श्रमसंस्कार छावणी २०१५

 श्रमसंस्कार छावणी २०१५


 
श्रमसंस्कार छावणी सुरु असते. देशाच्या कानाकोपर्यातून युवक-युवती आलेले असतात. आपली कामे स्वतः इथे करायची असतात. आपण जेवलेल्या ताटात काही शिल्लक राहू नये याची जबाबदारी सगळ्याच शिबिरार्थ्यांनी घेतलेली असते. जेवणाचे उष्टे जेथे फेकले जाते तेथे एक मुलगा बसलेला असतो.खरकटे आणणाऱ्या लोकांना ते अन्न खायला सांगत असतो. यांत्रिकी पद्धतीने त्याचे काम चालू असते. एक खरकटे ताट समोर असते, त्यात दही शिल्लक असते; मुलगा कोण आहे हे न पाहता, ताटातले राहिलेले खावून घ्या, असा धमकीवजा हुकुम सोडतो. समोरचा व्यक्ती ते ताटात राहिलेले दही खावून घेतो.जेव्हा त्याची नजर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे जाते, तेव्हा तो गडबडतो कारण, ती व्यक्ती असते स्वतः डॉ. विकास बाबा आमटे!
               असे एक न एक अनुभव या वर्षीच्या श्रमसंस्कार छावणी मध्ये अनुभवायला मिळाले. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या संकल्पनेतून १९६७ पासुन ही छावणी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील सोमनाथ या गावी दरवर्षी आयोजित केली जाते. तत्कालीन स्थिती लक्षात घेता पंजाब, गुजरात, अरुणाचल, केरळ मध्ये उसळलेल्या दंगलीने अस्वस्थ झालेले बाबा "भारत जोडो" अभियानाला सुरुवात करतात.कन्याकुमारी ते काश्मीर असा पल्ला सायकलने बाबा आणि  त्यांचे सहकारी पार पाडतात. युवकांमध्ये असलेली प्रचंड स्थितीज उर्जा चांगल्या कामासाठी, देश उभारणीसाठी वापरली तर नक्की काहीतरी नवनिर्मिती होईल असा बाबांना विश्वास होता.त्यातूनच श्रमसंस्काराची कल्पना आली. भान ठेवून योजना करा आणि बेभान होऊन काम करा असे सांगणारे बाबा आमटे इथे आपल्या सोबत असलेल्या सहकार्याच्या रुपात येथे कायम भेटतात. इथे कोणाच्याही जाती-धर्माचा गवगवा नसतो. इथे माणुसकी गायली जाते. कोण व्यक्ती  कुठल्या भागातून, पार्श्वभूमीतून आलेली असते हे माहित नसते,पण ती व्यक्ती या सात दिवसांच्या सहवासात आपलीशी होऊन जाते हे नक्की.शेतावर कधी पाय ठेवला नाही असे लोक इथे श्रमदान करतात. शेतातली तरवड काढतात,बंधारे बांधतात, माती उपसतात. हाता-पायाला काटे टोचत असले तरी श्रमिकपनाची जाणीव झाल्याने त्याचा दिखावा किंवा कौतुक नसते.  श्रमिकांचे जीवन ७ दिवस जगुन पाहिल्यावर शब्दात न सांगता येणारे अनुभव हे शिबिरार्थी सोबत घेऊन जातात. इथे वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक येतात. संघ, समाजवादी, आंबेडकरवादी, अल्पसंख्यांक अशा विविध विचारसरणीचे लोक इथे येतात, सोबत खातात,पितात,राहतात पण या दरम्यान कुठेही त्यांची विचारसरणी आड येत नाही. मला वाटते "भारत जोडो" अभियानाचे हे फलित आहे. कुमार सप्तर्षी, अनिल अवचट अशी कित्येक मंडळी येथे घडली. ध्येयवेड्या तरुणांनी नक्की अनुभव घ्यावा असा हा प्रकल्प आहे. विकासभाऊंच्या मार्गदर्शनाखाली अगदी सुनियोजितरित्या इथे काम चालू आहे. पायी असलेल्या शृंखला तोडून नवी पिढी आता गतीचे गीत गाण्यास तत्पर आहे. गरज आहे ती एक अनुभव घेण्याची, तेव्हा आयुष्यात एकदा तरी हे शिबीर अशा युवकांनी नक्की अनुभवावे


इंजी.सागर भालेराव
९५९५८४२२३८ 

No comments:

Post a Comment