करोना: सफाई कर्मचाऱ्यांचे वर्क फ्रॉम होम?


करोना विषाणूने जगभर धुमाकूळ घातलाय. हजारो नागरिक या विषाणूच्या कचाट्यात सापडलेत. यावर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नसल्याने हवी ती खबरदारी घेतली पाहिजे असं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलंय.खबरदारी म्हणून जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली गेली. भारतानेही  या विषाणूला राष्ट्रीय आपदा म्हणून घोषित केलं. आजघडीला १४७ भारतीय करोना बाधित आहेत. त्यामुळे प्रधानमंत्री, आरोग्यमंत्री सगळेच सावधान पवित्रा घेऊन आहेत. गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, स्वच्छता राखावी वैगेरे वैगेरे संदेश दिले जात आहेत. अगदी कॉलर ट्यूनवरून देखील जनसामान्यांचे प्रबोधन केले जात आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना दिल्यात. आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करता यावेत म्हणून लॅपटॉप देखील दिले गेले. सातव्या वेतन आयोगानुसार पगार घेणाऱ्या शिक्षकांना-प्राध्यापकांना आठवडाभराच्या सुट्ट्या दिल्या गेल्या. न्यायालयांना देखील करोनाला घाबरून आपली कवाडे बंद केली. या सगळ्यांत आपण सफाई कर्मचाऱ्यांना कसे विसरलो?



होय, अजून एकाही मंत्र्याने, एकाही वृत्तपत्राने-वृत्तवाहिनीने सफाई कर्मचारी काय म्हणतायेत, त्यांच्या मनात काय भीती आहे हे जाणून घेतलं नाही. स्वच्छता ठेवणारे स्वच्छतादूत म्हणून ज्यांना आपण ओळखतो त्यांना करोनाची लागण होणारच नाही असं शासनाचं गृहीतक आहे. 
याबाबत मुंबईच्या सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यातून हे स्पष्ट झालं की,ज्याप्रमाणे सामान्य नागरिकांना स्वच्छतेच्या सूचना केल्या गेल्या, त्यांच्यासाठी ज्या उपाययोजना केल्या गेल्या. तशाप्रकारच्या कुठल्याही उपाययोजना सफाई कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या नाहीत. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या या सफाई कर्मचाऱ्यांना नवे हातमोजे आणि मास्क पुरविण्याचे साधे सौजन्य शासनाने दाखवलेले नाही.


एका कर्मचाऱ्याने तर असा आरोपच केला की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल सरकारी कर्मचाऱ्यांना ७ दिवसांची सुट्टी जाहीर केली होती. पण लागलीच त्यांच्या असे लक्षात आले की सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कर्मचारी देखील आले. त्यांनाही सुट्टी दिल्यानंतर घाण कोण साफ करणार? त्यामुळे लागलीच स्वतः जाहीर केलेला निर्णय त्यांनी फिरवला आणि सुट्ट्या देणार नाही असं जाहिर केलं. सफाई कामगार असलो तरी सरकारी कर्मचारी आहोत त्यामुळे उघडपणे बोलता येत नाही असं देखील ते म्हणाले. 
दुसरा एक कर्मचारी जो कंत्राटी तत्वावर कचरागाडीवर काम करत होता त्याचं म्हणणं तर याहून वेगळं होत.आम्ही कंत्राटी कामगार असल्यामुळे आम्हाला कुठलीही सवलत नाही. पगारी सुट्ट्या नाहीत. जीवाचं काही बरं वाईट झालं तर विमा नाही की भरपाई नाही. कामावर आलो नाही तर दिवसाचा रोजगार बुडेल, घरातले उपाशी राहतील,त्यामुळे जीव मुठीत घेऊन कामावर यावं लागत. 

या प्रातिनिधिक स्वरूपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या भावना होत्या. देशभरातील सर्वच कामगारांच्या याच भावना असतील. प्रधानमंत्री मोदींनी करोनाच्या विरोधात कंबर कसून काम करणाऱ्या डॉक्टरांचे अभिनंदन केले, त्यांचं कौतुक केलं. परंतु साफसफाईची जबाबदारी डोळे झाकून ज्यांच्यावर टाकली त्यांना मात्र दुर्लक्षित केलं. मागच्याच वर्षी अलाहाबादेत प्रधानमंत्री मोदींनी आपल्या हाताने सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले आणि त्याच मोठ्ठ मार्केटिंग केलं. परंतु आज हेच सफाई कर्मचारी जीवावर उदार होऊन आपलं कर्तव्य बजावत आहेत तेव्हा आपण त्यांना दुर्लक्षित केलंय ही वस्तुस्थिती आहे.


विचार करा सफाई कर्मचाऱ्यांनी देखील वर्क फ्रॉम होमची मागणी केली तर काय होईल? एका दिवसात आपली शहरं कचराकुंडी बनतील,जी करोनाची निमंत्रक असतील.सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुवून फायदा नाही, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं अधिक महत्वाचं आहे. 

जगभरातील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना सलाम!

No comments:

Post a Comment