ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांचा उचित सन्मान.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुल्यांचा उचित  सन्मान.             
              
    पुणे शहर म्हणजे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाचं सांस्कृतिक वैभव! आजवरच्या प्रत्येक शैक्षणिक चळवळीत,परिवर्तनवादी चळवळीत हे शहर पुढारलेलं आहे."विद्येच माहेरघर" असलेल्या पुण्याने जगभरात आपली ओळख आणि परंपरा निर्माण केलेली आहे.संपूर्ण भारतातूनच काय पण जगातून अनेक विद्यार्थी येथे ज्ञानार्जनासाठी येत असतात.उत्तम शैक्षणिक वातावरण,नावाजलेली शिक्षण संस्था,प्रगल्भ सांस्कृतिक वातावरण यामुळे अनेक विद्यार्थी या विद्याभूमिकडे आकर्षित होत असतात."पुणे विद्यापीठ" हि या सर्व कारणांची मातृसंस्था.१९४८ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाने आजवर अनेक नामांकित व्यक्ती जगाला दिले आहेत,ज्यांनी पुढे जाऊन जग घडविण्यात मोलाची  कामगिरी केली आहे.अशा या विद्यापीठाचा येत्या काळात नामविस्तार होणार आहे.काल झालेल्या सिनेट सदस्यांच्या बैठकीत विद्यापीठाचा "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ" असा नामविस्तार व्हावा असा निर्णय झाला आहे,आणि या मागणीचा प्रस्ताव राज्यशासनाकडे पाठविण्यात आलेला आहे.

   "कर्मठ" पुण्याची "सांस्कृतिक" पुणे ओळख निर्माण करण्यासाठी महात्मा फुल्यांनी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नांत सावित्रीबाई खंबीरपणे  ज्योतीबांच्या मागे उभ्या राहिल्या.ज्या समाजात स्रियांना ज्ञानार्जनबंदी होती,त्या समाजाच्या विरोधात उभे राहून परिवर्तनाचा एल्गार पुकारणारे हे दाम्पत्य खऱ्या अर्थाने या देशाचे कोहिनूर ठरले.चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये स्रियांना पंचम वर्ग म्हणून मान्यता होती,अस्पृश्यांपेक्षा कठोर वागणूक या स्रिवर्गाला    भोगावी लागली आहे,दास्यपणाची,गुलामगिरीची जाणीव शिक्षणाशिवाय रुजू घालू शकत नाही हे महात्मा फुल्यांनी ओळखलं आणि स्री शिकली कि समाज शिकेल आणि कर्मठ प्रथा बंद होतील हे जाणून त्यांनी आपल्या पत्नीला,म्हणजेच सावित्रीबाईंना  शिक्षण दिलं. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पण बंधनांचा अर्थच ज्या वयात कळत नाही, त्या वयापासूनच त्यांनी आपल्या कार्याला त्यांच्याही नकळत सुरुवात केली १८५१ साली पुण्यातच स्रियांसाठी भिडे वाड्यात त्यांनी सुरु केलेली मुलींसाठीची   शाळा त्यांच्या दूरदृष्टीची आजही साक्ष देत आहे.

"विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले" 

 हे सत्य स्वीकारत त्यांनी दलितोद्धारासाठी आजन्म कार्य केले.सत्यशोधक समाज मध्ये असलेल सावित्रीबाईच योगदान देखील वादातीत असंच आहे.'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.आणि महात्मा फुल्यांच्या पाठीवर हे काम सावित्रीबाईनी अविचलपणे पेललं.
  ज्या काळात धर्मरुढीचा,धर्मवेड्या लोकांचा समाजावर पगडा होता,त्या काळात समाजाच्या विरुद्ध जाऊन सामाजिक सुदृढतेसाठी फुले दाम्पत्यांने केलेला हा प्रयोग नक्कीच प्रसंशनीय आहे.आज महिलांच्या बाबतीत जर बोलायचं झालं,तर आज आकाशाला गवसणी घालणाऱ्या,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,खेळ अशा सगळ्या क्षेत्रात ज्या महिला दिसत आहेत त्या सावित्रीबाईच्या ऋणी आहेत.काल जर त्यांनी स्रिशिक्षणाची मुहूर्तमेढ रचली नसती तर महिला सक्षमीकारणाचा पायंडा पडलाच नसता.बालविवाहाला विरोध करणाऱ्या सावित्रीबाई,बलात्कारामुळे गरोदर असलेल्या बाईच बाळंतपण करणारी सावित्रीबाई,पोटापाण्यासाठी शरीरविक्री करणाऱ्या माय-माउलीला दृष्टांच्या तावडीतून सोडून आणणारी सावित्रीबाई आणि प्लेगच्या साथीमध्ये रुग्णांना आईच्या मायेप्रमाणे सुश्रुषा करणाऱ्या सावित्रीबाई आज देखील एक अद्भुत रसायन वाटतात.  त्यामुळे पुणे विद्यापीठाच्या नामांतरामुळे सावित्रीबाई फुलेंच्या स्मृतीस नक्कीच न्याय मिळणार आहे.त्यांच्या कर्मभूमीत असलेल्या या विद्यापीठाला एक आणखी एक नवी ओळख मिळेल,आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या कार्याचा महिमा हा विद्यापीठ रूपाने सर्वांच्या नजरेत राहणार आहे.सध्या सिनेटचा हा निर्णय राज्य शासनाकडे विचाराधीन आहे,येणाऱ्या काळात शासन किती लवकर निर्णय घेतो हे पाहण्याजोगे असेल.मराठवाडा नामांतराप्रसंगी झालेला संघर्ष आजूनही पुरोगामी चळवळीतील लोकांच्या मनात भळभळत आहे,१४ वर्षांच्या रक्तरंजित संघर्षानंतर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार केला गेला,या वेळी मात्र असा प्रकार घडू नये आणि हि सुयोग्य मागणी मायबाप  सरकारने मान्य करावी अशी इच्छा विद्यापीठातील विद्यार्थी,प्राध्यापक आणि सगळेच कर्मचारी व्यक्त करीत आहेत.गेल्या ७-८ वर्षापासून काही संघटना पुणे विद्यापीठाचे नामांतर व्हावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करीत होत्या.सोशल मिडीयावर या मागणीला पाठींबा देणारे पेज देखील बनविण्यात आले होते,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या मागणीला पाठींबा मिळविण्याचा उत्कृष्ट प्रयोग या प्रकरणामध्ये करण्यात आल्याचे आढळते.पुणे विद्यापीठ नामविस्तारला कुणाची हरकत असेल असे चित्र सध्या तरी दिसत नाहीये.परंतु भविष्यात काही समाजविघातक शक्तींकडून याला विरोध होऊ शकतो.याच सुसंस्कृत पुण्यात गेल्या महिन्यात ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र दाभोळकरांची हत्या करण्यात आली.धर्मांध शक्तीकडे पुणे परत तर वळले जात नाही ना? अशा प्रकारच्या चर्चांना उधान आले आहे.या पार्श्वभूमीवर आपल्या एकजुटीचे प्रदर्शन दाखऊन महाराष्ट्राची सुद्न्य जनता,पुरोगामी विचारांशी प्रामाणिक राहील अशी ग्वाही द्यायला हवी. सावित्रीबाई फुल्यांना आणि महात्मा फुल्यांना अभिप्रेत असलेला  पुरोगामी महाराष्ट्र घडविण्याचा प्रयत्न सुद्न्य जनता नक्की करेल.या सर्व परिवर्तनवादी विचारमंचाला हे विद्यापीठ सदोदित प्रेरणा देणारे ठरेल आणि या विद्यापीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी सावित्रीमाईच कार्य डोळ्यासमोर ठेऊन राष्ट्रउभारणीत आपला सहभाग नोंदवतील या बाबत शंका नसावी.  

इंजि.सागर भालेराव.

4 comments:

  1. I read it and its very good.
    Good job Mr. Bhalerao!

    ReplyDelete
  2. साविञीबाईंचे कार्य महान होते हे वादातीत,पण नामांतराची आवश्यकता नाही आणि त्यांनी साध्य काहीच होत नाही असे मला वाटते.

    ReplyDelete
    Replies
    1. सावित्रीबाई फुले होत्या म्हणून आज आपल्या आया बहिणी शिकत आहेत,ह्याचा तरी विचार करायला हवा न आपण.विद्यापीठाला नाव देऊन सावित्रीमाई अजून मोठ्या होणार नाहीत,पण त्यांच्या उपकराला थोडस तरी उतराई व्हायला हव.

      Delete