शेवटी पंकजाताई बोलल्या. ब्लॉगच्या माध्यमातून का होईना त्यांनी आपली बाजू मांडली. स्वागत. लोकशाही समाजव्यवस्था असलेल्या आपल्या देशात आपली बाजू पडकी, खोटी,थिल्लर असली तरी मांडण्याचा अधिकार आहे. हा अधिकार बजावला म्हणून काही कौतुक करण्याची गरज नाही. "मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री" असा स्वयंघोष भरसभेत करणाऱ्या ताई ब्लॉगच्या माध्यमातून आपली बाजू मांडतात तेव्हाच यातील नेमकी गोम काय आहे हे सुजाण नागरिकांच्या लक्षात यावे. २०६ कोटी रुपयाची खरेदी एक दिवसात उरकती घेण्याचा मान पंकजाताई यांना मिळाला, महाराष्ट्राची संघर्षकन्या म्हणून आम्हाला या गोष्टीचा काय अभिमान वाटावा? अजिबात नाही.भावनेच्या राजकारणात आपण कशा तरबेज आहात हे उभ्या महाराष्ट्राने अनुभवले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप होत असतानाही आपल्या स्वर्गीय पित्याच्या नावाचे भांडवल करावे? स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे आमच्या आदरस्थानी आहेत, याबाबत वाद नाही. पण केवळ, आपले आरोप फेटाळताना त्यांच्या नावाचा वापर करून, मुंडे नावाचे भावनिक भांडवल करून जर तुम्ही भावनेचे राजकारण करत असाल तर हे प्रकरण इथले सुजाण नागरिक नक्कीच विसरू पाहता विसरणार नाहीत. आपण सध्या लंडनमध्ये आहात,आपल्या मुलाच्या प्रकृती संदर्भात आपण तेथे गेल्या आहात. उत्तम. आपल्या सारख्या मंत्री असलेल्या आईचे हे हाल असतील, तर विचार करा मेळघाटात, सातपुड्याच्या जंगलात, जिथे अजूनही प्राथमिक सुविधा पोहोचू शकल्या नाहीत तिथल्या आपल्या आईबहिणी कशा आपल्या मुलांवर उपचार करत असतील? आपण मंत्री आहात म्हणून आपल्याला हा उपचार पेलवत असेल, पण अजूनही आदिवासी पाड्यावरचे आमचे भाऊबंध तुम्ही दिलेली ब्लेड,तार, दगड असलेली चिक्की खात आहेत. आपल्या मुलाचे सौभाग्य कि त्यांना अशी भ्रष्टाचारात बरबटलेली 'चिक्की' अजून नशिबी आली नाही.
आपल्या उत्तरात आपण म्हणालात कि," मी, पिडीत,वंचित,मागासवर्गीय महिलांच प्रतिनिधीत्व करते,अंत्योदय हे खरचं मी अंमलात आणते" . ताई, मनापासून विचाराव वाटत,मंत्री झाल्यापासून आपण किती पिडीत, वंचित आणि मागासवर्गीय महिलांसाठी धावून गेलात? भगवान गडाच्या मेळाव्यात छातीठोकपणे "माझ सरकार हे दिनदलितांच असणार आहे" असे सांगणाऱ्या आपणाला चिक्की घोटाळा होत असताना थोडीसुद्धा कष्टकरी,कामगार वर्गाची आठवण येऊ नये? एवढी जनतेची काळजी आपण घेतच आहात,तेव्हा आपल्या रॅडीको कंपनीतील केमिकलमिश्रित सांडपाणी शेतात आणि विहिरीत सोडल्यामुळे संपुर्ण गावातील शेतजमिन नापिक झाली, त्या गावातला शेतकरी देशोधडीला लागला त्यावेळी तुम्ही एका शब्दानेही प्रतिक्रीया दिली नाही.ज्यांनी निवडून दिले त्यांच्याशी अस व्यवहार स्वर्गीय मुंडे साहेबांनी तरी केला असता का? सत्तेचा हा उन्माद तर नाही? गेल्या वर्षभर आपण झोपलेल्या नाहीत, आश्चर्य! अतिशयोक्ती करण्यात आणि स्रीदाक्षिण्य मिळविण्यात आपला हाथ कोणी धरू शकणार नाही.कुंभकर्णाची कहाणी आठवली. असो, लंडनची हवा खावून झाली असेल, मुलाचा उपचार झाला असेल तर भारतात परत या. समस्त महाराष्ट्राची जनता या संघर्षकन्येची सॉरी, सॉरी... चिक्कीकन्येची वाट पाहत आहे.सत्य काही लपणार नाही, जे सत्य असेल ते आम्हाला मान्य असेल पण उगाच भावनिकतेच भांडवल नको.बाकी, चांगली झोप घ्या, मुलाची काळजी घ्या, जेवणही वेळेवर करा. आणि हो, रस्त्याने येताना "सुर्यकांता चिक्की" दिसली, मुलाने कितीही आग्रह केला तरी घेवू नका. त्यात ब्लेड,काचा,दगड, तार असे काहीबाही असते.
सत्यमेव जयते!

संयत आणि संतुलित मांडणी.
ReplyDeleteसंयत आणि संतुलित मांडणी.
ReplyDeleteWell Said bro!
ReplyDelete