मराठी मालिकांमध्ये ब्राम्हण अभिनेत्रीच का असतात असा प्रश्न सुजय डहाके नावाच्या नव्या दमाच्या दिग्दर्शकाने विचारला आणि कायम जातीच्या कंफर्ट झोनमध्ये असलेले अनेकजण व्यक्त व्हायला लागले. इथे प्रश्न जाती- जमातीचा नाही तर सांस्कृतिक मक्तेदारी कुणाच्या ताब्यात आहे आणि ही मक्तेदारी कशाप्रकारे काम करते हे समजून घेण्यासाठी केलेला प्रयत्न आहे. ब्राम्हण जातीला नाव ठेवावं असं त्यांच्यात काहीच नाही. विशिष्ट जातीत जन्माला आल्यामुळे जन्मतः जे प्रिव्हिलेज मिळतं, ते सर्व या समुदायाला मिळालंय. आर्थिक असमानतेवर मी इथे बोलणार नाही, कारण गरिबी जात बघून येत नसली तरी जातीची गरिबी काही विशिष्ट समुदायांना आजवर शिवली नाही हेही खर. बहुजनांवर सप्तबंदी असताना या समाजाने भारतीय इतिहासातील महत्वाचा कालखंड आपल्या नावे करून घेतला. इतिहासाची पाने खरडून काढण्याचा, त्यात बेरीज-वजाबाकी करण्याचा सर्वाधिकार आपल्या हातात असल्यामुळे साजूक तुपाची धार टाकून हवं तसं इतिहासाचं प्रकरण आपल्याकडे वळत केलं. सांस्कृतिक सत्ता आपल्या हातात असली पाहिजे असा होरा कायम ठेवला. शिक्षणाने माणसे हुशार होतात हे महात्मा फुल्यांना कळलेलं होत, त्यांनी जेव्हा महारामांगाच्या मुलांना शिकवायचं ठरवल तेव्हा विरोध करणारे कोण होते हे वेगळं सांगायला नको. हजारो वर्षांपासून शैक्षणिक सत्ता आपल्या हाती ठेवण्याचं कौशल्य असल्यामुळे या समुदायाला कधीही स्किल इंडिया योजनेत नाव नोंदवाव लागलं नाही.
मुळात कला-साहित्य-शास्र-विनोद हा केवळ बुद्धिवंतांचा आणि पर्यायाने ब्राम्ह्मणांचा प्रांत आहे असं मानलं गेलं, जनमानसावर ते बिंबवलं गेलं. त्यामुळे प्रमाण भाषा कुठली, प्रमाण साहित्य कुठलं हे देखील या समुदायाने ठरवून दिल. त्याला 'अभिजात' असा टॅग लावला आणि त्यावर आपलीच मक्तेदारी आहे असं पदोपदी सांगितलं. बहुजनांना व्यक्त व्हायची मुभा मिळाली ती फुले-शाहू-आंबेडकरी काळ नावारूपाला आल्यानंतर. आपलं स्वतःच एक सौंदर्यशास्र आहे आणि हे 'अभिजात' वर्गाच्या कुठल्याच फुटपट्टीत बसत नाही ही समज यायला वेळ लागला खरा, पण त्यामुळे या सांस्कृतिक सत्तेला भेद देण्याचा कालखंड सुरु झाला. तो आजतागायत सुरु आहे. चित्रपटांमध्ये बहुजनांच, दलितांच चित्रण कसं केलं जात, दलित महिलांना कसं दाखवलं जात यावर अनेक अभ्यास, अनेक संशोधन झाली आहेत. ही सगळी संशोधने केवळ थिसीसमध्ये अडकवून पडली.. त्याची जाहीर वाच्यता अभावानेच झाली. सुजय डहाकेने नेमका हाच मुद्दा उपस्थित केला. जात-वर्ग मानसिकता आपल्या देशात अस्तित्वात नाही,असं कुणीही म्हणू शकत नाही. जात-वर्गाच्या वर्चस्वातून सत्ता,संपत्ती आणि प्रतिष्ठा आपल्याकडेच राहिली पाहिजे या हेतूने चित्रपटांची, नाटकांची, मालिकांची ,साहित्याची निर्मिती केली गेली. त्यामुळे चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये जरी ब्राम्हणेत्तर कलाकार असली/ असला, तरी पात्रांची नावे मात्र एका विशिष्ट जातीचीच दिली जातात ही वस्तुस्थिती आहे.आपल्या घरातील दूरदर्शन संच अशाच प्रकारे आपल्या नेणीवेत जातीची सत्ता आणि सत्तेची चाल भिनवत असतो, आपल्याला हे कळायला बराच वेळ लागतो. सध्या मराठी मालिकांचं उदाहरण घेऊया चित्रपटांबद्दल कधीतरी विस्ताराने लिहीन.इथे कलाकाराच्या जातीबद्दल बोलणार नसून, मालिकेत कलाकारांच्या जाती कशा दाखविल्या जातात यावर भाष्य करणार आहे.
१. माझ्या नवऱ्याची बायको
या मालिकेत पुरुषसत्ता बिंबविण्याचं काम सगळेच कलाकार इमाने इतबारे करत आहेत. मालिकेची मुख्य नायिका राधिका सुभेदार या आहेत.सुखवस्तू कुटुंबातून आलेली राधिका आपल्या नवऱ्याच्या लफड्यानंतर काय काय दिव्य करते हे यात दाखवलय. आता तर राधिकानेच दुसरं लग्न केलय. सर्वाधिक पसंती असलेली ही मालिका विशिष्ट वर्गाची जीवनशैली दाखवते.
२. अग्ग बाई सासूबाई
अतिशय चवीने पाहिली जाणारी ही मालिका. यात अभिजीतराजे आणि आसावरी यांची लव्हस्टोरी दाखवलीये. यातही महत्वाची पात्रे कुठल्या संस्कृतीचे वाहक आहेत हे वेगळं सांगायला नको.
३. तुझ्यात जीव रंगला
अस्सल मराठी बाज असलेली मालिका म्हणून याकडे पाहिलं जातंय. यातला राणा हे मुख्य पात्र सरंजामदार मराठा समाजातील आहे. त्याची बायको मात्र 'पाठक' बाई कशा? हा प्रश्न आहेच. आंतरजातीय विवाह व्हावेत, त्याला विरोध नाही. पण तसं काही दाखविण्याची तसदी देखील निर्मात्यांनी घेतली नाही.
ही उदाहरणं झाली. मुख्य फळीतल्या सगळ्याच चॅनेलवर कमीजास्त प्रमाणात सारखंच चित्र आहे. हिंदी मालिका तर पूर्णपणे जातीआधारित पात्रे दाखवतात. उदाहरणादाखल काही मालिका पाहुयात.
स्टार प्लसवर गाजलेली मालिका 'दिया और बाती हम' मध्ये राठी आणि कोठारी हे सवर्ण कुटुंब दाखवले होते. 'ये रिश्ता क्या केहलता है' मालिकेत माहेश्वरी आणि सिंघानिया ही आडनावे असलेली बनिया जातीतील कुटुंबे दाखवली गेली. झी टीव्हीवर येणाऱ्या कुंकुम भाग्य मालिकेत मुख्य कुटुंब मेहेरा, अरोरा आणि खन्ना. 'पवित्र रिश्ता' या दीर्घकाळ चाललेल्या मालिकेतही देशमुख (मराठा) आणि किर्लोस्कर(ब्राम्हण) ही दोन मुख्य कुटुंबे दाखवली गेली.
हे सगळं पाहिल्यावर लक्षात यायला सोपं होत की जात-वर्ग व्यवस्था कशी काम करते. मालिकेतील पात्र बहुजन समाजातील असतीलही, परंतु पडद्यावर दिसणारी पात्रे मात्र सरंजामी मानसिकतेतून आलेली असतात हेही नाकारता येत नाही. कुठल्याही मालिकेत अजूनही मुख्य पात्रांची आडनावे कांबळे,खरात, सुतार, माळी अशी अजूनही आलेली नाहीत. फारफार तर कांबळे नावाचे पात्र पोलीस हवालदार म्हणून सावधान इंडिया मध्ये आपण पाहिलं असेल. त्याउपर इथली व्यवस्था विचार करत नाही. असो, यानिमित्ताने पुन्हा एकदा विशिष्ट जातीच्या सांस्कृतिक सत्तेवर असलेल्या मक्तेदारीबद्दल बोललं जातंय हे विशेष. केवळ बोलून भागणार नाही. आपली शक्तीस्थळे स्वतःलाच निर्माण करावी लागतील. विद्रोही सांस्कृतिक चळवळीने, बोधी नाट्यसंस्थेने ते करून दाखवलय. इथे जो काही वाद-प्रतिवाद सुरु आहे तो वैचारिक दृष्टीने व्हावा, जातींची मक्तेदारी किंबहुना जातीच्या भिंतीच गळून पदव्या यासाठी वैचारिक घुसळण व्हावी. श्रीराम लागू, गिरीश कर्नाड, सुरेश भट आदी मंडळी डि-कास्ट झाल्याचं होत्या, त्यांनी आपल्या करणीतून ते सिद्ध केलं. त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे.
Mr. Sagar R. Bhalerao
PhD Research Scholar, Department of Communication and Journalism, University of Mumbai.
Correspondent: Lokmudra Magazine, Mumbai, Maharashtra.



No comments:
Post a Comment