ऑक्सफर्ड विद्यापीठात खा. शशी थरूर यांनी ब्रिटीशांची घेतलेली विकेट.
अध्यक्ष मोहोद्या, आणि सभागृहात उपस्थित असलेल्या सर्वांना नमस्कार.
मी इथे,प्रतिष्ठित अशा संस्थेमध्ये केवळ आठ मिनिट वेळ घेवून तुमच्या समोर उभा आहे.तुम्हाला अगोदरच खात्री देतो कि मी माझे भाषण मी लांबवणार नाही.
मी इथे या चर्चासत्रात एका महत्वाच्या मुद्द्यावर आपले लक्ष केंद्रित करू इच्छितो, आतापर्यंत या चर्चासत्रात ज्या काही लोकांनी आपल्या भूमिका मांडल्या आहेत, अगदी त्याला विरोधी अशी माझी भूमिका मी इथे मांडणार आहे. सर रिचर्ड ओट्वे अस सुचवतात कि,वसाहतींच्या आर्थिक सुधारणांसाठी ज्या काही क्लुप्त्या साम्राज्यशाहीकडून चालविल्या गेल्या त्या सगळ्या क्लुप्त्या ब्रिटीश वसाहतवादाच्या भंपक चुका होत्या.
अगदी त्याच धर्तीवर भारताच्या संदर्भात मी इथे काही उदाहरणे देवू इच्छितो. ब्रिटीश राज्यव्यवस्था सुरु होण्याच्या अगोदर जागतिक उत्पन्नात भारताचा २३% हिस्सा होता, आणि ब्रिटीश भारत सोडून जाताना ही आकडेवारी केवळ ४% इतकी होती. का असे घडले असेल? साहजिक आहे, केवळ आपल्या फायद्यासाठी ब्रिटिशांनी भारताचा उपयोग केला हे मात्र कुणालाही समजण्यासारखे आहे.
ब्रिटीश साम्राज्याची जी काही भरभराट आहे ती केवळ २०० वर्षे भारताच्या चालवलेल्या लुटीमुळे आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. आणि खरे पाहता, ब्रिटीश साम्राज्यात औद्योगीकरण वाढीस लागले त्यामागे कारण होते, भारताची औद्योगिक क्षेत्रातील वाताहत, जी ब्रिटिशांनी केली.
उदाहरण घेवूया, भारताचा हातमाग व्यवसाय हा जगप्रसिध्द होता.जगभरात भारतीय बनावटीच्या हातमागाचा व्यवसाय पसरलेला होता.भारतात बनलेला, बारीक ताग्याची वीण असलेला आणि वजनाने हलका असलेला मलमलचा कपडा जगप्रसिध्द होता. असे बोलले जाते कि, जेव्हा ब्रिटीश भारतात आले तेव्हा त्यांनी हातमाग कारागिरांचे बोटे कापली,त्यांचे हातमागाचे साहित्य नष्ट केले, हातमागावर बनलेल्या कापडावर अधिक कर लावला. त्यानंतर भारतातून कच्चा माल इंग्लंडला नेण्यास सुरुवात झाली आणि तिथे प्रक्रिया करून आणलेला माल संपूर्ण जगभरात विकण्यास सुरुवात झाली.इंग्लंडच्या असुरी कपड्यांच्या मिलमध्ये भारतीयांचा कच्चा माल प्रक्रियेसाठी जात होता हे विसरता येणार नाही. याचा अर्थ असा झाली कि, भारतात कमवणारे हात वसाहती आल्यानंतर भिक मागणारे हात झाले.हातमागाची निर्यात करणारा एक संपन्न देश अल्पावधीतच हातमागाची आयात करणारा देश बनला. २७% जागतिक उत्पन्नात हिस्सा असलेल्या देशाचे हे प्रमाण त्यामुळे २ टक्क्यापेक्षाही कमी झाले. आणि याच दरम्यान, रोबेर्ट क्लाइव्ह यांच्या सारख्या वसाहतवादी लोकांनी 'दुषित नगर' ही संकल्पना जोरात राबवली, ज्यायोगे ब्रीटीशांकडून भारताची लूट चालणार होती.त्यामुळे ब्रिटिशांनी जसा 'लूट' ह्या शब्दाचा समावेश ऑक्सफोर्ड डिक्शनरित केला तसाच त्याचा उपयोग व्यवहारात देखील आणला.(लोकांचा हशा आणि प्रतिसाद)...आणि ब्रिटिशांना देखील असे पित्त उठले कि त्यांनी क्लाइव्ह यांना "क्लाइव्ह ऑफ इंडिया" अशी उपाधी दिली.यावेळी ब्रिटीश हे देखील विसरले कि आपण जे काही केले आहे त्याहून वेगळे क्लाइव्ह यांनी विशेष काही केलेलं नाही.(हशा)
१९ व्या शतकाच्या शेवटी शेवटी भारत म्हणजे केवळ दुध देणारी गाय अशी परिस्थिती निर्माण झाली.भारत हा ब्रिटीश वस्तूंची सर्वात जास्त खरेदी करणारा देश ठरला.ब्रिटीश अधिकाऱ्यांचे पगार हे भारतातून मिळवलेल्या उत्पन्नावरून भागवले जात असत.आम्ही भारतीयांनी आमच्यावर झालेल्या प्रयोगाची किंमत स्वतःच दिली आहे.
ब्रिटीश साम्राज्यावाद्यांनी अगदी गुलामांच्या व्यवसायातून सुद्धा आपली पोटे भरली. ब्रिटनमधला १/५ अभिजन वर्ग हा १९ व्या शतकात गुलामांच्या खरेदीसाठी पुढे होता. या दरम्यान थोडेथीडके नाही तर सुमारे, ३ दशलक्ष आफ्रिकन गुलाम निर्यात केले गेले अशी नोंद आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही कि, १८३३ साली गुलाम पद्धती बंद झाली खरी, परंतु त्या गुलामांना भरपाई देण्यात आलेल्या २० दशलक्ष पौंड रकमेचे काय झाले?इतकी मोठी रक्कम गुलामांच्या पुनर्वसनासाठी वापरनेणेअपेक्षित होते, परंतु ही रक्कम जे गुलाम खरेदी करण्यासाठी पुढे होते अशा अभिजन वर्गानेच लांबविली.
इथला वाय-फायचा पासवर्ड ऐकून मी क्षणभर स्तब्ध झालो, हा पासवर्ड इथले उदारमतवादी नेते श्री. ग्लाडस्टोन यांच्या नावे आहे.मला माफ करा,पण मला हे इथे नमूद करायचे आहे कि श्री. ग्लाडस्टोन यांचे कुटुंब सुद्धा गुलामांच्या पुनर्वसनासाठी असलेल्या पैश्यातून संपन्न झालेले होते.
असो, आता पुन्हा भारतीय संदर्भ लक्षात घेवूया, ब्रिटीश साम्राज्यशाही असताना १५-२९ दशलक्ष भारतीय उपासमारीमुळे मेल्याची नोंद आहे. याबाबत असे उदाहरनण आहे कि, दुसरे महायुध्द सुरु असताना बंगाल प्रांतामध्ये दुष्काळ पडलेला होता. या दुष्काळात ४ दशलक्ष लोकांचा मृत्यू झाला.याला कारण म्हणजे, विस्टन चर्चिल यांचे दुष्काळग्रस्त लोकांपेक्षा सरकारी कामावर, सूक्ष्म नियंत्रणावर जास्त भर होता. एवढेच नाही तर भारतीय दुष्काळग्रस्त लोकांपेक्षा आपल्या युरोपीय नागरिकांना अन्न मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.चर्चिल म्हणाले होते कि, "आमच्यासाठी अशक्त बंगाली भारतीयांपेक्षा, सशक्त ग्रीक नागरिक महत्वाचे आहेत''.खुद्द चर्चिल ह्यांनी हे वक्तव्य केलेले आहे. जेव्हा त्यांना त्यांच्या या वक्तव्याबद्दल विचारण्यात आले तेव्हा मात्र त्यांनी दर्पोक्ती अशी केली कि, जर भुकमारीने लोक मरत असतील तर मग उपोषण करणारे गांधीजी अजून कसे जिवंत राहिले?.
भारतात आपली जुलूमशाही प्रस्थापित करण्यासाठी ब्रिटिशांनी ज्या काही कल्पना योजल्या त्यामुळे ब्रिटीश वसाहतीस फायदा झाला असा जर कुणाचा समज असेल तर मला क्षमा करा,कारण १९४३ साली चर्चिल यांनी जी भूमिका घेतली त्यातून हे प्रतीत होते कि त्यांची त्यावेळीची भूमिका ही केवळ मिथक ठरली.त्याचबरोबर असेही मानले जात एकी ब्रिटीश वसाहतीच्या काळात हिंसा,वर्णभेद यांचे स्तोम माजले.ब्रिटीश साम्राज्यावरचा सूर्य कधी मावळणार नाही असे म्हटले जायचे,हे एका अर्थाने खरे सुद्धा आहे कारण, काळोखात ब्रिटीश साम्राज्य ठीकपणे चालू शकेल अशी ईश्वराला सुद्धा खात्री नाही. (हशा)
पहिले महायुध्द उदाहरणादाखल घेतले कि समजते, श्री. लि यांनी सुचवले कि, ब्रिटीश साम्राज्यवाद आणि वसाहतवाद हा निर्धारित मोजपट्टीत मोजता येण्याजोगा नाही.ठीक आहे, मला पहिले महायुध्द आपल्यासाठी निर्धारित करायचे आहे. पुन्हा मला माफ करा, तुम्ही सगळे आपल्या आपल्या देशाच्या परीक्षेपात बोललात,मला मात्र माझ्या भारताच्या परीक्षेपातच बोलावे लागेल.ब्रिटीश साम्राज्यातील केवळ १/६ सैनिक पहिल्या महायुद्धात लढले, तसेच ५४,००० भारतीयांना आपल्या प्राणांना मुकावे लागले, ६५,००० जबर जखमी झाले तर ४००० बेपत्ता झाले किंवा तुरुंगात गेले. भारतीय करदाते पहिल्या महायुद्धाच्या वेळी १०० दशलक्ष पौंड एवढी किंमत देत होते. ७० दशलक्ष रुपयांचा दारुगोळा, ६००,००० बंदुका आणि मशीन गन्स, ४२ दश लक्ष कपडेजोड भारतातून पहिल्या महायुद्धासाठी गेले. १.३ दशलक्ष भारतीयांचा या महायुद्धात प्रत्यक्ष सहभाग होता.हा स्मरणसोहळा करण्याचे कारण हेच कि माझ्या अगोदर बोलून गेलेल्या वक्त्यांनी याबद्दल भाष्य केले. एवढेच नाही तर १७३,००० पशुसंपत्ती देखील भारताबाहेर नेण्यात आली.याचा परिणाम म्हणून भारताला त्यावेळी आर्थिक विवंचनेतून, भूकमारीतून, गरिबीतून जावे लागले.या सगळ्यांची भरपाई होते ८ अरब पौंड. तुम्ही हे गणित तपासू शकता,सगळे पुरावे आतासुद्धा उपलब्ध आहेत. दुसरे महायुध्द तर याहून भयानक होते, २.५ दशलक्ष भारतीय या युद्धात सामील होते.मला तीच तीच गोष्ट परत परत सांगायची नाहीये, परंतु या युद्धानंतर ब्रिटन ३ अरब पौंड रकमेचा देणे लागत होता, पैकी १.२५ अरब पौंड एवढी रक्कम भारताला देणे लागत असतानाही ती कधीही दिली गेली नाही.
मगाशी इथे कुणीतरी स्कॉटलंडचा उल्लेख केला. सत्य असे आहे कि,वसाहतवाद हा अगोदरच ब्रिटन आणि स्कॉटलंड यांच्या संकल्पनेतुन आलेला होता. स्कॉटिश लोकांनी १७०७ च्या अगोदर आपल्या देशाबाहेर वसाहती निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. ते भारतातही आले होते तेथे मात्र त्यांना असंगत रोजगार दिसला. मला क्षमा करा, माझ्यानंतर श्री. म्यकेझिअस (स्कॉटलंड) हे बोलणार आहेत! स्कॉटिश लोकांनी आपल्या वसाहती निर्माण करताना वेगवेगळ्या पैलूंनी विनाकारण विचार केला.सैनिक,नाविक,उद्योग,दलालि , रोजगार यांच्याकडे महत्वाने लक्ष दिले गेले.याचा परिणाम म्हणून स्कॉटलंड गरिबीच्या गर्तेत अडकला. आता भारत त्यांच्या गावीही नाही, स्कॉटलंड आणि भारत यांच्यातील वसाहतवादी धोरण संपुष्टात आले याचे आश्चर्यही आम्हाला वाटत नाही.आपण आणखी एक युक्तिवाद ऐकलात तो म्हणजे रेल्वे सुविधाबद्दल.छान, पण मी इथे सांगू इच्छितो आणि जे कि माझे सहकारी जमाइका हाय कमिशनर यांनी देखील स्पष्ट केले की,रेल्वे आणि रोड हे ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी बनवले,नागरिकांच्या नाही. आणि मला याबद्दल आणखी एक सांगावेसे वाटते कि, जगभरात अनेक देशांनी रोड आणि रेल्वे बनवले जेथे वसाहतवाद अस्तित्वात देखील नव्हता. रोड आणि रेल्वे हे मुख्यत्वे दळणवळणासाठी बांधले गेले.कच्चा माल प्रक्रियेसाठी ब्रिटनला पाठविण्यासाठी हा सगळा खटाटोप होता. जमाइका आणि भारत या वसाहती देशांच्या गरजा या प्रासंगिक स्वरूपाच्या होत्या.त्यांना मोठ्या प्रमाणात वस्तूंची आयात-निर्यात करण्यासाठी अशा वाहतुकीच्या साधनांची गरजच नव्हती.
खरे तर, ब्रिटीश लोकांचाच आग्रह असल्यामुळे रेल्वे बनवल्या गेल्या.त्यामुळे ब्रिटिशांना महसूल गोळा करण्यासाठी नवीन योजना मिळणार होती.मुख्य म्हणजे कॅनडा आणि ऑस्ट्रेलियात रेल्वे बांधणीचा खर्च हा भारतात होणार्या खर्चापेक्षा दुप्पट होता. कारण, या देशांमध्ये तेवढी आर्थिक समृद्धी नव्हती.आपला आर्थिक फायदा,तंत्रज्ञावरील नियंत्रण,साधनसंपत्तीचा पुरवठा या सगळ्या गोष्टी लक्षात घेवूनच ब्रिटिशांनी सुधारणा केल्या आहेत.याचाच परिणाम म्हणून भारतात रेल्वे धावू लागली.
आपण इथे ब्रिटिशांनी वसाहती देशांना केलेल्या मदतीबद्दलाही ऐकले,मला वाटते सर रिचर्ड ओट्वे यांनी हे म्हणणे मांडले. असो,पण मला हे लक्षात आणून द्यायचे आहे कि, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या केवळ ०.४% खर्च हा ब्रिटिशांनी भारताच्या विकासासाठी खर्च केला.खरी गोष्ट अशी कि या पेक्षा जास्त सबसिडी तर भारतात त्यावेळी खतांवर होती, रिचर्ड यांच्या वरील उदाहरणाला हे रूपक अगदी लागू पडते.( हशा)
काही वक्त्यांनी असेही म्हटले आहे कि जातीय हिंसा, रक्तपात, शोषण, लुट ही मुघल साम्राज्याच्या अगदी शेवटच्या काळातही होतीच.हो, होतीच त्याबद्दल वाद नाही.त्यामुळे सध्या भारताची जी स्थिती आहे त्याला पूर्णपणे ब्रिटीश जबाबदार आहेत असे आम्ही मानत नाही,पण काही वक्ते मात्र ब्रिटीश राज्यात ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणांचा उल्लेख अगदी अभिमानाने करत आहेत. जसे सद्यपरिस्थितीला आम्ही पूर्णपणे ब्रिटिशांना ग्राह्य धरत नाही, तसेच तत्कालीन सुधारणांचा बडेजाव आता करण्यात काहीही हाशील नाही. सोमालीयातल्या उपासमारीलाआपण कारणीभूत नाही,पण त्यांना आपण संसाधन पुरवले याचा अर्थ आपण फार मोठे काम केले आहे असा होत नाही. तसेच काही सुधारणा केल्या असल्या तरी ज्या चुका आपण केल्या आहेत त्यांना कधीच नजरअंदाज करता येणार नाही.
आफ्रिकन आदिवासी लोकांसोबत ब्रिटिशांनी जो अमानवी व्यवहार केला तो देखील लक्षात घेतला पाहिजे.वसाहती धोरणामुळे त्यांच्या मानसिक स्थितीत बदल झाला, त्यांच्या परंपरागत चालीरीतीमध्ये बदल झाला. आफ्रिकन आदिवासी लोकांच्या संपत्तीच्या हक्कांची, समाजव्यवस्थेची घडी विस्कळीत करण्यास जर कोणी जबाबदार असेल तर ते फक्त ब्रिटिशांचे वसाहतवादी धोरण. वंशवाद,वर्णवाद,सांस्कृतिक अशा विविध प्रश्नांना आजही हे आफ्रिकन लोक सामोरे जात आहेत.याबाबत विचार होणे मला गरजेचे वाटते.
काहीजण वसाहती देशांना नुकसान भरपाई देण्याच्या विरोधात असतीलही,पण लक्षात घ्या कि, जर्मनीने केवळ इस्राइल नव्हे तर पोलंडलाही नुकसान भरपाई दिली आहे.इथे भरपूर तरुण तरुणी आहेत, तुम्हालाही एका जगप्रसिध्द चित्राची आठवण करून द्यावीशी वाटते.या जगप्रसिध्द चित्रात १९७० साली जर्मनीचे चान्सलर असलेले विली ब्रान्द्त हे दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान पोलंड मध्ये मारल्या गेलेल्या ज्यू लोकांच्या 'वॉरसॉ' या स्मृतीस्थळावर जाऊन आपले गुडघे टेकतात आणि आपली चूक मान्य करतात. अशीच चूक इतरांनीही कबुल करावी. दुसरे आणखी एक उदाहरण आहे, इटलीने लिबियाला नुकसान भरपाई दिली आहे,जपानने कोरियाला दिली आहे आणि एवढेच नाही तर, ब्रिटनने देखील न्यूझीलंडला नुकसान भरपाई दिली आहे.त्यामुळे नुकसान भरपाई कोणा एका देशाने कोणा दुसऱ्या देशाला दिली आहे असे नवीन नाही.
ब्रिटीश वसाहती देशात लोकशाही होती असा देखील इथे मगाशी उल्लेख झाला.पण मला मोठ्या आदराने हे सांगावेसे वाटते कि, गेल्या २०० वर्षांच्या ब्रिटीश साम्राज्यात भारतीयांनी केवळ गुलामी,छळ आणि यातना भोगल्या.तुमची लोकशाही केवळ तुमच्यासाठी होती, आमच्यासाठी नाही. आम्हाला आमची लोकशाही तुमच्याकडून हिसकावून घ्यावी लागली. आणि मोठ्या नाखुशीने ब्रिटिशांनी ही लोकशाही १५० वर्षाच्या शोषनानंतर सीमित स्वरुपात भारतीयांना दिली.
गोष्ट अगदी साधी आणि समजण्यासारखी आहे.नुकसान भरपाई ही कुणा देशाच्या विकासासाठी महत्वाची ठरू शकत नाही.तुम्ही केलेय चुकांचे ते एक परिमाण आहे.मी हे देखील मान्य करतो कि नुकसान भरपाईचा हिशोब करणे सद्यस्थितीला शक्य नाही. परंतु वसाहतवादी धोरणाचे जेवढे लोक बळी ठरले त्यांची काळजी घेण्याची नितीमत्ता आपल्या जागी ठेवली पाहिजे.एखादा चोर तुमच्या घरात शिरतो आणि चोरीसाठी संपूर्ण घर शोधताना त्याला जर ठेच लागली, तर नुकसान दोघांचेही झाले असे आपण कधीही म्हणत नाही. त्यामुळे भारतात वसाहतवादी धोरण स्वीकारताना ब्रिटिशांनी सुधारणावादी धोरणही राबविले हे विधान मान्य करण्यासारखे नक्कीच नाही.
खरे तर , आम्हाला ब्रिटिशांनी नुकसान भरपाई द्यावी अशी कुठलीही मागणी आम्ही करत नाही. किती भरपाई द्यावी, किती भरपाई बाकी आहे, किंवा भरपाई कुणाला द्यावी हे सांगण्यासाठी ही चर्चा निश्चितच नाही. परंतु चर्चेचा विषय 'ब्रिटीश साम्राज्याने त्यांच्या पूर्वीच्या वसाहती देशांना नुकसान भरपाई द्यावी ' हा असल्यामुळे हे सगळे मुद्दे ओघाने आले.
माझ्या आकलनानुसार इथे मी माझे मुद्दे मांडले आहेत, जर काही चुकीचे संदर्भ वा उदाहरणे दिली असतील तर मनापासून क्षमस्व.२०० वर्षाच्या शोषणाची किंमत म्हणून पुढची २०० वर्षे काही नाही तरी वर्षाला १ पौंड एवढी रक्कम तरी भारताला द्यायला हवी असे माझे स्वतःचे वैयक्तिक मत आहे.
धन्यवाद!
स्वैरानुवाद: प्रा. सागर भालेराव

No comments:
Post a Comment