बेझवादा विल्सन यांना या वर्षीची मॅगसेसे पुरस्कार जाहीर झालाय. त्यांचे अभिनंदन!
बऱ्याच लोकांना अजूनही बेझवादा विल्सन यांचे नाव माहिती नाही, त्यांचे कार्य काय हे देखील माहिती नाही. प्रत्येकाला ते माहिती हवे असा हट्ट नाही, पण त्यांचे कार्य माहिती नाही याची खंत मात्र नक्की आहे. कर्नाटकात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ बेझवादा विल्सन नावाचा माणूस, हाताने मानवी मैला साफ करणाऱ्या सफाई कामगारांच्या हक्कासाठी लढतो आहे.त्याची आणि माझी पहिली भेट झाली ती आमिर खानमुळे. 'सत्यमेव जयते'च्या पहिल्या पर्वात अस्पृश्यतेचा विषय घेऊन एक कार्यक्रम सादर केला गेला होता.त्या कार्यक्रमात बेझवादा मला पहिल्यांदा भेटले. त्यांची पोटतिडकी त्यावेळी दिसली, नुसती दिसलीच नाही तर ती जाणवली देखील. चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शूद्रांना जी काही कामे ठरवून दिलेली आहे, तीच कामे आजच्या लोकशाही युगात देखील दलित समाजाकडून करून घेतली जातात. उदाहरण बघायचे झाल्यास कर्नाटकातील कोलार गावी तुम्ही जाऊन बघू शकता. कोलार हे बेझवादा विल्सन यांचे गाव. त्या गावात अजूनही लोकांचा मैला हा तिथले दलित लोक हाताने साफ करतात. हे चित्र पाहिलं कि मॅग्ना कार्टा टराटरा फाडावासा वाटतो, मानवी हक्काची सनद धगधगत्या अग्नीत पेटवून द्यावीशी वाटते. 21 व्या शतकाच्या उंबरठ्यावर जिथे आपण महासत्तेची स्वप्ने बघतो आहोत, तिथे या दलित,श्रमिक वर्गाचा आणि जातीचा आपण विचार कधी करणार आहोत? विकासाच्या प्रक्रियेत हे लोक नेमके आहेत कुठे? यांचा नेमका वर्ग कोणता? स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय हि संविधानाची मूल्ये या समाजासाठी आहेत कि नाही? कि अजूनही लोकशाही प्रक्रियेत आपण त्यांचा विटाळ धरतो आहोत?
स्वच्छ भारत अभियान केंद्र सरकारमार्फत देशभरात राबवलं जातंय. आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे यात दुमत असण्याचे कारण नाही. चांगल्या गोष्टीचा विरोध करणे करंटेपणाचे लक्षण आहे,ते मी करणार नाही. पण हे अभियान राबविताना सफाई कामगारांच्या समस्या हे सरकार कसे दुर्लक्षित करू शकते? हातात झाडू घेऊन रस्ते साफ करणारे अमिताभ बच्चन, नीता अंबानी, स्मृती इराणी व अन्य लोक आणि सोबतच प्रधानसेवक मोदीजी आपल्या हाताने मानवी मैला साफ करायला तयार होतील काय? स्वच्छतेत कशाला अस्पृश्यता असायला हवी? वरवरची आपुलकी दाखवून प्रश्न सुटतील काय? अजिबात नाही! त्यासाठी सरकारी पातळीवर जसे कार्यक्षम निर्णय घेण्याची गरज आहे, तशीच संपूर्ण समाजमन बदलणे आवश्यक आहे. बेझवादा विल्सन यांची चळवळ ही केवळ त्यांची चळवळ राहता काम नये. ती लोकचळवळ व्हावी. आरक्षणाच्या मुद्दयांवरून कायम दलितांना टारगेट केलं जात. सफाई कामगार म्हणून तर दलितांना इथे 100% आरक्षण असत ,तिथे आपल्या समाजाला आरक्षण हवं म्हणून कोणी सवर्ण समाज आंदोलन करताना दिसत नाही. तेव्हा, जातीअंताची मांडणी न करता, समतेची भाषा न करता जे सवर्ण आरक्षणाची मागणी करतात त्यांची खरी मानसिकता यातून प्रतीत होत असते. आजवर वेळोवेळी ती झालेली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रकर्षाने ज्या घटनेचा उल्लेख केला पाहिजे ती घटना म्हणजे गुजरातमध्ये कातडी कामविणाऱ्या दलित युवकांना झालेली अमानुष मारहाण. कातडी कमविणे हा तसा वर्णव्यवस्थेने सांगितलेला जातिगत व्यवसाय. मेलेल्या गाईची कातडी कामविणाऱ्या 4 दलित तरुणांना गाडीला बांधून अमानुषपणे मारहाण केली गेली. गाई सारख्या जनावराला देवत्वाची वागणूक आणि हाडामासाच्या माणसांना अशी निर्दयी मारहाण कुठल्या मानवी मूल्यात बसते माहीत नाही. देशाच्या पंतप्रधानांना देखील याचे उत्तर माहिती नसेल, म्हणून कदाचित ते या प्रश्नावर गप्प आहेत. देशोविदेशी दौरे करताना भारतभूमी ही गांधी आणि बुद्धाची भूमी आहे असे सांगायचे, मात्र देशात अखलाक मारला जातो, मोहसीन शेखची हत्या केला जाते, दलितांना अमानुष मारहाण केली जाते आणि बेजवादा विल्सनला आपल्या मानवी हक्कासाठी अजूनही झगडावं लागत ही निंदनीय गोष्ट आहे.
हाताने मैला साफ करणारी महिला कामगार
23 वर्षांपूर्वी माणसांकरवी मैला साफ केला जाऊ नये यासाठी कायदा केला गेला.कायदा अस्तित्वात आला तो कागदावर.त्याची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही.गेल्या 2 वर्षात 1268 सफाई कामगार हे आरोग्याच्या समस्येमुळे मरण पावले असा अहवाल बेझवादा यांनी सरकारला सादर केलाय.
सामाजिक न्यायाची बीजे ज्यांनी संविधानात रोवली त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीनिमित्त 35,000 किलोमीटरचा प्रवास करत सफाई कर्मचारी आंदोलनातील लोक दिल्लीला पोहोचले होते. आपल्या समस्या घेऊन त्यांनी 13 एप्रिल 2016 ला दिल्ली गाठली. मात्र त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी कोणाही तथाकथित दलित नेत्याला वेळ नव्हता.ज्या बाबासाहेब आंबेडकरांना हायजॅक करत संघाने केंद्रात सत्ता स्थापन केली,त्यांना याबद्दल सोयरेसुतक नव्हते. बाबासाहेबांशी आपलं नातं सांगत हे लोक पुन्हा आपल्या आपल्या गावी पोहोचले.देशात मोठ्या उत्साहात भीमजयंतीचा जल्लोष होता.आपले बांधव मात्र तेव्हा हाताने कुणाचा तरी मैला साफ करत होते, आताही करत आहेत.
बेझवादा विल्सन यांचा सन्मान देशाची वेगळी ओळख आता जगाला देणार आहे, इथे अजूनही अशा अमानवी प्रथा चालतात हे आता सगळ्या जगाला कळले आहे.ही नक्कीच शरमेची बाब आहे. बेझवादा यांच्या कार्याची दखल जागतिक स्तरावर घेतली गेली, भारतीय समाज मात्र अजूनही याबद्दल अनभिद्न्य आहे.आम्ही शिकलेले लोक तुमच्या कामी येऊ शकलो नाही याची खंत आहे. आमचे सुख तुमचे व्हावे, तुमचे दुःख आमचे व्हावे असं म्हणू तरी कसं? तुमच्या समाजाचं दुखणं कुणाच्याही नशिबाला येऊ नये. मी तुमचं दुःख वाटून घ्यायला तयार नाही, मीच काय या देशातला कोणीही माणूस ते घ्यायला तयार होणार नाही हे खात्रीपूर्वक सांगतो. माफ करा आम्हाला.
आम्ही तुमचं अभिनंदन तेवढं करू शकतो,यापेक्षा अधिक काही करण्याची आमची माणुसकी केव्हाच गोठलेली आहे.


No comments:
Post a Comment