समर खडस यांना पत्र




















प्रती,
मा. समर खडसजी,
वरिष्ठ सहाय्यक संपादक,
महाराष्ट्र टाइम्स

विषय: मंजुळेजी, फुले-आंबेडकरांनी असे केले असते का? या आपल्या लेखाबाबत.

नमस्कार !
आपला लेख वाचला.म्हटल आपल्याशी या विषयावर बोललं पाहिजे.एखाद्या विषयाबद्दल मत मांडण्याचा जसा आपल्याला घटनादत्त अधिकार आहे, तसाच तुमच्या वादाला प्रतिवाद देण्याचा  मी माझा अधिकार समजतो म्हणून हा लेखनप्रपंच करतो आहे. मी नागराज मंजुळेचे वकीलपत्र घेवून बोलेल अस तुम्हाला वाटण्याची दाट शक्यता आहे ,तेव्हा मी 'भक्त' प्रवर्गातला नाही हे अगोदरच जाहीर करतो म्हणजे मला बोलायला आणि तुम्हाला समजायला सोपे जाईल.
आपले म्हणणे आहे कि, "अर्धशिक्षित गरीब बाईच्या आयुष्यात काय भोग वाट्याला आले याचा काडीमात्र विचार भक्तांपैकी कुणीही केला नाही".व्यवहारी जगात स्रीला कायम दुय्यम स्थान दिले गेले आहे, हे जसे तुम्हाला मान्य आहे तसेच मलादेखील. हे नाकारण्याइतके करंटे आपण  नक्कीच नाही.बाई अर्धशिक्षित राहिली कि काय होत हे या प्रकरणातून दिसतय. तेव्हा कायद्याने घटस्फोट झालेल्या बाईशी तिच्या पूर्वाश्रमीच्या नवऱ्याशी नेमका कसा व्यवहार असायला हवे हे तुम्ही सांगायला विसरलात सोबतच नागराज मंजुळेवर तोंडसुख घ्यायला मात्र तसूभर जागा ठेवली नाही. 'स्रीसक्षमीकरण' आणि 'स्रीमुक्ती' या दोन वेगवेगळ्या गोष्टीत आपला गोंधळ उडालेला दिसतो आहे. तस पाहिलं तर मंजुलेंचा विवाह हा काही आंतरजातीय नाही.तो सजातीयच होता.त्यामुळे आपण डॉ. आंबेडकर लिखित 'कास्ट ईन इंडिया' या शोधनिबंधाचा उल्लेख करून काय सध्या करू पाहता आहात हे कळाले नाही.
या शोधनिबंधात बाबासाहेब म्हणतात कि, गटांतर्गत विवाह करणाऱ्या रूढीने गटबाह्य लग्न करण्याच्या रूढीवर मिळवलेला विजय म्हणजे जातीची निर्मिती होय.जातीत परावर्तीत होऊ इच्छिणाऱ्या लोकसमूहाला त्यांच्यातील स्री-पुरुष संख्येत समानता राखणे हे अनिवार्य ठरते.लग्नपद्धती टिकून ठेवायची असेल तर लोकांचा लग्नविषयक अधिकार त्यांना गटातल्या गटात पूर्ण करता आला पाहिजे.नेमका हा मुद्दा घेवून 'सैराट' आला. 'आंबेडकर' हे नाव ऐकून ज्यांना दचकायला होत, त्यांना हा विचार पटणार तरी कसा? ऋतिक रोशनच्या बायकोला  पोटगीदाखल काय काय मिळाल याचा प्रश्न आपल्याला पडत नाही, कारण तो एका 'क्लास' चा विषय असतो, त्यात आपले काय काम असा उक्तिवाद केला जातो. मात्र गल्लेभरू(आपलाच शब्द) दिग्दर्शकाच्या खाजगी आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्याच्या सुलभ मानवी भावनेला परिपूर्ण न्याय देण्यास आपल्याला बरोबर जमले. सवर्ण स्रीला कायम लिंगभेदाशी संघर्ष करावा लागतो तर दलित स्रीला जातिभेद आणि लिंगभेद असा दुहेरी संघर्ष करावा लागतो. नागराजच्या घटस्फोटीत बायकोला या दोघांपैकी नेमका कोणता संघर्ष करावा लागतो आहे हा तुमचा संशोधनाचा विषय का झाला नाही कुणास ठावूक?
आपले आणखी एक म्हणणे आहे कि,जातीय शोषणाच्या चर्चा करणारे किंवा जात अत्याचाराच्या विरोधात रणशिंग फुंकल्याचा आव आणणारे या चर्चा व आंदोलनातही कायम स्त्री मुक्ती वजा करूनच ती चर्चा करतात.मला वाटते आपला हा फार मोठा गैरसमज झालाय. शतकातील क्रूर हत्याकांड अशी ज्या हत्याकांडाची ओळख करून देता येईल अशा खैरलांजी हत्याकांडात तथाकथित स्रीवादी कार्यकर्त्यांचे मेणबत्ती मोर्चे निघाले नाहीत त्यासाठी जातीय शोषणाच्या चर्चा करणाऱ्या लोकांनाच संघर्षाचा मार्ग पत्करावा लागला हे सत्य तुम्हीदेखील नाकारु शकत नाही. डेल्टा मेघवाल या दलित मुलीची राजस्थानमध्ये बलात्कार करून हत्या झाली त्यावेळी आपली लेखणी आपण स्रीवादी भूमिकेतून का झिजवली नाही हा प्रश्नदेखील निरुत्तर आहे.फुले आंबेडकर यांचे नाव घेतल्यानंतर वागण्यात काहीपथ्ये पाळावी लागतात,असे तुमचे म्हणणे आहे , परंतु नेमकी कोणती पथ्ये पाळायला हवी यासाठी आपण यादी दिलेली नाही तेव्हा कृपया करून ही तयार करावी, जेणेकरून देशातील तमाम घटस्फोटीत पुरुषांना ती कामी येईल.एकदा कि फुले-आंबेडकर विचारांच्या शाळेत दाखल झालो कि घटस्फोट घ्यायचा नाही असा काहीसा मतितार्थ आपल्या लिखाणाचा आहे असे समजते. तेव्हा लिव-ईन-रिलेशनशिपला तर आपल्या विचारप्रणालीत जागाच नसेल असे दिसते.याबद्दलही आपल्याकडून जाणून घ्याला आवडेल. माणूस हा समाजशील प्राणी आहे, तेव्हा आपल्या सारख्या समाजाचे कायम भले पाहणाऱ्या व्यक्तीकडून समाजात घटस्फोटीत स्री-पुरुषाबद्दल काय आचारसंहिता असायला हवी हे जाणून घ्यायला आवडेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या 'कास्ट ईन इंडिया' या शोधनिबंधाचा शेवट करताना म्हणतात कि, बंडखोर विचारवंत धर्मसंप्रदायाच्या स्वरुपाची जात निर्माण करत असतो. जातीचा भंग करण्याचे धाडस करणाऱ्या पापी माणसासाठी जातीजवळ दया-मया नसते. बहिष्कार हा त्याला दंड असतो व त्याचा परीणाम म्हणून नवी जात निर्माण होते. जातीबहिष्कृत लोक नवी जात निर्माण करतात, त्याला कारण आहे ती आपली समाजव्यवस्था. सैराटमध्ये माणुसकीच्या आधारावर फुलू बघणारी 'जात' रक्ताच्या अभिषेकाने संपवली जाते, तर तुमच्या  'मंजुळेजी, फुले-आंबेडकरांनी असे केले असते का?'  या प्रश्नाने तुम्हीच  'मंजुळे' नावाची एक नवी जात निर्माण करता आहात,ते देखील फुले आंबेडकरांचे नाव घेवून.यानिमित्ताने एक मात्र पक्क जाणवलं कि, जब्याने मारलेला दगड ज्या ज्या लोकांच्या जिव्हारी लागला होता त्या सगळ्यांनी या निमित्ताने छोटे-छोटे दगड,विटा घेवून परतफेड करण्याचा लाजीरवाणा प्रयत्न केला.असो,माझे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केलाय,तुम्हाला पटलेच पाहिजे हा आग्रह नाही.

जय भीम ! जय जगत!

-सागर भालेराव

No comments:

Post a Comment