कोपर्डी
: संवादाची प्रक्रिया वाढायला हवी
२४ जुलै रोजी कोपर्डीला भेट दिली.
भेट देण्याशिवाय बाकी काय करू शकतो आपण? कुणाही मानवी मनाला चीड़ येईल असे कृत्य कोपर्डीमधे
घडले. या अमानवी कृत्यामुळे काही काळातच नगर जिल्ह्यातील हे गाव देशाच्या नकाशावर झळकायला
लागले. अहमदनगर जिल्हा प्रसिद्ध आहे तो सहकार चळवळीसाठी, मात्र अलिकडच्या काळातली या
जिल्ह्याची ओळख म्हणजे दलित अन्यायग्रस्त जिल्हा म्हणून. जिल्ह्यात सत्ता, संपत्ती
आणि प्रतिष्ठा यांच्या अहंगंडापाई अनेकदा अमानुष अत्याचार घडले आहेत, घडत आहेत. या
सगळ्या पार्श्वभूमीवर कोपर्डीचे बलात्कार प्रकरण वेगळे ठरते. या प्रकरणात आरोपी हे
तथाकथित 'दलित' समाजातले आहेत,पहिल्यांदाच असे घडलेय. या अगोदरच्या सगळ्या प्रकरणात
चित्र नेमके उलटे होते.
झाल्या प्रकारणाचे समर्थन बुद्धी
ठिकाणावर असलेला कोणताही व्यक्ति करू शकत नाही. ज्या क्रूर पद्धतीने त्या कोवळया मुलीची
विटंबना केली गेली ती घटना मानवी समुहाची 'माणूस' म्हणून उत्क्रांती होणे अजुन बाकी
आहे असे सांगणारी आहे.
कोपर्डीत पोहोचताना अगोदर कुळधरण
नावाचं गाव लागते. या गावात 'जगदंब' नावाची एक माध्यमिक शाळा आहे, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या
सदस्य असलेल्या कोणा नामी व्यक्तीची ही शाळा आहे. ही शाळा ते कोपर्डी हे अंतर सुमारे
4 किलोमीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी. जीव मुठीत घेवून इथल्या महिला, मुली
या मार्गावरुन प्रवास करतात. गावात दारुचे अड्डे आहेत, दारू पिऊन या झाड़ाझुडपात गावातले
रिकामटेकड़े बसलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर,महिलांवर अश्लील शेरेबाजी इथे
अगोदर पासून होत होती. पोरीची 'जात' म्हणून घरच्यांनी अगोदर दुर्लक्ष केले, आणि त्याचे
पर्यवसान म्हणजे कोपर्डी प्रकरण!
या प्रकरणातला मुख्य आरोपी हा
तरबेज गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे, या अगोदर त्याने एक खून पचवलाय, 3 लग्न केली आहेत.
त्याच्या या कृत्यांचा गावकऱ्यांना अंदाज होता, वेळीच पाऊल उचलले असते, पोलिसांनी त्याला
वेळीच चाप घातला असता, तर आज नगरची निर्भया जिवंत असती. असो, हे झाले बोलण्यासाठी.
प्रत्यक्ष प्रकरण आता वेगळ्या थराला गेले आहे. मराठा विरूद्ध दलित असा वाद यानिमित्ताने
उभा राहिला आहे. कोपर्डीतले सगळे दलित लोक सध्या गावातून भूमिगत आहेत. गावात वातावरण
तणावपूर्ण असल्याने त्यांनी इतर ठिकाणी आसरा घेतलाय. समुहातील एका माणसाच्या चुकीमुळे
इतरांना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. ही परिस्थिती त्यांनी स्वतः निर्माण केली
आहे. वेळीच सगळ्या समाजबांधवांनी अशा उपद्रवी लोकांना जरब बसवली असती तर एवढी मोठी
घटना घडलीच नसती.
पीड़ित कुटुंबियाना भेटायला गेलो
असता, पीड़ित मुलीचे चुलत आजोबा प्रथम भेटतात. त्यांच्या शर्टला 'शेतकरी संघटने'चा
बिल्ला असतो, विचारल्यावर सांगतात की शरद जोशींच्या समवेत त्यांनी काम केले आहे.
घरात एकूणच चळवळीची पार्श्वभूमी. पीड़ित मुलीचे मामा, मावशी उच्चशिक्षित आहेत. झाल्या
प्रकरणावर कमालीचा संयम त्यांनी बाळगला आहे त्याच्या मागे ही कारणे आहेत. पीड़ित मुलीचे
प्राध्यापक असलेले मामा सांगतात की, आमची मुलगी तर गेली परंतु इतर मुली वाचल्या पाहिजेत
म्हणून काय प्रयत्न करता येईल ते बघा.
मुलीचे चुलत आजोबा मात्र सरकारी
यंत्रणेवर आणि आरोपींवर आगपाखड़ करतात, ते स्वाभाविक आहे. अॅट्राॅसिटीचे संरक्षण
दलितांना असल्यामुळे ते असे प्रकरण करायला धजतात असे त्यांच म्हणणे आहे. या अगोदर त्या
आरोपीने गावातल्या लोकांना अॅट्राॅसिटीच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या
दिल्या होत्या. कायद्याची कवचकुंडले असलेली ही हत्यारे आपलीच लोक कशी बोथट करतात याचे
आणखी एक उदाहरण पहायला भेटले. या अगोदर देखील अशा घटना मी स्वतः पाहिलेल्या आहेत, बघतो
आहे.
या सगळ्या प्रकरणात एक नाव कायम
चर्चेत राहीले, ते म्हणजे शिवप्रहार या संघटनेचे संजीव भोर पाटिल यांचे. त्यांची भूमिका
जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांचे म्हणणे आहे की,अॅट्राॅसिटी कायदा रदद् केला पाहिजे
असे आपले मत नाही, पण त्याचा दुरूपयोग होऊ नये ही आपली मागणी आहे. जवखेड़ा हत्याकांडाचे
ते प्रकर्षाने उदहारण देतात. या प्रकरणात आरोपी हे पीड़ित कुटुंबातलेच निघाले, मात्र
चौकशी होण्याच्या अगोदरच संपूर्ण मराठा समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल गेल,
हे चुक असल्याचं ते सांगतात. सोनई हत्याकांडाबद्दल देखील त्यांचे गंभीर असे आरोप आहेत,
नितीन आगे खून प्रकरणात तथाकथित दलित नेत्यांनी अॅट्राॅसिटी कलम लागू नये यासाठी आरोपींसोबत
'अर्थ'पूर्ण व्यवहार केले आहेत असेही त्यांचे म्हणणे आहे. या गोष्टीत तथ्य असू शकते.
अहमदनगरचे दलित राजकारण मी स्वतः जवळून पाहिले आहे, त्यामुळे याची शक्यता नाकारता येत
नाही असे मत मी व्यक्त करू शकतो.
या सगळ्या गोष्टीचे माइलेज मिळवण्याचा
प्रयत्न आता दलितविरोधी संघटना घेत आहे हे नक्की. अगोदरच्या काळातली घडलेली प्रकरणे
बघता, या प्रकरणात त्याचा वचपा काढण्याची संधी कोणी सोडलेली नाही.
रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर
यांना कोपार्डीमधे येण्यास मज्जाव करणे हा त्याचाच एक भाग. घडल्या प्रकारणानंतर ज्यांच्याकड़े
दलित समुदायाचे नेतृत्व म्हणून बघितले जाते त्यांच्याकडून, प्रकरण घडून गेल्यानंतर
7 दिवसांनी देखील काही भूमिका घेतली जात नाही हे त्यामागचे कारण. या बलात्कार प्रकरणाची
गांभीर्याने दखल घेतली गेली असती तर समाजात वेगळा मेसेज गेला असता, जो सामाजिक कलह
रोखण्यास उपयोगी पडला असता. गावकरी देखील ही खंत व्यक्त करतात.
एक गोष्ट प्रकर्षाने सांगावी
लागेल,की या घटनेकड़े जातीच्या चष्म्यातुन न बघता सामजिक मूल्यांतुन बघितले पाहिजे.
मुलीच्या आजोबांचे दारुचे दुकान आहे, याच दारूच्या दुकानातून हे आरोपी दारु पिऊन आले
होते. दारुची व्यसनाधिनता यामागे आहे हे मुख्य कारण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे
मुलीचे सख्खे आजोबा कुणाला भेटत नाहीत, त्यांच्याही मनात ती सल असणार, असायलाच पाहिजे.
या प्रकरणात केवळ जातीचे मेक्यानिज्म
नाही, तर अनेक व्यवस्था काम करत आहेत. तरबेज गुन्हेगाराला पोलिसांची सूट, दारुचा अवैध
व्यापार, लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि स्रीला उपभोग्य वस्तु म्हणून बघण्याचा दृष्टिकोन,
या सगळ्या घटकांचा पदर या घटनेला आहे. त्यामुळे अॅट्राॅसिटी कायदा रदद् झाला पाहिजे
ही मागणी चुकीची आहे, या उलट अॅट्राॅसिटीचा गैरवापर होऊ नये यासाठी मागणी केली तर ती
परिवर्तनवादी चळवळीतले लोक देखील सहज स्वीकारतील इतकी ती वास्तविक आहे.
गावगाड्यातील सवर्ण आणि दलित
यांच्यातील संवादाला मध्यंतरी सुरुवात झालेली होती, पण जेव्हा प्रतिष्ठेच राजकारण आड़
आले तेव्हा सगळे थांबल. मराठा सेवा संघाने केलेला हां प्रयोग लोकांना नवविचार देणारा
होता.परंतु या चळवळीने टोकाचा ब्राम्हणविरोध स्वीकारला तेव्हा मानवी मूल्ये जपणारी
लोक त्यांच्याशी फारकत घेत बाहेर पडले. हीच मानवी मूल्ये जपणारे लोक आज कोपर्डी प्रकरणात
आपला निषेध नोंदवित आहेत.
यथावकाश आरोपींना शासन होईल,
पीड़ित मुलीला न्याय मिळेल. परंतु आपल्या मानसिकतेचे काय? संस्कृतीची वाहक म्हणून स्रीची
पूजा करणारे आपण, लैंगिक वासनेसाठी जर तिचे असे हाल करत असू, तर आपला प्रवास हा पुन्हा
अश्मयुगाकडे जाणारा ठरणार आहे.
पीड़ित कुटुंबियाने आणि कोपर्डी
ग्रामस्थांनी दाखवलेली कमालीची संयमित भूमिका मनावर खोलवर परिणाम करणारी ठरली आहे.
पुढील काळात याचे पर्यावसान कशात होईल हे काही सांगता येत नाही. समाजातल्या प्रत्येक
घटकाने याचा निषेध केला पाहिजे आणि कोपर्डीच्या ग्रामस्थासोबत खंबीरपणे उभ राहीले पाहिजे.
सदर प्रकरणात खंडित झालेली संवादाची प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु झाली पाहिजे. दलित
नेत्यांनी यात पुढाकार घ्यायला हवा आणि वाढलेला दुरावा कमी करण्यासाठी प्रयत्न व्हायला
हवा. पीड़ित मुलगी ही केवळ कोपर्डीच्या लोकांचीच बहिण-बाळ नव्हती. तर आपल्या सर्वांशी
तीच एक नाते होत, ते नाते म्हणजे माणुसकिचे!
आता मात्र हे नाते अधिक घट्ट
व्हावे. बीडच्या प्रकरणात, गुजरातच्या प्रकरणातून त्याची प्रतिक्रिया येऊ नये. कारण
प्रकृतीचा नियम आहे, सुख्यासोबत ओले देखील जळते. आपल्याला लागलेली आग विझवायची आहे,
त्यात तेल घालणे हा मानवधर्म नक्कीच नाही.
-
सागर भालेराव
sagobhal@gmail.com
No comments:
Post a Comment