आज महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल लागला. या निकालात लढाऊ तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने निवडून आल्याचं आशावादी चित्र तर आहेच. सोबतच जळगावच्या भादली बुद्रुक गावातून अंजली पाटील ही तृतीयपंथीय उमेदवार देखील निवडून आलीये. अंजलीचं निवडून येणं हे अनेकार्थाने महाराष्ट्राच्या जनतेला समजून घ्यावं लागेल. प्रत्येक नवनिर्मितीमागे संघर्ष हा असतोच. याच संघर्षातून अंजलीला देखील जावं लागलं.
निवडणूक अधिकाऱ्यांनी तिचा अर्ज नाकारला होता. तिने स्त्री राखीव वार्डातून आपला उमेदवारी अर्ज भरला होता. आपली ओळख 'तृतीयपंथी' सांगणाऱ्या अंजलीला मात्र जुन्या कायद्याच्या आधारे या राखीव जागेवर निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवल गेलं. ज्यांच्या हाती प्रशासकीय सत्ता आहे त्यांनाच जर नवीन कायदे माहिती नसतील तर मनस्ताप हा सामान्य नागरिकांनाच होत असतो हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. अंजलीच्या बाबतीतही तेच झालं. तिसऱ्या महिला आयोगाने महिलांप्रमाणेच तृतीयपंथीयांना सवलती दिल्या जाव्यात असा निर्वाळा केला होता. तसेच २०१९ च्या कायद्यानुसार कुठलीही सज्ञान व्यक्ती आपले लिंग निश्चित करू शकतो/शकते हे ही सरकारी अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं. अशावेळी अंजलीची मैत्रीण, समलैंगिक हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती शामिभा पाटील ही तिच्या पाठीशी उभी राहिली. तिने सरळ औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करत कायद्याचे दाखले न्यायपिठासमोर सादर केले. न्यायालयात मानवी हक्काची लढाई अंजली जिंकली. तिचा अर्ज वैध ठरवला गेला आणि तिला निवडणूक लढवण्याची संधी मिळाली.
भादलीचे ग्रामस्थ अंजलीची ही चिकाटी न्याहाळत होते. विकासाच्या गप्पा केवळ दाढीची लांबी आणि छातीची रुंदी बघून होत नसते हे त्यांना चांगलच ठाऊक होत. अंजली आरोग्य, शिक्षण, समानता या मुद्द्यावर प्रचार करत होती. लोकांनी तिची तळमळ ओळखली. खोटेपणाचा आलाप जसा कर्कश भासतो तसाच खरेपणा सोन्यासारखा चकाकत असतो. अंजली आणि शामिभा या दोघीही वंचित बहुजन आघाडीचं काम करतात. ऍड.प्रकाश आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही निवडणूक लढवली होती. वंचित समूह घटकांना अजूनही मानवी हक्कांसाठी लढावं लागतं आणि जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हे अनेकांनी पाहिलंय. जातीपातीच्या भिंतींना आता कुठे हादरे बसू लागले आहेत. लिंगाधारित समतेवर, त्यातही समलैगिंकतेवर बोलणं अजूनही पाप समजलं जात अशा समाजात अंजलीचं निवडून येणं ही नव्या युगाची नांदी आहे. महाराष्ट्रात विजयी झालेली अंजली ही एकुलती एक तृतीयपंथी उमेदवार आहे. तिचे मनापासून अभिनंदन!
समतेच्या, समानतेच्या चळवळीत अंजली आणि शामिभा सारख्या लढाऊ कार्यकर्त्यांनी सूत्रे हाती घेतली तर येणारा काळ प्रत्येकासाठी संधीची समानता घेऊन येईल.काल-परवा पर्यंत आपापल्या मुद्द्यावर एकएकटे लढणारे हे जीव संसदीय लोकशाहीत पाऊल ठेऊ मागतायेत, याचाच अर्थ मुकनायकाच्या शब्दाची धार येत्या काळात आणखी वाढणार आहे.

खूपच छान. लढवयी अंजली आपला अभिनंदन💐✌️
ReplyDelete1 number god bless you congratulations!
ReplyDeleteCongratulations
ReplyDelete