाताशी धरून शेतकरी आंदोलनाला बदनाम केले गेले. पोलिसांच्या उपस्थितीत स्वतःला 'स्थानिक' म्हणवून घेणारे गुंड आंदोलकांवर हल्ला करू लागले. हे अगल बघून सत्ताधार्यांना वाटले कि रातोरात हे आंदोलन संपेल. गोदी मिडीयाने तर हे आंदोलन संपल्याचे जाहीर देखील केले. परंतु गाजीपूरच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाने चित्र पालटून टाकले. राकेश टिकैत यांचे अश्रू शेतकऱ्यांच्या अपमानाचे प्रतिक बनले आणि दिल्लीच्या आसपास असलेले शेतकरी बांधव आंदोलनस्थळी पोहचू लागले.यावेळी उत्स्फूर्तपणे शेतकरी महापंचायतींचे आयोजन केले गेले. आंदोलनाचा आवाज.दाबण्याऐवजी हा आवज सर्वदूर पोहोचल. उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब आणि हरियाणासह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात शेतकरी महापंचायतींची प्रक्रिया आजही सुरू आहे.
आता ही शेतकऱ्यांची ऐतिहासिक चळवळ चौथ्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. आता पुन्हा एकदा मोर्चांमधील शेतकर्यांची संख्या कमी झाली आहे, समर्थन ओसरत आहे असा दावा सरकार करत आहे. सरकारचे निर्दयी वागणे हीच सरकारची ताकद आहे अस चित्र उभ केल जात आहे. 'मोदी झुकणार नाहीत' आणि शेतकऱ्यांना रिकाम्या हाती परतावे लागेल असे टीकाकार म्हणत आहेत. परंतु संयुक्त किसान मोर्चाच्या नेतृत्वात सुरु असलेली ही ऐतिहासिक चळवळ आगामी काळात पुन्हा एकदा शिखर गाठेल, हा आम्हां सगळ्यांना विश्वास आहे.
आधी शेतकरी चळवळीचे रणांगण उत्तर भारत होते परंतु दिवसेंदिवस दक्षिण व पूर्व भारतामध्येही हे आंदोलन पसरत चालले आहे.शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी आणि या मागणीला कायद्याचं संरक्षण मिळाव अशी आम्ही मागणी करत आहोत. तसेच अध्यादेश आणून लागू केलेले 3 कायदे रद्द करण्याची मागणी जोरदारपणे येणाऱ्या काळातही मांडली जाईल. मतदानासाठी आकड्यांची जुळवाजुळव करणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्या सामर्थ्याला दुखावण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना शेतकरी योग्य धडा शिकवतील.
केवळ हे सरकारच नाही, तर भविष्यातील कोणतेही सरकार या तिन्ही किंवा त्यांच्यासारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करण्याची हिंमत करणार नाही. सत्य हे आहे की ही शेतकरी चळवळ आता या तीन कायद्याच्या पलीकडे गेली आहे. आता ही चळवळ शेतकऱ्यांच्या अस्तित्वाची आणि सन्मानाची चळवळ बनली आहे. खर तर हा संघर्ष केवळ या सरकारच्या विरोधात नाही. शेतकरी विरुध्द सत्ताधारी असा हा संघर्ष आहे. सत्ताधाऱ्यांनी याचा चांगलाच अनुभव घेतला आहे. शेतकऱ्यांच्या वाटेला गेलेलं सत्ताधाऱ्यांना महागात पडणार आहे.
मूळ लेखक: योगेंद्र यादव
अनुवाद: सागर भालेराव


No comments:
Post a Comment