विंग कमांडर #अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना भारतीय माध्यमं ज्या पद्धतीने वागली त्याच विश्लेषण आताच्या परिस्थितीत व्हायलाच हवं. ते टाळून आपण पुढे जात असू तर आपल्यासारखे अविचारी आपणच ठरणार आहोत. माध्यमांची म्हणून एक नैतिकता असते. ती पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकातून शिकवली जाते. परंतु जेव्हा याच नैतिकतेला डावलून आपण स्वतःच एक व्यवस्था आहोत या अविर्भावात आपलं काम करणार असू तर भारतीय पत्रकारितेला घरघर लागली आहे असे समजण्यास भरपूर वाव आहे. संविधानात पत्रकारितेच्या स्वातंत्र्याचं कुठलही वेगळं कलम नाही. पत्रकारांना कुठलीही वेगळी सवलत नाही, विशिष्ट वागणूक नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे जे काही हक्क आणि मर्यादा कुठल्याही भारतीय नागरिकाला आहेत त्याचा मर्यादा आणि हक्क पत्रकारांना देखील लागू आहेत. नेमकं हेच आपण विसरलो आहोत. कमांडर अभिनंदन ज्या दिवसापासून पाकिस्तानच्या अटकेत होते त्या दिवसापासून भारतीय माध्यमांनी आक्राळस्तेपणाने वागायला सुरुवात केली. माध्यम म्हणून आपल्या काही मर्यादा आहेत हे जवळजवळ सर्वच पत्रकार विसरले. अर्थातच याला सन्माननीय अपवाद आहेत. हिंदी, इंग्रजी सहित सर्व माध्यमांनी युद्ध पुकारलंच पाहिजे, ठेचून काढा, गाडून टाका अशी अविचारी भाषा वापरली. परस्पर माध्यमांनीच युद्ध पुकारल्यासारखी परिस्थिती आहे. वर्तमानपात्र वाचून, टीव्ही चॅनेल पाहून निश्चितच जनमत बनतं. जेव्हा माहिती मिळण्याची कुठलीच व्यवस्था नसते तेव्हा आपल्या सर्वांची भिस्त असते ती माध्यमांवर. माध्यमे जी काही माहिती देतील त्यावर आपण विश्वास ठेवतो.
याठिकाणी माध्यमांच्या नैतिकतेच, विचारीपणाचं आणि विवेकीपणाचं दर्शन घडवायला हवं होत. भारतीय माध्यमांनी ही संधी गमावली. हातात खेळण्यातली बंदूक घेऊन, सैनिकांच्या वेशात राष्ट्रवादाने, राष्टभक्तीने भारलेले पत्रकार न्यूजरूम मध्ये बातम्यांचे निवेदन देताना आपण पहिले. आपले विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानात कुठलीही माहिती देत नव्हते. जे काही प्रश्न त्यांना विचारले गेले त्याची माहिती देण्याचं त्यांनी टाळलं. देशहितासाठी हे महत्वाचं होत. शत्रूराष्ट्राला कुठलीही गोपनीय माहिती मिळता कामा नये यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला. कमांडर अभिनंदच्या अगदी विरुद्ध भारतीय माध्यमे वागली. कमांडर अभिनंदनच्या आई-वडिलांचा, नातेवाईकांचा शोध आपल्या माध्यमांनी घेतला. त्यांचं गाव शोधून काढलं, तिथे आपले कॅमेरामन, ओबी व्हॅन पाठवल्या गेल्या. कुठल्या विमानातून त्यांनी कारवाई केली, कोणत्या वेळेला केली याचं विस्तृत वर्णन प्राईम टाईमच्या भपकेबाज फालतू चर्चेमध्ये केलं गेलं. निवृत्त सेनाधिकाऱ्यांना शोधून शोधून न्यूजरूममध्ये आणलं गेलं. टीआरपी वाढवण्यासाठी हा सगळा खेळ खेळला गेला. चर्चेत निवृत्त सैन्याधिकारी कमी बोलू दिल गेलं, पण न्यूज अँकर गळा फाडून ओरडताना आपण पाहिले. माध्यमांनी संवादाचं काम करायचं आहे हे विसरता काम नये. घडल्या प्रकारावरून हे मात्र स्पष्ट झालं की भारतीय माध्यमे अजूनही बाल्यावस्थेत आहेत. भावी पिढीला विचारी बनवायचं असेल आणि सामाजिक एकता अबाधित ठेवायची असेल तर आपल्या माध्यमांना खूप मेहनत घ्यावी लागेल. सरकारलाही हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं लागेल. युद्धजन्य परिस्थितीत माध्यमांनी कसं वागलं पाहिजे, कसं वार्तांकन केलं पाहिजे याची नियमावली बनवली पाहिजे, आणि अर्थातच त्याची अंमलबजावणी सुद्धा केली पाहिजे. असे जर होणार असेल तरच लोकशाहीच्या चौथ्या खांबाला किंमत आहे. असे होणार नसेल तर हाच चौथा खांब लोकशाहीचं कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही.


अगदी बरोबर सागरजी .....
ReplyDeleteअगदी बरोबर सागरजी .....
ReplyDeleteBarobar aahe pan sarkar ne sudha ya goshti var lakshya dila pahije nahi tar hech mansa aaplya gotayat antil
ReplyDelete