अस्पृश्यतेची विहीर - विषमतेच एक स्मारक

             
   स्वतंत्र भारताच्या संविधानानुसार कलम १७ अन्वये घटनाकारांनी ही गोष्ट जाहीर केली कि या देशातून मानवतेला काळिमा फासणारी 'अस्पृश्यता' नष्ट केली गेली आहे. सगळीकडे उत्साह होता, नव्या दमाने आपला देश आता विकासाची वाट धरू पहात होता. मनूच्या कायद्याने सांगितलेले जाचक नियम २६ नोव्हेंबरला १९५० ला लाथाडून एक नवी सुरुवात आपण केली. ज्या घटनाकारांनी स्वतः अस्पृश्यतेचे चटके सोसले त्यांनी कुठलाही लवलेश न ठेवता, सुडाचे राजकारण न करता प्रत्येक भारतीय नागरिकाला 'एक व्यक्ती-एक मत' आणि  'एक मत-समान मुल्य' हे तत्व दिले. या घटनेला आता ६५ वर्षे उलटून गेली. काय घडलं गेल्या ६५ वर्षात? घटनाकारांना अपेक्षित असलेला सामाजिक न्याय आपण प्रस्थापित करू शकलो? नेणीवेत असलेल्या जातीला मूठमाती देण्याचा खरच आपण प्रयत्न केला?



आज हे सगळे प्रश्न पडतायेत याच कारण म्हणजे काल परवा बातमी वाचली कि गावातल्या सवर्णांनी (तथाकथित, आता ही पद्धत फक्त बोलीभाषेत आहे, त्याला संविधानिक महत्व आणि अर्थ नाही) बापूराव ताजने नावाच्या एका दलित व्यक्तीच्या बायकोला विहिरीवरून पाणी भरू दिले नाही म्हणून ईर्षेला पेटलेल्या या पट्ठ्याने तब्बल ४० दिवसात चक्क विहीरच खोदली!
त्याने खोदलेल्या विहिरीला भला मोठा गर्भित अर्थ आहे अस मला वाटत. महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना खरे तर माणुसकीचे दर्शन घडायला हवे परंतु हा संस्कार आपल्या समाजात अजून पूर्णपणे रुजलेला नाही हे जळजळीत सत्य मान खाली घालून स्वीकारावे लागेल. पाण्यासाठी संघर्ष हा काही या समुदायासाठी नवा नाही. चवदार तळ्याचा सत्याग्रह इथल्या सनातनी परंपरेची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार होता. किंडेमुंगे जे पाणी पितात त्या पाण्यावर हाडामासाच्या माणसांचा अधिकार असू नये ही गोष्टच मुळात तर्कबुद्धीला पटणारी नव्हती, पण ज्यांची बुद्धी हजारो वर्षापासून स्वर्ग-नरकाच्या संकल्पनेत गहाण पडली आहे त्यांचे प्रबॊधन होण्यासाठी अशा किती विहिरी खोदाव्या लागणार आहे कोण जाणे? हा सगळा विचार करता पाण्यासाठी संघर्ष करणारे बाबासाहेब आंबेडकर आणि अस्पृश्यांसाठी आपली खाजगी विहीर खुले करणारे जोतीराव फुले त्यामुळे या देशाचे  खरेखुरे महात्मा आहेत.

जातीचे वास्तव जो व्यक्ती नाकारतो त्याला खरे तर येरवड्याच्या जेलमध्ये नेवून विजेचे झटके देणे गरजेचे आहे नाही तर बापूराव ताजने सारख्या असंख्य मानवतेच्या विहिरी खोदण्यासाठी कामाला जुंपवण्याची  गरज आहे. पैकी पर्याय दुसरा अधिक संयुक्तिक वाटतो. आरक्षणाच्या मुद्द्यावरून तोंडाला फेस येवूपर्यंत वाद-प्रतिवाद करायचा मात्र सामाजिक न्यायासाठी तसूभर आपली अक्कल झिजवायची नाही अशी आजच्या समाजाची गत आहे. बापूरावने खोदलेली विहीर ही त्यामुळे भारतातील विषमतेचे एक स्मारक आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये. हे स्मारक येणाऱ्या काळात भावी पिढीला त्यांच्या पूर्वजांनी काय काय चुका केल्या हे ओरडून सांगणार आहे. बापूरावने खोदलेल्या विहिरीला पाणी लागल, पण दगड काळीज झालेल्या माणसांना पाझर कधी फुटेल माहित नाही. आत डोकावून पाहिलं कि समजते ही विषमतेची विहीर दिवसेंदिवस खोलवर जाते आहे, खोल. एकदम खोल. जिच्या बुडाशी निर्वात पोकळी आहे. तिचा रस्ता कुठे जातो माहित नाही. शेवट कुठे आहे माहित नाही. आदिमकाळात ही विहीर आपल्याला घेवून जाते. माणूस जेव्हा समाजशील प्राणी झालेला नव्हता त्याही  पलीकडे ही विहीर आपल्याला घेवून जाते. हळूहळू डार्विन -दुर्खीम मागे पडतात,बुद्धाची करुणामय आर्त हाक ओझरती कानावर पडते. पाठीमागून एक आवाज मात्र सदैव तुमचा पाठलाग करतो ,तो आहे १२५ वर्षांचा उत्क्रांत झालेला आवाज, जो ओरडून सांगतो, मागे फिरा! समतेच्या वाटेने या जगाचा उद्धार होईल,अंधाराकडे जाल तर विनाश आहे. उजेडाकडे चला.  गर्तेत जाल तर दरवेळी तुम्हाला त्यातून काढण्यासाठी मी असेलच असे नाही. आता या विहिरी तशाच ठेवायच्या कि बुजवायाच्या हे आपल आपण ठरवायचय. आतामात्र ठळकपणे ऐकू येणारा आवाज काहीसा अस्पष्ट ऐकू येतोय!
         

No comments:

Post a Comment